मेष एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याचा तुमचा इरादा असेल. परंतु सभोवतालची परिस्थिती मात्र त्यावर मुरड घालायला लावेल. व्यापार धंद्यातील स्पर्धकांच्या हालचाली तुम्हाला अस्वस्थ बनवतील. त्या नादात तुम्ही प्रमाणाबाहेर धोका पत्करायलाही तयार व्हाल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्याकडे जे कौशल्य असेल त्याची संस्थेला गरज असल्यामुळे अचानक तुमची वेगळ्या टेबलावर बदली होण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही कारणाने नेहमीच्या व्यक्तींचा सहवास नसल्याने एकाकीपणा जाणवेल.

वृषभ काही मोठय़ा बदलांची नांदी करणारे हे ग्रहमान आहे. व्यवसाय उद्योगात तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुमची मेहनत तुम्हाला उपयोगी पडेल. पशाची आवक वाढेल. नोकरीमधे भविष्यातील प्रगतीकरता वेगळ्या पद्धतीचे काम करावे लागण्याची शक्यता आहे. नेहमीच्या सहकाऱ्यांची ताटातूट झाल्याने तुमच्या मनाला हुरहुर वाटेल. घरामध्ये लांबलेले कार्य ठरण्याची शक्यता निर्माण होईल. खरेदीकरता वेळ आणि पसे राखून ठेवा. विद्यार्थ्यांनी करिअरकरता घरापासून लांब जाण्याची तयारी ठेवावी.

मिथुन सागरात दोन ओंडक्यांची भेट होते आणि नंतर येणाऱ्या लाटेमुळे ते एकमेकांपासून लांब जातात. व्यापार उद्योगामध्ये प्रगतीचा वेग वाढविण्याकरता गेल्या वर्षांत तुम्ही जे प्रयोग करून बघितले असतील त्याला फारसे यश न मिळाल्याने काहीतरी वेगळे करावेसे वाटेल. त्यानिमित्ताने तुमचे वर्तुळ बदलण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये ज्या चांगल्या बदलांनी तुम्हाला हुलकावणी दिली होती ते आता नजरेच्या टप्प्यात येतील. तरुणांना स्थिरता मिळण्याच्या दृष्टीने सुसंधी प्राप्त होईल. विद्यार्थ्यांनी ताण तणाव घेऊ नये.

कर्क ज्या गोष्टींविषयी आपल्याला खूप उत्सुकता असते ती जेव्हा नजरेच्या टप्प्यात येते त्यावेळेला कितीही कष्ट करण्याची आपली तयारी असते. पण त्यामध्ये थोडा जरी अडथळा आला तरी आपण चिथावून जातो आणि अति साहस करायला प्रवृत्त होता. तुमचा संयम तुम्हाला सोडून चालणार नाही. व्यापार उद्योगात अफवांवर विश्वास ठेवू नका. नोकरीमध्ये गरसमज टाळण्यासाठी वरिष्ठांच्या कामाला महत्त्व द्या. घरामध्ये वागताना, बोलताना शब्द हे शस्त्र आहे हे लक्षात ठेवा. वाहन चालवताना, मशीनवर काम करताना बेसावध राहू नका.

सिंह सध्या तुमच्या राशीचे ग्रहमान चांगले असल्यामुळे सभोवतालच्या व्यक्तीची पर्वा न करता जे तुम्हाला हवे आहे तेच करायला तुम्ही सिद्ध झालेले आहात. व्यवसाय उद्योगामध्ये भरपूर पसे मिळवण्याची अभिलाषा स्वस्थ बसू देणार नाही. कदाचित ज्या कामातून फायद्याचे प्रमाण कमी आहे ते काम बंद करून नवीन काम सुरू करण्याचा तुमचा इरादा असेल. पण नोकरीमध्ये अति उत्साहाच्या भरात कोणाशी तुटकपणे वागू नका. मिळालेल्या अधिकारांचा योग्य पद्धतीने वापर करा. घरामध्ये सर्व काही ठीक असेल.

कन्या नजीकच्या भविष्यात काही महत्त्वाचे बदल घडणार आहेत, अशी नांदी करणारा हा सप्ताह आहे. त्यामुळे व्यावसायिक आणि व्यक्तिगत जीवनात तुमच्या सभोवतालचे वर्तुळ अचानक बदलेल. व्यापार उद्योगामध्ये ज्या कामातून तुम्हाला फारसे पसे मिळत नाही ते काम बंद करून त्याऐवजी नवीन काम करण्याचा विचार कराल. घरगुती जीवनात जी व्यक्ती बराच काळ तुमच्या सहवासात होती ती लांब गेल्यामुळे चुकल्यासारखे होईल. विद्यार्थ्यांनी चांगल्या अभ्यासक्रमासाठी घरापासून लांब राहण्याची तयारी करावी.

तूळ हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तुम्ही ठोस उपाययोजना कराल. एखाद्या विशिष्ट कारणानंतर निर्माण झालेले हितसंबंध अचानक काही कारणाने संपुष्टात येतील. पण नवीन व्यक्तीचा सहवास लाभल्याने त्याची खंत वाटणार नाही. व्यवसाय उद्योगात तुमच्या आवडीचे काम मिळेल. नोकरीमध्ये एखाद्या विशेष कामानिमित्त जादा सुविधा मिळेल. घरामध्ये तरुणांच्या विवाहासंबंधी संभ्रम निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आवडत्या करिअर करता घरापासून लांब राहण्याची तयारी ठेवावी.

वृश्चिक खूप प्रयत्न करूनही जेव्हा एखाद्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही त्यावेळेला आपण ती गोष्ट नशिबावर सोडून देतो. तशी आता तुमची स्थिती असेल. ही ग्रहस्थिती लवकरच बदलणार आहे. व्यवसाय उद्योगात खर्चाची आधीच तरतूद झाल्यामुळे जे पसे हातात पडतील त्याचा फारसा उपयोग होणार नाही. जुनी देणी देता येतील. नोकरीमध्ये वरिष्ठ श्रेय देतील असे गृहीत न धरता तुमचे कर्तव्य करत राहा. घरामध्ये क्षुल्लक कारणावरून इतरांचा राग तुम्हाला सहन करावा लागेल. विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळतील.

धनू तुमच्या सभोवतालचे वातावरण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा पवित्रा सावध ठेवा. व्यापार उद्योगात जी नवीन कामे मिळतील त्यांच्याबाबतीत दुरून डोंगर साजरे असा अनुभव येईल. पूर्वीचे हितसंबंध घाईने तोडू नका. कारखानदारांना बाजारातील बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्यांचा पवित्रा बदलणे भाग पडेल. नोकरीमध्ये तुमच्याशी सल्ला-मसलत न करता संस्थेच्या गरजेपोटी तुमची बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या सहकाऱ्यांपासून ताटातूट होईल. विद्यार्थ्यांनी फार मोठे बेत करू नयेत.

मकर दोन आघाडय़ांवर तुमची दोन रूपे इतरांना पहायला मिळतील. व्यापार उद्योगात शिथिलता आली असेल तर ती भरून काढण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. कदाचित त्याकरता एखादा धाडसी निर्णय घेण्याचा मोह होईल. नोकरीमध्ये इतर वेळेला शांतपणे आणि इतरांच्या कलाने वागणारे तुम्ही एखाद्या कारणाने आग्रही बनाल. घरामध्ये वर्दळ कमी झाल्याने सुनेसुने वाटेल. वाहन चालविताना किंवा प्रवास करताना सावध राहा. तरुणांना प्रेमात रुसवेफुगवे सहन करावे लागतील. विद्यार्थ्यांना करिअरसंबंधी तडजोड करावी लागेल.

कुंभ एकाच माणसाला एकाच वेळी सर्व आघाडय़ा सांभाळता येत नाहीत. तसे करायला गेल्यावर काहीतरी चुका होतात. याची जाणीव झाल्याने तुम्ही स्वत:वरच नाराज असाल. व्यवसाय उद्योगात ज्या कामामध्ये तुम्ही स्वत: लक्ष घालाल त्यामधे चांगली प्रगती होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या, संस्थेच्या गरजा जास्त असल्यामुळे तुम्ही केलेले काम अपुरेच वाटेल. घरामध्ये कोणाचाच कोणाला पायपोस राहणार नाही. वाहन चालवताना व मशीनवर काम करताना सावधगिरी बाळगा.

मीन तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत ती शक्यतो तातडीने उरका. ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असाल त्यांच्या बाबतीत भरवशाच्या म्हशीला टोणगा असा अनुभव येण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगामध्ये नवीन गिऱ्हाइकांशी संपर्क साधणे, महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करणे अशा गोष्टींना प्राधान्य द्या. नोकरीमध्ये एखाद्या नेहमीच्या सहकाऱ्याच्या लांब जाण्यामुळे घाईघाईत काम उरकण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये किरकोळ प्रश्नावरून तुम्ही चिडून जाल.

Story img Loader