वर्षभर आरोग्य नीट राखायचे असेल तर त्याचा पाया सप्टेंबर महिन्यात निर्माण करता येतो. म्हणून आरोग्यदृष्टय़ा सप्टेंबर हा महत्त्वाचा महिना आहे.

सप्टेंबर महिन्याच्या स्वास्थ्याकरिता लेख लिहायला सुरुवात करताना मला एकदम ‘कम् सप्टेंबर’ या एके काळी युरोप-अमेरिकेत व आपल्या देशातील रसिकांना आवडणाऱ्या कवितेची आठवण झाली. कवयित्रीचे नाव ‘नताली जेने इंब्रुग्लीया.’ आता संपूर्ण देशात पावसाने तोंड फिरवल्यामुळे तुम्ही आम्ही शहरवासीय व खेडोपाडीचा लहान मोठा शेतकरी पावसाच्या पाण्याअभावी हैराण आहे. कवयित्री म्हणते,

Her violet sky,
will need to cry;
cause if it doesn’t rain,
then everything will die!

काले घना, काले घना,

She needs to heal,
She needs to feel;
something more than tender
Come September
– Natali Jane Imbruglia

या कवितेत म्हटल्याप्रमाणे सारे आकाश निळे-निळे, निरभ्र आहे. ढगांची वानवा, ‘काले घना, काले घना’ यांचा पूर्ण अभाव, साहजिकच पाऊस नाही, त्यामुळे सगळय़ांच्या समोर सर्वनाश, सर्वनाश!
एखाद्या कवयित्रीने जरी अशी नैराश्यपूर्ण भाषा सप्टेंबर महिन्याबद्दल केली असली, तरी प्रत्यक्ष व्यवहार, या सृष्टीचा वेगळाच आहे. सप्टेंबर महिन्याचे वर्णन ‘विसर्ग काल’ या संज्ञेने केला जातो. सप्टेंबर महिन्यात उन्हाळ्यामध्ये सूर्याने घेतलेली ताकद, सूर्य तुम्हा-आम्हाला सव्याज परत देत असतो. या काळात चंद्राचे अधिपत्य असते. स्त्री-पुरुषांच्या दृष्टीने हा उत्तम प्रजनन काल आहे.
१ सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषक आहार सप्ताह म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. २, ३ व ४ सप्टेंबर अनुक्रमे गौरी आवाहन, गौरीपूजन, गौरी विसर्जन असे महिलांकरिता महत्त्वाचे दिवस आहेत. ६ व ७ सप्टेंबर रोजी अनुक्रमे वामन जयंती, गोविंद प्रभु जयंती तसेच विश्वकर्मा जयंतीची आठवण ठेवू या! ८ सप्टेंबर गणेश चतुर्थी, ११ सप्टेंबर विसाव्या शतकातील श्री ज्ञानेश्वर आचार्य विनोबा भावे यांचा जन्मदिन, १४ सप्टेंबर हिंदी भाषा दिन व ज्ञानेश्वरी गं्रथ जयंतीची आठवण ठेवू या. १५ सप्टेंबर आपल्या लाडक्या टीव्हीचा स्थापना दिन तसेच अभियंता दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. जगात सर्वत्र ‘ओझोनचे घटते प्रमाणाचे संकट’ कसे टाळावे, याकरिता १६ सप्टेंबर ओझोन संवर्धन दिन पाळला जातो. २३ सप्टेंबर सर्वपित्री अमावास्या. आपल्या स्वर्गवासी झालेल्या पितरांची आठवण करण्याचा दिवस! त्याला दक्षिण गोलारंभ असेही म्हणतात. २४ सप्टेंबर जागतिक कर्णदिन. २५ सप्टेंबर या दिवशी नवरात्र आरंभ होत असून, थोर स्त्रीसंत मुक्ताबाई व बहिणाबाई यांचा जयंतीदिन मोठय़ा श्रद्धेने साजरा करू या. २८ सप्टेंबर रोजी जगभर हृदय आरोग्यदिन म्हणून साजरा केला जातो. वाचक मित्र हो, हृदयाची काळजी घ्या.

सप्टेंबर महिन्यात उन्हाळ्यामध्ये सूर्याने घेतलेली ताकद, सूर्य तुम्हा आम्हाला सव्याज परत देत असतो. 
या काळात चंद्राचे अधिपत्य असते.

सप्टेंबर महिन्यात आपल्या आरोग्याकरिता चांगली काळजी घेतली तर पुढील तीन-चार महिन्यांत आपण प्रकृतीकरिता चांगली पूर्वतयारी करू शकतो. काहींना विशेषत: ‘अब्दुल गब्दुल’ लठ्ठ व्यक्तींना ‘झीरो फिगर’ व्हायचे असते. त्यांचे त्याकरिता डाएटिंगचे प्रयत्नही चालू असतात. चेहऱ्यावरील फाजील सूज, फॅट्स ही पुढील थंडीत वाढू नये असे वाटत असेल, तर तारतम्याने थोडेफार डाएटिंग करावयास हरकत नाही. मात्र अतिरेकी डाएटिंगमुळे चेहऱ्यावर, हातावर सुरकुत्या येणार नाहीत याची काळजी घ्यायलाच हवी. बाजारू जाहिरातींना बळी पडून अकारण एजिंग क्रीम किंवा खूपखूप केमिकल्स असलेल्या साबणांपासून लांब राहू या! त्यापेक्षा घरगुती लोणी, तूप किंवा खात्रीच्या खोबरेल तेलाचा वापर रात्री झोपताना बाह्योपचारार्थ जरूर करावा. या काळात काही वेळेला रात्रौ हवामान खूपखूप उष्ण असते. पंखा असूनही खूप उकडते; झोपेचे खोबरे होते. अशी समस्या असेल तर झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना घरी केलेल्या नारीकेल तेलाचे हलक्या हाताने मसाज करावे. झोपेच्या गोळय़ा न घेता पहिली झोप उत्तम लागते.
पुढचा ऑक्टोबर महिना, हा ‘ऑक्टोबर हीटचा’ जरी लांब असला तरी काही वेळा सप्टेंबर महिन्यातच शरद ऋतूची सुरुवात म्हणून डोळे तळावणे, डोळे लाल होणे, डोळय़ाशेजारील नाजूक त्वचेच्या खाली काळेपणा वाढणे असे नेत्रविकार संभवतात. डोळय़ात खूप नेत्रबिंदू टाकण्यापेक्षा रात्री झोपताना तळपायाला खोबरेल तेल, लोणी व तूप जिरवल्यास डोळय़ांचे आरोग्य उत्तम राहते. डोळे लाल होणे, आग होणे या साध्यासोप्या तक्रारींपासून सुटका होते. सप्टेंबर महिन्यात काही वेळेला आपल्या शरीरावर पावसाळी हवामानामुळे काही विषाणूंचे आक्रमण होत असते. त्यामुळे फार गंभीर नव्हे पण शरीराला त्रास देणारे ताप, सर्दी, पडसे, खोकला, आवाज बसणे असे रोग संभवतात. घरातील एका व्यक्तीला सर्दी, खोकला झाला तर इतरांनाही त्याची लागण होऊ शकते. त्याकरिता लगेचच डॉक्टर, वैद्यांकडे धावपळ करून स्ट्राँग औषधे घेण्यापेक्षा पुढील साधेसोपे उपाय करावेत, व्हायरल इन्फेक्शन टाळावे. थर्मामीटरमध्ये नव्याण्णवच्या वर ताप असेल तरच तापाची औषधे घ्यावी. अलीकडे नवरा बायको व त्यांना एकच अपत्य. त्या लहान बाळाचे अंग गरम झाले, शिंका आल्या, कफ झाला की माणसे लगेच घाबरतात. स्ट्राँग अ‍ॅण्टिबायोटिक्स घेतात. असे करून आपल्या मुलांची रोगप्रतिकार शक्ती नष्ट करू नका. त्याऐवजी संबंधित कफ विकाराकरिता प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणून तुळशीची पाने व सोबत कणभर मीरपूड हे सर्वात प्रभावी औषध कफप्रधान विकाराकरिता आहे. रोजच्या जेवणात पुदिना, ओली हळद, आले, लसूण अशी चटणी जेवणात असावी. सप्टेंबर महिना हा तसे पाहिले तर उत्तम वातावरणाचा महिना आहे. या काळात आपण दीर्घश्वसन, प्राणायाम यांचा यथायोग्य वापर केला तर आपल्या फुप्फुसाची ताकद वाढू शकते. त्याकरिता आपल्या सकाळच्या स्नानानंतर पाच मिनिटे तरी दीर्घश्वसन, प्राणायामाकरिता द्यावीत. लहान बालकांना दीर्घश्वसन प्राणायामाची सक्ती न करता गोडी उत्पन्न करता आली तर फारच चांगले. या कफाच्या छोटय़ा-छोटय़ा रोगलक्षणांकरिता एक वेळ मीठ-हळद-गरम पाण्याच्या गुळण्या यांचाही उपयोग होतो. ज्यांना नेहमी खूपखूप दूषित वातावरणात किंवा कार्यालयातील वातानुकूलित थंड हवेचा सामना करायला लागतो त्यांनी आठवणीने चांगल्या दर्जाच्या काळय़ा मनुका किमान तीस-चाळीस स्वच्छ धुऊन चावून खाव्यात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते.
ज्यांचा पाचकाग्नी चांगला आहे, काहीही खाल्ले तरी पचते, पोटाची कोणतीही तक्रार नाही, ‘मॉर्निग कॉल’ वेळेवर येतो, त्यांनी कच्च्या अन्नाचा किंवा नैसर्गिक स्वरूपातील फळे, भाज्यांचा वापर जरूर करावा.
आपल्या नेहमीच्या जेवणातल्या भाज्या खूप-खूप शिजविल्या तर त्यातील काही पोषक द्रव्ये नाहीशी होत असतात, याकरिता कृश व्यक्तींना विशेष काळजी घ्यायला हवी. ‘शौचानंदं परमसुखदम्।’ असे एक सुभाषित वैद्यकात आहे. सकाळी उठल्याबरोबर कमीत कमी वेळात शौच साफ झाले तर त्यासारखे दुसरे कोणतेच सुख नाही, असे वैद्यकशास्त्र म्हणते. ज्यांना सकाळचा शौचानंदाचा अनोखा आनंद घ्यायचा आहे त्यांनी रात्रीच्या जेवणातील पदार्थाचा तोच तोचपणा घालवावा. आलटून पालटून गहू, भात, ज्वारी, बाजरी यांची प्रमुख अन्न म्हणून व जोडीला मूग, राजमा, चवळी अशा कडधान्यांची निवड करावी. फळभाज्या, पालेभाज्या आलटून-पालटून वेगवेगळय़ा खाव्यात. बटाटा रात्री टाळावा. पालेभाज्या स्वच्छ धुऊन, उकडून किंवा कमी तेलाचा वापर करून केलेल्या सेवन केल्या तर आपल्या शरीराला पुरेसे लोह व कॅल्शियम नक्की मिळते. अनेकानेक वैद्यकीय चिकित्सक आपल्या रुग्णांना कॅल्शियम, व्हिटॅमीन किंवा आयर्नच्या गोळय़ा लिहून देत असतात. त्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा टरफलासकट कडधान्ये, स्वच्छ धुतलेल्या पालेभाज्या व कमी अधिक फळफळावर यांचेशी जवळीक ठेवू या, तब्येत सुधारू या!
सामान्यपणे भाद्रपदातील शेवटचे पंधरा दिवस व अश्विन महिन्यातील पहिले पंधरा दिवस असा सप्टेंबर महिना असतो. पण या वर्षी भाद्रपद महिना व सप्टेंबर महिना दोन्ही एकदम येत आहेत. या काळात तुमच्या आमच्या शरीरात तसेच अन्य जीवसृष्टी व प्राणिमात्रांत मध्यम बल असते. जून-जुलैच्या तुलनेत शरीरात व वातावरणात थोडा अधिक स्निग्धपणा येत असतो. या काळात लवण रसाला खूप खूप बल हवामानामुळे मिळालेले असते. या काळात वृद्ध माणसांनी आपले पोट साफ न होण्याची तक्रार असेल तर त्याकरिता खूप स्ट्राँग औषधे घेण्याच्या फंदात पडू नये. कारण पावसाच्या कमी-अधिक प्रमाणामुळे व सूर्याच्या प्रखर किरणांमुळे वृद्धांनी अधिक काळजी आपल्या आहार-विहार व औषधासंबंधित घ्यायला हवी. वृद्धांना शौचाला खडा होत असल्यास चिंचेची दोन बुटुके गरम पाण्यात कोळून घ्यावीत. त्या पाण्यात नाममात्र मीठ मिसळावे. सकाळ-संध्याकाळ चार चमचे गोडे तेल या हिशोबाने सव्वाशे मिली गोडे तेल व अर्धा लिटर चिंचेचे पाणी एकत्र उकळून अटवावे, असे सिद्ध झालेले चिंचालवण तेल वृद्धांनी सकाळ-सायंकाळ आठवणीने घ्यावे. विनासायास पोटाच्या तक्रारी बऱ्या होतात.
या ऋतूमध्ये लहान बालकांची, त्यांना होणाऱ्या विविध जंतुसंसर्ग दूर करण्याकरिता विशेष दक्षता घ्यावी लागते. त्याकरिता त्यांच्या शाळेत जाताना नेणाऱ्या डब्यातील पदार्थ आंबणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी. डब्यामध्ये सुकी चपाती, आंबणार नाही अशी कोरडी भाजी किंवा तीळ, खोबरे, शेंगदाणे अशी कोरडी कोरडी चटणी, असा टिफीन असावा. ऑगस्ट महिन्याप्रमाणेच सप्टेंबर महिन्यातही पिण्याच्या पाण्याबद्दल सर्वदा सावधान असायला हवे. पुणे-मुंबईसारख्या शहरांतसुद्धा पाण्यामध्ये गढूळपणा वाढतो. त्याला विविध कारणे आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या महिना-दोन महिन्यांत नदीनाल्यांना येणारे पाणी गढूळ, लालसर मातीयुक्त असू शकते. अशा पाण्याला ‘अम्लविपाकी’ पाणी असे म्हणतात. असे पाणी सर्वच जण उकळून पीत असतात. तरीपण पावसाळी आजारांची लागण होऊ नये असे वाटत असेल तर त्या पाण्यात एका ग्लासला पाव चमचा सुंठ या हिशोबाने दक्षता घेतली तर आमांश, जुलाब, पोटदुखी, पोटफुगी, हागवण अशा विकारांना व अनावश्यक औषधांना निश्चित लांब ठेवता येते.
श्रीसंत एकनाथ महाराज समकालीन, श्री संत विष्णुदास नामा यांची एक काव्यरचना पुढीलप्रमाणे आहे.
‘‘रात्र काळी, घागर काळी,
यमुनाजळे ही, काळी हो माय!
उंठ काळी, बिल्वर काळी,
गळा मोती एकावळी,
काळी हो माय!!’’
सप्टेंबर महिन्यात काही वेळा अतिवृष्टी होते. त्यात भाद्रपद वद्य पक्षातील अमावास्येजवळपासचे चार दिवस बघायलाच नको; असे रात्रीचे वा पहाटेचे वर्णन असते. या काळात वृद्धांनी विशेष काळजी घ्यायला लागते. वृद्ध व्यक्तींना नेहमीच नातेवाईक, सुना, लेकी, नातवंडांकडून, लग्न-मुंज अशा कार्यक्रमानिमित्त भोजनाची आग्रहाची आमंत्रणे येत असतात. इथे वृद्धांनी अशा जेवणांना कटाक्षाने नकार द्यायला हवा. अशा सार्वजनिक जेवणांत अनेकानेक दोष असू शकतात. वृद्ध माणसांचा अग्नी मंद झालेला असतो. जेवणावळीतील पक्वान्न, भजी, वडे खायला बरे वाटतात, पण वृद्धांची रात्र मात्र अपचनाची, काही वेळेस काळरात्र ठरते. सप्टेंबर महिन्यात अन्नाच्या बाबतीत थोडा संयम पाळला तर पुढील तीन महिन्यांत चांगले आरोग्य राखता येते. अकारण औषधपाणी करावे लागत नाही. याउलट ‘तरुणाईने’ सप्टेंबर महिन्यात हवा कोरडी असल्यास स्वत:ला थोडय़ा कच्च्या अन्नाची सवय लावून घेतली तर, आगामी काळात तबियत एकदम मस्त मस्त बनवता येते. अन्न खूप खूप शिजवत राहिले की त्यातील काही अत्यावश्यक जीवनसत्त्वे नष्ट होत असतात. शरीराला जीवनसत्त्वांची कमी पडली की रोगप्रतिकारशक्ती कमी होत असते. त्याकरिता तरुणाईने ताजे ताजे कच्चे अन्न जरूर खावे. पण ते सावकाश पुरेसा वेळ घेऊन खायला पाहिजे हे सांगावयास नकोच.
जुलै १०, १९१४ रोजी ‘ग्रँड ओल्ड लेडी ऑफ इंडियन सिनेमा’ जोहरा सेहगलचे वयाच्या एकशे दोनाव्या वर्षी दु:खद निधन झाले. शंभराव्या वर्षांनिमित्त त्यांना दिल्लीतील एका कार्यक्रमात एका श्रोत्याने ‘अभी तो मैं जवान हूं।’ या त्यांच्या लोकप्रिय गाण्याच्या दोन ओळी म्हणायचा आग्रह केला. त्या उत्तरल्या, ‘दो लाईन ही क्यूं?’ असे म्हणत त्यांनी डोळे मिचकावत, ते धमाल अख्खेच्या अख्खे गाणे, मस्त मस्त ढंगात म्हणून अख्ख्या सभागृहाला डोक्यावर घेतले. शेकडो श्रोत्यांनी उभे राहून तिला हषरेत्फुल्ल दाद दिली. अशा या ‘ग्रँड ओल्ड लेडी ऑफ बॉलीवूड’ जोहरा सेहगलसारखे आरोग्य हवे असेल, तर सप्टेंबर महिन्यासारखा ‘हेल्दी पाया’ असणारा महिना दुसरा कोणता नाहीच. वाचक मित्रहो, पुरेसा व्यायाम करा, वेळेत खा, प्या. ‘कम सप्टेंबर’ची मजा अनुभवा.

(पुढील अंक गणपती विशेषांक असल्यामुळे सप्टेंबरची ऋतुचर्या हा लेख दोन आठवडे आधी प्रसिद्ध करत आहोत.)

Story img Loader