आपल्या भारतात अनेक औषधी वनस्पतींचे खजिने अगदी सदापर्णी जंगले, रखरखीत वाळवंटे ते हिमालयापर्यंत आढळतात. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, ज्यामध्ये सांगितले आहे की, ‘‘अशी एकही वनस्पती नाही की जिच्यामध्ये औषधी गुण नाहीत, फक्त मनुष्यच ती ओळखण्यास कमी पडतो.’’ आपल्या भारतातील पश्चिम घाटातील एका अतिशय उपयुक्त अशा वनस्पतीची आज ओळख करून घेऊ.
ही वनस्पती एक झुडूप आहे. दिसायला साधारणपणे कढीपत्त्यासारखी असते. हिचा उपयोग पालेभाजीसारखा करता येतो. दक्षिण भारतात हिचा वापर बऱ्याच प्रमाणात होत असला तरीही महाराष्ट्रात अजूनही ही बहुगुणी वनस्पती अनोळखीच राहिली आहे. हिला सर्वसाधारणपणे कटुक, चेकुरमाणीस आणि स्वीट लीफ या नावांनी ओळखले जाते. हिचे शास्त्रीय नाव आहे ‘Sauropus androgynus’. ही आवळ्याच्या कुळातील, म्हणजेच ‘Euphorbiaceae’ कुळातील आहे. इतर कुठल्याही पालेभाजीपेक्षा हिच्यामध्ये व्हिटामिन्सचे प्रमाण अधिक असल्यानेच हिला ‘मल्टी व्हिटामिन प्लांट’ हे नाव दिले गेले आहे. १०० ग्रॅम पानांत पुढीलप्रमाणे व्हिटामिन व इतर पौष्टिक गुण आढळतात. एनर्जी ५९ कॅलरीज, ६.४ ग्रॅम प्रोटीन, १.० ग्रॅम प्रोटीन, १.० ग्रॅम फॅट, ९.९ ग्रॅम काबरेहायड्रेट, १.५ ग्रॅम फायबर, १.७ ग्रॅम अॅश, २३३ मिग्र्रॅ कॅल्शियम, ९८ मिग्रॅ फॉस्फरस, ३.५ मिग्रॅ आर्यन, १०,०२० कॅरोटीन, १६४ मिग्रॅ व्हिटामिन ए, बी आणि सी, ८१ ग्रॅम पाणी.
चेकुरमाणीसच्या पानांचा उपयोग पालेभाजीसारखा करता येत असला तरीही अनेक लोकांना, त्यातही लहान मुलांना, पालेभाजी नकोशी वाटते. हिची पानेही जरा चरबट असतात. या कारणाने तिचा वापर नुसतीच पालेभाजी म्हणून न करता, हिची पाने दुसऱ्या कोणत्याही भाजीत किंवा डाळीत घातल्यास त्या भाजीचा किंवा डाळीचा सत्त्वांश वाढतो. या पानांना तशी काही खास चव किंवा स्वाद नसल्याने मूळ भाजीची किंवा डाळीची चव/ स्वाद बिघडत नाही. हिच्या कोवळ्या कोंबांची चव चवळीच्या शेंगासारखी गोडसर असते. हिच्या पानांपासून बनवलेला हर्बल टी फारच स्वादिष्ट व पौष्टिक असतो. हर्बल टी बनवण्यासाठी प्रत्येक कप पाण्यासाठी एक मूठभर पाने घ्यावीत. पाने उकळताना त्यांत स्वादासाठी पुदिना किंवा ओली कोथिंबीर घालावी. चवीसाठी थोडा गूळ व मीठ टाकावे. आमसूलही घातल्यास फारच छान. दोन मिनिटे उकळून काढा गाळून घ्यावा व त्यास लसणीची फोडणी द्यावी की झाला चविष्ट हर्बल टी तयार. माहिती महाजालावर या वनस्पतीबद्दल काही विपरीत शेरेही झळकतात; परंतु माफक प्रमाणात, अतिरेक न करता हिचा वापर करण्यास काहीच हरकत नाही. आज अनेक वष्रे आमच्या घरी हिचा वापर महिन्यातून एक-दोनदा होतो आहे; तोही आम्हाला कसलाही अपाय न होता.
चेकुरमाणीसची लागवड मोठय़ा कुंडीत किंवा जमिनीत करावी. हल्ली काही नर्सरींमधून हिची रोपे उपलब्ध असतात. हिची अभिवृद्धी फांद्यांचे तुकडे लावून करता येते. अर्धवट सावलीच्या जागी किंवा पूर्ण उन्हाच्या जागीही हिची लागवड करता येते.
नंदन कलबाग – response.lokprabha@expressindia.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा