त्याचं आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. तिच्या घरच्यांनी हे लग्न आनंदाने स्वीकारलं. परंतु मुलाच्या आईला काही हे लग्न पटलेच नव्हते. मात्र याचा अर्थ तिने लग्नाला विरोध केला असे मुळीच नाही. चार पाहुण्यांशिवाय हे लग्न बिना साग्रसंगीत असे पार पडले होते, पण आता चेंडू सासूबाईच्या कोर्टात होता. त्याचं आणि तिचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, म्हणूनच त्यांना हे सगळंच सहनीय आणि निभावून जाण्यासारखं वाटत होतं.
– लग्नानंतर कुलदैवत दर्शन, हनिमून उरकून आल्यावर उगवलेली सामान्य सकाळ! अंथरुणात गुलाबी उबदार चादर घट्ट ओढून झोपणे तिच्या सासूला खुपले. अशा अनेक गोष्टी तिला सलायला लागल्या. एवढं सगळं असूनही सासू तिचे कधी कधी कौतुक, कधी गप्पा-टप्पा, टीव्हीवरच्या मालिका इत्यादी गोष्टी ज्या सुखासुखी नांदणाऱ्या सासू-सुनांत असतात तशीच वागत होती. सुनेला वाटायचे की तिच्या स्वभावाने सासूच्या वागणुकीत अगदी मलईदार, मृदू बदल घडला आहे. आणि त्याच्या दृष्टीने तर आई चांगलीच होती.
– सगळ्यांचे आयुष्य असे चालू होते. पण एक दिवस पाहुणे आलेले असताना त्याच्या आईने पाहुण्यांच्या देखत सूनबाईची अगदी अघोरी स्तुती करायला सुरुवात केली. भांडी घासताना जसे साबण लावायचे लक्षात राहते तसे तो लावलेला साबण घासून भांडे धुवायचे असते हे मात्र कसे विसरायला सुनेस होते, असा प्रश्न सासूबाई विचारत होत्या. भोळसट सून माहेरून येताना भोळसटपणासह मूर्खपणाही घेऊन आली आहे, असे तिच्याच तोंडावर डोळे वटारून पहात सांगितले. अन् शेवटी सून कशी लोळत असते असा बऱ्याच गोष्टींचा उद्धार केला. हे असे नेहमीच होऊ लागले आणि तो काहीच बोलेना. एक दिवस सगळं असह्य़ होऊन सून रागारागातच घर सोडून निघून गेली.
– तो मात्र या मानसिक आघाताने पार कोलमडून गेला. कुठलीच, काही कल्पना नसल्याने घडल्या प्रकाराचा त्याने धसका घेतला होता. आता समोर येणाऱ्या कोणत्याच गोष्टीवर तो विश्वास ठेवायला कचरायला लागला. काळजात खोल कुठे तरी वेदना त्याला जाणवू लागल्या. आपल्या लेकाच्या या अवस्थेला आपणच जबाबदार आहोत म्हणून त्याच्या आई-वडिलांनी गावी मुक्काम हलविला. आता आयुष्यात आणि घरात तो एकटाच राहायचा.
– हा एकाकीपणा मोडत नेहा आली. त्याची कॉलेजकाळातली मैत्रीण. ती त्याच्या इमारतीत रहायला आली होती. ही इथे कशी हा प्रश्न त्याला पडला. तिने त्याला अजून पाहिले नव्हते. त्यामुळे तिचे सामान शिफ्ट झाल्यावर तिला तिच्या घरी जाऊन भेटण्याचे त्याने ठरवले. त्याआधीच ती इमारतीच्या आवारातच भेटली. हाय-बाय झाले. असेच तीन महिने गेले.
– एक दिवस जेवण केल्यावर तो नेहाकडे गेला. तिने काहीशा उदास नजरेने त्याचे स्वागत केले. दोघेही कॉफीचा मग हातात घेऊन बोलण्यासाठी घराच्या बाल्कनीत आले. गार वारा सुटलेला होता. चतुर्दशीच्या चंद्राने आकाश उजळून टाकलेले होते. उन्हाळयाचे दिवस असल्याने जरा निरभ्र आकाशात तारेही चमचमताना दिसत होते. आणि श्रीला काहीही समजायच्या आतच ती त्याला घट्ट बिलगली. तिच्यावर आलेल्या परिस्थितीचे करुण वर्णन तिने केले. सर्व काही सुरळीत चालू असताना, चार महिन्यांची गर्भवती असताना एका भरधाव ट्रकने तिच्या नवऱ्याला उडवून दिले. तिचे अश्रू थांबत नव्हते. श्रीलाही मग भरून आले. त्यानेही आपल्या आयुष्याची गाथा तिला ऐकवली.
– आणि ते दोन समदुखी जीव तना-मनाने एकत्र आले. एकमेकांच्या आयुष्यातली उणीव एकमेकांच्या सहवासाने भरून काढू लागले. त्यांना आता एकमेकांच्या ओढीची जाणीव झाली होती. हळूहळू नेहा मागचं विसरून नवीन सुरुवात करायला तयार झाली. त्यालाही त्याच्या बायकोचे रुसून, रागावून जाणे पटलेले नव्हते. तिच्या घरच्यांनी तिच्या दुसऱ्या लग्नाचा विचार करत घटस्फोटाची मागणी केली होती. त्यानेही तिला विसरून आयुष्यभरासाठी नेहाला पत्नी बनविण्यासाठी मनाची पूर्ण तयारी केली होती. त्याने घरी तसे कळवलेदेखील, पण घरच्यांनी प्रखर विरोध दर्शवला. या वेळी तर त्याच्या बाबांनाही त्याचे वागणे पटत नव्हते. पण त्या दोघांचा विचार ठाम होता. आहे तिथेच राहिलो तर आजूबाजूचा दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याच्या आड येणारा समाज, शेजारी, मित्र, सारेच टोचून टोचून बोलतील म्हणून दोघांनी एक निर्णय घेतला.
– नेहाने नोकरी करून थोडेफार पैसे सहा महिन्यांत साठवलेले होते, बँकेतल्या खात्यातली सगळी शिल्लक त्याने गोळा केली आणि दोघेही एका दिवसात ते शहर सोडून निघून गेले. कुठे गेले याचा आजवर पत्ता लागलेला नाही. ते दोघे खरंच सुखी झाले असतील का त्यांच्या ‘लपवलेल्या जगात’?
विशाल लोणारी