ज्या वेळी अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे असतात त्या वेळेला उसने अवसान आणून आपल्याला कामे करावी लागतात. सध्या तुमची स्थिती अशीच असणार आहे. एवढेच नव्हे तर मन स्थिर ठेवण्याचे आव्हानही स्वीकारावे लागेल. व्यापार-उद्योगातील प्रश्न सोडविण्याकरिता गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला आवडत नाही ते करावे लागल्याने त्यात चूक होण्याची शक्यता आहे. घरामध्ये आप्तेष्ट नातेवाईक यांच्याकडून प्रतिसाद मिळणे अवघड आहे.

वृषभतुमचे घर आणि तुमची नोकरी-व्यवसाय या आघाडय़ांवर भरपूर आणि चांगले काम करण्याचा तुमचा इरादा असेल. त्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करण्याची तुमची तयारी असेल. व्यापार-उद्योगात नवीन भागीदारी किंवा मैत्री कराराचे प्रस्ताव पुढे आले त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याचा अंदाज घ्या. नोकरीमध्ये संस्थेच्या गरजेकरिता थोडय़ा कालावधीसाठी तुमची वेगळ्या टेबलावर किंवा स्थळी बदली होण्याची शक्यता आहे. घरामध्ये तुम्ही इतरांवर हुकमत गाजवाल.
मिथुन फारशी दगदग धावपळ न करता जे काम सहजगत्या जमेल त्यावर लक्ष केंद्रित करायचे तुम्ही ठरवाल. पण ‘तेरडय़ाचा रंग तीन दिवस’ या म्हणीप्रमाणे थोडा कालावधी गेल्यावर तुमची उलघाल सुरू होईल आणि पुन्हा एकदा तुम्ही कामाला लागाल. व्यापार-उद्योगामध्ये पैशाची आवक आणि नफ्याचे प्रमाण वाढवण्याकरिता काही नवीन बेत आखून ठेवाल. नोकरीमध्ये काम कमी, पसारा जास्त असा प्रकार झाला तर वरिष्ठ नाराज होतील. नवीन नोकरीचे प्रयत्न वाढवा. घरामध्ये इतरांच्या कलानुसार वागावे लागेल.
कर्क तुम्हाला खूप काही तरी करायचे असेल परंतु ज्यांच्यावर तुम्ही अवलंबून असाल त्यांचा प्रतिसाद मात्र थंड असेल. प्रत्येकाला घोडय़ावर बसवून काम करून घेणे म्हणजे एक दिव्यच असेल. व्यवसाय-उद्योगामध्ये गिऱ्हाइकांची ये-जा कमी राहिल्यामुळे आपण कुठे चुकलो का असे वाटेल. व्यावसायिक जागेचे आधुनिकीकरण, दुरुस्त्या वगैरे गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. नोकरीमध्ये तुम्ही तुमचे कर्तव्य चोख बजावाल. नवीन कल्पना वरिष्ठांना सुचवाल. घरामध्ये प्रत्येक जण आपल्याच नादात असेल.
सिंह अनेक कामे पूर्ण करण्याचा तुमचा मानस असेल. पण प्रत्येक बाबतीत तुम्हाला इतरांवर अवलंबून राहिल्यामुळे एक प्रकारचा अडसर वाटेल. त्यातूनही तुम्ही काही तरी चांगला मार्ग काढाल. व्यापार-उद्योगामधे प्रत्यक्ष कामाचे प्रमाण जरी कमी झाले तरी पैशाची तुम्हाला चिंता नसेल. येणी वसूल करताना गिऱ्हाईकांचे मन सांभाळा. नोकरीमध्ये ज्यांना बदली हवी असेल त्यांनी प्रयत्न करावेत. घरामध्ये एखाद्या निमित्ताने नातेवाईक, आप्तेष्ट किंवा मित्रमैत्रिणी यांची हजेरी लागेल. तरुणांचा उत्साह ओसंडून वाहील.
कन्या संथ गतीने पण विचारपूर्वक काम करणारी तुमची रास आहे. पण या आठवडय़ात प्रकार उलटा असेल. आधी कृती आणि नंतर विचार असे धोरण तुम्ही अमलात आणाल. व्यापार-उद्योगात कामाला गती देण्याकरिता आवश्यक असणारी सर्व माहिती तुम्ही मिळवाल. वेळप्रसंगी छोटा प्रवास करण्याची तुमची तयारी असेल. नोकरीमध्ये मात्र तुमची कामाची गती चांगली असली तरी वरिष्ठांना घाईने कोणतेच आश्वासन देऊ नका. घरामध्ये काही न चुकवता येणारी कर्तव्ये तुम्हाला पार पाडावी लागतील.
तूळ ‘कळतं पण वळत नाही’ अशी आता तुमची स्थिती असेल. अनेक चांगले विचार तुमच्या मनामध्ये असतील. पण आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे दाखविण्याकरिता केलेले अचाट, अफाट धाडस नंतर महागात पडेल. व्यापार-उद्योगात भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व असते हे लक्षात ठेवा. नोकरीमध्ये अतिउत्साहाच्या भरात वरिष्ठांना आश्वासन दिले तर ते पाळणे कठीण होईल. कामाच्या स्वरूपात अचानक फेरफार होण्याची शक्यता आहे. घरामध्ये जोडीदारावर अधिकार गाजवण्याची खुमखुमी येईल.
वृश्चिक तुमची रास गूढ स्वभावाची मानली जाते. तुमच्या मनात काय चालले आहे हे समजत नाही. या आठवडय़ामध्ये याचा प्रत्यय सभोवतालच्या व्यक्तींना येईल. व्यवसाय-उद्योगात फारसे काम नसल्यामुळे आर्थिक गोष्टी आणि इतर व्यवहारांचा आढावा घ्याल. त्यातून तुम्हाला भविष्यासाठी उपयुक्त ठरणारी बरीच माहिती मिळेल. नोकरीमध्ये तुमच्या वागण्या-बोलण्याचा अंदाज न लागल्याने वरिष्ठ आणि सहकारी बुचकळ्यात पडतील. घरामध्ये माझे तेच खरे हे तुमच्या वागण्या-बोलण्यातून सिद्ध करून दाखवाल.
धनू तुमच्या स्वभावातील वेगवेगळे कंगोरे या आठवडय़ात दिसून येतील. राग, लोभ, प्रेम वगैरे भावना तीव्र असतील. ज्यांना तुम्ही आपले म्हणाल त्यांच्यावर प्रेमाचा वर्षांव कराल. एखाद्या व्यक्तीशी फटकून वागाल. व्यवसाय-उद्योगातील कामाचे प्रमाण कमी असल्याने उत्पन्न वाढवण्यासाठी काही नवे प्रयोग करावेसे वाटतील. नोकरीमध्ये तुमच्या आवडीचे काम तुम्ही वेळेत आणि चोखपणे बजावाल. घरामध्ये सर्व सदस्यांची काळजी घेऊनही त्यांचे समाधान न झाल्यामुळे तुमची चिडचिड होईल. तरुणांनी अतिसाहस टाळावे.
मकर गेल्या एक ते दोन महिन्यांपासून तुम्ही ठरविलेले उद्दिष्ट सफल करण्यासाठी बरेच काम केले असेल. वेळप्रसंगी स्वत:च्या स्वास्थ्याकडेही दुर्लक्ष झाले असेल. खरे म्हणजे आता थोडा काळ विश्रांती आणि स्वास्थ्याची गरज आहे. व्यापार-उद्योगात नेहमीच्या मानाने कमी काम असेल्यामुळे वस्तूंची आवराआवरी दुरुस्त्या आणि नूतनीकरण अशा गोष्टींमध्ये लक्ष घालाल. नोकरीमधील कामाच्या निमित्ताने छोटय़ा प्रवासाचे योग येतील. घरामध्ये एखाद्या कारणाने नातेवाईकांची हजेरी लागेल.
कुंभ एखादी गोष्ट जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचे आकर्षण वाटते. पण ते मिळाल्यावर ‘दुरून डोंगर साजरे’ असा अनुभव येतो. म्हणून या आठवडय़ामध्ये कोणत्याही कामात गडबड न करत जे मिळेल त्यावर समाधान माना. व्यवसाय-उद्योगामध्ये कामाचे प्रमाण हळूहळू कमी होईल. तरीही पूर्वी केलेल्या कामाचे पैसे मिळत राहिल्याने तुम्हाला फार मोठी चिंता जाणवणार नाही. नोकरीमध्ये तुमचे विचार सावधतेने व्यक्त करा. प्रकृतीच्या जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
मीन बऱ्याच वेळेला तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेता आणि त्यामुळे तुमचीच दगदग वाढते. आता जे काम तुम्हाला करायचे आहे त्याचे योग्य नियोजन करा म्हणजे विनाकारण होणारी धावपळ टळेल. व्यापार-उद्योगात नवीन व्यक्तींबरोबर गुंतवणूक करण्यापूर्वी त्या प्रोजेक्टसंबंधी सर्व माहिती निष्णात व्यक्तींकडून मिळवा. नोकरीमध्ये टप्प्या-टप्प्याने कामे पूर्ण करत राहा. घरामध्ये पैशाचा विचार केल्याशिवाय कोणाला कसलेच आश्वासन देऊ नका.

Story img Loader