मेष स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही याची प्रचीती देणारे ग्रहमान आहे. ज्या कामामध्ये तुम्ही लक्ष घालाल त्या कामाला चांगला वेग येईल, पण इतरांवर सोपवलंत तर तुमची गैरसोय होईल. व्यापार उद्योगामध्ये सरकारी नियम किंवा तांत्रिक अडथळे दूर करण्याकरिता सक्रिय राहावे लागेल. नोकरीमध्ये तुमच्याकडे काही नवीन चांगल्या कल्पना वरिष्ठांसमोर ठेवाल, पण ते ताबडतोब प्रतिसाद देणार नाहीत. नवीन नोकरीचे काम लांबण्याची शक्यता आहे. तरुणांना काहीच प्रगती न झाल्यामुळे थोडेसे अस्वस्थ वाटेल.

वृषभ तुमच्या कामामध्ये तांत्रिक अडथळे असतील. ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून आहात त्यांचीच काही तरी अडचण निघाल्यामुळे तुम्ही ठरविलेले बेत बदलावे लागतील. व्यापार-उद्योगामध्ये बाजारपेठेतील वारे लक्षात घेऊन काही नवीन योजना तुम्ही मनाशी आखाल. परंतु पैशाच्या अडचणी पार करण्याकरिता हितचिंतक किंवा वित्तीय संस्थेची मनधरणी करावी लागेल. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या आज्ञेचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुमचे विचार भावंडांना किंवा ज्येष्ठ व्यक्तींना पटणार नाहीत.

मिथुन ग्रहमान तुमच्या मनाची चलबिचल करणारे आहे. काही तरी भव्यदिव्य घडावे असे तुम्हाला वाटत राहील. परंतु पैशाचा विचार केल्यावर त्यावर मर्यादा येतील. व्यवसाय उद्योगाच्या कामासाठी जादा भांडवलाची गरज असेल तर त्याची व्यवस्था होईल. त्यामुळे जागेचे सुशोभीकरण करण्याचा विचार मनात येईल. नोकरीमध्ये कामानिमित्त विशेष सवलती मिळाव्यात अशी तुमची अपेक्षा असेल, पण वरिष्ठ त्याला लगेचच होकार देणार नाहीत. घरामध्ये दोन पिढय़ांतील विचारांची तफावत जाणवेल.

कर्क प्रगतीचा मार्ग निर्वेध असला की यशाची किंमत कळत नाही, असा अनुभव तुम्हाला येईल. अगदी सहज आणि सोप्या वाटणाऱ्या कामात लक्ष घातल्यानंतर त्यातले अडथळे तुम्हाला दिसायला लागतील. पण जिद्दीच्या जोरावर तुम्ही तुमचे काम फत्ते करू शकाल. व्यापार-उद्योगातील कोणतेही मोठे बेत करण्यापूर्वी त्यातील सरकारी नियम, कामगारांच्या अडचणी लक्षात घ्याल. नोकरीमध्ये तुमची कार्यपद्धती आणि कल्पना वरिष्ठांना पटतील, परंतु ते तसे दर्शविणार नाहीत. घरामध्ये शुभकार्याची नांदी होईल.

सिंह नशिबाची साथ लाभणार नाही, पण इच्छा आहे तेथे मार्ग आहे या तुमच्या वृत्तीमुळे काही गोष्ठी तडीस लावू शकाल. व्यापार-उद्योगामध्ये निर्णय घेण्याची किंवा कृती करण्याची घाई करू नका. जे काम तुम्हाला करायचे आहे त्याचे व्यवस्थितपणे नियोजन करा. पैशाची तंगी जाणवेल. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्याकडून महत्त्वाचे काम करून घेतील. त्याचे श्रेय मात्र द्यायला ते तयार होणार नाहीत. घरामध्ये अत्यावश्यक गरजांकरिता वेळ आणि पैसे दोन्ही राखून ठेवा.

कन्या एका हाताने घ्यायचे आणि दुसऱ्या हाताने द्यायचे असा या आठवडय़ात प्रकार असेल. व्यापार-उद्योगातील कामाचे प्रमाण हळूहळू वाढत गेल्यामुळे तुमच्यामधला उत्साहसुद्धा वाढत राहील. खेळत्या भांडवलाच्या गरजेपोटी बँक किंवा इतर ठिकाणाहून पैसे उभे करावे लागतील. नोकरीमध्ये तुमच्या आवडीचे काम तुम्हाला मिळेल. त्यातून जास्त सवलती आणि पैसे मिळतील, पण वरिष्ठ ही संधी साधून वेगळे कामही तुमच्यावर सोपवतील. घरामध्ये महत्त्वाची कामे सर्वजण विश्वासाने तुमच्यावर सोपवतील.

तूळ ग्रहमान सुधारल्यामुळे तुमच्या मनाचे वारू आता उधळलेले असेल. प्रत्येक कामात आपला पुढाकार असावा ही तुमची इच्छा विशेषरूपाने दिसून येईल. पण यशाचा मार्ग खडतर आहे हे लक्षात ठेवा. व्यवसाय-उद्योगात आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसू लागतील. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून एखादी मागणी पूर्ण करून घेण्यासाठी गोडीगुलाबीने वागणे आवश्यक आहे. नवीन नोकरीचे काम तात्पुरते लांबेल. घरामध्ये एखाद्या विषयावर चर्चा होईल. ज्येष्ठांची मते तरुणांना पटणार नाहीत. कोर्ट व्यवहारात सावध राहा.

वृश्चिक कोडय़ात टाकणारी परिस्थिती आता सुधारत असल्यामुळे प्रत्येक बाबतीत तुम्ही आशावादी बनाल. व्यापार-उद्योगात एखादी गोष्ट कठीण आहे हे माहीत असूनही तुम्ही ते आव्हान समजून त्यात लक्ष घालाल. नवीन ऑर्डर मिळविण्याकरिता प्रयत्न करा. नोकरीमध्ये वरिष्ठ मधाचे बोट चाटवून तुमच्याकडून नेहमीपेक्षा जास्त काम करून घेतील. व्यक्तिगत जीवनामध्ये सरकारी नियम आणि कोर्ट व्यवहार याबाबतीत काटेकोर राहा. घरातील व्यक्तींच्या बाबतीत एखादी चांगली घटना घडण्याची नांदी होईल.

धनू वातावरण फारसे उत्साहवर्धक नसेल. किंबहुना प्रत्येक कामामध्ये यशाविषयी साशंकता असेल. पण बचेंगे तो और भी लढेंगे असा तुम्ही तुमचा पवित्रा ठेवलात तर बरेच काम करू शकाल. व्यापार-उद्योगात पैशाची आवक कमी राहील. नोकरीमध्ये वरिष्ठांची संमती घेतल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय परस्पर घेऊ नका. घरामध्ये स्वत:ची आणि वयोवृद्ध व्यक्तींची मन:स्थिती, प्रकृती या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. वस्तूंची मोडतोड, डागडुजी यामुळे खर्च हाताबाहेर जातील.

मकर तुमच्यामधील जिद्द आणि कल्पकता याला भरपूर वाव असल्यामुळे अविरत मेहनत करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात नावीन्यपूर्ण काम करण्याकरिता एखादा नवीन मार्ग शोधून काढाल. ज्यांचा कमिशन ब्रोकरेज अशा प्रकारचा व्यवसाय आहे अशा व्यक्तींना चांगली संधी चालून येईल. नोकरीमध्ये तुमच्याकडे असलेल्या कौशल्यामुळे छोटी-मोठी मागणी वरिष्ठांकडून मंजूर करून घ्याल. घरामध्ये मोठय़ा व्यक्तीच्या प्रकृतीची आणि वडिलोपार्जित इस्टेटीची चिंता वाटेल.

कुंभ ज्या यशाचा तुम्ही पाठलाग करीत आहात ते तुमच्यापासून लांब पळत आहे असा तुम्हाला भास होईल. त्यामुळे तात्पुरती निराशा होईल. सध्या शो मस्ट गो ऑन या तत्त्वानुसार काम करत राहाल. व्यवसाय-उद्योगात तुमचे भविष्यातील बेत स्पर्धकांपासून गुप्त ठेवा. सरकारी नियम व कायदे यांचे उल्लंघन होऊ देऊ नका. नोकरीमध्ये एखादी चूक राहिली तर ती वरिष्ठांना सहन होणार नाही. उलट उत्तर देऊ नका. घरामधल्या मोठय़ा व्यक्तींसंबंधी चिंता वाटेल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष झाले असेल तर त्याचा त्रास होईल.

मीन थोडीशी मुभा मिळाली की तुमच्या मनाचे वारू उधळायला वेळ लागत नाही. परंतु त्याच्या परिणामांचाही विचार करून ठेवा. व्यापार उद्योगामध्ये सरकारी नियम आणि कायदे सांभाळून नवीन योजनेचा संकल्प करा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या पद्धतीनुसार सर्व गोष्टी हाताळल्या तर तुमचाच फायदा होईल. घरामध्ये वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती किंवा त्यांच्या वागण्या-बोलण्यामुळे विचित्र परिस्थिती निर्माण होईल. प्रियजनांकडून एखादी खूशखबर कळेल.

Story img Loader