निळ्या-जांभळ्या रंगाच्या कृष्णकमळाची फुले अनेकांना माहीत असतात. त्याची गच्च पसरणारी वेल, त्यातूनच डोकावणारी मोहक आणि सुवासिक फुले आपणा सर्वाना हवी हवीशी वाटतात. परंतु कृष्णकमळाच्या अनेक जाती अनेक रंगांत उपलब्ध असतात, हे मात्र अनेकांना माहीत नसते. आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की काही कृष्णकमळांच्या पाकळ्या अगदीच अनाकर्षक असतात. याचे उदाहरण म्हणजे, आपल्या सर्वाना माहीत असलेले निळ्या-जांभळ्या रंगाचे कृष्णकमळ. याच्या पाकळ्या अगदीच फिकट निळ्या रंगाच्या असतात. पाकळ्यांच्या बाहेरील बाजूस संदले असतात. फुलण्याआधी कळी ज्या हिरव्या, पाकळ्यांसम दिसणाऱ्या अवयवांत अवगुंठित असते ती म्हणजे संदले. आता पाकळ्या अनाकर्षक असल्याने, कीटकांना आकृष्ट करण्यासाठी त्या निरुपयोगी ठरतात. परंतु त्याची भरपाई त्याच फुलातील असंख्य असे तंतुमय अवयव करतात. या आकर्षक अशा तंतूंच्या वलयास ‘परिवलय’ असे म्हणतात. त्यास इंग्रजीमध्ये Corona असे संबोधले जाते. मात्र काही कृष्णकमळांच्या फुलांत पाकळ्याही सुंदर असतात आणि त्या फुलांतही विरळ असे परिवलय असते.
काही कृष्णकमळांच्या वेलीवर साधारण हाताच्या पंजासारखी दिसणारी पाने असतात. मात्र काही वेलींवर फक्त साधीच पाने धरतात. कृष्णकमळाच्या बहुतेक जातींच्या वेली भरगच्च पानांचा संभार असलेल्या असतात. बहुतेक वेली बऱ्यापकी मोठय़ा वाढणाऱ्या असतात. या वेलींना कमानीवर किंवा ट्रेल्लीसवर चांगल्या प्रकारे वाढवता येते. कृष्णकमळाच्या फुलांचे आयुष्य एकाच दिवसाचे असते. फुले सकाळी उमलतात व दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कोमेजून गेलेली असतात. काही जातींच्या कृष्णकमळाच्या फुलांना सुवास असतो तर काही बिनवासाची असतात. पण सुगंधी किंवा बिनवासाची असली तरी त्यांमधील मधासाठी फुलपाखरे आणि मधमाश्या या फुलांना भेट देत असतात. एक छोटेसे फुलपाखरू मात्र कृष्णकमळाच्या सर्व जातींना उपद्रवी ठरू शकते. ही फुलपाखरे कृष्णकमळाच्या पानांवर खूप अंडी घालतात. अंडय़ांतून बाहेर पडलेल्या शेकडो अळ्या वेलीला पूर्णपणे निष्पर्ण करून टाकतात. या एका उपद्रवी किडीपेक्षा दुसऱ्या कुठल्याही किडी किंवा रोग कृष्णकमळाच्या वेलींना त्रस्त करत नाहीत.
काही कृष्णकमळाच्या जातींत फुलांपेक्षा फळांना जास्त महत्त्व असते. त्याचे कारण म्हणजे त्या फळांचा स्वाद. फळ साधारण टेनिस चेंडूपेक्षा थोडे लहान असते. पक्व फळाला जाडसर साल असते. सालीच्या आत केशरी रंगाचा पातळसर गर असतो. गरामध्ये अनेक बिया असतात. गर जरी चवीला आंबट असला तरी त्याला अप्रतिम असा स्वाद असतो. या गरापासून सरबत, जॅम, जेली, मिल्कशेक आणि स्वादिष्ट असे आईस्क्रीमही करता येते. या गराचा साखरेत पाक करून ठेवल्यास तो अनेक महिने टिकतो. लिंबापासून आपण जसा सुधारस बनवतो, तसा याचाही उत्तम सुधारस बनवता येतो.
कृष्णकमळाच्या वेलींची अभिवृद्धी छाटकलमे लावून किंवा बिया उपलब्ध असल्यास बियांपासूनही करता येते. इंग्रजीत या फुलाचे नाव आहे – पॅशन फ्लॉवर.
शुभदा साने – response.lokprabha@expressindia.com