नवीन मोबाइल फोन विकत घेताना आपण मोबाइलच्या विविध फिचर्सबरोबरच त्याच्या बॅटरीची क्षमता किती आहे, हे प्राधान्याने जाणून घेतो. मोबाइलचा बॅटरी बॅकअप किती, किती वेळ टॉकटाईम आहे याकडे हल्ली ग्राहक लक्ष देतात. अनेकदा नवीन मोबाइलची बॅटरी चांगल्या क्षमतेची असूनही तिची कामगिरी समाधानकारक दिसत नाही. चार्जिग लवकर संपणे, चार्ज होण्यासाठी वेळ लागणे यासारख्या अनेक अडचणी युजर्सना येतात. मोबाइलच्या बॅटरीची योग्य काळजी घेतली आणि काही सोप्या टिप्स फॉलो केल्या, तर या अडचणी येणार नाहीत. अशाच काही टिप्स..
ऑनलाईन सेशन्स, मिटींग्ज, वर्क फ्रॉम होम यामध्ये सध्या मोबाइलचा वापर मोठय़ा प्रमाणावर होतो. सहाजिकच यामुळे सतत आपल्याला मोबाइलची बॅटरी चार्ज करावी लागते. त्यासाठी अनेक जण आता पोर्टेबल चार्जर खिशात घेऊन फिरतात, पण आपण स्मार्टफोनची बॅटरी बराच काळ पुरावी, म्हणून विविध पर्याय स्वीकारू शकतो. त्यामुळे बॅटरी दीर्घकाळ टिकतेच शिवाय मोबाइलही उत्तम स्थितीत राहतो.
सध्याच्या घडीला मार्केटमध्ये ४५००- ७००० एमएएच बॅटरी असणारे मोबाइल उपलब्ध आहेत. बॅटरीची क्षमता जास्त असल्यास फोनचे वजन जास्त असते. एखाद्या स्मार्टफोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज केल्यानंतर तो फोन किती काळ व्यवस्थित काम करू शकतो, याचे उत्तर प्रत्येक युजर आणि प्रत्येक स्मार्टफोननुसार वेगवेगळे असू शकते, मात्र स्मार्टफोनचा सरासरी वापर लक्षात घेता, दिवसातून दोनदा तरी बॅटरी चार्ज करण्याची वेळ आपल्यावर ओढवते. जुन्या मोबाइल फोनमध्ये फिचर्स मर्यादित असल्याने आणि त्यांचा वापर मोजका असल्याने त्यांची बॅटरी बराच काळाने चार्ज करावी लागत असे. नोकिया कंपनीचे जुने मोबाइल एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तीन ते चार दिवसही चालायचे, पण विविध अॅप्स आणि समाजमाध्यमांमुळे स्मार्टफोनचा वापर आता वाढत आहे, त्यामुळे बॅटरी लवकर संपण्याचा अनुभव प्रत्येकालाच येतो. अनेक जण यावर उपाय म्हणून पॉवर बँकसुद्धा वापरतात त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी असणारे चार्जर तसेच चार्जिग स्टेशन्सचा वापर करूनसुद्धा काहीजण चार्जिग करतात, मात्र बऱ्याचदा बॅटरी वाचवण्यासाठी फोनमध्ये असणारे पर्याय अनेकांना लक्षात येत नाहीत.
हे आहेत पर्याय :
जीपीएस ठेवा बंद
मोबाइलमधील बॅटरीचा सर्वाधिक वापर ‘जीपीएस’ यंत्रणेकडून केला जातो. लोकेशन सव्र्हिस तसेच त्याबद्दलची अॅप्स यामुळे मोबाइलची बॅटरी लवकर संपण्याची शक्यता असते. जीपीएस यंत्रणा तुम्ही जिथे आहात, ते ठिकाण दर्शवते. त्यामुळे अनेक मोबाइलमध्ये जीपीएस नेहमीच ऑन असतं. पण तुम्हाला या सुविधा वापरायच्या नसतील तेव्हा, जीपीएस बंद करा. जीपीएसचं आयकॉन अनेकदा स्मार्टफोनच्या वरच्या भागात असतं. तिथे क्लिक करून किंवा फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन जीपीएस बंद करता येतं. त्यामुळे मोबाइलची बॅटरी किमान दोन-तीन तास जास्त कार्यरत राहू शकते. ‘जीपीएस’ची गरज असेल, तेव्हा ते पुन्हा सुरू करता येते.
मोबाइल डेटाकडे द्या लक्ष
इंटरनेटमुळेही बॅटरी मोठय़ा प्रमाणात वापरली जाते. त्यातही मोबाइल कंपनीच्या डेटावापरामुळे बॅटरी लवकर संपते. याचं प्रमुख कारण म्हणजे आजही आपल्या देशात अनेक भागांमध्ये नेटवर्क चांगल्या दर्जाचं नसतं. त्यामुळे सिग्नल पकडण्यासाठी स्मार्टफोनला जास्त शक्ती खर्च करावी लागते. साहजिकच त्यासाठी बॅटरीचा अधिक वापर होतो व ती लवकर संपते. त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा वायफायचा वापर करा. घरी किंवा कार्यालयात असताना वायफाय वापरण्यास प्राधान्य द्या.
स्क्रीन ब्राइटनेसकडे ठेवा लक्ष
स्क्रीन ‘ब्राइटनेस’ जितका जास्त तितक्या जास्त वेगाने बॅटरी संपते. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्मार्टफोनचा ब्राइटनेस नेहमी ‘ऑटो मोड’वरच ठेवा. या मोडमध्ये सभोवतालच्या प्रकाशानुसार स्मार्टफोनचा ब्राईटनेस आपोआप बदलतो. त्यामुळे डोळ्यांना त्रासही होत नाही आणि बॅटरीही योग्यरीत्या वापरली जाते. काही फोनमध्ये आउटडोअर, नाईट मोड, डार्क रूम असेही पर्याय उपलब्ध आहेत. त्याचा वापर करून ब्राईटनेस योग्य पद्धतीने सेट करता येतो.
नोटिफिकेशन्सवर नजर
आजकाल प्रत्येक स्मार्टफोनमध्ये फेसबुक तसेच इतर समाजमाध्यमांची अॅप असतात. बऱ्याचवेळा लॉग इन केल्यावर वापर नसला तरीही ही अॅप्स सुरूच असतात. त्यांची नोटिफिकेशन्सही येत असतात. बॅकग्राऊंडमध्ये सतत प्रोसेस सुरू राहते आणि त्यासाठी बॅटरीचा वापर होत राहतो. अर्थात केवळ यासाठी समाजमाध्यमे वापरणे कोणी बंद करू शकत नाही. पण त्यांच्या वापरावर मर्यादा नक्की ठेवता येते. यासाठी ‘नोटिफिकेशन’चा पर्याय बंद ठेवा. ‘फेसबुक लाइट’हे अॅपदेखील वापरू शकता. हे अॅप फेसबुकसारखंच असतं. पण ते डेटा आणि बॅटरी कमी वापरतं.
इतर अॅप्सचा वापर
अनेकदा आपण केवळ हौस म्हणून किंवा क्षणिक गरज म्हणून एखादं अॅप इन्स्टॉल करतो आणि मग ते विसरूनही जातो. पण अनेक अॅप चालू नसतानाही पाश्र्वभूमीवर काम करत असतात. असं अॅप आपल्या नकळत फोनची बॅटरी वापरत असतं. त्यामुळे आपल्याला कळतही नाही की आपल्या फोनची बॅटरी इतक्या लगेच कशी संपते. तुम्हाला अशा प्रकारची समस्या जाणवत असेल तर सर्वप्रथम तुमच्या मोबाइलमधील अनावश्यक आणि जास्त बॅटरी वापरणारी अॅप काढून टाका. कोणते अॅप जास्त बॅटरी वापरत आहे, हे सहज कळू शकते. त्यासाठी मोबाइलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन बॅटरी या पर्यायावर क्लिक करा. तुम्हाला प्रत्येक अॅपनुसार बॅटरीचा वापर किती ते समजू शकेल.
सार्वजनिक ठिकाणी चार्जिग धोक्याचे
स्मार्टफोनला सार्वजनिक ठिकाणी चार्ज करताना सावधानता न बाळगल्यास महत्त्वाचा डेटा चोरीस जाऊ शकतो. ‘ज्यूस जॅकिंग’ने ही डेटा चोरी होण्याचा धोका सध्या वाढला आहे. आजच्या घडीला अनेकजण मोबाइलची चार्जिग केबल सोबत ठेवणे विसरतात. त्यामुळे ते बस, रेल्वेस्टेशन, विमानतळ अशा आणि इतर अनेक सार्वजनिक जागांवरील चार्जिग पॉइंटवर आपला मोबाइल अगदी सहज चार्ज करतात. पण, त्यानंतर अनेकांचे मोबाइल स्लो किंवा हँग होतात. काही वेळा फोन सुरूच होत नाही. बॅटरी वारंवार डाऊन होते. हे सर्व प्रकार ‘ज्यूस जॅकिंग’मुळे झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रवासात स्वतचा चार्जर बाळगला पाहिजे.
या गोष्टी लक्षात ठेवा
- मोबाइल कधीही रात्रभर चार्जिगला लावून ठेवू नका. अनेकजण मोबाइल चार्जिगला लावून झोपतात. त्यामुळे मोबाइल गरम होतो आणि सातत्याने असे होत राहिल्यास त्याचा परिणाम मोबाइलवर होण्याची शक्यता असते.
- मोबाइल नेहमी त्या-त्या कंपनीच्याच चार्जरने चार्ज करा. अन्य चार्जर वापरल्यामुळे फोन हळूहळू चार्ज होतोच, शिवाय बॅटरीला धोका निर्माण होतो. प्रत्येक चार्जरला विशिष्ट फिचर्स असतात, त्याचबरोबर त्याची क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे स्वत:च्या चार्जरचाच वापर केला पाहिजे.
- मोबाइल चार्ज करता करता फोनवर अजिबात बोलू नका. स्पीकर फोन ऑन करूनही बोलू नका. शिवाय चार्जिग करताना मोबाइलवर व्हिडीओ बघणे किंवा गेम खेळणेही टाळा. यामुळे चार्जिगला वेळ लागतो. काहीवेळा फोन गरम होऊ शकतो.
- चार्जिगला लावल्यानंतर मोबाइल गरम होत असेल तर संबंधित मोबाइल कंपनीच्या सव्र्हिस सेंटरमध्ये जाऊन तपासून घ्या. त्यामुळे बॅटरीला नुकसान होऊ शकते.
- मोबाइल संपूर्ण चार्ज झाल्यानंतर त्याचा चार्जर काढून ठेवा. मोबाइल ८०-९० टक्के चार्ज आहे म्हणून तो दिवसभर चार्जिगलाच लावून ठेवू नका.
- बॅटरी किमान २० दिवसांतून एकदा पूर्णत: डिस्चार्ज होऊ द्या. त्यानंतर पूर्ण चार्ज करा.
- आवश्यकता नसेल तेव्हा (झोपताना, मीटिंगमध्ये) मोबाइल स्वीच ऑफ करून ठेवा. यामुळे मोबाइलची बॅटरी वाया जाणार नाही.
- व्हायब्रेशन मोडवर बॅटरी वेगाने संपते. त्यामुळे मोबाइल व्हायब्रेशनऐवजी कमी रिंगटोन मोडवर ठेवा.
- ब्लू टूथ, जीपीएस, वायफाय विनाकारण ऑन ठेवू नका. त्यामुळे मोबाइल बॅटरी तातडीने संपते.
- अॅनिमेशन्स थीम किंवा लाईव्ह वॉलपेपर स्क्रीनवर ठेवू नका, त्यामुळे बॅटरी लवकर कमी होऊ शकते.
– response.lokprabha@expressindia.com