मेष तुमच्या दृष्टीने जी कामे जनसंपर्कावर आधारित आहेत ती तातडीने उरका, कारण नंतर त्यात विलंब होईल. व्यापार-धंद्यात नवीन करार करत असाल तर त्यावर सही करण्यापूर्वी त्यातील अटींचा सखोल विचार करा. एखाद्या कामानिमित्त तातडीने प्रवासाला जावे लागेल. आर्थिक बाजू जरी खूप चांगली नसली तरी काम समाधानकारक होईल. नोकरीमध्ये कामाच्या वेळी काम करून फावल्या वेळात तुम्ही मौजमजा अनुभवाल. घरातील सुखसुविधा आणि आवश्यक गोष्टी या दोन्ही गोष्टींकरिता खरेदी होईल.

वृषभ ग्रहमान चांगले असल्यामुळे आता तुम्हाला वेळेशी स्पर्धा करत काम करायचे आहे. तुम्हाला अत्यावश्यक वाटणारी आणि पैशांसंबंधी कामे ताबडतोब हातात घ्या. नंतर तुमचीच गैरसोय होईल. व्यापार-उद्योगात आजची पेरणी उद्या उपयोगात पडेल असा विश्वास ठेवून पैसे गुंतवायला लागले तरी त्याचे वाईट वाटून घेऊ नका. नेहमीच्या कामात चांगली गती राहील. बेकार व्यक्तींनी तडजोड करण्याची तयारी दाखवावी तर त्यांना नोकरी मिळेल. चालू नोकरीमध्ये एखादे कष्टदायक पण श्रेय देणारे काम मिळेल.

मिथुन तुमच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामांना हातात घेऊन ती संपुष्टात आणा. व्यवसाय-धंद्यात तुमच्या कामासंबंधी चांगल्या घटना घडतील. पैशांची आवक वाढण्याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये जे काम तुम्ही कराल त्यामध्ये तुमच्या हुशारीची चुणूक इतरांना दिसून येईल. मात्र वरिष्ठ त्याचे श्रेय द्यायला तयार होणार नाहीत. त्याचा जास्त विचार न करता तुमचा स्वार्थ साधा. घरामध्ये शब्दाने शब्द वाढू देऊ नका. तरुणांचे विवाह ठरण्याची शक्यता निर्माण होईल. आशावाद वाढेल. कलाकारांना प्रसिद्धी मिळेल.

कर्क ग्रहस्थिती तुमच्या प्रयत्नादी स्वभावाला पूरक आहे. त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. व्यापार-उद्योगात एखादे नवीन पद्धतीचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक त्या हालचाली सुरू होतील. बेकार व्यक्तींनी त्यांच्या अटी शिथिल केल्या तर नोकरी मिळू शकेल. चालू नोकरीत तुम्हाला न आवडणारे काम सोपवण्याची लक्षणे दिसू लागतील. घरामध्ये एखाद्या कठीण प्रश्नावर सर्वानुमते तोडगा निघेल. छोटय़ा मेळाव्याच्या निमित्ताने चांगला बदल घडेल. कलाकारांना मानाचे योग संभवतात.

सिंह पैशाच्या बाबतीत तुमचे अतिऔदार्य कधी कधी महागात पडते. आपुलकीच्या व्यक्ती तुमची स्तुती करून तुमच्याकडून पैसे उधार घेण्याची शक्यता आहे, पण त्याची परतफेड लवकर होणार नाही हे ध्यानात ठेवा. उद्योग-धंद्यामधील नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तीचा सल्ला घ्या. कारखानदारांना परदेशातून ऑर्डर मिळत असेल तर त्यांनी अटी व नियमांचा अभ्यास करावा. नोकरीमध्ये अधिकाराचा वापर जपून करावा. घरामध्ये प्रत्येक सदस्याच्या गरजा वेगळ्या असतील.

कन्या तुमच्या मनामध्ये सतत एक भीती असते की पैशाच्या कारणामुळे आपले काम थांबू नये. तुमच्या दृष्टीने जी महत्त्वाची कामे आहेत ती सुरुवातीला हातात घेऊन पूर्ण करा. व्यापार-उद्योगात गिऱ्हाईकांचे प्रमाण जरी कमी असले तरी पूर्वी हातात घेतलेल्या कामामध्ये तुमचा वेळ जाईल. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी निर्णय घेण्यात उशीर केला तर हातची संधी निसटून जाईल. चालू नोकरीमध्ये अधिकार गाजविण्याची खुमखुमी येईल. घरामध्ये तुमच्या व्यवहारी आणि कल्पक स्वभावाला वाव मिळेल.

तूळ कोणत्या कामाला महत्त्व द्यायचे हे आधीच ठरवा. तुमच्यातील बुद्धिमत्तेला आणि कौशल्याला वाव मिळाल्याने तुम्ही उत्साही दिसाल. व्यवसाय-धंद्यातील जुन्या ओळखी आणि तुम्ही निर्माण केलेल्या सदिच्छा यांचा उपयोग होईल. आर्थिक बाजू सुधारण्याची लक्षणे दिसू लागतील. नोकरीमध्ये तुमच्यावर होणारा अन्याय काही प्रमाणात कमी होईल. नवीन नोकरीसंबंधी निर्णय अर्धवट राहिल्यामुळे उत्कंठा वाढेल. घरामध्ये जोडीदाराच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण कराल. काही न चुकवता येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे खर्च वाढतील.

वृश्चिक तुमच्या दृष्टीने ज्या भेटीगाठी किंवा कामे असतील तर शक्यतो ती तातडीने उरका. नंतर त्यामध्ये विनाकारण विलंब होईल. व्यापार-उद्योगात प्रयत्नांच्या प्रमाणामध्ये फळ देणारे ग्रहमान आहे. एखाद्या कामाकरिता तुम्ही पूर्वी काही प्रयत्न करून ठेवले असतील, पण यश मिळाले नसेल अशा कामाला गती आल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. नोकरीमध्ये जे काम तुम्ही अंगाबाहेर टाकले होते ते काम वरिष्ठांच्या आग्रहामुळे पूर्ण कराल. घरामध्ये मौजमजा आणि कर्तव्य याचा समन्वय साधून मिळालेल्या क्षणाचा आनंद घ्याल.

धनू जी जनसंपर्कावर अवलंबून असतील त्यामध्ये आळस करून चालणार नाही, नाहीतर नंतर विलंब होईल. तुमच्या ओळखी आणि पूर्वी केलेले चांगले काम याचा आता फायदा मिळणार आहे. व्यापार-उद्योगाच्या दृष्टीने कोडय़ात टाकणारी परिस्थिती आहे. लहान कामांऐवजी मोठा हात मारण्याचा तुमचा इरादा असेल. पण त्यातल्या धोक्यांचा नीट अभ्यास करा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. घरामध्ये प्रिय व्यक्तींच्या गरजा आणि हट्ट या दोन्हींकरिता पैसे राखून ठेवा.

मकर एकाच वेळी करिअर आणि घर या दोन्ही गोष्टींना महत्त्व येईल. पण तुम्ही घरगुती प्रश्नांना प्राधान्य द्याल. त्यामुळे घरातील व्यक्ती आश्चर्यात पडतील आणि खूशही होतील. व्यवसाय-उद्योगात मरगळ घालविण्याकरिता जाहिरात प्रसिद्धी याचा वापर करून कामाचे प्रमाण वाढविण्याचा प्रयत्न कराल. कामगारांचा कल कमी काम करून जास्त फायदा करून घेण्याकरिता असेल. नोकरीमध्ये स्वत: जास्त काम न करता हाताखालच्या व्यक्तींकडून काम करवून घ्याल. घरामध्ये पाहुण्यांची ये जा राहील.

कुंभ नशिबाचा वाटा सुधारला या आनंदात तुम्ही असाल आणि पुन्हा एकदा त्याची साथ कमी झाल्यामुळे थोडेसे निराश व्हाल. पण ‘प्रयत्नांती परमेश्वर’ हे लक्षात ठेवा आणि तुमचे प्रयत्न वाढवा. व्यापार-उद्योगात सरळ मार्गाने यश मिळत नाही असे पाहिल्यानंतर तुमची वाट वाकडी करण्याचा विचार असेल. नोकरीमध्ये ज्या कामाविषयी बरीच उत्सुकता होती ते काम लांबल्यामुळे पुन्हा एकदा वेगळ्या कामात लक्ष घालावे लागेल. नवीन नोकरीचे बेत लांबतील. घरामध्ये काही समारंभ पुढे ढकलले जातील.

मीन तुमच्या मनाची द्विधा करणारे हे ग्रहमान आहे. व्यवसायात चांगली प्रगती करण्याची इच्छा तीव्र होईल. परंतु घरगुती गोष्टींमध्येही तुमचे मन अडकून पडेल. व्यापार-उद्योगात जरी अडथळे असले तरी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल. अतिसाहस शक्यतो टाळा. प्रसिद्धीमाध्यमांकरिता थोडा वेळ आणि पैसे राखून ठेवलेत तर त्याचा उपयोग होईल. नोकरीच्या ठिकाणी एखादे वेगळे प्रशिक्षण घ्यावेसे वाटेल. घरामध्ये ज्या गोष्टींमध्ये तुमचे दुर्लक्ष झाले होते त्याकडे लक्ष देणे भाग पडेल.

Story img Loader