मेष नवीन वैचारिक वळणावर तुम्ही येऊन पोहोचलेले असाल. घराला जास्त महत्त्व द्यायचे का, नोकरी-व्यवसायाला प्राधान्य द्यायचे, असा प्रश्न तुमच्यापुढे असेल. व्यापार-उद्योगात मोठी गुंतवणूक किंवा आर्थिक धोका पत्करण्याची तुमची तयारी नसेल. कामाचे प्रमाणही कमी झालेले तुम्हाला चालणार नाही. नोकरीमध्ये वरिष्ठ कामाच्या स्वरूपामध्ये जे बदल करतील, त्यातून नेमके काय निष्पन्न होईल याचा अंदाज लागणार नाही. घरामध्ये महत्त्वाचा निर्णय तुमच्यापुढे असल्यामुळे तुम्ही त्यात मग्न असाल.

वृषभ कोणताही बदल असो, तो तुम्ही बऱ्याच विचारानंतर करता. पण जे तुम्हाला पाहिजे आहे ते अचानक आणि वेगळ्या पद्धतीने मिळण्याची शक्यता आहे. व्यापार-उद्योगात काळाची गरज, तुमची महत्त्वाकांक्षा आणि स्पर्धकांविषयी असणारी भीती या सगळ्यांमुळे तुमच्या कार्यपद्धतीत तुम्ही अचानक फेरबदल कराल. नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या कामाची पद्धत बदलून टाकतील. त्यामुळे तुम्हालाही तसेच वागावे लागेल. घरामध्ये सुख-दु:खाचा वाटा समसमान राहील. विद्यार्थ्यांना प्रगतीकरिता तडजोड करावी लागेल.

मिथुन तुमच्या राशीचे वैशिष्टय़ असे आहे की, जे काम तुम्ही करीत असता त्यामध्ये थोडा काळ तुम्हाला आनंद वाटतो, पण नंतर त्याचा कंटाळा येतो. याच कारणामुळे अनेक डगरींवर तुम्ही हात ठेवाल. व्यापार-उद्योगामध्ये नवीन आणि आधुनिक असलेल्या आवश्यक तंत्रज्ञानाकडे तुमचा ओढा राहील. त्याकरिता आवश्यक ती माहिती मिळवाल. नोकरीमध्ये स्वत:चे काम सोडून इतरांच्या कामामध्ये लक्ष घालू नका. बदलीकरिता तातडीने प्रयत्न करा. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.

कर्क एका वेगळ्या वळणावर तुम्ही पोहोचले असाल. व्यापार-उद्योगामध्ये जादा भांडवलासाठी तुम्ही ओळखींचा चांगला उपयोग करून घ्याल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांना एखादे नवीन काम मिळण्याची शक्यता निर्माण होईल. नोकरीमध्ये तुमच्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल किंवा स्थलांतर होण्याची शक्यता आहे. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी चिंता वाटेल. एक काम संपते तोच दुसरे काम उपटते असा घरामध्ये अनुभव येईल. त्यासाठी सतत गाठीशी पैसे ठेवावे लागतील. विद्यार्थ्यांच्या विचारात अनिश्चितता राहील.

सिंह प्रत्येक माणूस आपल्या पद्धतीने नियोजन करत असतो आणि त्याला वाटते की माझे तेच बरोबर. परंतु कधी कधी ज्या घडामोडी अचानक घडतात त्यावरून नशिबाचा काही डाव वेगळाच आहे असे लक्षात येते. या सर्व गोष्टींची चुणूक दिसून येईल. नोकरीमध्ये तुमच्या संस्थेची गरज म्हणून कामाच्या स्वरूपात फेरफार होण्याचे संकेत मिळतील. त्याचा तुमच्या उत्पन्नावर आणि जीवनपद्धतीवर परिणाम होईल. घरामध्ये अत्यावश्यक खर्चाची नांदी होईल. विद्यार्थ्यांना करिअरचा महागडा पर्याय स्वीकारावा लागेल.

कन्या तुमचे विचार तुम्ही इतरांना बोलून दाखवत नाही, पण त्या वेळेला एक वेगळेच मंथन चालू असेल. सध्या तुम्ही वैचारिकदृष्टय़ा एका संक्रमणाच्या उंबरठय़ावर असणार आहात. व्यापार-उद्योगामध्ये थोडेसे धाडस करण्याकडे तुमचा कल राहील. नवीन तंत्रज्ञान आत्मसात कराल. नोकरीमध्ये बदल करण्याचे बेत लांबलेले असतील तर त्याला गती येईल. चालू नोकरीत भरपूर काम कराल. घरामध्ये तुमच्या आज्ञेनुसार वागले पाहिजे, असा तुमचा आग्रह असेल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्ती चमकतील.

तूळ जीवनामध्ये प्रगती म्हटली की बदल आलेच. व्यवसाय-धंद्यात आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून कार्यपद्धतीमध्ये बदल करावासा वाटेल. त्यानिमित्ताने वेगळ्या व्यक्तींचा सहवास घडेल. नोकरीच्या प्रयत्नांना यश मिळावे म्हणून तुम्ही धडपड कराल. चालू नोकरीमध्ये वरिष्ठ त्यांच्या कामाकरिता तगादा लावतील. त्यामुळे स्वत:चे आणि वरिष्ठांचे काम करणे म्हणजे तारेवरची कसरत होईल. घरामधील प्रश्नामुळे आलेल्या तणावाचा मनस्वी कंटाळा येईल. विद्यार्थ्यांनी कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा.

वृश्चिक भाग्यस्थानात गुरू आल्यामुळे तुमच्यामध्ये उत्साह जागृत होईल. सभोवतालची परिस्थिती फारशी अनुकूल नसतानाही तुम्ही एखादा निर्णय केवळ निश्चयाच्या जोरावर घ्याल. व्यापार-उद्योगामध्ये आपले काहीतरी चुकत आहे असे वाटून धाडस करायला सिद्ध व्हाल. हितचिंतकांकडून थोडीफार साथ मिळेल, पण त्यावर तुम्ही अवलंबून राहणार नाही. जोडधंदा असणाऱ्यांनी हातातली संधी वाया जाऊ देऊ नये. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपात अचानक काही बदल संभवतात. नंतर त्यातून फायदा होईल.

धनू तुमचा मूड कधी बदलेल याचा कोणालाही पत्ता लागत नाही. अर्थातच त्यामुळे सभोवतालच्या व्यक्तींना तुमच्या कलाकलाने वागावे लागते. व्यवसाय-उद्योगात पैसे कमी मिळाल्यावर तुम्ही गोंधळून जाल. पण पैशाच्या लालसेपोटी चालू असलेल्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा विचार मनात आणाल. वेळ पडली तर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीमध्ये कामाच्या स्वरूपामध्ये काही बदल झाले असतील तर त्यामध्ये तुम्हाला रुळायला वेळ लागेल. विद्यार्थ्यांची करिअरची दिशा बदलण्याची शक्यता आहे.

मकर अनेक वेळला अतिविचार करण्यामुळे तुम्ही निर्णय घ्यायला खूप वेळ घालविता. त्यामुळे कामाचे महत्त्व कमी होते. आता विचार करण्यापेक्षा कृतीची तुम्हाला जास्त घाई असेल. तुमच्यापुढील कामाचे उद्दिष्ट मोठे असल्यामुळे एकप्रकारचा तणाव जाणवेल. व्यापार-उद्योगामध्ये गिऱ्हाईकांची ये-जा कमी असल्यामुळे आपल्या कामामध्ये काही चूक तर होत नाही ना, अशी शंका निर्माण होईल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे तुमचा गोंधळ उडेल. विद्यार्थ्यांचे नियोजन अचानक बदलण्याची शक्यता आहे.

कुंभ घरामधल्या व्यक्तींचे विचार एका दिशेने आणि तुमच्या करिअरसंबंधीचे विचार दुसऱ्या दिशेने असा प्रकार पाहायला मिळेल. व्यापार-उद्योगात तुम्हाला काय वाटते याला जास्त महत्त्व न देता बाजारामधल्या घडामोडींचा आढावा घेऊन तुमचा पवित्रा ठरवा. महागडे बेत घाईने अमलात आणू नका. नोकरीमध्ये ज्यांना बदल करायचा आहे त्यांनी नवीन नोकरीतल्या जबाबदाऱ्यांचा अंदाज घ्यावा. चालू नोकरीमध्ये वरिष्ठांच्या बदलत्या सूचनांमुळे गोंधळ उडेल. हवापालटाकरिता थोडासा प्रवास करावासा वाटेल.

मीन ज्या वेळेला ग्रहमान चांगले नसते, त्या वेळेला आपले बेत चांगले असूनही त्याला संबंधित व्यक्तींकडून प्रतिसाद मिळत नाही. पण मनामध्ये कुठे तरी ही गोष्ट तरळत असते. पूर्वीचे बेत भविष्यातील प्रगतीकरिता कार्यान्वित करावेसे वाटतील, पण बदलत्या काळानुसार त्यामध्ये बदल करावा लागेल. तुमचे धोरण लवचीक ठेवा. व्यापार-उद्योगात बाजारातील चढाओढ आणि स्पर्धा यांचा अंदाज घेऊन तुम्हाला तुमचा पवित्रा बदलणे भाग पडेल. विद्यार्थ्यांनी बेत बदलू नयेत.

Story img Loader