मेष जे प्रश्न निर्माण झाले होते त्यातून बाहेर पडण्यासाठी अजूनही जवळजवळ दीड ते दोन महिने लागणार आहेत. यादरम्यान तुम्हाला काही कटू निर्णय घ्यावे लागतील. कदाचित तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल. पूर्वीच्या चुकीच्या निर्णयांची नुकसानभरपाई करावी लागेल. या सगळ्याला हारून न जाता हिमतीने उभे राहा. नोकरीमध्ये संस्थेमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा अंदाज घेऊन मगच तुमचा पवित्रा ठरवा. घरामध्ये वादाच्या वेळेला मौन पाळणे चांगले; नाहीतर शब्दाने शब्द वाढेल.

वृषभ तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये चांगले-वाईट बदल घडवून आणले असतील, त्यांचे नेमके काय परिणाम होणार आहेत याची जाणीव आता तुम्हाला हळूहळू होईल. कदाचित हे अनुभव किरकोळच असतील, परंतु त्यामुळे तुमच्या अनेक शंकाकुशंका दूर होतील. कारखानदारांना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एखादे महागडे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. नोकरीमध्ये बदली किंवा कामाच्या स्वरूपामधे बदल होईल. घरामध्ये वादविवाद किंवा मतभेदांवर ठोस निर्णय घेण्यासाठी पावले उचलावी लागतील.

मिथुन बऱ्याच दिवसांनंतर ग्रहस्थिती सुधारल्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षांवर कोणीही बंधन घालू शकणार नाही. व्यवसाय-उद्योगात आयत्या वेळेला तुमची कार्यपद्धती बदलून स्पर्धकांना कोडय़ात टाकाल. नवीन ऑर्डर मिळतील. नोकरीमध्ये चांगले काम करून वरिष्ठांना खूश ठेवाल. त्यामुळे गुप्तशत्रूंच्या लाथाळ्यांचा उपयोग होणार नाही. संस्थेमध्ये होणारे लहानमोठे बदल तुमच्या पथ्यावर पडतील. घरामध्ये आनंद उत्साह साजरा कराल. कुटुंबातील सदस्यांची हौसमौज पूर्ण कराल.

कर्क तुमच्या करिअर आणि सांसारिक जीवनामध्ये ज्या घडामोडी घडत होत्या त्याचे नेमके स्वरूप कसे आहे त्यानुसार भविष्यातील पवित्रा ठरविणे शक्य होईल. व्यापार-उद्योगात जेवढे जास्त काम तेवढी जास्त कमाई असे समीकरण असल्यामुळे तुम्ही भरपूर मेहनत घ्याल. नव्या आणि जुन्या गिऱ्हाइकांकडून तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. व्यावसायिक व्यक्तींना नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीमध्ये संस्थेतर्फे उपलब्ध होणाऱ्या रोख किंवा इतर सवलतींचा तुम्ही चांगला फायदा उठवू शकाल.

सिंह नवीन संक्रमणाचा अनुभव आता तुम्हाला येणार आहे. त्याचे स्वरूप खट्टामीठा असे असणार आहे. व्यक्तिगत जीवनात तुम्हाला थोडीशी कमतरता सहन करावी लागेल; पण त्याची कसर व्यावसायिक जीवनात भरून निघाल्यामुळे तुम्हाला फारसा तणाव जाणवणार नाही. तुमच्या मनाची परिस्थिती विचित्र बनवणारी ग्रहस्थिती असल्याने तुम्ही विचारात पडाल. व्यवसाय-उद्योगात नवीन योजनेला वेग देण्यासाठी जीवापाड मेहनत कराल. मात्र अनोळखी व्यक्तींवर जास्त अवलंबून राहू नका.

कन्या जे काम तुम्ही हातात घ्याल ते तडीस नेण्याचे धोरण ठेवाल. त्याचा फायदा तुम्हाला आणि सभोवतालच्या व्यक्तींना निश्चित मिळेल. नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष होईल, पण पैशाची पकड तुम्ही ढिली होऊ देणार नाही. व्यवसाय-उद्योगामध्ये कामाचे प्रमाण व्यवस्थित असेल. परंतु मोठे व्यवहार उधारीचे असल्यामुळे हातामध्ये त्यामानाने रोख रक्कम कमी असेल. नोकरीमध्ये ज्या कामातून तुमचा फायदा जास्त आहे त्यावर लक्ष केंद्रित कराल. घरामधील वातावरण सौख्यकारक असेल. आवडत्या वस्तूची खरेदी कराल.

तूळ तुमची जी गैरसोय झाली होती आणि त्यातूनच खर्चही वाढले होते त्याची कसर भरून काढण्याची तुम्हाला घाई असेल. अनेक वेळेला अतिविचार करून तुम्ही हातची संधी दवडता. आता तुम्हाला काही निर्णय झटपट घेऊन त्यावर कृती करावीशी वाटेल. व्यापार-उद्योगात आर्थिकदृष्टय़ा चांगली संधी निर्माण होईल. बराच काळ हुलकावणी देणारी एखादी ऑर्डर मिळण्याची शक्यता निर्माण होईल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. जादा पगारासाठी सध्याच्या नोकरीमध्ये बदल करण्याचे विचार कार्यान्वित होतील.

वृश्चिक गेल्या काही महिन्यांत तुमच्या जीवनात बरीच खळबळ माजली. तुमचे ठरलेले बेत बदलल्याने चिंताही निर्माण झाली. त्यामध्ये तुम्ही निश्चयाने मार्गक्रमण करायचे ठरवाल. व्यापार-उद्योगात पूर्वीच्या अनुभवावरून एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यास प्रवृत्त व्हाल. ज्या कामातून फायदा होत नाही त्यात बदल करण्याचा तुमचा मानस असेल. घरामध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्याल. सामूहिक कामात सहभागी व्हाल. त्यामुळे विरंगुळा लाभेल.

धनू ग्रहांची आवश्यक त्या वेळी साथ मिळाल्याने जे खर्च अपेक्षित असतील त्याची तरतूद होईल. मात्र तुम्हाला तुमच्या इच्छेवर लगाम ठेवावा लागेल. व्यावसायिक व्यक्तींना सप्ताह चांगला जाईल. जाहिरात, प्रसिद्धी माध्यमातून मिळणारा प्रतिसाद चांगला असल्याने भरपूर काम मिळेल. जे पैसे मिळतील त्यातून लहानमोठे कर्ज फेडून टाका. घरामध्ये मुलांच्या आणि प्रिय व्यक्तींच्या हट्टाला तुम्ही बळी पडाल. स्वत:ची हौसमौज भागवायला विसरणार नाही. सामूहिक कामामध्ये भाग घ्याल.

मकर एखादा प्रश्न विनाकारण लोंबकळत पडला असेल आणि ज्यातून तुम्हाला बरेच पैसे मिळणार असतील तर त्या कामाला गती येईल. व्यापार-उद्योगामध्ये भरपूर काम करण्याची तुमची तयारी असेल. अर्थातच त्यामुळे दिवसाच्या शेवटी ताळेबंद केल्यावर तुमच्या चेहऱ्यावर हास्य दिसेल. नोकरीमध्ये चांगल्या संधीची कुणकुण लागेल. काही जणांना थोडय़ा अवधीकरता परदेशी जाता येईल. घरामध्ये सगळ्यांनी तुम्हाला मान दिल्यामुळे तुम्ही त्यांच्या इच्छाआकांक्षा जरी महाग असल्या तरी पूर्ण करायला तयार व्हाल.

कुंभ अनेक गोष्टी तुमच्या मनात असल्यामुळे नेमके कशाला महत्त्व द्यायचे याविषयी गोंधळ उडेल. तुमच्या नियोजनानुसार काम केलेत तर कोणताच प्रश्न उद्भवणार नाही. व्यवसाय-उद्योगात गिऱ्हाइकांची वर्दळ आणि त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद दोन्ही चांगले असल्यामुळे खूप काम करावेसे वाटेल. पैशाच्या अडचणीवर तुम्ही मार्ग शोधून काढाल. नोकरीमध्ये वरिष्ठ महत्त्वाच्या प्रोजेक्टकरता तुमची निवड करतील. काही जणांना त्याकरता परदेशीसुद्धा जाता येईल. घरामध्ये जोडीदाराच्या विचारांचा बराच प्रभाव राहील.

मीन अनेक अनपेक्षित अडथळे निर्माण झाल्यामुळे सर्व आघाडय़ांवर तुमची धावपळ झाली होती. आता तुम्हाला सुटकेचा नि:श्वास टाकायला हरकत नाही. व्यवसाय-उद्योगात अपेक्षित व्यक्तींकडून तुम्हाला साथ मिळेल. खर्चाची सोय झाल्यामुळे जरी पैसे शिल्लक राहिले नाहीत तरी पैसे मिळवल्याप्रमाणेच वाटेल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात मनासारखी एखादी संधी दृष्टिक्षेपात येईल. घरामधील ताणतणाव कमी झाल्याने एखादा छान बेत ठरेल.

Story img Loader