गेल्या वर्षी ‘बर्डमॅन’ चित्रपटाद्वारे ऑस्कर गाजविणाऱ्या आलेहान्द्रो इनारितू याचा यंदाचा ‘द रेव्हनण्ट’ चित्रपट सर्वार्थाने अनुभवण्यासाठी आपल्याकडे शाळेत ‘अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धा’च्या इतिहासात सांगितली गेलेली पाश्र्वभूमी त्रोटक का होईना लक्षात असणे महत्त्वाचे आहे. तरच सुडापलीकडचे त्याचे रूप लक्षात येऊ शकेल..

जग कितीही ‘फ्लॅट’ झाले असले तरी अमेरिकेतर जगात मोडणाऱ्या आपल्या सगळ्यांची सर्वोत्तम अमेरिकी फिल्म पूर्णपणे आकळून घेताना पहिली बोंब होते ती त्यातील भौगोलिक, सांस्कृतिक संदर्भाच्या तपशिलांशी ओळख नसल्याने. सिनेमा पाहताना  तपशीलांचा फार मोठा अभ्यास करायची गरज नसते, मात्र आपण शाळेत जगाचा इतिहास-भूगोल शिकताना जे ज्ञान घेतो, तेवढे मूलभूत ज्ञान सोबत असले तरी त्याची मदतच होत राहते. अन्यथा यादवी युद्धातून अमेरिकेला सावरून गुलामगिरी नष्ट करणाऱ्या अब्राहम लिंकन या द्रष्टय़ा नेत्यावर बेतलेल्या ‘िलकन’सारख्या महाचरित्रपटाचे आकलन अशक्य असते. तसंच कृष्णवर्णीयांवरील अत्याचार दाखविणारा ‘ ट्वेल्व्ह इयर्स ए स्लेव्ह’सारखा चित्रपट कंटाळवाणा वाटू शकतो. ‘ऑस्कर सिनेमा’ म्हणून बोटे मोडत आपल्याकडील सर्वसामान्य प्रेक्षक ज्याला कलात्मकतेच्या गटात टाकत असतो तोच चित्रपट अमेरिकेत व्यावसायिक म्हणून तिकीटबारीवरील आधीच्या  विक्रमांची बंदिस्त दारे खिळखिळी करीत असतो. गेल्या वर्षी ‘बर्डमॅन’ चित्रपटाद्वारे ऑस्कर गाजविणाऱ्या आलेहान्द्रो इनारितू याचा यंदाचा ‘रेव्हनण्ट’ हा चित्रपट  सर्वार्थाने अनुभवण्यासाठी  आपल्याकडे शाळेत ‘अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धा’च्या इतिहासात सांगितली गेलेली पाश्र्वभूमी त्रोटक लक्षात असणे महत्त्वाचे आहे. १८२३ साली घडणारा हा चित्रपट रक्ताळलेले मानवी आदीमपण दाखवितो आणि निसर्गाने जिवावर बेतलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सूड घेण्यासाठी निघालेल्या नायकाची कहाणी सांगतो. पण त्यापलीकडे अमेरिकेतील मूळ रहिवासी असलेल्या रेड इंडियन्सवर वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रक्रियेतील संघर्षांची एक बाजूही कार्यरत ठेवतो. अन् त्यातून घडलेल्या आजच्या अमेरिकी नागरिकाच्या एका पूर्वजाची गाथाही मांडू पाहतो.

Marathi Serial World First AI Experiment
मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग
Biographies The film Srikanth tells the story of the struggle of a stubborn young man
श्रीकांत : एका जिद्दीची हृदयस्पर्शी कथा
Sunny deol border 2 release date
‘गदर २’च्या यशानंतर सनी देओलच्या २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा सिक्वेल येणार, प्रदर्शनाची तारीखही ठरली!
Nach Ga Ghuma Movie poster
नाच गं घुमा! मोलकरणीचंच नाही माणुसकीचं ‘मोल’ सांगणारा चित्रपट
swargandharva sudhir phadke movie review by loksatta reshma raikwar
Swargandharva Sudhir Phadke Movie Review : तोच चंद्रमा नभात…
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान
Director Bhaurao Karhade announced his new film Fakira
मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत

टायटॅनिकच्या बरंच आधीपासून ‘दीस बॉय’स लाईफ’, ‘व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’पर्यंत अन् ‘टायटॅनिक’नंतर ‘द बिच’पासून ‘वूल्फ ऑफ वॉल स्ट्रीट’पर्यंत अभिनयाची चढती अभिनय कारकीर्द तयार करूनही ऑस्करपासून वंचित राहिलेल्या लिओनाडरे डी कॅपरिओचे अस्तित्व  किंवा ‘अ‍ॅमेरॉस पेरोस’नंतर दु:ख चित्रत्रयी पूर्ण करीत ‘बर्डमॅन’द्वारे ऑस्करकक्षेत पोहोचलेला इनारितू याचे दिग्दर्शन या चित्रपटाकडे प्रेक्षकाला ओढण्यास पुरेसे आहे. पण एवढय़ाच चित्रप्रेमी उत्साहावर  विरजण टाकणारी पहिली गोष्ट दिसेल ती म्हणजे म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याही चित्रपटांमध्ये नसेल इतका ओंगळवाण्या अवतारातील लिओनाडरे डी कॅपरिओ आणि आजवर कुठल्याही प्रकारचा महाकाळपट न उलगडलेल्या या दिग्दर्शकाचा त्या प्रांतातील सहज वावर.

अमेरिकी स्वातंत्र्ययुद्धापूर्वी बरीच दशके आधी वसाहतीतून जनावरांच्या तलम कातडीच्या शोधार्थ दूरवर जंगलात भटकणाऱ्या ह्य़ू ग्लास (लिओनाडरे) याच्या सुसंस्कृत अमेरिकी टोळीवर (म्हणजेच बंदूक वगैरेसारखी शस्त्रे दिमतीला असलेल्या) रेड इंडियन लोकांकडून होणाऱ्या भीषण हल्ल्याने या चित्रपटाला सुरुवात झाली आहे. बर्फाळ प्रदेश, प्रचंड मोठय़ा धुक्यातील रानटी आणि सुसंस्कृत यांच्या संघर्षांत धनुष्य-बाण घेऊन आलेले रेड इंडियन्स लोक वरचढ ठरतात आणि ह्य़ू ग्लास याच्या टोळीला पोबारा करावा लागतो. िहस्र रेड इंडियन लोक  आणि निसर्ग या दोन्हींशी लढताना त्यांच्यासमोर आणखी एक नवी अडचण येते, ती म्हणजे अस्वलाच्या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या ह्य़ू ग्लास याला सांभाळण्याची. बर्फाळ प्रवासात मरणासन्न अवस्थेला पोहोचलेल्या ग्लास याला सोबत नेणे सर्वाना अवघड व्हायला लागते. वेदनांनी अगतिक झालेल्या ग्लासला मारून टाकावे की नाही, यावर वाद होतो. शेवटी ग्लासच्या तरुण मुलासह इतर दोन सदस्य ग्लासच्या सेवेत थांबून इतरांनी पुढे जायचे यावर एकमत होते. मात्र या सदस्यांत नाखुषीने थांबलेला जॉन फित्झगेराल्ड (टॉम हार्डी) दगाबाजी करीत ग्लासच्या मुलाला ठार करतो आणि बरे होण्याची शक्यता शून्य असलेल्या ग्लासला मरण्यासाठी बर्फाळ जंगलात सोडून देतो. अन्न-पाण्याची अनुपलब्धता आणि मदतही मिळण्याची शक्यता नसलेल्या भागात मुलाच्या मृत्यूच्या दु:खाचा आणि फसविणाऱ्या सहकाऱ्याचा सूड घेण्यासाठी मग ह्य़ू ग्लास जगण्यासाठीच्या सर्वच मूलभूत मानवी शक्यतांचा वापर करतो. मरणासन्न अवस्थेला मागे टाकत प्रतिकूल निसर्गाला हरविण्यासाठी तयार होतो, ही झाली चित्रपटाची ढोबळ गोष्ट.

ह्य़ू ग्लास या लढवय्या व्यक्तिमत्त्वाची सत्यघटना अमेरिकी इतिहासातील लोकप्रिय घटक बनून विविध रूपांनी विस्तारली गेली. त्यावर काही दशकांपूर्वी ‘मॅन इन द वाईल्डरनेस’ नावाचा एक सिनेमाही आला होता. गेल्या दशकात या घटनेवर मायकेल पुंका या लेखकाची ‘द रेव्हनण्ट’ ही कादंबरी आली. त्या कादंबरीतील निसर्गाच्या रौद्रसुंदर रूपाची वर्णनं आणि ग्लास याच्या शौर्याची काल्पनिक पाश्र्वभूमी इनारितू याने आपल्या चित्रपटासाठी वापरली आहे.

लांबलचक चालणाऱ्या या चित्रपटात गोष्ट सांगण्यासाठी दिग्दर्शकाने मायकल पुंका याच्या कथेचे तीन टप्पे केले आहेत. पहिला टप्पा ग्लासच्या करारी आणि लढाऊ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवितो. यात त्याच्या भूतकाळातील अनेक संदर्भाना त्याच्या फ्लॅशबॅकमध्ये दाखवतो. त्यात रेड इंडियन्सचे टोळीयुद्ध, त्याच्या रेड इंडियन पत्नीची फ्रेंच वसाहतवाद्यांनी केलेली हत्या आदी अनेक बाबी त्याला योद्धा बनविण्यात कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट होते.

दुसऱ्या टप्प्यात हल्ल्यामुळे त्याचे बदललेले परावलंबित रूप आणि दु:खातिरेकाचे त्याच्यावर एकामागून एक होणारे हल्ले यांचा आहे. यात त्याच्या आठवणींचा पट आणखी मोठय़ा प्रमाणात बदलला आहे. त्याच्यात जीवनेच्छा पेरणारा पत्नीकडून होणारा एकतर्फी संवाद त्याला निसर्गाच्या प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आवश्यक बनला आहे. हा संवाद जराही कृत्रिम वाटत नाही, इतक्या सावधतेने येतो.

तिसरा टप्पा त्याला मृत्युपंथातून बाहेर काढून जगण्याच्या कलेत तरबेज करणारा आहे. या तीनही टप्प्यामध्ये कथेतील इतर महत्त्वाच्या घटकांचा म्हणजेच ग्लासशी दगाफटका करणाऱ्या फित्झगेराल्ड याचा मागोवा, रेड इंडियन टोळीच्या प्रमुखाकडून गोऱ्या लोकांनी अपहरण केलेल्या मुलीच्या शोधाचा सूक्ष्म उपकथानकांचाही भाग येत राहतो.

चित्रपटाचे खरे सौंदर्य नैसर्गिक प्रकाशात चित्रीकरणातून आले आहे. अमेरिकेतील नेब्रास्का, मोन्टाना परिसरातील शून्य अंशाखालील प्रदीर्घ जंगलामध्ये मानवी हस्तक्षेप नसलेल्या भागात बर्फाची वादळे आणि सतत बदलणारी निसर्गरूपे यांना कॅमेराने पकडले आहे. क्षणाक्षणाला वेगळे रंग दाखविणारे आकाश, नदी, बर्फाळ जमिनीवरून जाणाऱ्या प्राण्यांच्या झुंडी यांतून जगण्याची वाट शोधणाऱ्या जर्जर ग्लासची कथा पुढे  सरकत गेली आहे.

लिओनाडरे डी कॅपरिओचा ‘द बीच’ ज्यांनी पाहिला असेल, त्यांच्या त्यातील त्याच्या व्हिडीओगेमप्रेमी भूमिकेची थायलंडच्या जंगलामध्ये एकटे पाडल्यानंतर जगण्यासाठी चालणारी विचित्र धडपड कायम लक्षात राहिली असेल. रेव्हनण्ट पाहताना त्या भूमिकेशी वेगळ्या प्रकारे तुलना करता येईल. एकाच कलाकाराची वाढत गेलेली अलौकिक अभिनयश्रीमंती लक्षात येईल. टायटॅनिकनंतरच्या गेल्या दोन दशकांत त्याने हाती आलेल्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण कसदार भूमिका वठविल्या आहेत, अन् तरीही ऑस्करने त्याला प्रत्येक वेळी हुलकावणी दिली आहे. यंदा ऑस्कर नकाराचा शिरस्ता मोडण्याचं चिन्ह ठरावी अशी भूमिका रेव्हनण्टमध्ये वठली आहे. चित्रपटभर त्याच्याकडून अतित्रोटक संवाद आलेले आहेत. त्यातही अर्धे रेड इंडियन टोळ्यांच्या स्थानिक बोलीभाषेतील. त्यामुळे सारीच मदार त्याच्या देहबोलीवर आली आहे. अस्वलाशी लढण्याचा त्याचा प्रदीर्घ काळ चालणारा प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे. पुढे अन्न मिळविण्यासाठी आणि बर्फाच्या वादळातून बचावासाठी ग्लासने निवडलेल्या भीषण अन् आदिम प्रकारांनाही त्याने जिवंत करून सोडले आहे. त्यातही थंडीपासून बचाव करण्यासाठी मेलेल्या घोडय़ाच्या पोटात लपण्याचा प्रकार त्यातला सर्वोच्च ठरावा.

‘रेव्हनण्ट’चे वैशिष्टय़ हे की ग्लासचे मरणासन्न अवस्थेतून ठणठणीत अवस्थेला येणारे टप्पे दिग्दर्शकाने सव्‍‌र्हायव्हल सिनेमांप्रमाणे सकारात्मक संदेश देऊ पाहणाऱ्या गिमिक्स मेलोड्रामा पद्धतीने रचलेले नाही. म्हणजेच ‘लाईफ ऑफ पाय’ किंवा टॉम हँक्सच्या ‘कास्ट अवे’ या चित्रपटात येणारा गिमिक्सयुक्त मेलोड्रामा ही सव्‍‌र्हायव्हल फिल्म असूनही येथे दिसत नाही. सरळसोटपणे यात ग्लासचे स्वबचाव सत्र पार पडते. चित्रपटाची पाश्र्वभूमी वरवर वेस्टर्न सिनेमांसारखी असली तरी त्यात कोरियाई दिग्दर्शक किम-की-डय़ुक याच्या चित्रपटांप्रमाणे अंगावर येणारे संयतनाटय़ आहे. त्यात ग्लासच्या मृत पत्नीचे जगण्याविषयी, प्रेमाविषयी तत्त्वज्ञानाच्या पातळीवर त्याच्याशी चालणारे अल्पसंवादही या प्रसंगांचे सौंदर्य वाढविणारे आहेत.

मात्र हा चित्रपट प्रेक्षकाची सिनेसहिष्णुता तपासणारा नक्कीच आहे. यातील कुठलाही भाग रंजक, आकर्षक करण्याच्या फंदात न पडता दिग्दर्शकाने अकृत्रिमरीत्या ग्लासच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण प्रसंगांची गुंफण केली आहे. बदल्याच्या भावनेने पेटलेल्या सूडपटी नायकांप्रमाणे इथला नायक सरधोपट नाही. शिवाय मृत्युपंथावर असलेल्या ग्लासची स्वप्ने, वास्तव आणि आभास यांतून तयार झालेल्या दृश्यप्रतिमा देखण्या करण्यावरच दिग्दर्शकाने भर दिला आहे.

मूळ रेड इंडियन्स नागरिकांना विस्थापित करून तयार झालेली स्थलांतरितांची अमेरिका, तेथे पुन्हा झालेले ब्रिटिश-फ्रेन्चांचे वसाहतीकरण आणि त्या वसाहतींमध्ये जगताना या नवअमेरिकी नागरिकांना कराव्या लागणाऱ्या कुतरओढीच्या काळात घडलेली ह्य़ू ग्लासची कहाणी इनारितूने ‘द रेव्हनण्ट’मधून सादर केली आहे. अर्थातच आपल्यासाठी या गोष्टीतील सगळेच संदर्भ सावत्र असले, तरी शाळेतल्या इतिहासात शिकलेले अमेरिकी वसाहतीकरणाचे त्रोटक ज्ञान सोबत असणाऱ्या प्रत्येकाला ‘द रेव्हनण्ट’ सूडपटाच्या पलीकडे सिनेमा आकलनाचा भरपूर आनंद देईल. याशिवाय इतरांसाठी त्यातील असाधारण दृश्यनिर्मिती, लिओनाडरे डी कॅपरिओचा डोळ्यात भरणारा एकपात्री अभिनय, यंदाही ऑस्करसाठी आसुसलेले दिग्दर्शन आदी बाबींचे ताट सज्ज आहेच.
पंकज भोसले – response.lokprabha@expressindia.com