कव्हरस्टोरी
पालिकेची मोहीम तीव्र, पण…
प्राजक्ता कासले, मुंबई
नखाएवढेही नसणारे डास काय उत्पात घडवून आणू शकतात, त्याचे भीषण रूप २०१० मध्ये मुंबईत मलेरियाचा उद्रेक झाला तेव्हा दिसले. त्यापूर्वी कधी डासांनी साथीच्या रोगांना आमंत्रण दिले नव्हते, असे नाही. मात्र तब्बल एक लाखांहून अधिक लोकांना डासांकडून मलेरिया ‘भेट’ मिळाल्याने या कीटकाविरोधात पालिकेने मोहीम तीव्र केली. गेल्या दोन वर्षांत डासांचे प्रमाण आणि त्यामुळे आजारांवर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश मिळाल्याचे चित्र किती फसवे होते, ते या वर्षी डेंग्यूच्या साथीमुळे दिसून आले.

पालिकेच्या अधिकृत आकडेवारीनुसार डेंग्यूचे या वर्षभरात सुमारे साडेसातशे रुग्ण आढळले आहेत. हे रुग्ण अर्थातच फक्त पालिका रुग्णालयातील आहेत. शहरातील केवळ ३० टक्केनागरिक पालिका रुग्णालयात जातात. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची वास्तविक संख्या यापेक्षा किती तरी पट अधिक असू शकते. डेंग्यू हा नोटिफाएबल आजारात येत असल्याने खासगी रुग्णालयांना या आजाराच्या रुग्णांची माहिती पालिकेला देणे बंधनकारक आहे. मात्र तरीही पालिका ही आकडेवारी जाहीर करताना आढेवेढे घेते. अनेक नगरसेवक, त्यांच्या मुलांनाही डेंग्यूचा डंख झाल्यावर महानगरपालिका सभागृहात गदारोळ झाला. अखेर पालिकेला खासगी रुग्णालयातील रुग्णाबाबतही माहिती द्यावी लागली. खासगी रुग्णालयातील ऑक्टोबरच्या पहिल्या १५ दिवसांतील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या पालिकेने जाहीर केली. शहरातील केवळ २५ रुग्णालयांत त्या १५ दिवसांत तब्बल ६१५ डेंग्यू रुग्ण उपचार घेत होते. मात्र हे रुग्ण संशयित आहेत, डेंग्यू निश्चित करण्यासाठी वापरण्यात आलेली एलायन्झा चाचणी केल्याशिवाय डेंग्यू निश्चित मानला जात नाही, असे ठोकळेबाज उत्तर पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले. अधिकृत आकडेवारीनुसार डेंग्यूमुळे नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत मुंबईतील १३ जणांचा बळी गेला आहे. मात्र यातही डेंग्यूच्या ‘संशयित’ बळींचा समावेश नाही. डेंग्यूच्या रुग्णांची तसेच मृत्यूंची संख्याच मर्यादित ठेवल्याने मलेरिया किंवा टीबीप्रमाणे डेंग्यूविरोधात पालिकेकडून मोठय़ा प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली नाही. अर्थात कीटक नियंत्रणासाठी मात्र पालिकेकडून प्रयत्न करण्यात आले.
डेंग्यूच्या विषाणूंचा वाहक असलेला एडिस इजिप्ती हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. घरातील कुंडय़ांखालील प्लेट, फेंगशुईच्या रोपामधील पाणी, फुलदाणी यातही हा डास अंडी घालत असल्याने पालिकेने घराघरांत जाऊन या डासांच्या अळी शोधण्यास सुरुवात केली. झोपडपट्टीमध्ये छतावर टाकण्यात येणारे निळे प्लास्टिक आणि ते उडू नये यासाठी त्यावर ठेवण्यात येणाऱ्या टायरमध्येही डेंग्यूचे डास आढळले. पावसाळा संपल्यावर पालिकेने झोपडय़ांवर, चाळीवर टाकण्यात आलेले प्लास्टिक काढून टाकायला सुरुवात केली. मात्र श्रीमंतांच्या घरातील कुंडय़ा, फुलदाण्यांपर्यंत पोहोचणे पालिकेला शक्य नव्हते. डेंग्यू आजाराचे रुग्ण श्रीमंत वस्तीतही मोठय़ा प्रमाणात आढळत असल्याचे प्रजा फाउंडेशनने केलेल्या पाहणीत दिसून आले होते. या समस्येचे उत्तर पालिकेच्या डासांविरोधातील कारवाईत समोर आले. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने २० ऑक्टोबपर्यंत एडीस डासांची तब्बल १८४७ उत्पत्तिस्थाने शोधली. त्यातील ५८ टक्केउत्पत्ती ही बिगर-झोपडपट्टी परिसरात होती. त्यातही एकूण उत्पत्तिस्थानांपैकी सुमारे तीस टक्के उत्पत्तिस्थाने ही घरात आढळली. यावरून केवळ पालिकाच नाही तर नागरिकही डासांच्या बाबत किती उदासीन आहेत, ते दिसून आले. डेंग्यूचे डास कुठे अंडी घालतात, त्यांना रोखण्यासाठी काय करावे याबाबत पालिकेने शहरभरात तीन लाख भित्तिपत्रके लावली. मात्र तरीही घरातील डासांबाबत नागरिक कोणतेही पाऊल उचलत नसल्याचे पाहून त्यांना दंड करण्याचा मार्गही अवलंबला.
या वर्षी देशात अनेक ठिकाणी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली. ही संख्या का वाढली व त्यामागे नेमके कोणते विषाणू कारणीभूत ठरले ते पाहण्यासाठी केंद्रीय कीटकसंसर्गित आजार नियंत्रण विभागाच्या तज्ज्ञांचे पथकही मुंबईत येऊन गेले. मुंबईतील डेंग्यूच्या १०१ रुग्णांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये पाठवण्यात आले. या नमुन्यांमध्ये डेंग्यूचे डेन टू आणि डेन थ्री हे विषाणू आढळले. यातील डेन टू हा विषाणू अधिक घातक आहे. संसर्गजन्य आजारांसाठी असलेल्या कस्तुरबा रुग्णालयाने २०११ मध्ये केलेल्या पाहणीनुसार डेंग्यूच्या ८५ टक्के मृत्यूंमध्ये डेन टू विषाणू कारणीभूत असतो. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र या चाचण्यांकडे फारशा गांभीर्याने पाहिलेले नाही. केंद्रीय पातळीवर ठरवल्याप्रमाणे डेंग्यूवर उपचार सुरू राहतील, असे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
डेंग्यू आजारावर कोणताही निश्चित उपाय नाही. त्याच्या लक्षणांवर उपचार करता येतो. डेंग्यू आजारात शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. प्लेटलेट्सची संख्या निश्चित केलेल्या रॅपिड चाचण्यांवरून डेंग्यूवर प्राथमिक उपचार सुरू करता येतात. मात्र वेळेत उपचार झाले नाहीत किंवा लहान मुलांना डेंग्यूचा संसर्ग झाला तर परिस्थिती गंभीर होते. त्यामुळे डेंग्यूसाठी प्रतिबंधात्मक उपायांवरच अधिक भर देण्याची गरज आहे. विषाणूंची वाढ रोखण्याबाबत अजून तरी कोणताही पर्याय समोर आलेला नाही. त्यामुळे हे विषाणू पसरवणाऱ्या डासांचा नायनाट करणे हाच प्रभावी उपाय ठरू शकतो. डेंग्यू आजारांच्या साखळीचा हा दुवा तोडणे हे जसे पालिकेचे काम आहे तसेच घरात डेंग्यूची पैदास थांबवणे, हे नागरिकांच्या हातात आहे. नाही तर पालिकेकडे बोट दाखवण्याचा पर्याय आहेच.

डेंग्यूमुळे पुण्यात प्लेटलेट्सचा तुटवडा
संपदा सोवनी, पुणे
पुण्यात सध्या डेंग्यूने चांगलाच जोम धरला आहे. खरे तर थंडी सुरू झाल्यानंतर डासांच्या वाढीत घट येऊन डेंग्यूचा फैलाव थांबायला हवा. पुण्यात थंडी सुरू झाली आहे, पण सतत आणि कडाक्याची थंडी अजूनही जाणवण्यास सुरुवात झालेली नाही. दुपारच्या वेळी घामाच्या धारा आणि संध्याकाळ पडता पडता बोचरी थंडी असेच चित्र आहे. त्यामुळे डासांच्या वाढीत घट तर झालेली नाहीच, उलट नोव्हेंबरमध्ये दर दिवशी डेंग्यूचे सरासरी किमान सहा रुग्ण शहरात आढळत आहेत. असे असले तरी या वर्षीची थंडीची सुरुवात गेल्या वर्षीपेक्षा पुष्कळच चांगली म्हणायला हवी. दर वर्षी ऑक्टोबरपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या एकदम वाढू लागते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये शहरात डेंग्यूचे तब्बल ३३७ रुग्ण सापडले होते. रुग्णांच्या संख्येची तुलना करता या वर्षी पालिकेने राबवलेल्या काही उपायांना बरे यश आल्याचे दिसते.

पालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. श्याम सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ५५८ रुग्ण आढळले आहेत. वर्षभरातील डेंग्यूच्या फैलावावर नजर टाकली तर जानेवारी ते मेपर्यंत डेंग्यूची फारशी चर्चा नव्हती. दर महिन्याला सापडणाऱ्या रुग्णांची संख्याही दहाच्या आतच होती. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात डेंग्यूचे ३ रुग्ण आढळले होते आणि या तीनही रुग्णांचा मृत्यू झाला होता, पण यानंतर आढळणाऱ्या रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ दिसली नाही. प्रथम जूनमध्ये ही संख्या २२ म्हणजे दोन आकडी झाली आणि जुलैला ती जवळजवळ दुपटीने वाढली. यानंतर डेंग्यूने आपले हातपाय चांगलेच पसरले. ऑगस्टला डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आणि ती अजूनही वाढतेच आहे.
डेंग्यू हा नागरिकांच्याच निष्काळजीपणामुळे होणारा रोग असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेने या वर्षी ज्या ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळेल त्या जागामालकाला नोटिसा देऊन त्यांच्यावर खटले भरण्याची मोहीम हाती घेतली आहे. दंडात्मक कारवाईच्या भीतीने या मोहिमेला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. आतापर्यंत पालिकेने एक हजाराहून अधिक जागामालकांना डासांची पैदास आढळल्याबद्दल नोटिसा दिल्या आहेत, तर नोटिसांना प्रतिसाद न देणाऱ्या २५ जागामालकांवर खटले भरले आहेत. यात बांधकाम व्यावसायिकांपासून सोसायटय़ांचाही समावेश आहे.
डॉ. सातपुते म्हणाले, ‘‘नागरिकांनी निष्काळजीपणे पाणी साठवून ठेवल्यामुळे आणि बांधकामाच्या जागांवरील पडीक वस्तूंमध्ये पाणी साठून राहिल्यामुळे डासांच्या पैदाशीला चालना मिळते. त्यामुळे साठवलेले पाणी झाकून ठेवणे, योग्य काळाने हे पाणी बदलणे, बांधकामाच्या ठिकाणी आणि घराच्या आजूबाजूला पाणी साठू शकेल असा कचरा साठू न देणे आवश्यक आहे. शहराच्या ज्या भागात डेंग्यूचा रुग्ण सापडतो, त्या रुग्णाच्या भागातील शंभर घरांमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी भेट देतात. त्या भागात आणखी कुणाला डेंग्यू किंवा फ्लूसदृश लक्षणे दिसतात का, याची नोंद घेतली जाते. संशयित रुग्णांची डेंग्यूसाठी तपासणी केली जाते, तसेच त्या भागात औषध फवारणीही केली जाते. हे डेंग्यूचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी फायदेशीर असले तरी डासांची पैदासच होऊ न देणे हाच या रोगावरील कायमचा उपाय आहे. त्यासाठी पालिकेला अधिक प्रमाणात लोकसहभागाची अपेक्षा आहे.’’
सप्टेंबरपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून येत असल्यामुळे या वर्षी ३० सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत पालिकेने डेंग्यूसंबंधी जनजागृती मोहीम राबवली होती. या मोहिमेत सोसायटय़ा, शाळा आणि अंगणवाडय़ांमध्ये जाऊन डेंग्यू कसा पसरतो, त्याचा फैलाव थांबवण्यासाठी काय करावे, अशा प्रकारची माहिती देण्यात आली.
पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जरी मोठी असल्याचे दिसून येत असले तरी डेंग्यूमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मात्र आटोक्यात राहू शकली आहे. गेल्या वर्षी पूर्ण वर्षभरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ७६२ होती. यातील ६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. या वर्षी आढळलेल्या एकूण रुग्णांपैकी ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जानेवारीतील ३ मृत्यूंनंतर जूनमध्ये डेंग्यूचा आणखी एक मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णांची संख्या चांगलीच फुगली, पण सुदैवाने जुलै ते आजपर्यंत डेंग्यूच्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येबाबत चांगली कामगिरी केल्याचे दिसते. महापालिकेचे आरोग्यप्रमुख डॉ. अनिल रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी- चिंचवडमध्ये जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले असून यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. डॉ. रॉय म्हणाले, ‘‘पिंपरी- चिंचवड महापालिकेला बेकायदा बांधकामांची संख्या कमी करण्यात यश आले आहे. बांधकामाच्या जागांवर डासांची पैदास प्रामुख्याने आढळत असल्याने बेकायदा बांधकामांना चाप लावण्याच्या पालिकेच्या धोरणाचा फायदा डेंग्यूचा फैलाव कमी करण्यासाठीही झाला आहे. गावांमधील नद्यांवरील बंधारे पालिकेने फोडले आहेत. त्यामुळे पाणी वाहते होऊन ते साचून राहण्याचा प्रश्न आटोक्यात आला आहे.’’ नदीत वाढणारी जलपर्णी आणि या वातावरणात होणारी डासांची पैदास यावरून पालिकेत नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळानंतर नदीपात्रांतील गावांलगतचे बंधारे फोडण्याचा उपाय पिंपरी- चिंचवड पालिकेने अमलात आणला आहे.
पुणे वैद्यकीय सुविधांच्या दृष्टीने चांगलेच विकसित असल्यामुळे शहराच्या ग्रामीण भागांमधून आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर ठिकाणांहूनही रुग्ण डेंग्यूच्या उपचारांसाठी पुण्यात येत आहेत. डेंग्यूच्या संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून (एनआयव्ही) झाल्यानंतर त्यांची गणना डेंग्यूच्या रुग्णांमध्ये केली जाते. एनआयव्ही पुण्यात असणे हीदेखील डेंग्यूच्या निदानाच्या दृष्टीने अधिक फायद्याची गोष्ट ठरली आहे. डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे शहरातील रक्तपेढय़ांवर मात्र ताण पडतो आहे. डेंग्यूवरील उपचारांसाठी रुग्णाला प्लेटलेटस् हा रक्तघटक देणे आवश्यक असते. या घटकाला असलेली मागणी दिवाळीच्या एक आठवडा आधीपासूनच प्रचंड प्रमाणात वाढली आहे. शहरातील काही रक्तपेढय़ांमध्ये प्लेटलेटस्चा तुटवडाही जाणवत आहे; परंतु पुण्यातील बहुसंख्य खासगी रुग्णालयांतील रक्तपेढय़ांचे बांधलेले आणि विश्वासू रक्तदाते आहेत. त्यामुळे प्लेटलेटस्च्या वाढलेल्या मागणीला पुरेसा पुरवठा करणे शक्य होत असल्याचे चित्र आहे.

माजी महापौरांनाच डेंग्यू
चारुशीला कुलकर्णी, नाशिक
नाशिक शहरात डेंग्यू हातपाय पसरवीत असताना त्याबद्दल विशेष फिकीर न करणाऱ्या आरोग्य यंत्रणेने माजी महापौर विनायक पांडे हेच जेव्हा डेंग्यूमुळे आजारी पडले तेव्हा त्याची खडबडून दखल घेतली. मागील दोन ते तीन महिन्यांत डेंग्यूचे रुग्ण शहरात अधिक प्रमाणात वाढले. शहरातील स्वच्छतेकडे महापालिकेकडून होणारे दुर्लक्ष हे त्यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप विरोधकांसह सर्वसामान्य नाशिककरही करीत आहेत. चालत आलेल्या या संधीचा शिवसेनेनेही लाभ उठवीत सत्ताधारी मनसेविरुद्ध आंदोलन सुरू केले. नाशिककरांना दोन्ही पक्षांच्या राजकारणात काडीमात्र रस नसल्याने कसेही करून शहरातील अस्वच्छता दूर करावी एवढीच त्यांची इच्छा आहे.
घराघरांतून कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेची घंटागाडी व्यवस्था कार्यान्वित आहे; परंतु ही व्यवस्था ठेकेदार व कर्मचारी यांच्या मनाप्रमाणे चालते. म्हणजे, शहरातील सर्व भागांत घंटागाडी दररोज फिरून कचरा संकलित करील याची शाश्वती नाही. घंटागाडय़ा नियमित येत नसल्याने ठिकठिकाणी कचऱ्यांचे ढीग साचून राहतात. जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांना गळती लागली आहे. त्यामुळे साचणाऱ्या पाण्यात डेंग्यूच्या डासांना पोषक असे वातावरण उपलब्ध होते. या पाश्र्वभूमीवर डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यास पालिकेला सवड मिळाली. फलक, जाहिराती याद्वारे जनजागृती करणारी महापालिका स्वच्छता राखण्यात तसे प्रयत्न करताना दिसत नाही. सद्यस्थितीत संपूर्ण नाशिक जिल्ह्यात डेंग्यूसदृश ९०२ रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांपैकी ३३० रुग्ण डेंग्यूसदृश असल्याचे निदर्शनास आले. त्यात शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक म्हणजे २०३ असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रदीप काकडे यांनी दिली.
जिल्ह्यात डेंग्यूमुळे दोन जणांचा बळी गेला आहे. त्यात एका सहा वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. दोघांमध्ये डेंग्यूसदृश आजाराची लक्षणे दिसून आली असली तरी पुढील काही चाचण्या बाकी होत्या. त्या पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गतवर्षीची आकडेवारी लक्षात घेतल्यास यंदा रुग्णांच्या संख्येत जवळपास दुपटीने वाढ झाल्याचे लक्षात येते. मागील वर्षी ग्रामीण भागातून ४१८ रक्तनमुने तपासणीसाठी मागविण्यात आले होते. त्यांपैकी ९९ रुग्णांना त्याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. शहरात ६११ रुग्णांची तपासणी करण्यात आली तर त्यातील १९२ रुग्ण डेंग्यूबाधित होते. महापालिका हद्दीत या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत हा आकडा ५६ च्या घरात पोहोचला आहे. सात रुग्ण डेंग्यूसदृश आढळून आले असून त्यासंदर्भात अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसल्याची महिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिली.
पालिकेचा वैद्यकीय विभाग डेंग्यूचे धोके, डेंग्यू फैलावाची कारणे, डेंग्यू डासांची उत्पत्ती, आजाराची लक्षणे, औषधोपचार आदींची माहिती देणार आहे. पंचवटी आणि नाशिक रोड भागात या आजाराचे प्रमाण अधिक आहे. यामुळे पंचवटी व नाशिक रोडसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या वैद्यकीय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील पाच हजार २९१ घरांना भेटी देऊन तपासणी केली. त्यात २४ हजार ७१२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या गृहभेटीत घरातील स्वच्छ पाण्याची तपासणी केली जात असून काही ठिकाणचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

पाणीसाठय़ांबाबत जागरूकतेची गरज
एजाज हुसेन मुजावर, सोलापूर
अधूनमधून दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात पाणीटंचाई सातत्याने भेडसावते. त्यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातही उपलब्ध पाणी कमी पडू नये म्हणून त्याची जास्तीत जास्त साठवणूक करण्याचा आटापिटा केला जातो. पाण्याची साठवणूक करताना हौद, रांजण, पिंप यासारख्या पाणीसाठय़ांची माध्यमे आठवडय़ातून किमान एकदा तरी कोरडी ठेवणे आवश्यक असते, परंतु त्याबाबतची जाणीव-जागृती नसल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात पाणी साठवण्याच्या प्रयत्नात आपसूकच डेंग्यूला आमंत्रण देणाऱ्या डासांच्या पैदाशीला हातभार लागतो, असे चित्र दिसून येते.
सुदैवाने जिल्ह्य़ात डेंग्यूने पछाडलेल्या रुग्णांची संख्या कमी असली तरी त्याकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरते. गेल्या फेब्रुवारी ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्य़ात डेंग्यूबाधित १४ रुग्ण आढळून आले. १८ संशयित रुग्णांचे रक्त नमुने तपासले असता त्यापैकी १४ रुग्णांना डेंग्यूची बाधा झाल्याचे दिसून आले. सोलापूर शहरासह माळशिरस, बार्शी, पंढरपूर आदी भागांत डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला खरा; परंतु त्यावर वेळीच उपाययोजना केल्याने पुढील अनर्थ टळल्याचा दावा जिल्हा हिवताप निर्मूलन अधिकारी शुभांगी अढळराव करतात.

डासपुराण
डासांमुळे डेंग्यूसारख्या गंभीर आजाराची लागण होऊन प्रसंगी मृत्यूही ओढवतो. पण हाच डास कधी भूषण म्हणून पुढे येतो तर कधी दूषण म्हणून सामोरा येतो. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांनी इंडिया अगेन्स्ट करप्शन्सच्या नेत्यांना डास चावल्याची उपमा दिली होती. त्याला प्रत्युत्तर देताना अरविंद केजरीवाल यांनी मी डेंग्यूचा डास आहे. काँग्रेस-भाजपला दंश करेन आणि नंतर त्यांना समस्यांना सामोरे जावे लागेल, अशी मार्मिक टिप्पणी करीत डासांशी वेगळीच जवळीक साधली. तर प्रख्यात अभिनेता नाना पाटेकर यांचा ‘साला एक मच्छर..’ हा गाजलेला संवाद माणूस डासांपुढे कसा कमजोर आहे, हेच स्पष्ट करतो.

सोलापूर जिल्हा परिषद व राज्य शासनाची हिवताप निर्मूलन यंत्रणा यांच्यात समन्वय साधून कीटकजन्य साथीच्या रोगांवर नियंत्रण घालण्याचे प्रयत्न होतात, परंतु त्यासाठी लागणारे मनुष्यबळ अपुरे आहे. हिवताप निर्मूलन विभागाकडे आरोग्य सेवकांची १७७ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात केवळ १०९ एवढीच पदे उपलब्ध आहेत. ६८ पदे अद्यापि रिक्त आहेत. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेचीही जवळपास हीच स्थिती आहे. गेल्या २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबरदरम्यान कीटक साथरोग प्रतिबंधक पंधरवडा राबविण्यात आला. डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी घरोघरी जाऊन पाणीसाठय़ांचे सर्वेक्षण करणे, संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेणे, धूर फवारणी करणे आदी कामे केली जातात. धूर फवारणी पारंपरिक पद्धतीने सार्वजनिक रस्त्यांवरच होते. वास्तविक पाहता घरोघरी धूर फवारणी होणे अपेक्षित आहे. अशी धूर फवारणी झाली तरच चांगला परिणाम साधला जाऊ शकतो. नागरिकांतही याबाबत कमालीची अनास्था दिसून येते. विषेशत: पाण्याचे साठे आठवडय़ातून एकदा तरी कोरडे करून ठेवण्याबाबत जागरूकता दाखविणे आवश्यक असताना त्याकडे साफ दुर्लक्ष केले जाते. लोकजागृती होण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणेचे प्रयत्न शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच होत असल्याने अखेर त्यात मर्यादा येतात. डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या डासांवर नियंत्रण मिळविण्यासाठी व्यापक प्रमाणात जाणीव जागृती होणे ही काळाची गरज असून त्यासाठी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्व स्तरांतून प्रयत्न होणे आवश्यक वाटते.
एकीकडे शासकीय यंत्रणेला डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी मर्यादा पडत असताना दुसरीकडे खासगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना डेंग्यू रोगाचे निदान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खासगी डॉक्टर आणि शासकीय यंत्रणा यांच्यात अधूनमधून वाद होतात. खासगी डॉक्टर मंडळी डेंग्यूची भीती दाखवून रुग्णांच्या नातेवाईकांची असह्य़ कोंडी करतात आणि स्वत:चा खिसा भरतात, अशा तक्रारीही पुढे येत आहेत.

चुका नागरिकांच्या, बोट सरकारकडे
दयानंद लिपारे, कोल्हापूर<br />गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्य़ात हिवताप निर्मूलन कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी गेल्या वर्षभरात जिल्ह्य़ात तब्बल २०० जणांना डेंग्यूची लागण झाली. या घातक रोगाने सहा नागरिकांना प्राण गमवावा लागला. शहरी भागांमध्ये महापालिका, नगरपालिका तर ग्रामीण भागांमध्ये जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. जिवावर बेतणारा रोग असतानाही त्याकडे नागरिकच डोळेझाक करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहेत.
प्रशासनाच्या वतीने साथीचे रोग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनांची मालिका राबविली जात असली तरी ते तितकेसे प्रभावी ठरत नसल्याचेही दिसत आहे. पावसाळा सुरू होताच साथीचे रोग डोके वर काढतात. हिवताप, चिकुनगुनिया, हत्तीरोग, डेंग्यू अशा अनेक रोगांनी नागरिकांना पछाडले जाते. त्याच्या वर्षभरातील आकडेवारीकडे नजर टाकली की त्याची तीव्रताही लक्षात यावी. सन २०१३ या एका वर्षांत साथीचे ३००हून अधिक रुग्ण कोल्हापूर जिल्ह्य़ात आढळले. हिवताप-६५, डेंग्यू-१९८, चिकुनगुनिया-४ व हत्तीरोग-३४ असे रोगनिहाय रुग्णांचे वर्गीकरण आहे. सबंध वर्षभरात डेंग्यूने जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज संस्था यांच्यासह सामान्य नागरिकांनाही सळो की पळो करून सोडले होते. डेंग्यूची लागण झाल्याने एका सराफ व्यापाऱ्यासह सहा जणांना जिवाला मुकावे लागले. एडिस एजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे डेंग्यू प्रसारित होतो.
फ्ल्यू सारखाच हा एक गंभीर आजार. जोराचा ताप, डोक्याचा पुढचा भाग दुखणे, स्नायू-सांध्यामध्ये वेदना ही याची प्रमुख लक्षणे होत. शहरी अन् ग्रामीण भागांतही स्वच्छतेचा अभाव ही एक मोठी समस्या बनली आहे. ठिकठिकाणचे कचऱ्याचे ढीग, पाण्याचा साठा, रिकाम्या टायरी-बॅरेलचा हव्यास यामुळे डेंग्यूला निमंत्रण न मिळेल तर नवल. पाण्याच्या टाक्या, भांडी याची स्वच्छता करण्याबाबत प्रशासनाकडून अनेक वेळा जाहीर प्रकटन करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यातूनच डासांची उत्पत्ती वाढीस लागून डेंग्यूसारखे रोग होत राहतात. स्वत: चुका करायच्या आणि दोष मात्र प्रशासनाच्या माथी मारायचा असा प्रकारही सुरू असतो. यातील वास्तव जाणून घेऊन नागरिकांनीही जिवाचे मोल जाणून सावध होणे हीच काळाची गरज आहे.
जिल्हा हिवताप विभागाकडून डेंग्यूसह अन्य रोग होऊ नयेत, यासाठी काळजी घेतली जाते. कोल्हापूर जिल्ह्य़ात सुमारे ३ हजार ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याने डासांवर नियंत्रण ठेवले आहे. शिवाय जिथून मागणी येईल तेथे हवे तितके गप्पी मासे मोफत पुरविण्याची प्रशासनाची तयारी आहे, असे जिल्हा हिवताप अधिकारी डी. एस. गंबरे यांनी सांगितले. छत्रपती प्रमिलाराजे या जिल्हा रुग्णालयात डेंग्यूची रक्ततपासणी मोफत केली जाते. तिथेच ती रुग्णांनी करून घेणे गरजेचे आहे. खासगी रुग्णालयात हजार-पाचशे रुपये खर्च करण्यापेक्षा जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रक्ताची तपासणी केल्यास वेळीच डेंग्यूवर योग्य उपचार होतील.

रक्त विघटनाची यंत्रसामग्री हवी…
सुहास सरदेशमुख, औरंगाबाद
डेंग्यूचा प्रकोप तसा सर्वत्रच. मराठवाडाही त्याला अपवाद नाही. रुग्णाचा आजार वाढला की, त्याला औरंगाबादला पाठविले जाते. रक्तातील प्लेटलेटस् कमी झाल्या की, त्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, यासाठीची कसरत मोठी असते. रक्ताच्या विघटनासाठी आवश्यक असणारी यंत्रणा मराठवाडय़ातील सर्व जिल्ह्यांत नाही. मोठय़ा शहरात काही खासगी व सरकारी दवाखान्यांत ग्रामीण भागांतून आलेले अनेक लोक ताटकळत असतात. जवळच्या मोठय़ा शहरात उपचारासाठी पळापळ करावी लागते. औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात ग्रामीण भागांतून मोठय़ा संख्येने रुग्ण दाखल होतात. गेल्या वर्षभरात डेंग्यूची लक्षणे असणाऱ्या ५९७ रुग्णांचे रक्त नमुने पुणे येथील संस्थेकडे तपासणीस पाठविण्यात आले. त्यापकी ७४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असल्याचे अहवाल होते. या आजाराने गेल्या वर्षभरात दोघांचा मृत्यू झाला. हा साथरोग वाढू नये म्हणून करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि महापालिका प्रशासनाचे प्रयत्न याचा ताळमेळ बसणेच सध्या तरी शक्य नाही. डासांची उत्पत्ती होऊ नये, यासाठी असणारी यंत्रणाच कुपोषित आहेत. दररोज डासांची घनता मोजावी, असेही अपेक्षित आहे. पण कोण करणार अशा उपाययोजना, याचे उत्तर यंत्रणेकडेच नाही. परिणाम डेंग्यूमुळे रग्णाचा मृत्यू असे वृत्त आल्यावर टीका होऊ नये, एवढीच उपाययोजना करण्याएवढीच कारवाई केली जाते. या आजारावर तसे हमखास औषध नाही. परिणामी प्लेटलेटस् कमी होऊ नयेत, यासाठीच डॉक्टर प्रयत्न करतात. साधारणत: २० हजारांपेक्षा कमी प्लेटलेटस् झाल्या तर खूप बारकाईने काळजी घ्यावी लागते. या आजाराची साथ सुरू झाली की, रक्तांचे नमुने पुणे येथील व्हायरॉलॉजी विभागाकडे पाठविणे आणि अहवालाची वाट पाहणे, हे आता दरवर्षीच घडते. हे अहवाल येण्याचे वाट न पाहता केवळ लक्षणांच्या आधारे डेंग्यूचा होणारा औषध उपचार होतो. अहवाल खूप उशिरा मिळतात. सरकारी रुग्णालयापेक्षा खासगी दवाखान्यात जाण्याची मानसिकता असल्याने अलीकडे या अजारावर उपचार करून घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. रक्त विघटनाची यंत्रसामग्री जिल्हा आणि तालुका स्तरावर उपलब्ध करून दिल्याशिवाय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होणार नाही.

डेंग्यूवर आळा घालण्यास आरोग्य यंत्रणा कुचकामी
सुनील तिजारे, नागपूर
विदर्भात गेल्या सहा महिन्यांत ७६५ नागरिकांना डेंग्यूची लागण झाली असून त्यात योग्य उपचाराअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डेंग्यूवर आळा घालण्यास राज्य शासनाचा आरोग्य विभाग अयशस्वी ठरत असल्याचेही यानिमित्ताने दिसून येत आहे.
गेल्या सहा महिन्यांत विदर्भात ३,१०१ नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यामध्ये ७६५ नागरिकांना डेंग्यूची लागण झाल्याचे आरोग्य खात्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. डेंग्यू हा एडीस नावाचा डास चावल्याने होतो. डेंग्यूचे साधा डेंग्यू, रक्तस्रावी ताप आणि शॉक सिंड्रोम असे तीन प्रकार आहेत. साध्या डेंग्यूवर शासनाचा आरोग्य विभाग यशस्वी ठरत असला तरी अन्य दोन प्रकारांतील डेंग्यूवर उपचार करण्यास अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. शॉक सिंड्रोम या प्रकारातील डेंग्यूच्या रुग्णांना आयसीयूमध्येच उपचार करावे लागतात. तिसऱ्या प्रकारातील डेंग्यूच्या रुग्णाच्या शरीरातील पाणी कमी होते. हातपाय थंड पडतात. जीव घाबरतो. या रुग्णांना वेळेवर व योग्य उपचार झाले नाहीत तर तो जीवघेणा ठरतो. विशेषत: ग्रामीण भागात तिसऱ्या प्रकारातील रुग्णांवर योग्य उपचाराच्या सोयी नाहीत. त्यामुळे योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवत असतो. तेथे अतिदक्षता विभाग असतो. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णास योग्य उपचार मिळतात. जिल्हा रुग्णालयात सर्व सोयी उपलब्ध असल्याने गेल्या एक वर्षांपासून डेंग्यूच्या आजाराने मृत्यू होण्याच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा आरोग्य उपसंचालक डॉ. प्रदीप दास यांनी केला.
ग्रामीण भागात डेंग्यूचे आजार होण्याचे व मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. ग्रामीणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णांवर लक्षणे पाहून प्राथमिक उपचार केले जातात. पहिल्या प्रकारातील रुग्ण लवकर बरा होतो, परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रकारांतील रुग्णांवर येथे उपचार होत नाहीत. शेवटच्या क्षणी मात्र अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयात पाठविले जाते. अशा वेळी जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर आणि खासगी डॉक्टरचे उपचारही अयशस्वी ठरतात. त्यामुळे लक्षणे दिसताच योग्य उपचार करणे आवश्यक असते, असे मत शहरातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर यांनी व्यक्त केले. गेल्या एक महिन्यात माझ्याकडे डेंग्यूचे ७ रुग्ण आलेत. या सर्व रुग्णांवर योग्य उपचार झाल्याने ते बरे होऊन घरी गेल्याची माहितीही त्यांनी दिली. गेल्या दोन महिन्यांत डेंग्यूचे ८ अत्यवस्थ रुग्ण आले होते. हे सर्व ग्रामीण भागातील होते. त्यांच्यावर योग्य उपचार झाल्याने त्यांचे प्राण वाचवण्यास आपणाला यश आले, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश पाटील यांनी सांगितले. शासनाच्या यंत्रणेबाबत काहीही बोलण्यास नकार देताना पालिकेच्या आरोग्य खात्याचे अधिकारी मात्र आपल्याकडून आकडेवारी नेत असल्याचे त्यांनी सांगितले.
डेंग्यूच्या आजारावर वेळेवर योग्य उपचार न होणे, हे मृत्यूचे प्रमुख कारण आहे. तसेच शासनाचा आरोग्य विभाग जाहिरातबाजीशिवाय योग्य उपचार देण्यास अयशस्वी ठरतो, हे स्पष्टपणे दिसून येते. शासन मात्र खासगी डॉक्टरांकडील डेंग्यूच्या आजाराच्या नोंदी घेऊन उपचार केल्याची शेखी मिरवत आहे, अशी प्रतिक्रिया एका डॉक्टरने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली.

Story img Loader