* माझ्या बहिणीच्या लग्नासाठी मला लेहेंगा साडी घालायची आहे. पण त्याचा रंग, डिझाइन याबद्दल मला काही शंका आहेत.
– अपूर्वा मते, २५
मागच्या दोन वर्षी लग्नाच्या सीझनमध्ये अनारकली ड्रेसेसना प्रचंड मागणी होती. पण यंदा त्यावर पर्याय शोधले जाऊ लागले आहेत. त्यातीलच एक पर्याय म्हणजे लेहेंगा साडी. खर तरं लेहेंगा हे पूर्वीपासून मारवाडी, गुजराती लग्नांमध्ये घातले जायचे. लेहेंगा साडी हे त्याचेच पुढचे रूप. अपूर्वा, तू पहिल्यांदाच लेहेंगा साडी घालणार आहेस, त्यामुळे खरेदी करताना काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे. सर्वात आधी तुला चोळीची लांबी किती हवी ते बघ. कित्येक जणी आखूड लांबीच्या चोली घालायला थोडय़ा अवघडतात. चोलीचा रंग शक्यतो असा निवड की, नंतर ती एखाद् दुसऱ्या साडीवर ब्लाऊज म्हणूनसुद्धा वापरता येऊ शकेल. जेणेकरून ती वापरात राहील. लेहेंग्याची बॉर्डर निवडताना तुझ्या उंचीनुसार निवड. कारण उंची कमी असेल तर, मोठय़ा बॉर्डरच्या लेहेंग्यामुळे उंची अजूनच कमी दिसते. उंच मुलींना मोठय़ा बॉर्डर्स छान दिसतात. सध्या मल्टी कलर लेहेंगा साडीचा ट्रेंड आहे. कित्येकदा या साडय़ा सेमी-स्टिच्ड म्हणजे अध्र्या शिवलेल्या असतात. अशा वेळी पूर्ण शिवून झाल्यावर त्यांचा लुक कसा दिसेल हे तपासून घ्या. कित्येकदा दुकानात ट्रायलपेक्षा शिवलेल्या साडीचा लुक वेगळा असतो.
* लग्नासाठी किंवा सणसमारंभासाठी नेहमीच फॅन्सी पर्स घ्याव्या लागतात. पण या पर्स एरवी पडून राहतात. त्यांना कोणते पर्याय आहेत?
– प्रियांका रास्ते, २२
घरातल्या अशा कार्यक्रमांना आपण मस्त पारंपरिक लुक मिरवणार असतो. पण तिथे आपली नेहमीची पर्स सूट होत नाही. मग अशा वेळी खडय़ांच्या, एम्ब्रॉयडरी असलेल्या पर्स विकत घेतो. पण या पर्स एरवी
आपल्याला कुठेच वापरता येत नाहीत. कारण यावरचं खडय़ांचं काम जास्तच भडक वाटण्याची भीती असते. त्यामुळे अशाच पर्स घ्यायच्या असतील, तर कमी एम्ब्रॉयडरीच्या पर्स निवड. जेणेकरून त्या छोटय़ा पार्टीजना सहज वापरता येतील. त्याशिवाय सध्या मेटलच्या क्लच बाजारात पाहायला मिळतात. त्या पारंपरिक आणि वेस्टर्न लुकवरसुद्धा सहज जुळून येतात. वेल्व्हेटच्या स्लिंज पर्स यासुद्धा अशा कार्यक्रमांना वापरता येऊ शकतात. स्टोन्स आणि मिरर असलेल्या कल्चनासुद्धा सध्या प्रचंड मागणी आहे. शिवाय कलमकारी, मीनाकारी केलेल्या स्लिंज पर्सपण पाहायला मिळतात. नेहमीपेक्षा वेगळा लुक हवा असेल, तर या पर्स वापरायला हरकत नाही.
आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.