सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-बुधाचा समसप्तम योग भावनांवर नियंत्रण ठेवणारा योग आहे.  नोकरी-व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर मात करताना आपल्या कृतीच्या परिणामांचे भान ठेवाल. वरिष्ठांच्या अनुभवातून खूप काही शिकायला मिळेल. जोडीदाराच्या कामाची कदर केली जाईल. प्रवासावर र्निबध येतील. मुलांच्या समस्या समजून घेताना समज-गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. संधिवात सतावेल. 

वृषभ शनी-चंद्राचा समसप्तम योग आपल्या जिद्दीला शिस्तीची जोड देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळाल्याने आपली मते स्पष्टपणे मांडू शकाल. सहकारी वर्गावर वेळेचे बंधन घालाल. जोडीदार कर्तृत्वाने आगेकूच करेल. मुलांच्या बाबतीत कणखरपणे पाऊल उचला. सामाजिक बंधने पाळा. खर्चावर प्रतिबंध येतील. पायावर फोड, पुटकुळय़ा, गळू येण्याची शक्यता आहे.

मिथुन चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा मेहनतीचे चांगले फळ देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात नव्या कल्पना, संकल्पना, नवे करार कराल. वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. जोडीदार आनंदात आणि उत्साहात असेल. आर्थिक स्थिती सुधारेल. अतिरिक्त आत्मविश्वास सादर करू नका. आरोग्य सांभाळा. उत्सर्जनाचे आजार, विकार बळावल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

कर्क रवी-चंद्राचा समसप्तम योग मनाला नवे चैतन्य देणारा योग आहे. आशा, आकांक्षा व्यक्त कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना मान द्याल. सहकारी वर्गाला चांगली मदत कराल. जोडीदाराची स्थिती दोलायमान असेल. निर्णयाप्रत पोहोचणे कठीण जाईल. आपल्या आधाराची गरज भासेल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. वातविकार आणि उष्णतेच्या विकारांना आटोक्यात ठेवावे.

सिंह चंद्र-मंगळाचा नवपंचम योग कठीण परिस्थितीतही उत्साह निर्माण करणारा योग आहे. गरजवंताला मदत करणे हे तर आपल्या रक्तातच आहे. सहकारी वर्ग आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य ते सहकार्य निर्णय घेऊ शकेल. जोडीदार सामंजस्याचे धोरण स्वीकारेल. शब्दाने शब्द वाढवू नका. मुले त्यांच्या आवडत्या कामात रस घेतील. डोकेदुखीचा त्रास उद्भवेल. निरीक्षण गरजेचे!

कन्या गुरू-चंद्राचा नवपंचम योग हाती घेतलेले कार्य पूर्णत्वाला नेणारा योग आहे. अधिक मेहनत घ्यायची तयारी ठेवा. नोकरी- व्यवसायात  ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करतील. सहकारी वर्गासह प्रगती कराल. नवे करार करताना सावधानी बाळगणे आवश्यक असेल. जोडीदार आपल्या कामकाजात व्यस्त असेल. परिस्थिती बदलेल तसे नवे वेळापत्रकही बदलेल. मुलांची मन:स्थिती द्विधा असेल.

तूळ चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग बौद्धिक प्रगती आणि अंत:स्फूर्ती देणारा योग आहे. नव्या संकल्पना नेटाने राबवाल. उच्च शिक्षणासाठी विचारविनिमय कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. जोडीदाराचे काही मुद्दे पटणार नाहीत. मुलांना आपल्या वागणुकीतून शिकवण द्याल. रक्तदाब, मधुमेह यावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा उत्साहवर्धक असला तरी राहू-केतूने युक्त असा आहे. त्यामुळे उत्साहावर एका प्रकारचे दडपण असेल. अतिविचार टाळा. नोकरी-व्यवसायात कामावर लक्ष केंद्रित करण्याची गरज भासेल. सहकारी वर्गाचा पािठबा मिळाल्याने कामाला गती येईल. जोडीदार मोठी जबाबदारी पेलून धरेल. मुलांचे कौतुक कराल. पचन, उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील.

धनू चंद्र-शुक्राचा समसप्तम योग भावविश्वात रममाण करणारा योग आहे. नोकरी-व्यवसायातील नव्या जबाबदाऱ्या यथायोग्य पार पाडाल. वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्याल. सहकारी वर्गाकडून काम वेळेत पूर्ण करून घ्याल. जोडीदाराची आर्थिक उन्नती होईल. मुलांचे हट्ट पूर्ण करताना त्यांच्या मानसिकतेकडेही लक्ष द्याल. पित्त, डोकेदुखी यावर योग्य उपचार घ्यावेत.

मकर चंद्र-शनीचा नवपंचम योग हा संशोधनासाठी उपयुक्त योग आहे. चंद्राचे कुतूहल आणि शनीची चिकाटी, मेहनत यांच्या जोडीने प्रयत्नांना यश मिळेल. परदेशासंबंधित कामांमध्ये संथपणा येईल. जोडीदाराच्या कार्यात प्रोत्साहन द्याल. कौटुंबिक पािठब्यामुळे मोठी झेप घ्यायचा निर्णय यशस्वी ठरेल. त्वचा आणि पोट यासंबंधित त्रास अंगावर काढू नका.

कुंभ चंद्र-नेपच्यून या दोन भावनाप्रधान ग्रहांचा केंद्रयोग भावनिक हिंदूोळे निर्माण करेल. सारासारविचार करूनच निर्णय घ्यावा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यात एकमत होईल. कामातील अडसर दूर कराल. जोडीदारासह वैचारिक मुद्दय़ांवर चर्चा होईल. पार पडलेल्या जबाबदाऱ्यांबद्दल कृतकृत्य वाटेल. मुलांना नव्या संधी उपलब्ध होतील.

मीन चंद्र-हर्षलचा लाभयोग मनात विचारांचे थैमान मांडेल. तर्कशुद्ध विचार करून मन शांत कराल. नोकरी-व्यवसायात योग्य निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ मदत करतील. सहकारी वर्गाचेही साहाय्य मिळेल. जोडीदार आणि आपल्या विचारात काही प्रमाणात तफावत आढळेल. मुलांच्या बाबतीत हळवे होऊ नका.  निराशेतून आशा फुलेल. मनोधैर्य वाढवा. मानसिक दमणूक टाळा.

Story img Loader