मेष :
नवीन वर्षांच्या सुरुवातीला गुरूसारखा प्रभावी ग्रह राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झाला असल्यामुळे तुमच्या मनात कधी न येणारी आराम करण्याची भावना जागृत होईल. या वर्षांत सर्व काही शांत चित्ताने आणि स्वास्थ्यपूर्वक करावे असे तुम्हाला वाटत राहील. शनी आता अष्टमस्थानात हजेरी लावणार आहे, त्याचे भ्रमण या स्थानात वर्षभर असणार आहे. अष्टम स्थानातील शनी तुम्हाला अडीअडचणीतून मार्ग काढायला लावणार आहे. तुमचा पवित्रा कायम सावध ठेवलात तर तुम्ही या सर्व प्रश्नांतून बाहेर पडू शकाल. मात्र थोडी जरी शिथिलता आली तरी नंतर चूक निस्तरण्यात बराच वेळ जाईल.
व्यापार उद्योगाच्या दृष्टीने वर्ष साधारण आहे. बाजारातील चढाओढ, बदलते तंत्रज्ञान आणि अचानक घडणाऱ्या घडामोडी यामुळे तुमचे नियोजन तुम्हाला लवचीक ठेवणे भाग पडेल. डिसेंबर ते फेब्रुवारी हा कालावधी गतिमान ठरेल. पुन्हा एकदा एप्रिलपासून जूनपर्यंत तुम्ही अनेक महत्त्वाची कामे हाताळू शकाल. पशाची आवक साधारण राहील. जुलनंतर गुरू आणि शुक्र या दोन ग्रहांची पुढील दिवाळीपर्यंत चांगली साथ मिळेल. अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊन संभाव्य धोक्यांचा अंदाज घ्या.
नोकरीमध्ये तुम्हाला कितीही कंटाळा आला असला तरी वरिष्ठ स्वस्थ बसू देणार नाहीत. किंबहुना दिवाळीनंतर लगेचच एखाद्या अवघड कामावर तुमची नेमणूक होईल. जवळजवळ जून महिन्यापर्यंत तुम्हाला बरीच मेहनत करावी लागेल. तुम्हाला हव्या असलेल्या सुखसुविधा आणि सवलती जुलनंतर मिळू शकतील. काही जणांना ऑगस्टनंतर परदेशी जाण्याची संधी मिळू शकेल. संपूर्ण वर्षांत सत्तेपुढे शहाणपण नसते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. विनाकारण नोकरीमध्ये टाइमपास करू नका. फेबु. किंवा जुल महिन्याच्या सुमारास कामामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. पगारवाढ किंवा बढतीकरिता या वर्षी हट्ट धरू नका.
कौटुंबिक जीवनात खट्टामीठा अनुभव देणारे वर्ष आहे. दिवाळीपासून मार्चपर्यंत घरामध्ये एखादे शुभकार्य ठरून त्याची कार्यवाही लगेचच पार पडेल. पुन्हा जुलनंतर पुढील दिवाळीपर्यंत एखादा चांगला सोहळा किंवा स्वप्न साकार झाल्यामुळे तुम्ही आनंदी मूडमध्ये असाल. नवीन वाहन किंवा वास्तू खरेदी करावीशी वाटेल. पण ते करताना नाकापेक्षा मोती जड होणार नाही याची मात्र काळजी घ्या. तरुणांनी कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी त्याचे दूरवर काय परिणाम होणार आहेत याचा अंदाज घेणे आवश्यक आहे. नातेवाईक आणि आप्तेष्ट यांच्याशी अंतर राखून संबंध ठेवा. रक्तदाब व हृदयविकार किंवा इतर जुने आजार असतील तर बेसावध राहून चालणार नाही. वृद्धांनी त्यांच्या इच्छा पूर्ण करून घेणे चांगले.
कलाकार आणि खेळाडूंनी त्यांच्या क्षेत्रातील घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवावे. जुलपासून पुढील दिवाळीपर्यंत चांगली कामगिरी करण्याची संधी मिळू शकेल. प्रतिष्ठित व्यक्तींशी फटकून वागू नये.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वृषभ :
राशीच्या सप्तम स्थानात शनी प्रवेश करणार आहे. गुरूचे भ्रमण तृतीय स्थानात आणि चतुर्थ स्थानातून होईल. या दोन ग्रहांची तुम्हाला वर्षभर उत्तम साथ मिळणार आहे. ज्या उद्दिष्टांमध्ये तुम्हाला बरीच धावपळ करून फारसे यश मिळाले नव्हते त्याला आता आशादायक कलाटणी मिळाल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागाल. त्यातच भर म्हणून राश्याधिपती शुक्रसुद्धा तुम्हाला चांगली साथ देणार आहे. तुमच्या व्यक्तिगत इच्छा-आकांक्षा आता वाढल्या नाहीत तरच आश्चर्य.
व्यापार उद्योगात जून-जुलपासून तुम्ही एखादा नवीन उपक्रम सुरू केला असेल तर आता त्याला हळूहळू चांगली गती मिळायला सुरुवात होईल. जानेवारीपासून भरपूर काम करण्याचा तुमचा मानस पूर्ण होईल. जवळजवळ जून-जुलपर्यंत कामाचा वेग उत्तम राहिल्यामुळे विविध मार्गानी तुमच्याकडे पसे येत राहतील. कारखानदारांना आहे त्या देशात किंवा परदेशात नवीन बाजारपेठ मिळेल. छोटय़ा व्यावसायिकांना चालू असलेल्या कामाव्यतिरिक्त काही तरी वेगळे काम करण्याची संधी मिळेल. पशाची आवक मनाप्रमाणे राहील.
नोकरदार व्यक्तींना एखाद्या विशिष्ट कामानिमित्त संधीची प्रतीक्षा असेल तर त्याची नांदी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होईल. तेव्हापासून मार्चपर्यंत चांगले काम करून वरिष्ठांना खूश करता येईल. या सगळ्याचा परिणाम म्हणून मे ते जुल या दरम्यान विशेष सवलती, पगारवाढ किंवा थोडय़ा अवधीकरिता परदेशात काम करण्याची संधी मिळेल. जून-जुलनंतर कामामध्ये थोडासा आळस येईल. ज्या सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहेत त्याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याकडे कल राहील. ज्या प्रतिस्पध्र्यानी तुमच्याविरुद्ध कारवाया करण्याचा प्रयत्न केला होता त्या हाणून पाडल्याने मन शांत होईल.
कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने वर्ष चांगले आहे. सबसे बडा रुपय्या असे मानणारी तुमची रास आहे. या वर्षांत आमदनी चांगली राहिल्यामुळे तुमचा मूड चांगला असेल. घरातील वातावरणही आनंदी राहील. डिसेंबर-जानेवारीमध्ये कुटुंबीयांसह लांबचा प्रवास घडेल. एप्रिल ते जुल या दरम्यान घरातील शुभकार्याची नांदी होईल. नवीन जागा किंवा वाहन खरेदीचे स्वप्न जुल ते पुढील दिवाळीपर्यंत साकार होईल. ज्यांनी पूर्वी जागेचे बुकिंग केले आहे त्यांना मे -जूनच्या सुमारास ताबा मिळू शकेल. तुमच्या अनेक मनोकामना पूर्ण होतील. घरामध्ये काही प्रश्न असतील तर त्याचे निराकरण होईल.
विवाहोत्सुक तरुणांना जूननंतर वैवाहिक जीवनात पदार्पण करता येईल. विद्यार्थ्यांना वर्ष अनुकूल आहे. ज्यांना उच्च शिक्षणाकरिता जायचे आहे त्यांनी जाने. आणि एप्रिल मेमध्ये कसून प्रयत्न करावेत. नवविवाहितांच्या जीवनात चिमुकल्याच्या आगमनाची गोड बातमी कळेल.
कलाकार, खेळाडू आणि राजकारणी व्यक्ती त्यांच्या क्षेत्रातील स्पर्धकांना मागे टाकून स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करू शकतील. मात्र त्यासाठी त्यांनी गाफील राहून चालणार नाही.
मिथुन :
नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच शनी षष्ठस्थानात हजेरी लावणार आहे. तो जरी तुम्हाला फारसा अनुकूल नसला तरी राशीच्या धनस्थानातील आणि तृतीय स्थानातील गुरूचे भ्रमण तुम्हाला अनुकूल आहे. शुक्रासारखा आनंदी ग्रहसुद्धा तुम्हाला बराच काळ साथ देईल. थोडक्यात येत्या वर्षांत तुमच्या यशाचे प्रमाण प्रयत्नांवर अवलंबून असणार आहे. नशिबाचा फारसा वाटा तुम्हाला मिळणार नाही. केलेल्या कामाची पावती निश्चित मिळेल. या आत्मविश्वासाने तुम्ही जर पुढे जात राहिलात तर भरीव कामगिरी करू शकाल. स्वत:चे वेगळेपण आणि आíथक कमाई या दोन गोष्टींवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल.
व्यवसाय उद्योगात तुमच्या कामाविषयी तुम्हाला जरी खात्री असली तरी कोणतेही बेत करण्यापूर्वी स्पर्धकांची तयारी कितपत आहे याचा अंदाज घ्या. दिवाळीच्या सुमारास एखादी नवीन कल्पना अमलात आणण्याचा तुमचा मानस असेल. तेथून जूनपर्यंत तुमची वाटचाल समाधानकारक राहील. पूर्वी केलेल्या कामातून तुम्हाला नवीन आणि फायदा मिळवून देणारे काम मिळेल. जुलपासून पुन्हा एकदा काहीतरी नावीन्यपूर्ण काम केले पाहिजे असे तुम्हाला प्रकर्षांने वाटेल. बँक किंवा इतर मार्गाने पसे उपलब्ध झाल्यामुळे आíथक अडचण भासणार नाही. मात्र त्याचा आवश्यक त्या कारणाकरिताच वापर करावा.
नोकरदार व्यक्तींच्या बुद्धिमत्तेला आणि कौशल्याला येत्या वर्षांत भरपूर वाव मिळेल. जी चांगली कामगिरी करून ती वाया गेली असे वाटत होते त्यातूनच काहीतरी नवीन निष्पन्न झाल्यामुळे हायसे वाटेल. येत्या वर्षांत वरिष्ठ तुम्हाला काही विशेष सवलती किंवा भत्ते देऊन खूश ठेवण्याचा प्रयत्न करतील. दिवाळी ते एप्रिलपर्यंतचा कालावधी आíथकदृष्टय़ा विशेष लाभदायक ठरेल. त्यानंतर जूनच्या सुमारास एखाद्या आव्हानात्मक प्रोजेक्टकरिता तुमची निवड होईल. त्यानिमित्त काहीजणांना परदेशी जाण्याची संधीही मिळेल. आपण केलेले काम चांगलेच असले पाहिजे हा आग्रह तुमचे वेगळे अस्तित्व निर्माण करू शकेल.
सांसारिक जीवनात पेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे. घरामध्ये आवडत्या व्यक्तीकडून तुमची काळजी घेतली जाईल. हाताशी पसे असल्यामुळे तुम्ही आनंदी मूडमध्ये असाल. पूर्वी ठरलेला एखादा शुभसमारंभ डिसें., जाने. किंवा मार्च ते जुल या कालावधीत पार पडेल. पूर्वी बुकिंग केलेल्या जागेचा ताबा मिळेल. नवविवाहितांच्या घरात एखादी शुभवार्ता कानावर येईल. या सर्वाबरोबर स्वत:च्या आणि बुजुर्ग व्यक्तीच्या स्वास्थ्याविषयी अधूनमधून तुम्ही निराश व्हाल. जुल ते नोव्हें. परदेश प्रवास घडण्याची शक्यता आहे.
तरुण मंडळींनी येत्या वर्षांत वेळ न दवडता येणाऱ्या प्रत्येक संधीचा चांगला फायदा करून घेतला तर त्यांच्या नोकरी-व्यवसायात त्यांना मोठी मजल मारता येईल.
कलाकार आणि खेळाडूंनी स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यासाठी भरपूर मेहनत घेण्याची तयारी ठेवावी. काही जणांना अटीतटीच्या स्पध्रेतून एखादे मानांकन मिळण्याची शक्यता आहे.
कर्क :
नवीन वर्षांच्या सुरुवातीला शनी पंचमस्थानात येणार आहे. २०१४ सालाच्या सुरुवातीपासून चतुर्थ स्थानातील शनी आणि मंगळ या दोन ग्रहांच्या भ्रमणामुळे तुम्हाला अनपेक्षित प्रश्नांमुळे जी गरसोय सहन करावी लागली होती त्यातून आता तुमची सुटका होणार आहे. नूतन वर्षांत गुरूचे राशीतील आणि धनस्थानातील भ्रमण तुम्हाला लाभदायक ठरेल. त्याचबरोबर शुक्रही चांगली साथ देईल. तुमचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा तुम्ही मिळवू शकाल. नव्या उमेदीने कामाला लागाल. तुमच्यातील चांगल्या गुणांना वाव मिळाल्यामुळे भरपूर काम करण्याची इच्छा निर्माण होईल.
व्यापार उद्योगात सध्या जे काम चालले आहे त्याला गती देण्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्नशील राहाल. तरीही तुमच्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने यश फेब्रुवारीपासून मिळायला सुरुवात होईल. तेथून जूनपर्यंत चांगली आगेकूच कराल. जुल महिन्यापासून एखादे मोठे आणि घवघवीत फायदा देणारे काम मिळाल्यामुळे विविध मार्गानी पशाचा स्रोत सुरू होईल. नोव्हेंबपर्यंत धंद्यामधील प्रगतीकरिता नवीन जागा मशीनरी, आधुनिक तंत्रज्ञान या गोष्टींकरिता गुंतवणूक करू शकाल. पूर्वीची अडकून पडलेली काही प्रकरणे मार्गी लागल्यामुळे तुमचा जीव भांडय़ात पडेल. एकंदरीत पूर्वी आलेल्या अपयशाची तुम्ही कसर भरून काढू शकाल.
नोकरदार व्यक्तींना संस्थेच्या धोरणांमुळे जर त्रास झाला असेल तर परिस्थिती आता निवळायला सुरुवात होईल. वरिष्ठांनी तुम्हाला एखादे चांगले आश्वासन दिले असेल तर त्याची अंमलबजावणी होईल. काही जणांना पदोन्नती आणि पगारवाढ या दोन्हीचा लाभ मिळू शकेल. तुमच्यामधील वैशिष्टय़पूर्ण कौशल्याला वाव असल्यामुळे वरिष्ठ अवघड कामाकरिता तुमची निवड करतील. संस्थेचे प्रतिनिधित्व करायला मिळेल. काहींना त्यानिमित्त काही काळापुरते परदेशी जाता येईल. सध्याच्या नोकरीत बदल किंवा बेकार व्यक्तींना सुयोग्य संधी मिळेल. तुमच्या कामाचा वेग आणि दर्जा उत्तम राहील.
चतुर्थ स्थानातील शनीने काही जणांच्या कौटुंबिक जीवनात वादळच निर्माण केले होते. काहींना त्यामुळे अपरिमित नुकसान सहन करावे लागले असेल. आता पूर्ण नाही, पण काही अंशी त्याची भरपाई झाल्यामुळे ‘हेही नसे थोडके’ असा विचार करून तुम्ही तुमच्या मनाचे समाधान करून घ्याल. एखादे शुभकार्य ठरत नसेल तर त्या कामालाही चालना मिळू शकेल. नवीन वास्तूचे तसेच वाहन खरेदीचे स्वप्न जुल ते सप्टेंबर या कालावधीत साकार होईल.
तरुणवर्गाला स्थिरता लाभल्यामुळे त्यांचे पूर्वी विस्कटलेले बेत मार्गी लागतील. विवाहोत्सुक तरुणांचे सांसारिक जीवनात पदार्पण होईल. पसे मिळवण्याच्या दृष्टीने देशात किंवा परदेशात चांगली संधी मिळेल.
कलाकार आणि खेळाडूंना त्यांच्या मनाप्रमाणे चांगले काम करून चाहत्यांची मने जिंकता येतील. एखाद्या मोठय़ा पदाकरिता किंवा बक्षिसाकरिता त्यांची निवड होईल.
सिंह :
२०१४ सालाच्या सुरुवातीपासून गुरू आणि शनी या दोन मोठय़ा ग्रहांनी तुमच्यावर वरदहस्त ठेवला होता. त्यामुळे तुमच्या इच्छा-आकांक्षा हळूहळू बळावत गेल्या; परंतु जूनपासून त्यामध्ये तुम्हाला थोडीफार कमतरता जाणवायला सुरुवात झाली आहे. आता शनी राशीच्या चतुर्थ स्थानात प्रवेश करेल. गुरूचे भ्रमण जुलपर्यंत व्ययस्थानात राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची इच्छा नसूनही तुमच्या महत्त्वाकांक्षेला मुरड घालावी लागेल. पेरल्याशिवाय उगवत नाही हे लक्षात ठेवून चिकाटीने काम करा.
व्यापार-उद्योगात तुमच्या जिद्दी स्वभावानुसार काही मोठे प्रोजेक्ट तुम्ही हाती घेतले असतील. त्याला वेग देण्यासाठी मनापासून प्रयत्न कराल; परंतु ज्या व्यक्तींकडून जशी साथ तुम्हाला अपेक्षित आहे तशी ती न मिळाल्यामुळे तुमची धावपळ उडेल. पशाची उपलब्धता होण्यास विलंब झाल्यामुळे एप्रिलपर्यंत तुम्हाला मुंगीच्या पावलाने पुढे जावे लागेल. जुलपासून कामाला खऱ्या अर्थाने वेग येईल. त्यानंतर तुम्ही मागे वळून बघणार नाही. पशाची आवक जरी खूप वाढली नाही तरी कामाचा झपाटा वाढल्यामुळे गमावलेला आत्मविश्वास नव्या दमाने निर्माण होईल. बाजारपेठेतील तुमची प्रतिमा उंचावेल.
नोकरदार व्यक्तींना वरिष्ठ एखादे आमिष दाखवून त्यांच्याकडून चांगले काम करवून घेतील. आपल्याला काहीतरी मिळणार या अभिलाषेने भरपूर काम कराल. पण सवलती लगेच न मिळाल्यामुळे मधूनच मन बंड करून उठेल. मार्च, एप्रिलनंतर काही चांगले बदल दृष्टिक्षेपात येतील. त्याचा ताबडतोब फायदा उठवा. जुलमध्ये गुरू तुमच्याच राशीमध्ये येईल. त्यानंतर बढतीचे योग संभवतात. जी संधी पूर्वी गमावलेली होती ती नजरेच्या टप्प्यात आल्यामुळे तुम्ही सतर्क बनाल. पुढील दिवाळीपर्यंत भरपूर काम करून त्याचे श्रेय मिळवाल. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये संस्थेचे प्रतिनिधित्व करता येईल.
कौटुंबिक जीवनामध्ये आशा आणि निराशेचा खेळ तुम्हाला जाणवत राहील. बरेच काही करायचे आहे. या भावनेमुळे तुम्ही सक्रिय बनाल. परंतु काही कारणाने तुमचे बेत लांबत गेल्यामुळे नाइलाज होईल. मे, जूनपासून तुमच्या इच्छा-आकांक्षा फलद्रूप होण्याची खात्री वाटू लागेल. एखादी शुभ घटना जुलनंतर ठरून त्याची कार्यवाही ताबडतोब करण्याचा इरादा असेल. घरातील सदस्यांचे प्रश्न हलके झाल्यामुळे मनावरचे दडपण कमी होईल. नवीन जागा किंवा वाहन खरेदी करायला वातावरणाची चांगली साथ मिळेल. येत्या वर्षांत जे आपल्याजवळ आहे त्यावर समाधान मानलेत तर तुमची मानसिक शांतता ढळणार नाही.
तरुणांनी कष्टामध्ये कसूर करून चालणार नाही. तुमचा संयम आणि चिकाटी याचे तुम्हाला चांगले फळ मिळेल, असा आत्मविश्वास बाळगा. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जुलनंतरचा कालावधी चांगला आहे. विवाहोत्सुक तरुणांना जुल ते नोव्हेंबर हा कालावधी उत्तम आहे. त्यांचे नवीन वास्तूचे स्वप्न त्याच कालावधीत साकार होईल.
कलाकार आणि खेळाडूंना त्यांना स्पर्धकांच्या पुढे जाण्यासाठी विशेष मेहनत घेणे भाग पडेल. उत्तम प्रसिद्धी आणि मानमरातब पुढील दिवाळीपूर्वी मिळाल्यावर केलेल्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल.
कन्या :
गेल्या दिवाळीपासून तुम्ही आशा आणि निराशा दोन्हीचा अनुभव घेतलात. नवीन वर्षांत पदार्पण करताना जूनपर्यंत गुरू लाभस्थानात, तर शनी राशीबदल करून तृतीय स्थानात प्रवेश करणार आहे. गुरू जूनपर्यंत लाभस्थानात आहे. तो तुम्हाला तुमच्या व्यवसाय धंदा आणि नोकरीमध्ये वाढ दर्शवितो; पण जुलनंतर मात्र पुन्हा एकदा खर्च वाढतील. पण ते चांगल्या कारणाकरिता असल्याने तुम्ही ते करायला तयार व्हाल.
व्यापारीवर्गाला वर्षांच्या सुरुवातीला गुरू आणि शनी या ग्रहांची साथ मिळाल्यामुळे त्यांची उमेद वाढेल. चालू असलेले काम आणि नव्याने मिळणारी कामे या दोन्हीतून कमाई असल्यामुळे तक्रारीला जागा राहणार नाही. मे ते जुल हा कालावधी विशेष चांगला ठरेल. कारखानदार कामाचा विस्तार करतील. जुलनंतर मात्र मोठी गुंतवणूक केल्यामुळे मिळालेले पसे अपुरेच वाटतील. कामगारांना जास्त भत्ते आणि सवलती द्याव्या लागल्यामुळे खिशावर थोडासा ताण येण्याची शक्यता आहे.
नोकरदार व्यक्तींना पगारवाढ किंवा काही विशेष सवलती देण्याचे वरिष्ठांनी मान्य केले असेल तर दिवाळीनंतर त्याची नांदी होईल. प्रत्यक्ष फायदा फेबुवारी, मार्च किंवा मेनंतर मिळेल. काही जणांना विशेष कामगिरीकरिता परदेशी जाता येईल. त्याचे वेगळे भत्ते मिळतील. मात्र घरापासून लांब राहावे लागेल. एखाद्या मोठय़ा प्रोजेक्टवर जुलनंतर निवड होईल. त्याचा तुम्हाला अभिमान वाटेल. पण काम कष्टदायक असेल. त्यासंबंधी तक्रार करून चालणार नाही. कारण बऱ्याच वर्षांनंतर तुम्हाला अशी संधी मिळाली असेल. बेकार व्यक्तींना काम मिळेल. फक्त त्यांनी तडजोड करण्याची तयारी ठेवावी.
सांसारिक जीवनात तुम्हाला जीवनाचा आस्वाद घ्यावासा वाटेल. पण जोडीदाराच्या विचित्र वागण्यामुळे नेमका आपण काय पवित्रा ठेवावा, असा प्रश्न तुमच्यापुढे उपस्थित होईल. जूनपर्यंत मुलांच्या जीवनातील चांगली बातमी कळेल. तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. तुम्ही जवळचे आप्तेष्ट, नातेवाईक यांच्याकडील शुभसमारंभाला आनंद घेऊ शकाल. त्यानिमित्त खरेदीचे बेत ठरतील आणि पार पडतील. तुम्हाला त्यांच्याकडून प्रशंसेचे उद्गार ऐकायला मिळतील. तुमचा जीव त्यामुळे धन्य होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आठवणी तुम्हाला भावविभोर करतील. एखाद्या जवळच्या नातेवाईकाबरोबर दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. त्यामुळे वातावरणातील बदल तुम्ही अनुभवू शकाल. तरुण त्यांच्या कार्यक्षेत्रात विशेष कौशल्य दाखवतील. ज्या तरुणांना नोकरीनिमित्त परदेशात जायचे आहे त्यांनी दिवाळीनंतर जोरात प्रयत्न करावेत. विवाहोत्सुक तरुणांना डिसेंबर, जानेवारीदरम्यान मनपसंत जीवनसाथीची निवड करता येईल.
कलाकार व खेळाडूंच्या कौशल्याला भरपूर वाव असल्यामुळे ते खूश असतील. येणाऱ्या संधीचा त्यांनी जास्तीत जास्त फायदा उठवावा. म्हणजे पूर्वीच्या अपयशाची कसर भरून काढता येईल.
तूळ :
२०१४च्या सुरुवातीला शनी तुमच्याच राशीत होता. साडेसातीचा महत्त्वाचा टप्पा तुम्ही पार केलात. आता शनी धनस्थानात नोव्हेंबरमध्ये येणार आहे, पण दशमस्थानातील आणि लाभस्थानातील गुरूचे भ्रमण तुम्हाला अनुकूल आहे. तसेच जुल २०१५ ते पुढील दिवाळीपर्यंत शुक्रही तुम्हाला साथ द्यायला सिद्ध असेल. तुमच्यातील निराशा दूर करणारे हे ग्रहमान आहे. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक बनेल. जीवनातील योग्य संधीचा लाभ उठवायचा असे तुम्ही ठरवाल. तुमच्या कार्यक्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्याकरिता अपार मेहनत घ्याल.
गुरू आणि शनी या दोन ग्रहांची वर्षभर चांगली साथ मिळाल्यामुळे व्यापारीवर्गाचे इरादे बुलंद असतील. भरपूर काम झाल्यामुळे कमाईसुद्धा चांगली असेल. एखादी नवीन शाखा उघडून उलाढाल वाढवता येईल. कारखानदारांना देशात किंवा परदेशात नवीन संधी उपलब्ध होतील. या सगळ्याचा फायदा आíथक प्राप्ती वाढवण्यासाठी जुलनंतर होईल. त्यामुळे कामामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल. एखाद्या प्रोजेक्टमध्ये पूर्वी तोटा झाला असेल तर त्यामध्ये काही फेरफार करून काम चांगल्या पद्धतीने कराल.
नोकरीमध्ये हातातोंडाशी येऊन ज्या संधी गेल्या दोन-तीन वर्षांत गमवाव्या लागल्या होत्या त्याचा आता आनंद मिळेल. बढतीचे योग येत्या वर्षांत संभवतात. तुमचे काम चांगले झाल्यामुळे वरिष्ठ विशेष भत्ते किंवा सवलती देतील. काही जणांना संस्थेचे प्रतिनिधित्व देशात किंवा परदेशात करता येईल. नोकरीमध्ये बदल हवा असेल तर नोव्हेंबर, डिसेंबर किंवा मार्च, एप्रिलच्या सुमारास तशी संधी मिळेल. मात्र पशाचा जास्त हव्यास धरून वेडेवाकडे बदल करू नका. तसेच जे पसे मिळतील त्याचा केवळ योग्य कारणाकरिताच उपयोग करा.
तुमच्या सांसारिक जीवनात जोडीदाराचे स्थान अनन्यसाधारण असते. जोडीदाराचे विचार तुमच्या दृष्टीने येत्या वर्षांत उपयोगी पडतील. महत्त्वाचे घरगुती प्रश्न निकालात काढायचा निकराने प्रयत्न कराल. तुम्हाला हवी असेल त्या वेळी पशाची ऊब मिळाल्याने तुम्ही एक एक करून काही गोष्टी संपुष्टात आणाल. ज्या घरगुती कारणाने तुमचे हात बांधले गेले होते त्यातून सुटका झाल्यामुळे सहजीवनाचा आनंद घ्याल. तुमच्या इच्छा-आकांक्षा फलद्रूप होतील. जानेवारी, फेबुवारी आणि जुलनंतर जोडीदाराच्या आग्रहाला तुम्ही बळी पडाल. परदेशवारी करण्याची तुमची तमन्ना सफल होईल. नवीन वास्तूचे स्वप्न जुल ते पुढील दिवाळीच्या सुमारास साकार होईल. विवाहोत्सुक तरुणांना जुलनंतर मनपसंत जोडीदार निवडता येईल. तरुणांना त्यांच्या करियरमध्ये स्थिरता आल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना ग्रहमान अनुकूल आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचा त्यांना उपयोग होईल.
कलाकार आणि खेळाडूंना पूर्वी विनाकारण अन्याय सहन करावा लागला असेल, तर तो दूर झाल्यामुळे नवचतन्य लाभेल. एक नवीन अध्याय सुरू झाला अशी भावना त्यांच्या मनात असेल.
वृश्चिक :
नवीन वर्षांच्या सुरुवातीलाच शनी तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे, पण गुरूचे भाग्यस्थान आणि दशमस्थानातील भ्रमण तुम्हाला तुमच्या अडचणींवर मात करायला मदत करेल. कोणताही निर्णय घेताना त्याविषयीचे विचारमंथन तुमच्या मनात बराच काळ चालते. त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय एकदम सांगता किंवा प्रत्यक्षात अमलात आणता. त्यामुळे सभोवतालच्या व्यक्तींना तुमचा पवित्रा समजत नाही. येत्या वर्षांत जुलनंतर शुक्रही तुमच्या दशमस्थानात बराच काळ राहणार आहे. त्यामुळे या वर्षांत बरेच काही करायचे तुम्ही ठरवाल, पण सर्व यश कष्टसाध्य असणार आहे हे लक्षात ठेवा.
राशीतील शनी व्यापारीवर्गाला खडतर आहे, पण गुरूचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे खूप चिंता करण्याचे कारण नाही. त्यांनी स्वत:च्या आíथक आणि इतर मर्यादा लक्षात घेऊन कामाचे योग्य ते नियोजन करावे. जून, जुलनंतर विशेष कमाईची एखादी संधी चालून येईल. त्याचा जास्तीत जास्त फायदा उठवावा. कारखानदारांनी बाजारपेठेतील चढओढींवर बारकाईने लक्ष ठेवावे. येत्या वर्षांत यशाचे प्रमाण कष्टावर अवलंबून असल्यामुळे आळस करून चालणार नाही. कोणावरही विसंबून न राहता तुमचे अंतर्मन तुम्हाला जे सांगेल त्यावर विश्वास ठेवून चिकाटीने पुढे मार्गक्रमण करणेच चांगले.
नोकरीमध्ये वरिष्ठ या वर्षांत तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा ठेवतील. तुमच्या व्यक्तिगत अडचणी असूनही कामामध्ये कसूर झालेली त्यांना आवडणार नाही, परंतु तुम्ही जर तुमच्या जिद्दी स्वभावानुसार हाती घ्याल ते तडीस न्याल असा दृष्टिकोन ठेवलात, तर अशक्य कामे शक्य करून दाखवाल. नोव्हेंबर ते जानेवारी आणि जुल ते दिवाळीपर्यंतचा कालावधी तुम्हाला अनुकूल आहे. पगारवाढ आणि विशेष संधी मिळेल, पण त्यावर तुमचे समाधान होणार नाही. संस्थेमध्ये जे काम इतरांना जमले नाही ते काम वरिष्ठ तुमच्यावर सोपवून जणू काही तुमची परीक्षाच पाहातील. त्यात सफल झालात तर त्याचे चांगले फळ मिळेल.
सांसारिक जीवनात तुमचे करियर आणि घरातील काही प्रश्नांमुळे सुरुवातीला तुम्ही गोंधळून जाल. ही परिस्थिती जुलपर्यंत राहील. त्यानंतर मात्र एकएक कोडी उलगडत जातील. त्यातून सहीसलामत सुटायला पुढील दिवाळी येईल. घरामध्ये जानेवारी ते जून यादरम्यान येणाऱ्या समस्यांमुळे तुमचा थोडाफार गोंधळ उडेल, पण त्यावर तुम्ही शांतचित्ताने विचार करून चांगला मार्ग काढू शकाल. बुजुर्ग व्यक्तींच्या सल्ल्याचा आणि पािठब्याचा तुम्हाला एक प्रकारे आधार वाटेल. दूरच्या प्रवासाचे बेत डिसेंबपर्यंत ठरतील आणि पार पडतील. पुन्हा एकदा जुल ते सप्टेंबर या कालावधीत परदेशात वारी करण्याचा विचार येईल. अतिधाडस करणे टाळावे. कुटुंबातील व्यक्तींचे विचार वेगळे असतील. त्यांच्याशी जुळवून घ्यावे.
तरुण वर्ग जूनपर्यंत प्रत्येक निर्णय घेताना साशंक असतील. त्यानंतर त्याची उमेद वाढेल. शक्यतो नोकरी-व्यवसायात त्यांनी बदल करू नयेत. वैवाहिक जीवनात पदार्पण करण्यासाठी जुल ते नोव्हेंबर हा कालावधी चांगला आहे. कलाकार आणि खेळाडूंना त्यांच्या क्षेत्रात विचित्र अनुभव येतील, पण त्यांनी नेटाने काम केल्यास त्यात यश मिळेल.
धनु :
नवीन वर्षांच्या सुरुवातीला राश्याधिपती गुरू अष्टमस्थानात आहे. शनीचे आगमन आता व्ययस्थानात होत आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला आता आपल्या नशिबात काय वाढून ठेवले आहे असे वाटेल. पण मंगळाचे भ्रमण तुम्हाला वर्षभर अनुकूल आहे. बाकी ग्रहांचीही तुम्हाला साथ मिळणार आहे. तुमची रास गुरुप्रधान असल्याने तुम्ही नेहमीच आशावादी असता. त्यामुळे नवीन वर्षांच्या सुरुवातीला बचेंगे तो और भी लढेंगे असा पवित्रा ठेवा. ही सर्व स्थिती जुलनंतर बदलणार आहे. पुन्हा एकदा तुम्ही उत्साही आणि आनंदी दिसाल.
व्यापारी वर्गाला नवीन वर्षांच्या सुरुवातीला उत्पन्न वाढवण्याकरिता काही प्रयोग करून पाहावेसे वाटतील. पण त्यांनी जुलपर्यंत संयम राखणे आवश्यक आहे. चालू असलेले काम बिनचूक करावे. जुलनंतर कामाला वेग यायला सुरुवात होईल. उपन्नाचे प्रमाण वाढू लागेल. छोटे-मोठे प्रकल्प हाती घेऊन मनाप्रमाणे काम करता येईल. वर्षभर कोणताही मोठा धोका न पत्करणेच हितावह राहील. जुन्या गिऱ्हाईकांना टिकवून ठेवणे अत्यावश्यक आहे. तसे केल्याने तुमच्या कामात खंड पडणार नाही. ज्या गोष्टींविषयी तुम्हाला माहिती नाही त्यामध्ये हात घालू नका. मिळणाऱ्या प्रत्येक पशाचा वापर उत्पादकतेसाठीच करा.
नोकरदार व्यक्तींना वर्षांच्या सुरुवातीला कठोर परिश्रमाला पर्याय नाही याची जाणीव होईल. भरपूर काम करूनही त्याचे फळ न मिळाल्यामुळे थोडीशी निराशा येईल. पण त्यांनी काम चालू ठेवावे. ऑगस्टनंतर अचानक काही संधी उपलब्ध झाल्यामुळे निराशेचे रूपांतर आशेत होईल. नोकरीमध्ये बदल पुढील दिवाळीच्या आसपास संभवतो. परदेशी जाण्याची संधी ऑक्टोबरमध्ये मिळेल. जे काम पूर्वी वाया गेले असे वाटत होते त्याचा कुठे ना कुठे तरी उपयोग झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा दिलासा लाभेल.
सांसारिक सुखात थोडीफार कमतरता राहील. पण तुम्हाला त्याकडे लक्ष द्यायला फुरसत नसेल. पूर्वी जर नवीन वास्तू किंवा मोठय़ा वस्तूची खरेदी करण्याचे बेत ठरले असतील तर त्यात एखादा निर्णय बदलणे भाग पडेल. कारण हातातील पशांचा अंदाज घेतल्यावर मोठा धोका पत्करू नये असे वाटेल. जुलनंतर नवीन जागेत राहायला जाण्याचे योग संभवतात. जुलनंतर तुम्ही सहजीवनाचा आनंद घ्याल. तसेच एखादी परदेशवारीही घडेल. जुलनंतर मुलांच्या प्रगतीमुळे काही आनंदाचे प्रसंग येतील. शुभकार्य जूननंतर ठरेल आणि सप्टेंबर नंतर पार पडेल.
तरुणांना त्यांचे ठरविलेले उद्दिष्ट गाठण्याकरिता अविश्रांत मेहनत घ्यावी लागेल. त्याचा उपयोग त्यांना निश्चित होईल, असा त्यांनी विश्वास बाळगायला हरकत नाही. त्यांनी कष्टात कसूर करू नये.
कलाकार आणि खेळाडूंना स्वत:चे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ढोरमेहनत घ्यावी लागेल. वेळप्रसंगी तत्त्वांशी तडजोड करून चाहत्यांची मने जिंकावी लागतील.
मकर :
राश्याधिपती शनी तुमच्या लाभस्थानात येणार आहे. त्याचे तेथील भ्रमण पुढील वर्षभर त्याच स्थानातून होणार आहे. गुरूचीही तुम्हाला जूनपर्यंत साथ मिळणार आहे. हे ग्रहमान तुमच्या इच्छा-आकांक्षा वाढवणारे आहे. प्रत्येक बाबतीत अग्रेसर राहण्याकरिता तुम्ही रात्रीचा दिवस कराल. जूनपर्यंत जे पसे मिळतील त्याची गुंतवणूक वास्तू किंवा शेअर्ससारख्या गोष्टीत कराल. जी संधी हातातून निसटली होती ती पुन्हा एकदा डिसेंबरनंतर दृष्टिपथात येईल. त्यावर तुम्ही झडप घालाल. त्यामुळे प्रगतीबरोबरच आíथक लाभही मिळतील.
व्यापारीवर्ग नवीन वर्षांच्या सुरुवातीला खूप उत्साहात असेल. कामाचा विस्तार करण्याकरिता भागीदारी किंवा मत्री कराराचे प्रस्ताव त्यांच्यासमोर असतील. या सर्वातून खूप पसे मिळविण्याची इच्छा बऱ्याच प्रमाणात जूनपर्यंत साकार होईल. कारखानदार नवीन उत्पादन बाजारात आणतील. त्यांना देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडता येईल. जून, जुलनंतर कितीही पसे मिळाले तरी ते अपुरेच वाटतील, कारण तुमची महत्त्वाकांक्षा वाढत राहील. त्यावर वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे. तसे न केल्यास कमावलेले गमवावे लागण्याची शक्यता आहे.
नोकरदार व्यक्तींना जानेवारी ते मार्च हा कालावधी विशेष फलदायी ठरेल. या दरम्यान पगारवाढ किंवा बढतीसंबंधी संकेत मिळतील. त्यामुळे कामामध्ये चतन्य येईल. काही जणांना देशात किंवा परदेशात नवीन नोकरीची संधी मिळेल. केलेल्या कामाचे कौतुक झाल्यामुळे एक प्रकारचा हुरूप येईल. जुलपर्यंत एखादी चांगली कामगिरी झाल्यामुळे समाधान लाभेल. ऑगस्टनंतर वेडेवाकडे प्रयोग न करता आहे त्यात समाधान माना. तसे केल्यास करिअरमधील चित्र अधिक चांगले आणि स्थिर होईल. नोकरीत बदल करू इच्छिणाऱ्यांना जूनपर्यंतचा कालावधी चांगला आहे.
सांसारिक जीवनात दूरच्या प्रवासाचे बेत करावेसे वाटतील. पण खर्चात काटकसर करायला तुम्ही विसरणार नाहीत. तुम्ही तुमचे कार्यक्षेत्र सोडून सहसा फार काळ लांब जात नाही. पण एखाद्या चांगल्या निमित्ताने तुम्ही प्रवासाचे बेत कराल. घरातील व्यक्तींच्या जीवनातील चांगल्या क्षणाचा आनंद घ्याल. जुलनंतर मात्र पुन्हा एकदा तुम्ही नेहमीच्या कामात सक्रिय बनाल. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता वाटेल.
ज्यांचे विवाह व्हायचे आहेत त्यांना जानेवारी ते जून हा कालावधी चांगला आहे. त्यांचे विवाह ठरतील/पार पडतील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण असेल. जो खर्च होईल तो चांगल्या कारणाकरिताच असल्याने तुमची तक्रार अशी राहणार नाही. ज्या मुलांना देशात किंवा परदेशात शिक्षणाकरिता किंवा नोकरीनिमित्त जायचे आहे त्यांनी तातडीने प्रयत्न करावेत. तरुणांना विवाह ठरवायला आणि पार पाडायला जूनपूर्वीचा कालावधी अनुकूल आहे.
कलाकार आणि खेळाडूंना त्यांचे कौशल्य प्रदíशत करून मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी मिळवता येईल. पसे मिळाल्याने आणि स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण झाल्याने बरे वाटेल.
कुंभ :
नूतन वर्षांत पदार्पण करताना राश्याधिपती शनी तुमच्या दशमस्थानात येणार आहे. तो तुम्हाला पुढील अडीच वष्रे अनुकूल आहे. मात्र गुरूचे षष्ठस्थानातील भ्रमण जूनपर्यंत अनुकूल नाही. पण त्यानंतर गुरू आणि शुक्रही तुमच्या मदतीला येणार आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत आपल्याकडून चांगले काम कसे करायचे आणि आपल्या प्रगतीच्या दृष्टीने पुढील काही वर्षांत तुमचे उद्दिष्ट काय असेल याचा विचार सतत तुमच्या मनात रेंगाळत असेल. नवीन ध्येयाने प्रेरित होऊन तुम्ही भरपूर काम कराल. आपले वेगळे अस्तित्व निर्माण करण्याकरिता धाडस करण्याची तुमची तयारी असेल.
व्यापारीवर्गाला उत्तेजित करणारे नवीन वर्षांचे ग्रहमान आहे. जे मिळालेले आहे त्यावर त्यांचे समाधान होणार नाही. तर जास्तीत जास्त मिळविण्याकरिता प्रयत्न चालू राहतील. या प्रयत्नांना फेबुवारी ते एप्रिल या काळात चांगला प्रतिसाद मिळेल. जुलनंतर एखादे नावीन्यपूर्ण काम करून बाजारातील प्रतिमा उंचावता येईल. उत्पन्नात चांगली भर पडेल. मात्र वर्षभर त्यांनी स्पर्धक आणि नवीन तंत्रज्ञान याकडे लक्ष द्यावे. कारखानदारांनी त्यांच्या कामाचा विस्तार करण्यापूर्वी त्यातील तंत्रज्ञान आणि भविष्यातील बदलाची शक्यता याचा बारकाईने विचार करावा.
नोकरीच्या ठिकाणी तुमच्या स्वत:कडूनच अपेक्षा खूप वाढल्यामुळे करू तेवढे काम कमी असे वाटेल. वरिष्ठ तुम्हाला चांगले प्रोत्साहन देऊन तुमचे मनोधर्य वाढवतील. जूनपर्यंत प्रत्यक्ष पगारवाढ जरी नसली तरी वेगळ्या सवलती बहाल केल्या जातील. जुलनंतर केलेल्या कामामुळे मोठय़ा स्तरावरच्या पदासाठी तुमची नेमणूक होईल. त्याच वेळी परदेशीही जाता येईल. मात्र या सर्वाबरोबर मेहनत प्रमाणाबाहेर वाढेल आणि हितशत्रूची असूया जाणवेल, त्याचे व्यवधान ठेवा. शिवाय कामाच्या ताणामुळे स्वत:चे स्वास्थ्य आणि मन:शांती बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
सांसारिक सौख्याच्या दृष्टीने आगामी वर्ष हे संमिश्र फल देणारे आहे. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही सहजीवनाचा आनंद घ्याल. तुमची रास ही एकलकोंडी आणि बुद्धिजीवी आहे. त्यामुळे स्वत:ची तत्त्वे तुम्ही जपण्याचा प्रयत्न कराल. घरामध्ये काही समस्या आल्या तर तुम्ही गांगरून न जाता त्यावर योग्य तो तोडगा काढाल. मुलांना प्रशिक्षणाकरिता वेगवेगळे पर्याय सुचवाल. त्यांचा कल लक्षात घेऊन त्यांना चांगली वाट दाखवाल. वृद्ध किंवा वडिलधाऱ्या व्यक्तींच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण साजरा करण्याकरिता जुल ते नोंव्हेंबर या दरम्यान आप्तेष्ट, नातेवाईक यांचा मेळावा भरवाल.
तरुणांना त्यांच्या मनपसंत जोडीदार जुल ते नोव्हेंबपर्यंत मिळेल. त्या दरम्यान त्यांचे विवाह ठरतील आणि ते पार पडतील. करिअरमध्ये केलेल्या श्रमाचे फळ मिळाल्यामुळे त्यांची कळी खुलेल.
कलाकार आणि खेळाडूंना जूनपर्यंतचा कालावधी जरी कठीण असला तरी त्या दरम्यान केलेले कामच त्यांना नंतर उपयोगी पडेल. त्यातून एखादे मानाचे पद पटकावता येईल.
मीन :
राशीचा स्वामी गुरू या वर्षांत पंचमस्थानात आहे. त्याने तुमच्या अपेक्षा आणि इच्छा काही अंशी का होईना पूर्ण केल्या. आताही त्याची साथ जूनपर्यंत लाभणार आहे. शनीसारखा कठोर ग्रह आता राशीबदल करून भाग्यस्थानात येणार आहे. या शनीने जवळजवळ गेले तीन वर्षे तुमची विविध प्रकारे सत्त्वपरीक्षा पाहिली. अपेक्षित आणि अनपेक्षित प्रश्नांना तुम्हाला सामोरे जाणे भाग पाडले. आता त्यातून तुमची सुटका होणार असा विश्वास बाळगून पुढे आगेकूच करा. वर्षभर मंगळ आणि इतर ग्रह तुमच्या दिमतीला असणार आहेतच. मात्र तुमची अतिमहत्त्वाकांक्षा तुम्हाला अडचणीत आणू शकते.
व्यापारीवर्गाला पूर्वीच्या अपयशाची कसर भरून काढण्याची प्रचंड घाई असेल. त्यामुळे थोडा धोका पत्करण्याकडे त्यांचा कल राहील. वर्षांच्या सुरुवातीलाच पूर्वी हातातून निसटलेले काम मिळाल्याने बरे वाटेल. मार्च ते जून हा कालावधी आíथक आणि इतर दृष्टीने चांगला ठरेल. जूननंतर ज्या कामात मोठी चढाओढ आणि गुंतवणूक आहे अशा कामात लक्ष घालावेसे वाटेल. मात्र अतिसाहस करू नका. त्यानंतरच्या कालावधीत भावनिक निर्णय टाळा. तुमचे सर्व विचार आणि भविष्यातील बेत गुप्त राहणे चांगले, नाही तर जुलनंतर स्पर्धकांनाच त्याचा फायदा मिळेल.
नोकरीमध्ये वरिष्ठांनी पूर्वी काही आश्वासने दिली असतील तर त्याची पूर्तता मार्चपूर्वी होऊ शकेल. एप्रिल ते जून या काळात चांगले काम करून वरिष्ठांचा आणि संस्थेचा विश्वास संपादन करता येईल. नेहमीपेक्षा जादा पगारवाढ, एखाद्या पदावर बढती आणि विशेष सवलती मिळू शकतील. काही जणांची परदेशातील प्रोजेक्टकरिता निवड होईल. जुलनंतर मात्र कामाचा तणाव मोठय़ा प्रमाणात वाढेल. त्याची पूर्तता करण्याकरिता बरीच मेहनत घ्यावी लागेल. नवीन नोकरी स्वीकारण्यापूर्वी तुमची भूमिका सावध ठेवा.
सांसारिक जीवनात दिवाळीच्या सुमारास दूरच्या प्रवासाचे बेत तुम्ही अमलात आणायचे ठरवाल. एखाद्या आनंददायी सोहळ्यात तुम्ही सहभागी व्हाल. बऱ्याच काळची इच्छा पूर्ण करून घ्याल. जूनपर्यंत नवीन कामाची संधी उपलब्ध झाल्यामुळे तुमच्या हातात जादाचे पसे खेळतील. स्वत:च्या प्रकृतीबाबत काळजी घ्यावी लागेल. तसेच अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना एकदम कोणावरही विश्वास ठेवू नका. तुमच्या मर्यादेत राहिलात तर तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. मुलांच्या प्रगतीमध्ये गेल्या दोन वर्षांत काही अडचण निर्माण झाली असेल तर त्यावर आता मार्ग मिळाल्याने वातावरण शांत होईल. तरुण व्यक्तींना एखाद्या व्यक्तीची भुरळ पडेल. पण विवाह ठरवताना त्यांनी घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीची मदत घ्यावी. जुलनंतर तरुणांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात शक्यतो बदल करू नयेत. प्रगतीकरिता त्यांनी आपला अभ्यास आणि ज्ञान वाढवावे.
कलाकार आणि खेळाडूंची निराशा कमी करणारे वर्ष आहे. त्यांना चांगली संधी मिळेल. पूर्वी केलेल्या कामाचा उपयोग होईल. पण त्यांनी स्वत:चा तणाव मर्यादेबाहेर वाढवू नये.