आपल्या रोजच्या आयुष्यातल्या अनेक वस्तूंबद्दल आपले गैरसमज असतात. आपल्या मनात संभ्रम असतात. म्हणूनच या घटकांबद्दल वास्तव समजून घेणे आवश्यक आहे.
निद्रा विभाग
अपुरी, अकाली व फाजील झोप
चांगल्या आरोग्याकरिता आहार, व्यायामाबरोबर रात्रीची झोप आवश्यक असते. शिफ्ट डय़ूटी, वर्तमानपत्र विक्रेते, हॉटेलमधील नोकर, रेल्वे कामगार, टेलिफोन व हॉस्पिटल स्टाफ, पहारेकरी, ट्रक किंवा बस ड्रायव्हर, वर्तमानपत्रातील रात्रपाळी छापखाना कामगार अशा अनेकांना व्यवसायामुळे अपुरी झोप मिळते. रात्री सहा-सात तास झोपणारा कामगार दिवसा झोपावयाचे असेल तर एकूण चार तासच झोपू शकतो असा निष्कर्ष आहे. दिवसा खूप झोप येऊ शकते असे महाभाग फार थोडे. या कमी झोपेमुळे रक्तदाब, हृद्रोग, पांडू, क्षय, चक्कर, भ्रम, मलावरोध, उदरवात, आम्लपित्त, अल्सर, मूळव्याध, डोळय़ांचे विकार, डोकेदुखी असे नाना विकार उद्भवतात, बळावतात. यावर उपाय असा की, दिवसा ज्यांना झोपावयाचे आहे त्यांनी तळपाय, तळहात, कानशिले यांना चांगल्या तुपाचा हलक्या हाताने मसाज करावा. तसेच नियमितपणे धने-पाणी व साखर असे मिश्रण घ्यावे. त्यामुळे पित्त वा वायूचे विकार बळावत नाहीत.
काही व्यक्तींना कारणाशिवाय केव्हाही झोपायची सवय असते. त्यामुळे मेद, कफ, वायूचे विकार बळावतात. शरीराला जडत्व येते. फाजील रक्तदाब, मधुमेह, आमांश, अग्निमांद्य, मूळव्याध, भगंदर, पोटफुगी, उदरवात, अजीर्ण असे नवे विकार बळावतात. या लोकांना हुशारी वाटत नाही. वेळी-अवेळी झोपल्यामुळे जेवण-खाणही अवेळी होते. एकूण सर्व स्वास्थ्य बिघडते. तरतरी राहत नाही. अवेळी झोप येत असेल तर आल्याचा तुकडा, लवंग, काळी मिरी यापैकी काही चघळावे. झोप पळून जाते. मेंदूचे जडत्व दूर होते.
तरुण माणसांना आठ तास, साठीनंतर सहा तास व सत्तरनंतर पाच तास झोप पुरेशी आहे. फाजील झोपेमुळे रक्तदाब, मधुमेह, स्थौल्य, हृद्रोग, डोळय़ांचे विकार, अजीर्ण, गॅस इत्यादी विकार बळावतात. त्याचबरोबर आयुष्य कमी होते. फाजील झोप म्हणजे कायमच्या झोपेला लवकर आमंत्रण देणे होय. ‘दुपारी जो झोपला, तो संपला.’ मधुमेही, स्थूल व वारंवार सूज येणाऱ्या रुग्णांनी वरील मंत्र लक्षात ठेवावा. दुपारी झोपल्याने आयुष्य कमी होते. इंग्रजीमध्ये एक सुभाषित आहे- अर्ली टू बेड, मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी अ‍ॅण्ड वाईज) सुज्ञ वाचक मित्रांना मी अधिक काय सांगावे?
शय्या विभाग
उशी, गादी
सुमारे दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक तरुण मुलगा माझ्याकडे चक्कर येते या तक्रारीकरिता आला. त्याची तपासणी करता काही दोष आढळेना. त्याला उशी घेऊ नको असा सल्ला दिला. तो त्याने तंतोतंत पाळला व त्या दिवसापासून पुन्हा त्या मुलाला चक्कर आली नाही. याअगोदर अनेक वैद्यकीय सल्लागारांनी त्याच्यावर अनेक औषधांचा मारा केला होता. खराखुरा ‘औषधाविना उपचार’ झाला. गेल्या पंधरा-वीस वर्षांत असंख्य तरुणांना ‘उशी नको’चा आग्रह मी वारंवार करत असतो. विशेषत: तोल जाणे, पडल्यासारखे वाटणे, फेकल्यासारखे वाटणे, झोक जाणे, रक्तदाब कमी होत असेल तर उशी काढली की लगेच बरे वाटायला लागते. उशी न घेण्यामुळे मानेच्या मणक्यांच्या विकारातही खूप आराम पडतो. ‘सव्‍‌र्हायकल स्पॉन्डिलायटिस’ किंवा मानेच्या मणक्यामधील अंतर कमी-जास्त होणे, या तक्रारीत उशी सोडल्याबरोबर बरे वाटायला लागते. विशेषत: हातांच्या पहिल्या व मधल्या बोटाला मुंग्या येणे, मान-खांदा दुखणे, टाइपिंग किंवा लिहिण्याचे सतत, भरपूर काम करणारे लेखनिक, खाली वाकून सातत्याने पोळय़ा लाटणे, मेवामिठाई किंवा इतर वाटणे, रांधणे, फरशा पुसणे इत्यादी स्वयंपाकघरातील कामे करणाऱ्यांना उशी न घेण्याचा फायदा आहे. त्याचबरोबर ‘लो हेड’ किंवा पलंगावर झोपणाऱ्यांनी डोके खाली व पायाकडे दोन विटा लावून मग झोपल्यास मानेचे विकार, चक्कर व रक्तदाब कमी होणे, या तक्रारीत आराम पडतो. मानेच्या विकारात कॉलर हा दागिना घालावयाचा नसेल तर वेळीच, विशेषत: चाळिशीनंतर उशी सोडावी. ‘आपण वरच्या मजल्यावर राहत असलात तर वरून उशी खाली फेकून द्यावी’ असा गमतीदार सांगावा मी माझ्या चक्करग्रस्त रुग्णमित्रांना देत असतो. ज्यांना पाठदुखी, पाठीच्या मणक्यांचा आजार आहे, त्यांनी उशीप्रमाणेच गादीचा त्याग करावा. हार्ड बेड, फळी, ब्लँकेट किंवा कांबळे वापरावे.
उबदार व कठीण अंथरूण
मानेच्या मणक्याबरोबर पाठीचे व कमरेचे मणके दुखावल्यामुळे, त्यांच्या चकत्या झिजल्यामुळे, अंतर कमी-जास्त होऊन तीव्र वेदना, फार वेळ उभे राहता न येणे, जरासे वजन उचलले तरी त्रास होणे, कुशीवर न झोपता येणे असे त्रास सुरू होतात. ‘स्लिप डिस्क’चे ऑपरेशन तज्ज्ञ सर्जन मंडळी सुचवतात. त्यापेक्षा फळी किंवा दिवाणावर ब्लँकेट किंवा कांबळे घालून कठीण, पण उबदार अंथरूण वापरणे आणि गादीचा पूर्णपणे त्याग करणे हा उत्तम उपाय आहे.
पाठीच्या मणक्यांची रचना स्प्रिंगसारखी वर-खाली करता येणाऱ्या टेबल लॅम्पसारखी असते. गादीवर झोपून, गादीचा आकार आतील कापसामुळे कमी-जास्त उंच-सखल होतो व अगोदरचे झिजलेले मणके आणखीनच झिजतात. माझ्या एका शेतकरी रुग्णाचे ठरवलेले शस्त्रकर्म केवळ फळीवर झोपल्यामुळे टळल्याचे उदाहरण आहे. कठीण व उबदार अंथरुणावर झोपल्याने, विशेषत: उताणे झोपल्याने पाठीचे मणके सुधारायला संधी मिळते. ‘गादी फेका, आपली पाठ बचावा.’
विहार विभाग
सगळय़ांच रोगांना ‘खाणे-पिणे’ कारणीभूत असते असे नाही. वेडेवाकडे, अतिरेकी कुपथ्यकारक किंवा कमी खाऊन, कदन्न खाऊन, अवेळी खाऊन अनेक पोटाचे व तत्सम विकार होतात, बळावतात, दुसऱ्या असाध्य रोगांना जन्म देतात. पण आपल्या नकळत आपले कपडे, अंथरूण-पांघरूण, चपला-जोडे अनेक रोगांना आमंत्रण देत असतात. आधुनिक राहणीचे आक्रमण, आजकाल केवळ शहरांपुरते सीमित राहिलेले नाही. लहानसहान गावांपर्यंत टेरिलिन, नायलॉन कपडे पोचलेले आहेत. कापसाचे सुताचे कपडे केव्हाच नाहीसे झाले आहेत. पादत्राणे प्लस्टिक व रबर यांचीच वापरावी लागतात. भरपूर पैसे द्यायचे ठरविले तरी चामडय़ाची पादत्राणे सर्वत्र मिळत नाहीत.
सर्वच प्लास्टिक, रबर, टेरिलिन रोग निर्माण करते असे नाही. पण सुबकता, तलमपणा, नाना आकर्षक रंग, डिझाईनमधील नवलाई व मुख्य म्हणजे या पदार्थाची सेकंड किंवा वापरून वापरून पुन:पुन्हा भट्टय़ा लावून तयार केलेल्या प्लास्टिक व रबर यांच्याबरोबर वापरलेली केमिकल्स अनेक रोगांना जन्म देतात.
टेरिलिनच्या कपडय़ांची अनेकांना अ‍ॅलर्जी असते. या कपडय़ांमुळे शरीरांतून घामावाटे बाहेर पडणारी मलद्रव्ये बाहेर पडत नाहीत. घाम शरीरात साठून राहतो. विशेषत: स्थूल, मधुमेही, रक्तदाब वाढलेले व हृद्रोगी रुग्णांनी टेरिलिन, टेरिकॉट, नायलॉन असे कृत्रिम धाग्याचे कडपे वापरू नयेत. ही मलद्रव्ये त्वचेत साठतात. ज्या वयात हे रोग झालेले असतात, त्या वयात मूत्रेंद्रियांच्या मार्फत मलद्रव्यांचे उत्सर्जन नीट होत नाही. वय साठ-पासष्टच्या पुढे मूत्रेंद्रिय दुर्बल होते. घामावाटे मलद्रव्याच्या बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाला की फाजील चरबी शरीरात साठते. मग रक्तशर्करा, रक्तातील चरबी, युरिक अ‍ॅसिड इत्यादी मळ वाढतात. वर सांगितलेल्या विकारांबरोबर त्वचाविकार सुरू होतात.
असे कापड घालून किंवा प्लास्टिक व रबराच्या चपला घातल्यामुळे त्वचेचे विकार झालेले अनेकानेक रुग्ण गेली चाळीस-पंचेचाळीस वर्षे माझेकडे येत आहेत. त्यांच्या व त्यांना पूर्वी पाहिलेल्या वैद्यकीय चिकित्सकांच्या बहुधा ही गोष्ट लक्षात येत नाही असे चौकशी केल्यावर आढळून येते. कॉटनचे कपडे, चामडय़ाच्या किंवा कापडाच्या सपाता, कापडी मोजे घालावयास सांगितले की त्वचारोगांना उतार पडतो असे पाहिले आहे. मानेवरचा चट्टा, नायटा, अंगावर उठणारे काळे-पांढरे डाग, त्वचेची विवर्णता, काखेत-जांघेत, विलक्षण खाज सुटणे, दीर्घकाळ त्रास देणारा नायटा बळावणे, पावलावर चप्पल लागून होणारे इसब, या विकारांना बऱ्याच वेळा वरील कृत्रिम आवरणे-प्रावरणे, कपडे, चपला-बूट कारणीभूत असतात.
काही स्त्रियांना आकर्षक व घट्ट बॉडीज घातल्यामुळे स्तनांना फोड, पुरळ, पुटकळय़ा झालेल्या आढळतात. काटय़ाचा नायटा होतो. डायरेक्ट त्वचेशी संबंध येत असलेल्या चड्डय़ा, लंगोट, बॉडीज, अंडरवेअर, पोहण्याच्या चड्डय़ा, पायमोजे हे सर्व कॉटनचेच असावे. ज्यांना त्वचाविकार, वृक्कविकार, हृद्रोग, मधुमेह, स्थौल्य, कंड, आग, सूज हे विकार बळावू द्यायचे नाहीत त्यांनी कृत्रिम प्रावरणे वापरू नयेत. त्यांनी कॉटनचे वापरावे.
काहींना अशी कॉटनची महागडी चैन परवडत नाही. त्यांनी काय करावे? कॉटन व टेरिलिन असे दोन्ही धागे असलेले कापडाचे कपडे शिवावेत. टेरिलिनचा कपडा कधीच फाटत नाही, पण त्याचबरोबर त्यामुळे उत्पन्न झालेले त्वचा, घाम, लघवीसंबंधी रोग कायमचे घर करून राहतात. कपडय़ाच्या किमतीच्या अनेकपट पैसा औषधाकरिता खर्च होऊनही रोग तसेच राहतात.
अशीच गोष्ट प्लास्टिक किंवा पॉलिथिलिन पिशव्यांमधील खाद्यपदार्थाची आहे. या पिशव्या दिसायला आकर्षक, वजनाला हलक्या, हाताळायला सोप्या आहेत. पण या पिशव्यांत नेहमीकरिता खाद्यपदार्थ ठेवणे म्हणजे आतडय़ाचे विकार विकत घेणे आहे. फळे, भाजी, कोरडे पदार्थ यांच्याकरिता तात्पुरते पॅकिंग म्हणून वापरणे थोडे क्षम्य आहे, पण नेहमीकरिता या पॅलिथिलिन बॅगच्या वापरांनी पेट्रोलियमधारक द्रव्य आतडय़ांना वण निर्माण करू शकतात.
अलीकडे अनेक खाद्यपदार्थात जेलीयुक्त कृत्रिम रंग वापरण्याची फॅशन आहे. मिठाईला लावलेला वर्ख आकर्षक दिसत असला तरी तो पॉयझन आहे. मिठाई बनविताना टाकलेले लाल, गुलाबी, हिरवे, पिवळे, केशरी इत्यादी रंग म्हणजे लहान मुले व म्हाताऱ्यांच्या पोटाची वाट लावण्याचा नक्की उपाय होय, या रंगांवर बहिष्कार हवा.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा