– सध्या सेलेब्रिटीज फ्रिन्जेस  हेअरस्टाइल्स मिरवताना दिसताहेत. फ्रिन्जेस देताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
– रेखा

–    फ्रिन्जेस या सिझनमध्ये हिट आहेत. वाऱ्याच्या झुळूक आल्यावर प्रेयसीच्या कपाळावर येणारी केसांची बट ही प्रत्येक काळातील प्रियकराला घायाळ करत आली आहे. सध्या सेलेब्रिटीच काय कॉलेज तरुणीसुद्धा फ्रिन्जेस मिरवताना दिसतात. पण असं असलं तरी आपल्या चेहऱ्याला सूट होतील, असे फ्रिन्जेस निवडणे खरंच गरजेचं असतं. त्यामुळे रेखा तुझी काळजी अगदी बरोबर आहे. फ्रिन्जेस केल्यावर आपले कपाळ लपले जाते. त्यामुळे कपाळाचा आकार आणि फ्रिन्जेस यांच्यात ताळमेळ असणे गरजेचे आहे. जर तुझे कपाळ मोठे असेल, तर लांब स्ट्रेट फ्रिन्जेस ठेवायला काहीच हरकत नाही. अर्थात, या फ्रिन्जेस भुवयांच्या वर असल्या पाहिजेत याची काळजी घे. कपाळ लहान असल्यास साइड फ्रिन्जेस ठेवणं उत्तम. शक्यतो मुली उजव्या बाजूला फ्रिन्जेस ठेवणं पसंत करतात, पण तुझा भांग ज्या बाजूचा असेल त्या बाजूला फ्रिन्जेस घे. कित्येकदा आपण हौसेने फ्रिन्जेस करून घेतो, पण रोजच्या धावपळीत दिवस संपेपर्यंत केस कानामागे जातात आणि त्यांना कर्ल्स येतात. अशा वेळी फ्रिन्जेस लांब असले, तर उत्तम. कारण केसांना कर्ल्स आले तरी लुक बिघडत नाही.
  
– बाजारात मेन्स शॉर्ट्स पाहायला मिळताहेत. त्या सोबत स्टायलिंग कसं करावं? त्या कुठे वापरता येऊ  शकतात?
– कपिल
  
– कपिल, शॉर्ट्सनी सध्या मेन्स डेनिम्सची जागा घेतली आहे. नेहमीच्या डेनिम्स घालण्यापेक्षा शॉर्ट्स घालून मिरवणे, सध्या कूल समजलं जातं. त्यामुळे ज्याप्रमाणे डेनिम्सवर हवं ते आणि हवं त्याप्रकारे घालून वेगवेगळं स्टायलिंग करता येतं, तसंच स्वातंत्र मुलांना शॉर्ट्ससोबत मिळतं. त्यामुळे प्रिंटेड टी-शर्ट्स, चेक्स शर्ट्स, स्ट्राइप टी-शर्ट, गंजीस सगळ्यासोबत शॉर्ट्स छान दिसतात. आता प्रश्न या कुठे घालाव्यात. तर ज्याप्रमाणे डेनिम्स घालण्यासाठी काळ आणि वेळ याचे बंधन नसते, तसंच शॉर्ट्सच्या बाबतीतपण असतं. त्यामुळे कॉलेजपासून ते पार्टीपर्यंत कुठेही या घालता येतात. तुला डेनिम्स किंवा ट्राऊझरमध्ये जे रंग घालायला आवडतात ते शॉर्ट्समध्येसुद्धा बिनदिक्कत घालू शकतोस. शॉर्ट्सवर जॅकेट्स कूल दिसतात. ओव्हरड्रेसिंगसुद्धा छान दिसतं. पण हे सगळं करताना तुमचा आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. कारण कित्येकांना शॉर्ट्स घालणं अवघडल्यासारखं होतं. त्यामुळे अजिबात अवघडून न जाता फुल आत्मविश्वासाने शॉर्ट्स घाल, काहीच हरकत नाही.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात
‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.

 

मृणाल भगत

Story img Loader