lp18२०१४चा एफ वन हंगाम गाजविल्यानंतर आपले हात आभाळाला टेकले, अशा भ्रमात वावरणाऱ्या हॅमिल्टनला मलेशियन ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावून सेबेस्टियन वेटेलने जमिनीवर आणले आहे. हॅमिल्टनचे असे का झाले?

कठोर परिश्रम, प्रबळ इच्छाशक्ती यांच्या बळावर तसेच दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून एखादी व्यक्ती यशाचा शिखर पादाक्रांत करण्यासाठी झटते. इतके सर्व करून ‘यशशिखर’ सर केल्यावर मिळणारा आनंद त्या व्यक्तीला निर्धास्त करतो. यश मिळवणे जितके कठीण, त्याहून ते टिकवणे कठीण, याचा त्याला विसरच पडतो आणि ज्या उंचीवर पोहोचण्यासाठी त्याला लागलेल्या प्रदीर्घ काळाहून कमी कालावधीत तो खालीही उतरू शकतो. यश-अपयशांच्या या हिंदोळ्यावर स्वत:ला सावरण्याची कसरत सर्वानाच जमते असे नाही, परंतु जो यातून सावरतो त्यालाच खरी यशस्वी व्यक्ती असे म्हणणे योग्य ठरेल. सध्या याच यशापयशाच्या झोक्यावर फॉम्र्युला वनचा शर्यतपटू लुइस हॅमिल्टन झुलत आहे आणि त्याची कसोटी यंदाच्या हंगामाच्या पहिल्या शर्यतीपासून सुरू झाली आहे.
२०१४चा एफ वन हंगाम गाजविल्यानंतर आपले हात आभाळाला टेकले, अशा भ्रमात हॅमिल्टन वावरत होता. त्याचा हा भ्रमाचा भोपळा आज ना उद्या फुटेल याची खात्री सर्वानाच होती आणि ती २०१५च्या दुसऱ्याच शर्यतीत खरी ठरली. चार वेळा विश्वविजेतेपदाची माळ गळ्यात टाकणाऱ्या सेबेस्टियन वेटेलने मलेशियन ग्रां. प्रि. शर्यतीचे जेतेपद पटकावून हॅमिल्टनला जमिनीवर आणले. या हंगामाच्या पहिल्याच शर्यतीत म्हणजेच ऑस्ट्रेलियन ग्रां. प्रि.मध्ये अवघ्या काही सेकंदाच्या फरकाने वेटेलला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. हॅमिल्टनसाठी हा धोक्याचा इशारा पुरेसा होता, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा फटका हॅमिल्टनला पुढील शर्यतीत बसला. हा फटका इतका जबरदस्त होता की, हॅमिल्टनने याचे खापर आपल्या संघावर फोडण्यास सुरुवात केली. (जसे विजयाचे श्रेय संघासोबत वाटतो, तसेच पराभवही संघासोबत वाटावा; अशी धारणा हॅमिल्टनची असावी.) पण, या पराभवाला सर्वस्वी आपणच जबाबदार असल्याचा मोठेपणा हॅमिल्टन दाखवू शकला नाही.
हॅमिल्टनने २०१४चे सत्र एकहाती गाजवले. १९ शर्यतींपैकी १६ मध्ये हॅमिल्टनच्या कर्तृत्वाच्या बळावर मर्सिडीज संघाने वर्चस्व गाजवले. या १६ पैकी ११ विजय हे हॅमिल्टनच्या नावावर होते, तर ५ हे त्याचा संघ सहकारी निको रोसबर्ग याने पटकावले. मात्र, या हंगामात केवळ हॅमिल्टन विरुद्ध रोसबर्ग अशीच लढत झाली आणि त्यामुळे हॅमिल्टनने रोसबर्गलाच आपला प्रतिस्पर्धी बनवले. प्रत्येक शर्यतीत या दोघांमध्येच चुरस पाहायला मिळाली आणि विजेताही दोघांपैकी एक असा समजच बनला होता. त्यामुळे यात ना कुठे सेबेस्टियन वेटेल होता आणि ना डॅनिएल रिकीयाडरे.. होते ते केवळ हॅमिल्टन व रोसबर्ग.. त्यामुळेच ही दोघे निर्ढावली होती. आपणच सर्वेसर्वा असा समज त्यांचा झाला आणि यातही आघाडीवर हॅमिल्टनच होता. मर्सिडीज संघानेही या दोघांच्या भांडणाला खतपाणी घातले. ही दोघे जेतेपदासाठी अशीच आसुसलेली असतील, तर त्याचा फायदा आपल्यालाच होईल, असे सूत्र मर्सिडीजने मांडले होते आणि झालेही तसेच. पण, त्यांचा वाद विकोपाला गेला असतानाही मर्सिडीजने आपण या दोघांच्या भांडणात पडणार नाही, अशी भूमिका घेतली.
२०१४ ते २०१५ या एका वर्षांच्या कालावधीत पुलाखालून बरेच पाणी गेले होते. प्रत्येक शर्यतपटूने आपापल्या कामगिरीत सुधारणा करून सर्वोत्तम निकाल देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हॅमिल्टनसाठी काहीच बदलले नव्हते. ज्या ताकदीने तो २०१४च्या हंगामात खेळला, तीच ताकद त्याने पुढे कायम ठेवली. मात्र, या वेळी प्रतिस्पध्र्याची ताकद वाढली होती, याची कल्पनाही त्याने केली नव्हती. किंबहुना आपणच श्रेष्ठ असे ठाम मत त्याच्या मनात घर करून बसले होते. त्यामुळेच त्याला कडवी टक्कर देणाऱ्यांपैकी एक सेबेस्टियन वेटेलने रेड बुलला सोडचिठ्ठी देऊन नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या फेरारी संघाशी सलगी केली आणि हॅमिल्टनने ताज हिसकावण्याची सुनियोजित योजना आखली. ऑस्ट्रेलियन शर्यतीत ती योजना यशस्वी ठरली नसली तरी मलेशियन शर्यतीत हॅमिल्टनचा पायउतार झाला. गेल्या रविवारी म्हणजे १२ एप्रिलला पार पडलेल्या चायनीज ग्रां. प्रि. स्पध्रेत हॅमिल्टनने बाजी मारली खरी, परंतु त्याच्या आणि रोसबर्ग व वेटेल यांच्यातील वेळेचे अंतर कमी झाले होते.
हॅमिल्टनच्या या उतरत्या आलेखामागे विविध कारणे आहेत. त्यातील पहिले कारण म्हणजे प्रतिस्पध्र्याना कमी लेखण्याची चूक हॅमिल्टनने वारंवार केली. आपणच वेगाचे बादशाह आहोत, या भ्रमात तो वावरतोय. जवळपास ९१ जेतेपद पटकावणारा मायकेल शूमाकरही या भ्रमात वावरलेला कुणी पाहिला नाही. हॅमिल्टन मात्र केवळ ३५ जेतेपद पटकावून हवेत तरंगायला लागला. आपल्यासमोर कुणाचे काहीच चालणार नाही, हा अतिआत्मविश्वास त्याला नडतोय. यातून तो लवकर बाहेर न पडल्यास त्याचा मोठी किंमत मोजावी लागू शकते.
दुसरे कारण म्हणजे, संघ सहकारी निको रोसबर्ग हाच आपला प्रतिस्पर्धी आहे, असा समज त्याने करून घेतला. मात्र, या मागे हॅमिल्टनची चूक आहे असे म्हणता येणार नाही. २०१४च्या हंगामातील अव्वल तीन विजेत्यांच्या नावावर लक्ष्य टाकल्यास हॅमिल्टन पाठोपाठ रोसबर्गचेच नाव येते आणि संपूर्ण शर्यतीत या दोघांमध्येच चुरस पाहायला मिळाली. याचे रूपांतर अनेकदा शाब्दिक चकमकीतही झाले आहे. चायनीज ग्रां. प्रि. शर्यतीत याचा प्रत्यय पुन्हा एकदा प्रेक्षकांनी अनुभवला. ५६व्या लॅपमध्ये या दोघांची गाडी एकमेकांवर आदळता आदळता राहिली. या दोघांमधील भांडण त्यानंतर सर्वानी अनुभवले. हॅमिल्टनने निदान आपल्या सहकाऱ्यासोबत तरी नम्रतेने वागणे अपेक्षित होते, परंतु तसेही झाले नाही. उलट हॅमिल्टनने जेतेपदासाठी आपण कुणाचीही पर्वा करणार नसल्याचे जाहीर करून आगीत तेल ओतले. सहकाऱ्यासोबत हॅमिल्टनने घातलेला हा वाद त्याला पुढील शर्यतींमध्ये महागात पडू नये हीच अपेक्षा.
काही वर्षांपूर्वी वेटेललाही असाच आत्मविश्वास नडला होता आणि तो जवळपास सर्वच स्पर्धामधून बाहेर फेकला गेला होता. मात्र, २०१४ मध्ये पूर्णपणे हद्दपार झालेल्या या खेळाडूने दमदार पुनरागमन केले आणि २०१५ मध्ये नव्या रणनीतीने नव्या संघासोबत सर्वाना आश्चर्याचा धक्काच दिला. यापुढील स्पर्धामध्ये हॅमिल्टनसमोर केवळ वेटेलचेच नव्हे, तर सहकारी रोसबर्गचेही आव्हान असणार आहे आणि या आव्हानातून यशस्वी मार्ग काढण्यासाठी हॅमिल्टनला आकाशातून जमिनीवर येणे आवश्यक आहे. तसे झाल्यास उत्तम, अन्यथा २०१५मध्ये नवा विश्वविजेता मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.
स्वदेश घाणेकर

Story img Loader