मेष लाभस्थानातील मंगळ तुमची आर्थिक स्थिती बळकट करायला उपयोगी पडणार आहे. या आठव01vijayडय़ातही जे काम अतिशय कठीण आहे त्यामध्ये तुम्ही शक्ती आणि युक्ती या दोन्हींचा उपयोग करून चांगली प्रगती करू शकाल. नवीन नोकरीकरिता प्रयत्न करणाऱ्यांना एखादी संधी दृष्टिक्षेपात येईल. चालू नोकरीत तुम्ही भरपूर काम कराल. जादा सवलतींकरता तुमची निवड होईल. घरामध्ये तुमच्या उत्तम निर्णयक्षमतेला आणि कृतिशीलतेला भरपूर वाव असेल. कलाकार, खेळाडू, राजकारणी व्यक्तींना लाभदायक सप्ताह आहे.

वृषभ ग्रहमान चांगले असल्यामुळे सध्या तुम्ही मनाशी ठरवूनही शांत बसू शकणार नाही. मोठय़ा आणि अवघड उद्दिष्टाचा तुम्हाला ध्यास लागलेला असेल. ते साध्य करणे कठीण असल्याने तुम्ही तुमची सर्व शक्ती एकवटून प्रयत्न कराल. व्यापार-उद्योगात परदेश व्यवहारांना गती येईल. नोकरीमध्ये तुमची कामाची पद्धत वेळ/काळ संस्थेच्या गरजेपोटी बदलण्याची शक्यता आहे. त्याचा दैनंदिनीवर परिणाम होईल. घरामध्ये प्रत्येक गोष्टीत तुम्हाला महत्त्व मिळाल्यामुळे तुमचा अहंम् सुखावला जाईल.

मिथुन हवामानातील बदल आणि वेडीवाकडी होणारी दगदग, धावपळ यामुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याकडे लक्ष ठेवून तुमचे कार्यक्रम आखा. व्यापार-उद्योगात तुम्ही तुमची कल्पकता आणि दूरदृष्टी या दोन्हींचा चांगल्या पद्धतीने वापर करून यश मिळविण्याचा तुमचा इरादा असेल. नोकरीमध्ये वरिष्ठांना तुमच्या हुशारीविषयी शंका नसेल. घरामध्ये प्रत्येकाचे विचार वेगळ्या दिशेने धावत राहिल्याने तुम्ही कोडय़ात पडाल. तरुण मंडळींना पाहिजे तसे स्वातंत्र्य मिळणार नाही.

कर्क तुमच्या राशीला चररास असे म्हटलेले आहे. कारण एका जागी तुम्ही जास्त काळ बसू शकत नाही. एखाद्या नावीन्यपूर्ण कल्पनेच्या मागे तुम्ही धावत राहाल. पण या नादात दैनंदिनीकडे दुर्लक्ष होणार नाही याची मात्र खबरदारी बाळगा. व्यापार-उद्योगात जादा भांडवलाची किंवा तात्पुरत्या कर्जाची तुम्हाला गरज भासेल. नोकरीमध्ये काही नवीन कल्पना तुम्ही वरिष्ठांना सुचवाल. त्याचा गुप्तशत्रूंना सुगावा लागू देऊ नका. घरामध्ये आवडत्या व्यक्तीबरोबर पूर्वी ठरलेले काही शुभ समारंभ पार पडतील.

सिंह ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे असे जर तुम्हाला विचारले तर तुम्ही म्हणाल की तो अर्धा भरलेलाच आहे. यावरून तुमच्या जिद्दी स्वभावाची झलक इतरांना लक्षात येईल. व्यापार-उद्योगात काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतील किंवा त्याची कार्यवाही करायची असेल तर सप्ताहाच्या मध्यापर्यंत करा. कामाच्या स्वरूपातील बदल जिकिरीचे वाटतील. घरामध्ये जोडीदाराशी वागताना तुमच्या रागीट आणि प्रेमळ स्वभावाचे दर्शन होईल. खेळाडूंना त्यांचे कौशल्य पणाला लावावे लागेल.

कन्या सर्व ग्रहस्थिती तुमच्या नशिबाचा वाटा वाढविणारी आहे. त्यामुळे करिअर व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवनातील तुमचे इरादे बुलंद असतील. जी गोष्ट प्रयत्न करूनही इतरांना जमलेली नाही ती तुम्ही तुमची बुद्धी आणि कौशल्य पणाला लावून पूर्ण करण्याचा मनात इरादा ठेवाल. व्यवसाय-उद्योगात एखाद्या चांगल्या संधीने तुम्हाला पूर्वी हुलकावणी दिलेली असेल तर तशी संधी पुन्हा एकदा तुमच्याकडे चालून येईल. स्पर्धकांवर मात करण्याकरिता विशेष योजना आखून ठेवाल. नोकरीमध्ये सहकाऱ्यांची असूया वाढेल.

तूळ दोन डगरींवर एकाच वेळी हात ठेवण्याचा तुमचा मानस असेल. पैशाच्या गरजेपोटी नोकरी-व्यवसायात भरपूर काम करण्याची तुमची तयारी असते. तर घरामध्ये घडणाऱ्या घडामोडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. व्यापार-उद्योगात एखादे महत्त्वाचे काम हातात घेण्याचा तुमचा इरादा असेल. नोकरीमध्ये तुमची कार्यक्षमता उत्तम राहिल्यामुळे वरिष्ठ मोठय़ा विश्वासाने तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्याची शक्यता आहे. घरामध्ये मोठय़ा व्यक्तींकडून मिळालेला सल्ला आणि सक्रिय मदत त्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल.

वृश्चिक तुमच्याकडे काही विशेष कौशल्य किंवा प्रावीण्य असेल तर त्याला भरपूर वाव मिळेल. व्यवसाय-उद्योगाच्या क्षेत्रात तुम्हाला काय वाटते याला महत्त्व न देता बाजारातील परिस्थिती कशी आहे त्याचा अंदाज घेऊन तुमचा पवित्रा ठरवा. नोकरीमध्ये वरिष्ठ एखादे नवीन काम तुमच्यावर युक्तीने सोपवतील. घरामध्ये एखादी गोष्ट इतरांना समजली नाही तर तुम्हाला राग येईल. नवीन ठिकाणी स्थलांतर करण्याचा विचार तुमच्या मनात येईल. तरुणांना सभोवतालच्या परिस्थितीशी मिळते-जुळते घेऊन काम करावे लागेल.

धनू उसने अवसान आणून तुम्हाला काम करायचे आहे. पण तरीही तुम्ही भरपूर काम करू शकाल. सगळी कामे एकटय़ाने न करता योग्य व्यक्तीची योग्य कामाकरिता निवड करा. व्यापार-उद्योगात उलाढाल आणि फायद्याचे प्रमाण वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट असेल. नोकरीमध्ये ज्या कामात तुमचा स्वार्थ आहे त्याला तुम्ही महत्त्व द्याल. मात्र वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केलेले चालणार नाही. घरामध्ये सर्वजण तुमच्यावर जबाबदारी सोपवतील. त्यामुळे तुम्हाला कंबर कसून सिद्ध राहावे लागेल.

मकर कोणत्याही कामाकरिता तुम्ही सदैव तत्पर असता. कारण तुमची रास स्वभावत: मेहनती आहे याचा प्रत्यय येईल. उत्तम कल्पनाशक्ती आणि योग्य वेळी केलेली कृती याचा समन्वय झाल्यामुळे तुमचे यश द्विगुणित होणार आहे. नोकरदार व्यक्तींना एखादे फायदेशीर काम मिळाल्याने त्यांचा उत्साह बळावेल. घरामध्ये सांसारिक जबाबदाऱ्या हाताळायला तुम्हाला इच्छा असूनही फारसा वेळ देता येणार नाही. पण आवश्यक त्या सदस्याला तातडीने मदत करायला तयार व्हाल. तरुणांचे विवाह जमतील.

कुंभ अनेक गोष्टी एकाच वेळी पूर्ण करण्याचा तुमचा इरादा असेल. पण ते सर्व शक्य नसल्याने कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे आणि कोणते काम मागे ठेवायचे याचा योग्य न्याय निवाडा करा. व्यापार-उद्योगाचे जे तांत्रिक प्रश्न असतील ते सोडविण्यात वेळ जाईल. खेळत्या भांडवलाची टंचाई असल्यामुळे त्याची व्यवस्था करणे भाग पडेल. ज्यांचा जोडधंदा आहे त्यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये. नोकरीमध्ये वरिष्ठांनी तुमच्या कामामध्ये फेरबदल करण्याची पूर्वसूचना दिली असेल तर त्याची आता कार्यवाही होईल.

मीन माणसाचे मन जेव्हा स्थिर आणि शांत असते तेव्हा त्याला अनेक नवीन कल्पना आणि नवीन विचार सुचत असतात. व्यापार-उद्योगात ज्या व्यक्तींनी पूर्वी तुमच्याकडे काही कारणाने पाठ फिरविली होती त्यांच्याकडून आता सहकार्याची भाषा ऐकू येईल. व्यावसायिक लोकांना नवीन संधी उत्तेजित करेल. नोकरीमध्ये वरिष्ठांना तुमच्या गुणांचे महत्त्व पटल्यामुळे चांगल्या कामाकरिता तुमची निवड होईल. घरगुती कार्यक्रमामुळे दैनंदिनीत चांगला बदल घडून येईल.
विजय केळकर

Story img Loader