‘फूल ऑन एण्टरटेन्मेंट’ असे बिरूद मिरवणारा ‘हॉलीडे’ नावाचा चित्रपट अक्षयकुमारचा ६ जून रोजी रुपेरी पडद्यावर झळकतोय. या चित्रपटाकडून रसिक, वितरक, निर्माते अशा सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत.
बॉलीवूडमध्ये या वर्षी पहिल्या पाच महिन्यांत तरी सलमान खानचा ‘जय हो’ हा चित्रपट सोडला तर गल्लापेटीवर ब्लॉकबस्टर यश मिळविणारा चित्रपट झाला नाही. अनेक बडे कलावंत असलेले चित्रपट येऊन गेले तरी गल्लापेटीवर कमाल करू शकलेले नाहीत. या पाश्र्वभूमीवर बॉलीवूडला एका सुपरडुपर हिटची नितांत गरज आहे. ‘फूल ऑन एण्टरटेन्मेंट’ असे बिरूद मिरवणारा अक्षय कुमारचा ६ जून रोजी ‘हॉलीडे’ नावाचा चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकतोय. या वर्षांतला त्याचा हा पहिला सिनेमा असून त्यामुळेच तो सुपरडुपर हिट होईल आणि बॉलीवूडचा फॉम्र्युला पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवील, अशी अटकळ बॉलीवूडचे बडे वितरक, परदेशी वितरक कंपन्या, डझनभर बडे निर्माते आणि एकूणच मनोरंजन हा व्यवसाय करणारे अन्य सर्व घटक बांधून आहेत.
तीन खानांच्या व्यतिरिक्त आणि अन्य अनेक छोटय़ा-मोठय़ा स्टार कलावंतांव्यतिरिक्त फक्त आणि फक्त अक्षयकुमारनेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. फक्त निखळ मनोरंजनाची अपेक्षा अक्षयकुमार आपल्या चित्रपटांतून पूर्ण करतो असे म्हटले तरी चालेल. चित्रपटाचे नाव काय आहे, त्याची भूूमिका कोणती आहे हे सगळे तपशील त्याच्या चाहत्यांना फारसे महत्त्वाचे नसतात.
हल्ली बॉलीवूडचे चित्रपट ट्रेलरमुळे चालतात. ट्रेलर चांगला, आकर्षक, उत्कंठावर्धक, अॅक्शनवाला वगैरे असला तर प्रेक्षक हमखास चित्रपटगृहांत जातात. ‘हॉलीडे’ या चित्रपटाचा ट्रेलर यूटय़ूबवर फेब्रुवारीतच झळकला असला तरी त्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या ‘इट्स एण्टरटेन्मेंट’ या अक्षयकुमारच्या चित्रपटाची चर्चा सध्या बरीच रंगलीय.
‘हॉलीडे’ या नावावरून सुट्टीवर आलेला नायक एवढेच सूचित होते. परंतु, अक्षयकुमारची सुट्टी म्हणजे सुट्टीतील धमाल तो दाखवणारच, असे त्याचे चाहते मानू लागले आहेत. पण शीर्षकाच्या पुढची टॅगलाइन महत्त्वाची आहे ती अशी – ‘ए सोल्जर इज नेव्हर ऑफ डय़ूटी’. अॅक्शन थ्रिलर प्रकारातला हा चित्रपट असेल हे सुज्ञास म्हणजे अक्षयकुमार चाहत्यांस सांगणे न लगे. ‘थुपक्की’ या नावाच्या गाजलेल्या तामिळ चित्रपटाचा हा रिमेक आहे. आपल्याकडे रिमेक पडले असले तरी या रिमेकद्वारे मूळ चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक स्वत:च हिंदीत रिमेक करतोय. त्यामुळे ‘ओरिजिनॅलिटी’ आहे बरं का. तर आपला नायक अर्थात अक्षयकुमार म्हणे लष्कराच्या गुप्तहेर खात्यातील अधिकारी आहे. तो सुट्टीवर आपल्या घरी आलाय. मुंबईत त्याला दहशतवादी कारवायांची चाहूल लागते. मग त्याचा मित्र असलेल्या मुंबई पोलिसाच्या सहकार्याने आणि लष्करातील अधिकाऱ्यांच्या ताकदीवर तो दहशतवादी हल्ला रोखतो. आपला बेत फसला म्हणून मग दहशतवादी संघटनेचा म्होरक्या भयंकर चिडतो. मग अक्षयकुमारच्या बहिणीचेच तो अपहरण वगैरे करतो. दरम्यान, कॉलेजात बॉक्सिंग करणारी सोनाक्षी सिन्हा आणि अक्षयकुमार यांची जोडी जमते, एखादे चुंबन वगैरे आहेच.
तर अशा या चित्रपटाच्या ट्रेलरवरून तो मसालापट नाही, या अक्षयकुमारच्या विधानाला काही अर्थ नाही हे खरे. तद्दन गल्लाभरू पण भरपूर टाइमपास, डोके बाजूला ठेवून पाहण्यासारखाच हा मनोरंजनपट आहे. ए. आर. मुरूगडॉस या लेखक-दिग्दर्शकाचा हा तामिळमध्ये सुपरडुपर हिट ठरलेल्या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. सोनाक्षी सिन्हा आणि बॉक्सिंग हे पाहायला अवघड वाटले तरी दाक्षिणात्य दिग्दर्शकाने ते करून दाखवले आहे. मूळ चित्रपटातील नायक साकारणारा विजय हादेखील हिंदी प्रेक्षकांना या रिमेकमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून मूळ चित्रपटातील खलनायक अर्थात दहशतवादी संघटनेचा म्होरक्या साकारणारा विद्युत जमवालऐवजी फ्रेडी दारूवाला हा पारसी मॉडेल दिसणार आहे एवढेच काय ते वेगळेपण आहे. बाकी मूळ चित्रपटाचा फॉम्र्युला जसाच्या तसा उचलून मूळ लेखक-दिग्दर्शकानेच हिंदी रिमेक तयार केला आहे. अक्षयकुमारच्या चाहत्यांसाठीचा हा अक्षयकुमार मनोरंजन धमालपट ६ जूनला प्रदर्शित होत असून ‘रावडी राठोड’, ‘जोकर’ आणि ‘वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा’ या चित्रपटांनंतर पुन्हा एकदा अक्षय-सोनाक्षी जोडी पाहायला मिळेल. सोनाक्षीची भूमिका अर्थातच आपल्या सुपरडुपर नायकाच्या तुलनेत नेहमीप्रमाणे दुय्यमच असेल हे अक्षयकुमार चाहत्यांना सांगण्याची गरजच नाही. एक मात्र खरे की, ‘जय हो’ नंतर अक्षयकुमारच ब्लॉकबस्टर चित्रपट देऊ शकेल, अशी त्याच्या चाहत्यांबरोबरच बॉलीवूडमधील निर्माते, वितरक, वित्त पुरवठादार यांना आशा वाटते आहे.