कुणी सांगतं पाणी भरपूर प्या, कुणी सांगतं पाणी आवश्यक तेवढंच प्यायला हवं.. नेमकं काय करायचं? मुळात पाणी कशासाठी प्यायचं? घरच्याघरी साध्या सोप्या पद्धतीने पाणी शुद्ध कसं करून घ्यायचं?

आपल्या सृष्टीत सर्वच जीवांकरता, वनस्पती विश्वासकट सर्वच प्राणिमात्रांकरता दैनंदिन जीवनात पाण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शास्त्रकारांनी पाण्याचे महत्त्व ‘आश्वासकराणां श्रेष्ठम्’ असे अत्यंत समर्पकपणे वर्णन केले आहे. आपणाला जगायचे असेल तर किमान तीन मूलभूत गरजा- हवा, पाणी व अन्न- आवश्यक असते. दैनंदिन जीवनात कोणतीही अडचण आली तर आपणास एखादा मार्गदर्शक, आपले वडीलधारे, जवळचे मित्र आपणास ‘तू भिऊ नकोस, आम्ही तुझ्याबरोबर आहोत,’ असे आश्वासन देतात. तसेच पाण्याचे महत्त्व घोटभर पाणी पी या सहज प्रेरणेने सगळय़ांनाच तत्क्षणी दिलासा देणारे आहे. एकवेळ अन्न नसले तरी चालते, पण तुम्हा-आम्हाला प्यायला पाणी हवेच.
शास्त्रकारांनी या द्रवद्रव्याचा फार बारकाईने विचार केला आहे. अष्टांगहृदयकार वाग्भटाचार्य सू.अ. ५ मध्ये ‘आकाशात पतितं तोयम्;’ आकाशात पडणाऱ्या पाण्याचे, अंतरिक्ष जगाचे विस्ताराने वर्णन केले आहे. जगभर मानवी जीवनाला शुद्धच पाणी मिळावे म्हणून पाणी शुद्ध करण्याचे, शुद्धच पाणी पुरवठय़ाचे २४ तास प्रयत्न चालू असतात.
शरद ऋतूमध्ये आकाश स्वच्छ असते. वातावरणात धूळ अजिबात नसते. या काळातील पावसाचे पाणी हे सर्वात शुद्ध जल होय. त्याला ‘अमृतजल’ अशी संज्ञा आहे. ज्यांच्या निवासात, गच्चीत किंवा उंच इमारतीत टेरेसवर मोकळी जागा आहे, त्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात मोठय़ा भांडय़ांना स्वच्छ फडके बांधून ठेवावे. पावसाचे पडणारे पाणी साठवावे. ते कधीही खराब होत नाही. त्यामध्ये किडे, जंतू अजिबात नसतात. पावसाळय़ाच्या सुरुवातीच्या काळात हवेत खूपच धुळीचे कण असतात. त्यामुळे जून, जुलै या वर्षां ऋतूच्या काळात पडणाऱ्या पाण्याची व्यवस्थित शुद्धी करूनच ते वापरावे लागते. या पाण्याला आम्लविपाकी पाणी असे संबोधतात. जगभर आमांश, अॅमिबायसिस, पोटदुखी, अतिसार या रोगांनी लोक हैराण असतात. आपल्या प्रजेला सुरक्षित पाणी मिळावे म्हणून सर्वच शासनयंत्रणा आपापल्या परीने प्रयत्न करत असतातच. पण आपल्या स्वास्थ्याकरिता जे पाणी प्यावयाचे ते उकळून गार करून प्यावे हे मी सांगावयास नकोच. पण अशा उकळलेल्या पाण्यात आपल्या अपेक्षेप्रमाणे थोडी सुंठ पूड मिसळून पाणी पिण्याकरिता वापरले तर ते सर्वात आरोग्यदायी पाणी असेल.
आजकाल मोठय़ा संख्येने लोक पर्यटनाला जातात. लहान-मोठे प्रवास करतात, लडाख, काश्मीर, कैलास, मानस सरोवरासकट ट्रेकिंग यात्रा करतात. बाटलीबंद पाण्याचे प्रचंड प्रस्थ माजले आहे. त्याऐवजी नागरमोथा या वनस्पतीचे चूर्ण- एक लिटर पाण्याकरिता पाच ग्रॅम या हिशोबात वापर केला तर प्रवासात कसलेही पाणी मिळाले तरी ‘वॉटरबोर्न’ रोगांची चिंता बाळगावी लागणार नाही. नागरमोथ्याचे कंद पाणथळ जागी उगवतात. त्यांना एक विलक्षण सुगंध असतो. नागरमोथा चूर्ण उपलब्ध न झाल्यास आणखी एक प्रकारचे शुद्ध जल आपणास आपल्या घरी करता येईल. त्याचे नाव आहे ‘सुधाजल.’ लाईम वॉटर असा इंग्रजी शब्द आहे. दिवसाला आपणास किती पिण्याचे पाणी लागते त्या हिशोबाने हे सुरक्षित पाणी विनासायास, विनाखर्चाचे तयार करता येते. विविध रंगाची माती, चुना विकणाऱ्या दुकानातून खालच्या थरांत असणारी चुनखडी आणावी. ती विरी न गेलेली, स्पर्शाला थोडी गरम असलेली असावी. रात्री एक लिटर पाण्याकरिता १० ग्रॅम या हिशोबाने चुनखडी पण स्टीलच्या भांडय़ात भिजवावी. सकाळी ते पाणी स्वच्छ फडके, टिपकागद किंवा फिल्टर पेपरने गाळावे. खाली चुना येऊ देऊ नये. २०० मिलीच्या पाच बाटल्यांत भरावे. या बाटल्यांत मोकळी जागा ठेवू नये. असे पाणी कधीही खराब होत नाही. जगाच्या अंतापर्यंत ते टिकते. लहान मुलांच्या व महिलांच्या विविध विकारांत, वजन घटणे, गंडमाळा, भूक नसणे, वाढ न होणे, कॅन्सरसारख्या गाठीच्या विकारात असे पाणी विकारांना लवकरच काबूत आणते. सुरक्षित पाण्याचे अंतरिक्ष जल, सुंठ सिद्ध जल, नागरमोथा चूर्णयुक्त पाणी व चुन्याची निवळी यांचे प्रयोग दैनंदिन जीवनात जरूर करा, अनुभवा, अनेक रोगांपासून मुक्ती मिळवा.
पाणी प्यावे? केव्हा, किती, कोणी? का?
प्रत्येक जीवमात्राला मग तो मनुष्य असो, पशू-पक्षी, लहान जनावरे, मासे, कीटक, मुंग्या या सर्वानाच कमी-अधिक प्रमाणात पाण्याची गरज असते. जीवनात पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असले तरी मनुष्यमात्राच्या हिताकरिता व्यक्तीनुरूप, कथानुरूप, कालानुरूप, व्यवसायानुरूप कमी-जास्त रोग लक्षणांप्रमाणे किंवा खाण्यापिण्याच्या पद्धतीनुसार पाण्याची मात्रा घेण्याची पद्धत, काल हे नेहमीच विचारात घ्यायला लागते.
सर्वसामान्यपणे तहान लागली तरच पाणी प्यावे, हे तत्त्व सगळेच पाळतात. कडक उन्हाळा, ग्रीष्म ऋतू, शरद ऋतू, मे महिना किंवा ऑक्टोबर महिना या काळात ठरवून पाणी प्यावे. ज्यांना वजन वाढवायचे आहे, जे कृश आहेत त्यांनी जेवणानंतर थोडय़ा वेळाने जरूर पाणी प्यावे. कृश व्यक्तीने जेवणाअगोदर किंवा जेवणामध्ये पाणी पिऊ नये. ज्यांना खूप बोलण्याचा व्यवसाय आहे, डोकेदुखी, चक्कर, पित्त होणे या तक्रारी आहेत, त्यांनी रात्री दहा-पंधरा चांगल्या दर्जाच्या मनुका, बिया काढून भिजत टाकाव्यात. सकाळी मनुका खाव्यात व वर ते पाणी प्यावे. कृश व हृदयरोगाच्या तक्रारी असणाऱ्यांनी या प्रकारेच दोन खजूर भिजत टाकून सकाळी त्याचे पाणी घ्यावे. त्यामुळे दुखण्याच्या तक्रारींकरिता इतर गोळय़ा घ्याव्या लागत नाहीत. कॉलरा, जुलाब, उलटय़ा या विकारात, शरीरातील ओलावा कमी झाला असल्यास पाणी, गूळ किंवा साखरपाणी काही काळ घ्यावे. स्थूल व्यक्तींनी शक्यतो पाणी कमी प्यावे. आपल्या शरीराचे बरेचसे वजन हे पाण्याचे असते. ज्यांना शोष पडतो, अशा स्थूल व्यक्तींनी जेवणाअगोदर पाणी प्यावे, त्यामुळे आहार कमी जातो, वजन वाढत नाही.
यकृताचे विकार, कावीळ, उदरविकार, जलोदर या विकारात पाणी अजिबात पिऊ नये. त्याऐवजी दूध, गोमूत्र, कोरफड रस असे पातळ पदार्थ घ्यावेत. जुनाट त्वचाविकार, कंड, इसब गजकर्ण, नायटा, पू वाहणे, व्रण, मधुमेहाच्या किंवा महारोगाचा जखमा, मधुमेह, स्थूल व्यक्तींचा रक्तदाब विकार, सूज, शय्यामूत्र, सर्दी पडसे या विकारात शक्यतो पाणी पिऊ नये. या विविध विकारात शरीराला पाण्याची गरज नसते. फाजील जलतत्त्वाने शरीरात पू तयार होतो. त्वचाविकार आणि जखमा सुकत नाहीत. संधिवात, आमवात, पाठ-कंबर-मान किंवा गुडघेदुखी या वात विकारात स्थूल व्यक्तींनी पाणी पिऊ नये. प्यावयाचे झाल्यास थोडे आणि सुंठचूर्ण मिश्रित पाणी प्यावे. पोटदुखी विकारात पोट केव्हा दुखते, या कालावर पाणी केव्हा प्यावे, किंवा पिऊ नये हे अवलंबून आहे. जेवणानंतर लगेचच पोट दुखत असेल किंवा रिकाम्यापोटी पोट दुखत असेल, तर पाणी पिऊ नये. प्रथम अन्नपचनाला, आतडय़ांत अन्न आपणहून सरकण्याची संधी द्यावी. जेवणानंतर तीन-चार तासाने पोट दुखत असेल तर पाणी जरूर प्यावे. क्रॉनिक रिनल फेल्युअर सी.आर.एफ्. या विकारात संपूर्ण दिवसात एकूण पाणी वा द्रव ५०० मिली. एवढेच प्यावे.
लहान वयातच मुलांना चष्मा लागणे, वर्ष सहा महिन्यांनी चष्म्याचा नंबर वाढता असणे, ही मोठीच समस्या अनेक बालकांत दिसून येते आहे. ज्यांना चष्म्याचा नंबर कमी करावयाचा आहे, त्यांनी नाकाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. त्यामुळे डोळय़ाचा अश्रू मार्ग मोकळा राहतो. सुरुवातीला नाकाने पाणी पिणे जमले नाही तर चमच्याने नाकात पाणी सोडावे. मानवी तोंडापेक्षा नाक हा अवयव उत्तम फिल्टर आहे.
एकाएकी उसण भरणे, पाठ दुखणे, कंबर दुखणे, अस कळा येणे; तसेच खूप नाक वाहणे, अस सर्दी-पडसे होणे. या अनुक्रमे वात व कफप्रधान विकारांत, एकदम गरम-गरम पाणी, दरदरून घाम येईल अशा पद्धतीने पिणे हा एक ‘अक्सर’ इलाज आहे.
आपण अनुभवा, अनुभवाचा फायदा झाला तर इतरांना सांगा. शुभं भवतु!
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
chemical manufacturing industries in india stock market share prices
क्षेत्र अभ्यास अजब रसायन बाजार
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
How many times you should wash your bedsheets cleaning tips to wash your sheets
तुम्ही तुमची बेडशीट महिन्यातून किती वेळा धुता? जाणून घ्या स्वच्छ करण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स