हेपॅटायटिस-बी आणि हेपॅटायटिस-सी नावाच्या, दोन वेगवेगळ्या विषाणूंमुळे होऊ शकणारा लिव्हरचा आजार बहुधा रुग्णाच्या लक्षातही येत नाही. काही रुग्णांमध्ये तर ते जंतू दहा-वीस र्वष शरीरातच दबा धरून बसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘तरी सांगत होते! बारावीचं वर्ष आहे. निदान या वर्षी तरी बाहेरची भेळ-पाणीपुरी खाऊ नकोस. झाली ना कावीळ! आता काय करायचं लेकरा?’’
रस्त्यावरची भेळ खाऊन होणारी कावीळ आपल्या ओळखीची असते. डॉक्टर तिला हेपॅटायटिस-ए म्हणतात. ती बारावीसारख्या महत्त्वाच्या वर्षी झाली तर नुकसान होतं हे खरं असलं तरी तो आजार सहसा जिवावर उठत नाही; चेंगटपणे रेंगाळून भयानक रूप घेत नाही आणि बहुधा आपला आपणच पूर्णपणे बरा होतो.
लोकांच्या मनांत धडकी भरवणारा हेपॅटायटिस हा नव्हे.
काविळीचे वेगवेगळे प्रकार असतात. हेपॅटायटिस किंवा लिव्हरला आलेली सूज हा त्यांच्यातलाच एक. तशी सूज अनेक कारणांमुळे येते. ती काही सांसíगक आजारांमुळे, अगदी नेहमीच्या सर्दीपडशानेही येऊ शकते. पण बहुधा ती सौम्य असते आणि तो आजार रुग्णाला जाणवतही नाही. पण काही विषाणूंच्या संसर्गाने मात्र लिव्हरला जास्त त्रास होतो.
‘‘भटक्या लमाण्याकडून गोंदून घेतलंत तुम्ही?’’
जितेंद्रच्या ऑफिसनेच त्याला हेल्थ-चेकसाठी डॉक्टरांकडे पाठवलं होतं. खरंतर फिरतीची नोकरी करणाऱ्या, पस्तिशीच्या जितेंद्रची प्रकृती अगदी ठणठणीत होती. त्याला कावीळ, ताप असलं काहीही दुखणं नव्हतं! पण त्या तपासात त्याची लिव्हर वाढल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. रक्ताच्या चाचण्यांत जितेंद्रच्या लिव्हरच्या कामकाजात गडबड असल्याचं आढळलं. त्यावरून त्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले. वीस वर्षांपूर्वी त्याला कोकणात झालेला अपघात आणि तिथल्याच हॉस्पिटलात दिलेलं रक्ताचं ट्रान्सफ्युजन डॉक्टरांनी आवर्जून नोंदून ठेवलं. त्याच्या दंडावरचं गोंदवणही डॉक्टरांना महत्त्वाचं वाटलं.
पंचवीस वर्षांची पहिलटकरीण, लेखा हॉस्पिटलात नाव घालायला गेली. डॉक्टरांना तिच्या रक्तात हेपॅटायटिस-बी या काविळीची चिन्हं सापडली. डॉक्टरांच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून लेखा घाबरली.
त्या दोघांची कावीळ नेहमीच्या काविळीहून वेगळी होती. तो आजारही सांसíगकच असतो. पण तो भेळ-पाणीपुरीतून, पाण्यातून किंवा उष्टय़ा घासातूनही फैलावत नाही. कुटुंबात, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या सर्वसाधारण संपर्कातूनही त्याची लागण होत नाही. तो रक्ताच्या, स्रावांच्या संपर्कातून किंवा शरीरसंबंधांतून पसरतो. अशाच प्रकारे फैलावणारा एड्सचा आजार सगळ्यांच्या ऐकिवात असतो. पण हा लिव्हरचा रोगही तितकाच खतरनाक आहे. त्याच्यामुळे जगभरात दरवर्षी दहा लाखांहून अधिक माणसं दगावतात. जागतिक आरोग्याची ती एक फार मोठी समस्या आहे.
तसा आजार मुख्यत्वे हेपॅटायटिस-बी आणि हेपॅटायटिस-सी नावाच्या, दोन वेगवेगळ्या विषाणूंमुळे होऊ शकतो. ते जंतू शरीरात शिरले की थेट लिव्हरमध्ये ठाण मांडतात. पण त्या पहिल्या हल्ल्याने होणारा आजार बहुधा रुग्णाच्या लक्षातही येत नाही. जितेंद्रसारख्या काही माणसांत मात्र, त्यानंतरची दहा-वीस र्वष ते जंतू शरीरातच दबा धरून बसतात. तशा धडधाकट दिसणाऱ्या जंतुवाहक माणसांना हेपॅटायटिसचे कॅरियर्स म्हणतात. ते छुपे वाहक रक्तदान करतात, गोंदून घेतात, सार्वजनिक सीिरज-सुया वापरून अमली पदार्थ शिरेत टोचून घेतात. काहीजण नायकिणीच्या माडीवर जातात. त्या सगळ्या ठिकाणी, कुणाच्याही नकळत, ते काविळीच्या जंतूंची खिरापत वाटतात. १९९२पासून रक्त आणि त्याचे घटक कसून तपासायची आणि डॉक्टरांची आयुधंही कटाक्षाने जंतुरहित करायची शिस्त पाळली जाते. आता त्या मार्गाने या घातक आजाराचा प्रसार कमी होतो. त्याखेरीजचे बहुतेक प्रसारमार्ग भारतीय सांस्कृतिक नीतिनियमांची लक्ष्मणरेषा पाळत नाहीत. ती मर्यादा मनोभावे पाळणाऱ्यांना तो गंभीर आजार सहजासहजी होत नाहीत.
त्या आजाराला खतरनाक
का म्हणायचं?
लिव्हरमध्ये मुक्काम ठोकणाऱ्या त्या विषाणूंशी शरीर झुंज देतं. त्या मारामारीत लिव्हरमध्ये नासधूस होते; मोठमोठे वण होतात. लिव्हरची नीटनेटकी रचना विस्कटते. म्हणजेच लिव्हर-सिऱ्हॉसिस होतो. रक्तवाहिन्या अडतात; पोटात पाणी साठतं. तशा जुनाट आजाराने लिव्हरचं इतर कामकाजही कायमचं बिघडतं. त्यामुळे जुनाट, चेंगट असा आजार होतो. अनेकांना लिव्हरचा कॅन्सरही होतो.
त्या आजाराचं निदान कसं करतात?
शास्त्रज्ञांनी त्याच्यासाठी खास चाचण्या बनवल्या आहेत. शरीरात छपून राहणारा विषाणू रक्ताच्या रामबाण चाचण्यांनी हुडकून काढता येतो. खास त्याच्याशी लढायला शरीरात काही झुंजार रसायनं बनवली जातात. त्यांच्या मोजमापावरून शरीर किती सुसज्ज आहे ते समजतं. चेंगट आजारामुळे लिव्हरच्या झालेल्या नुकसानाचाही अंदाज घ्यायला नेमक्या तपासण्या आहेत. पूर्वी सिऱ्हॉसिसमुळे झालेली नासधूस समजून घ्यायला जाडय़ा सुईने लिव्हरचा छोटा तुकडा काढून तपासावा लागत असे. आता अल्ट्रासाउंड, सीटी-स्कॅन आणि एमआरआय-प्रतिमांनी त्या वणांची, सिऱ्हॉसिसमुळे झालेल्या हानीची शस्त्रहीन पाहणी करता येते.

२०११ पासून भारतात उपलब्ध झालेल्या प्रतिबंधक लसीमुळे मिळणारी प्रतिकारशक्ती किमान वीस र्वष तरी टिकते.

तशाच रक्तचाचण्यांचा आता दुसराही उपयोग होतो. त्यांच्यामुळे प्रत्येक रक्तदात्याकडून घेतलेल्या रक्तात त्या जंतूंचा अचूक शोध घेता येतो. जंतुवाहकांचं दूषित रक्त रक्तपेढय़ांतून इतर रुग्णांना दिलं जाऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेता येते. दूषित रक्त, सुया यांचा शास्त्रशुद्ध नायनाट करता येतो. आता शस्त्रक्रियेची आयुधंही योग्य रीतीने र्निजतुक करता येतात. रक्त आणि त्याचे घटक हाताळताना रबरी ग्लोव्हज् घालणं, असुरक्षित यौन-संबंध टाळणं किंवा आवर्जून कंडोम वापरणं वगरे सार्वत्रिक सावधानता (युनिव्हर्सल प्रिकॉशन्स) आता एड्समुळे जगभरात पाळली जाते. त्यामुळे त्या आजारांचा संसर्ग शक्यतो टाळता येतो.
तशा आजारावर उपचार करता येतात का?
सुरुवातीच्या सौम्य आजाराला शुश्रूषेखेरीज इतर खास उपचारांची गरज नसते. पण नंतरच्या चेंगट आजारामुळे लिव्हरची नासधूस होत असली किंवा सिऱ्हॉसिस, कॅन्सर यांच्यासारखा गंभीर आजार उद्भवत असला तर ती हानी आटोक्यात ठेवायला औषधं दिली जातात.
१९८०-९०च्या काळात त्यासाठी इंटरफेरॉन हे एकच औषध होतं. त्या औषधाने दरवेळी फ्लूसारखा ताप येई. ते औषध दिवशी तीनदा इंजेक्शनाने द्यावं लागे, फारसं गुणकारी नसल्यामुळे वर्षभर चालू ठेवावं लागे आणि तरीही त्याने फार थोडय़ा लोकांमध्ये आजार आटोक्यात येई. हल्ली त्या इंजेक्शनाचं, दीर्घकाळपर्यंत काम करणारं भावंडं आठवडय़ातून एकदा आणि कमी मुदतीसाठी देऊन भागतं. शिवाय विषाणूंवर अधिक अचूक काम करणारी आणि तोंडाने घेण्याची इतर गुणी औषधं शास्त्रज्ञांनी बनवली आहेत. ती महागडी असली तरी त्यांच्यामुळे आजार लवकर आटोक्यात येतो. आजाराने लिव्हर साफच खराब झालेली असली तर मात्र लिव्हर-ट्रान्सप्लान्टसारख्या खर्चीक आणि अव्यवहारी उपायाला पर्याय उरत नाही.
हेप-बी आणि हेप सी या दोन विषाणूंमुळे होणाऱ्या आजारात बराच सारखेपणा असला तरी त्या दोघांची जातकुळी आणि चालचलणूक एकमेकांहून पूर्णपणे वेगळी आहे.
हेप-सी हा हेप-बीपेक्षा कमी जोमाने पसरतो. सर्वसाधारणपणे त्याचा फैलाव रक्तातूनच होतो. हल्ली वैद्यकीय उपचारां-आयुधांतून संसर्ग कमी झाला आहे. तरी सार्वजनिक सुया-सीिरजेस वापरून रक्तात ड्रग्ज टोचून घेणाऱ्या माणसांत मात्र अजूनही त्याची लागण होते.
या जंतूचं रूप सतत बदलत असतं. त्यामुळे त्याच्याविरुद्ध प्रतिबंधक लस बनवणं अजूनही शास्त्रज्ञांना जमलेलं नाही. त्या बहुरूप्याला टाळायचं असलं तर युनिव्हर्सल प्रिकॉशन्सच कटाक्षाने पाळाव्या लागतात.
सुमारे ४० टक्के लोकांत हेप-सीचा आजार आपल्या आपण पूर्ण बरा होतो. पण इतरांच्यात रोग रेंगाळतो; सिऱ्हॉसिस-कॅन्सर होतात. ते टाळण्यासाठी या आजारावर इलाज करावा लागतो. पूर्वी वर्षभराच्या इंटरफेरॉनने फक्त २०टक्के लोकांमध्ये आजार कह्य़ात येई. आता अनेक नवी गुणकारी औषधं आली आहेत. सगळी औषधं तोंडानेच घेऊनही ७५ टक्के लोकांमध्ये सहा महिन्यांत आजार निपटून टाकता येतो.
हेपॅटायटिस-बी हा या प्रकारच्या आजाराचा दुसरा प्रकार. त्याचा फैलावण्याचा जोम हेप-सीहून कित्येक पटींनी जास्त आहे. तो रक्ताखेरीज इतर स्रावांतून आणि शरीरसंबंधातूनही सहज पसरू शकतो. शरीराबाहेर सांडलेल्या रक्तात किंवा स्रावात हा जोमदार विषाणू तब्बल आठवडाभर तग धरतो आणि रोग पसरवू शकतो.
हेप-बी झालेल्या आईने बाळाला कुशीत घेतलं, अंगावर पाजलं, त्याचा मुका घेतला तर हा आजार बाळाला लागत नाही. पण अशा ९०टक्के आयांकडून बाळांना त्या जंतूची भेट मिळते ती ऐन बाळंतपणाच्याच वेळी. बाळांना तात्काळ काहीही आजार होत नाही आणि त्यांच्या शरीराकडून त्या जंतूला कसलाही प्रतिकारसुद्धा होत नाही. जंतू टिकून राहतो. त्या सगळ्या मुलांना मोठेपणी चेंगट आजार होतो. मोठं झाल्यावर तशा माणसांतली सुमारे २०टक्के माणसं सिऱ्हॉसिस किंवा कॅन्सरने दगावतात. लेखाच्या डॉक्टरांना काळजी वाटली ती त्यामुळेच.
हेप-बी जर मोठेपणीच पहिल्यांदा झाला तर ९०टक्के लोकांत तो आजार सहा महिन्यांत आपल्या आपणच बरा होतो. पण तो एकदा झाला की त्याचं शरीरातून समूळ उच्चाटन करता येत नाही. आधुनिक औषधांनी तो बरा झाला तरीही उपचार थांबवल्यावर आजार उलटायची शक्यता राहतेच. म्हणून त्यानंतर किमान वर्षभर नियमित चाचण्या कराव्या लागतात आणि तेवढं केल्यानंतरही या आजारामुळे कॅन्सर होण्याची शक्यता राहातेच.
पण त्या दुष्ट विषाणूचं खरं स्वरूप आता संशोधकांना समजलं आहे आणि ते कळल्यामुळे शास्त्रज्ञांनी त्याच्यासाठी प्रतिबंधक लसही बनवली आहे. ती लस २०११ पासून भारतभरात सर्रास मिळायला लागली आहे. तिच्यामुळे मिळणारी प्रतिकारशक्ती किमान वीस र्वष तरी टिकतेच. त्या लशीचा पहिला डोस जन्मापासून पहिल्या चोवीस तासांत द्यावा आणि त्यानंतर तसे आणखी दोन किंवा तीन डोस बाळांना ठरावीक अंतराने दिले जावे, असा जागतिक आरोग्य परिषदेचा आदेश आहे. मोठय़ा माणसांनीही लस टोचून घ्यावी. विशेषत: डॉक्टर, नस्रेस, लॅबोरेटरीतले तंत्रज्ञ वगरेंचा रोजच्या कामानिमित्ताने रक्ताशी संबंध येतो. निदान त्यांनी तरी त्या लशीचे तीन डोस घ्यावेच असाही आरोग्य परिषदेचा सल्ला आहे.
या प्रकारचा आजार एकदा झाला की तो निस्तरणं दुरापास्त होतं. कित्येकदा तर हेपॅटायटिस-बी, -सी आणि एड्स या तिन्ही विषाणूंची एकजुटीने लागण होते आणि परिस्थिती हाताबाहेर जाते. पण योग्य ती सावधगिरी सदैव बाळगली, नीतीच्या बंधनांची महती मानली आणि जी सर्रास मिळते ती हेप-बीची प्रतिबंधक लसही प्रत्येकानेच, रीतसर घेतली तर ते रोग शरीरात घुसूच शकणार नाहीत.
ज्या आजारावर इलाज करणं कठीण असतं तो शक्यतो टाळणंच श्रेयस्कर. सतान घरात शिरला की अनावर होतो. त्याला दाराबाहेर रोखण्यातच खरा शहाणपणा आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hepatitis b and hepatitis c
Show comments