मेष जेव्हा कठीण काळ असतो त्यावेळी आपण सर्व शक्ती पणाला लावून समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करतो. तसेच प्रत्येक निर्णय घेताना त्याच्या भविष्यातील परिणामांचा विचार करतो. या दोन्ही गोष्टी या आठवडय़ात लक्षात ठेवणे आवश्यक आहे. व्यापार उद्योगात उत्पन्नाची सोय करण्याकरता नवीन साधन शोधणे आवश्यक होईल. नोकरीमध्ये अचानक काहीही कारण नसताना तुमच्या कामाच्या स्वरूपामध्ये बदल केला जाईल किंवा बदली होईल. घरामध्ये जोडीदाराचे हट्ट आणि गरजा याकडे लक्ष द्यावे लागेल.
वृषभ सर्व ग्रहमान हळूहळू तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढणारे आहे. तुमच्या इच्छा-आकांक्षा त्यामुळे पल्लवित व्हायला सुरुवात होईल. व्यापार उद्योगात स्पर्धकांच्या पुढे पाऊल टाकण्यासाठी एखादी नवीन योजना नवीन वर्षांत सुरू होईल. खर्च कमी झाल्यामुळे बरे वाटेल. नोकरीमध्ये तुमची अडचण किंवा गैरसोय करणारे काम संपल्यामुळे तुम्ही सुटकेचा नि:श्वास टाकाल. त्यामुळे तुम्ही नव्या दमाने कामाला लागाल. घरामध्ये एखादा सुखद प्रसंग साजरा होईल. त्यामध्ये तुमची हौसमौज तुम्ही भागवून घ्याल.
मिथुन तुमच्या राशीमध्ये नावीन्यपूर्ण कल्पनांचा कधीच तोटा नसतो. परंतु त्यातील बऱ्याच योजना व्यावहारिक नसल्यामुळे आयत्या वेळी रद्द कराव्या लागतात. व्यापार उद्योगात स्पर्धकांशी तुलना न करता तुम्ही तुमच्याच पद्धतीने काम करणे चांगले. नोकरीमध्ये एखादी नवीन जबाबदारी तुमच्या गळ्यात येऊन पडण्याची शक्यता आहे. ती खुबीने टाळाल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांनी मध्यस्थांची विश्वासार्हता पडताळून पाहा. हवामानामुळे प्रकृतीला त्रास संभवतो. त्यावर वेळीच उपचार करा.
कर्क तुमच्यामधील रचनात्मक आणि कर्तव्यबुद्धीने काम करण्याच्या वृत्तीला या आठवडय़ात भरपूर वाव असणार आहे. त्यामुळे तुम्ही एकदम सक्रिय दिसाल. व्यापार उद्योगात एखाद्या नवीन योजनेचे नियोजन कराल, त्यातून पैसे जरी जास्त नाही मिळाले तरी बाजारातील तुमची पत वाढेल. नोकरीमध्ये संस्थेत घडणाऱ्या घडामोडींमुळे कामावर लक्ष केंद्रित करता येणार नाही. घरामधील व्यक्तींबरोबर मौजमजा करण्याचा तुमचा मूड असेल. पण मुलांना मात्र शिस्तीचे धडे द्यावे लागतील.
सिंह बरेचसे ग्रह राशीच्या चतुर्थस्थानात असल्यामुळे तुम्हाला थोडीशी सुस्ती येईल. आराम करायचे असे तुम्ही ठरवाल. पण तुमचे हे विचार जास्त काळ टिकणार नाहीत. एखाद्या नावीन्यपूर्ण कल्पनेमध्ये तुम्ही रमून जाल. व्यापार उद्योगात रोखीच्या व्यवहारांकडे जातीने लक्ष द्या. नोकरीमध्ये नेहमीपेक्षा वेगळे काही असेल तर त्यामध्ये तुम्ही रस घ्याल. दैनंदिन कामात टाळाटाळ कराल. इतरांच्या ते लक्षात येणार नाही याची काळजी घ्या. घरामध्ये सर्वाचा खरेदी करण्याचा मूड असेल.
कन्या ग्रहमान तुमच्या अनेक इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारे आहे. योग्य विचार आणि नियोजन जास्त. त्यामानाने कृती कमी असा तुमचा प्रकार असतो. पण या आठवडय़ात या दोन्हींचा उत्तम समन्वय झाल्यामुळे तुमच्या यशामध्ये चांगली भर पडेल. नवीन नोकरीकरता प्रयत्न करीत असाल तर मुलाखतीमध्ये यश मिळेल. चालू नोकरीमध्ये चांगले काम करून तुम्ही वरिष्ठांच्या प्रशंसेला पात्र ठराल. सांसारिक आणि व्यक्तिगत जीवनात एखाद्या कारणाने मनोरंजनाचा आस्वाद घ्याल. घरामध्ये शुभ कार्य पार पडेल.
तूळ ग्रहस्थिती तुम्हाला कोडय़ात टाकणारी आहे. चतुर्थस्थानातील मंगळ कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि जीवनातील विविधता याचा अनुभव देणारा आहे. आर्थिकदृष्टय़ा सर्व काही समाधानकारक असल्यामुळे तुम्हाला पैशाची चिंता असणार नाही. एखादी नवीन योजना सुरू करण्याचा विचार मनात येईल. ती योजना कशी चांगली आहे हे इतरांना पटवून देण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. घरामध्ये छोटा प्रवास, आवडत्या व्यक्तींशी गाठीभेटी याचबरोबर काही नैतिक जबाबदाऱ्या यामुळे वेळ कसा गेला हे समजणार नाही.
वृश्चिक संकटकाळी गोगलगाय जशी पोटात पाय घेऊन बसते तसेच गेले काही महिने तुम्ही तुमचे धोरण सावध ठेवले होते. आता तुम्हाला थोडेसे धाडस करावेसे वाटेल. कठीण परिस्थितीवर मात करण्याकरिता तुमची कल्पकता आणि दूरदृष्टी उपयोगी पडेल. व्यापार उद्योगामध्ये एखादी नवीन कल्पना तुमचे लक्ष आकर्षित करेल. परंतु स्वत:च्या आर्थिक मर्यादा लक्षात घ्या. नोकरीमध्ये एखादे अवघड काम हाताळावे लागेल. व्यक्तिगत जीवनात नवीन ओळख, प्रवास, स्नेहसंमेलन वगैरे गोष्टी हव्याहव्याशा वाटतील.
धनू बरेचसे ग्रह व्ययस्थानात असल्यामुळे तुमचे खर्च वाढण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी मंगळ धनस्थानात येत असल्याने आवश्यक त्या पैशाची तरतूद कुठून तरी होईल. व्यापार उद्योगात मात्र कोणतीही गुंतवणूक करताना त्याचा भविष्यात किती उपयोग होणार आहे याचा विचार करा. नोकरीमध्ये चांगले काम करून वरिष्ठांना खूश करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. घरामध्ये डागडुजी, वस्तूंची मोडतोड किंवा इतर खर्च अनपेक्षितरीत्या वाढेल. घरातील सदस्यांना सांभाळा. त्यांच्याकडूनच तुम्हाला मदत मिळेल.
मकर तुमच्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची तडफ व आत्मविश्वास निर्माण होईल. नियोजनाचा तुम्हाला नेहमीच उपयोग होतो. पण या आठवडय़ात शक्ती आणि युक्ती याचा योग्य समन्वय झाल्यामुळे सोन्याहून पिवळे असेच तुमच्या बाबतीत म्हणायला पाहिजे. व्यापार उद्योगात काहीतरी नवीन करावेसे वाटेल. नोकरीमध्ये इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत हे दाखवण्याची तुमची इच्छा तीव्र होईल. तरुणांचा मौजमस्तीचा मूड असेल. अनपेक्षित एखाद्या प्रश्रामुळे तुम्ही थोडेसे गोंधळून जाल.
कुंभ ग्रहस्थिती तुम्हाला अनुकूल असल्यामुळे चिंता करायचे कारण नाही. योग्यवेळी अचूक निर्णय घेण्याचे फायदे तुम्हाला ह्य आठवडय़ात मिळणार आहेत. त्याचा सर्व आघाडय़ांवर उपयोग होईल. व्यवसाय उद्योगामध्ये हातचे सोडून पळत्याच्या मागे लागू नका. तुमचे भविष्यातील बेत स्पर्धकांना कळणार नाहीत याची खबरदारी घ्या. जाहिरात आणि जनसंपर्काचा फायदा वाढवायला उपयोग होईल. ज्यांना नोकरीत बदल करायचा आहे त्यांच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. घरामध्ये हसते खेळते वातावरण असेल.
मीन ज्या पैशांनी तुम्हाला हुलकावणी दिलेली होती ते पैसे मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे तुमच्या हालचालींना वेग येईल. केलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत याची प्रचीती देणारे हे ग्रहमान आहे. व्यापार उद्योगामध्ये एखादे प्रकरण काही कारणाने लांबलेले असेल त्याला आता गती येईल. पैशांची तरतूद झाल्यामुळे पूर्वीची कर्जे तुम्ही हळूहळू फेडू शकाल. नोकरीमध्ये कामातली गैरसोय संपल्यामुळे तुमचा आनंद वाढेल. कलाकारांना चांगली मागणी राहील.