अमेरिका हा सगळ्या जगाच्या दृष्टीने प्रगत, विकसित देश. दरवर्षी येणारं चक्रीवादळाचं संकट हा प्रगत देश कसं हाताळतो, त्याची झलक-
फ्लॉरिडा हे अमेरिकेतलं दक्षिण-पूर्वेचं एक राज्य. भारतामध्ये फ्लॉरिडाचं समीकरण जास्त करून मायामी, डिस्ने-वर्ल्ड आणि साऊथ बीच यांच्याबरोबर झालेलं दिसतं. इकडच्या चक्रीवादळांचा (हरिकेन) समावेशही त्यात करायला हरकत नसावी. जून महिना उजाडतो, शाळांची उन्हाळी सुट्टी सुरू होते. बीचवर जाणारे रस्ते गाडय़ांनी गजबजून जातात. रस्त्यांच्या कडांनी लालभडक फुलांनी गुलमोहोर फुललेले असतात, प्रवासाचे बेत आखले जातात, पण हे बेत पार पडतीलच अशी खात्री मात्र फ्लॉरिडावासीयांना नसते. याचं मुख्य कारण म्हणजे १ जूनपासून ३० नोव्हेंबपर्यंत असलेलं हरिकेनच्या मोसमाचं सावट. समरला फ्लॉरिडामध्ये ‘हरिकेन सीझन’ म्हणतात. समरमध्ये सुरू झालेला हा हरिकेनचा मोसम, समर ओलांडून फॉल सुरू झाला तरी रेंगाळत असतो. ३० नोव्हेंबरला आपल्या कडू- किंवा कडू नसलेल्या- आठवणी (हरिकेनच्या आठवणी गोड असूच शकत नाहीत) मागे सोडून हरिकेन सीझन एकदाचा अंतर्धान पावतो.
जूनमध्ये जरी हरिकेन सीझनची सुरुवात होत असली तरी आतापर्यंतचा अनुभव असा की, साधारणपणे ऑगस्टच्या मध्यापासून ते ऑक्टोबरच्या अखेपर्यंत हरिकेनच्या झंझावाती दौऱ्याची शक्यता जास्त असते. अटलांटिक ओशन आणि गल्फ ऑफ मेक्सिकोच्या सान्निध्यामुळे (आणि त्यातल्या कोमट पाण्यामुळे) फ्लॉरिडामध्ये हरिकेनची हजेरी अमेरिकेच्या बाकी राज्यांपेक्षा जास्त लागते. नैसर्गिक आपत्ती असल्याने तिच्या आगमनाबद्दल फक्त अंदाजच करायचे. २००५ साली ऑक्टोबरच्या मध्याला मी नवीन झाडांच्या कुंडय़ांनी माझा मागचा व्हरांडा सजवायला सुरुवात केली. ओळीने मांडलेल्या कुंडय़ा आणि त्यांच्यामधली लवकरच फुलण्याची आशा देणारी रोपं बघून मला मिळणारा आनंद मात्र अगदीच अल्पजीवी ठरला. कारण लगेचच आलेल्या (ऑक्टोबर २४) ‘विल्मा’ (हरिकेन)ने माझ्या कुंडय़ा निर्दयपणे स्विमिंगपूलमध्ये भिरकावून दिल्या होत्या.
एक जूनला इथली वृत्तपत्रं, वेधशाळा, खास माहितीपत्रक काढून सर्व वाचकांना येऊ घातलेल्या हरिकेन सीझनला सामोरं जाण्याची तयारी करण्यासाठी सर्व तऱ्हेची मदत करतात. सुरुवात अर्थातच जेवण-खाण्याची सोय करण्यापासून! विजेचा पुरवठा एक आठवडा खंडित झाला तरी सबंध कुटुंबाची जेवण्याची व्यवस्था व्हायला हवी. तेव्हा दर आठवडय़ाचं वाणसामान थोडं जास्तीचं आणायचं. हवाबंद पदार्थ, पुठ्ठय़ाच्या खोक्यांमधले पदार्थ, कोरडे, बाटल्यांमध्ये टिकणारे पदार्थ आणि पिण्याचं पाणी. नळाचं पाणी एरवी प्यायला ठीक असतं, पण हरिकेनमुळे दूषित होतं. मग पाणी उकळवून प्यायच्या नगरपालिकेच्या सूचना येतात, पण विजेचा पुरवठा नसला तर? माणशी सात गॅलन पाणी ग्रोसरीच्या यादीत सर्वात वर लिहायचं. हरिकेनच्या वेळी लागणारं सामान विक्रीकर न आकारता जून महिन्यात विकलं जातं. विजेचा पुरवठा बंद असल्यावर बार्बेक्यूचा ग्रिल वापरता येतो. त्याकरिता लागणारा गॅसचा छोटा सिलिंडर मात्र आणून ठेवायचा. मग जनरेटरच्या खरेदीबद्दलचा सल्ला. तो किती कपॅसिटीचा असावा, मुख्य म्हणजे तो कुठे ठेवावा, कुठल्या दुकानात जास्त, वेगवेगळ्या किमतीचे आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे जनरेटर्स आहेत ही सर्व माहिती.
तुमच्या घराच्या मागे-पुढे मोठी झाडं असली तर ती छाटणं जरुरी असतं. नगरपालिकेचे वृक्षछाटणीचे नियम पाळावे लागतात. अमेरिकेत पहिलं घर घेतलं तेव्हा कामाचा उत्साह भरपूर होता. बाहेरच्या बाजूला असलेली काही मोठी झाडं ट्रिम करायला मी माझ्या माळ्याला सांगितलं. (तोही माझ्यासारखाच नवखा होता) त्याने झाडं छाटली आणि ‘सिटी’च्या इन्स्पेक्टरने दोनच दिवसात मला झाडांचं ‘हॅट-रॅकिंग’ करणं बेकायदेशीर असल्याचं सांगितलं.
माहितीपत्रकातील नियम
माहितीपत्रकातली दोन पानं पाळलेल्या कुत्रे, मांजरं यांच्या व्यवस्थेबद्दल असतात. त्यांच्या रजिस्ट्रेशनचे, लसीकरणाचे पेपर्स, त्यांचं खाणं, त्यांना आरामशीरपणे बसता-झोपता येईल असा पिंजरा, त्यांच्या नावाचा बिल्ला, सगळं तयार ठेवायचं असतं. पाळलेले प्राणी घरात राहणाऱ्या कुटुंबाच्या सदस्यांइतकेच महत्त्वाचे असतात. सर्व पाळीव, तसेच बेवारशी (क्वचितच आढळून येणाऱ्या) कुत्रे, मांजरं आणि इतर प्राण्यांना एक-दोन दिवस आसरा द्यायला शहराच्या वेगवेगळ्या भागांत मोठ्ठी शेल्टर्स उघडली जातात. माहितीपत्रकात त्यांची नावं, पत्ते, तिकडे जाण्याचा रस्ता, फोन नंबर अशी सगळी माहिती दिलेली असते. समुद्राच्या जवळ बीचच्या बाजूंनी मोठय़ा, उंच इमारतींमध्ये खूप लोक आवडीने राहतात. हरिकेनची वॉर्निग आल्यावर ही घरं रिकामी करणंच शहाणपणाचं ठरतं. आग, भूकंप, हरिकेन अशा सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आपलं रक्षण करायला प्रत्येक कुटुंबाला आपला प्लान तयार ठेवावाच लागतो. खूप ठिकाणी शेल्टर्स उघडली जातात. बहुतेक शेल्टर्स पब्लिक स्कूल्समध्ये असतात. या शाळांचे पत्ते, फोन नंबर माहितीपत्रकात दिलेले असतात. काही वृद्ध लोक एकटे किंवा दुकटे राहात असतात. तात्पुरत्या उघडलेल्या निवासात त्यांना सर्वात आधी काळजीपूर्वक हलविलं जातं. भिकारी किंवा बेघर लोकांनाही हरिकेनसारख्या संकटाचा सामना एकाकी राहून करावा लागत नाही. अमेरिकेत कुठल्याही संकटात जीवितहानी टाळण्याचे किंवा ती कमीत कमी ठेवण्याचे प्रयत्न होतात. झाडं, पशू, पक्षी, माणसं सगळ्यांच्याच आयुष्याचा अमेरिकेत सन्मान केला जातो. आपली घरं बंद करून काही थोडय़ा लोकांनाच जावं लागतं. बाकीच्या रहिवाशांना घर सुरक्षित ठेवायच्या खूप सूचना पत्रकात असतात. घरांच्या काचेच्या खिडक्यांना सुरक्षित करणं खूपच गरजेचं असतं. पत्रकात वेगवेगळे पर्याय, त्यांच्या किमती, दुकानांची नावं दिलेली असतात. घरात तरणतलाव असला तर तो रिकामा करायचा नाही, पण त्याचं पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी त्यात मोठय़ा मात्रेने क्लोरीन घालायचं असतं. हे पाणी पिण्याकरिता वापरता येत नाही.
या वर्षीही दरवर्षीप्रमाणे वेधशाळेने सगळ्या फ्लॉरिडियन्सना जूनच्या आधीच सावध केलेलं आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये एकही हरिकेन आला नसला तरी फ्लॉरिडामध्ये हरिकेन हे काही नवल नाही, (सबंध अमेरिकेत जास्तीत जास्त हरिकेन झेलणारं राज्य म्हणजे फ्लॉरिडा) आणि येणारा सीझन हा हरिकेनमुक्त असेल, असा समज कोणी करून घेऊ नये. २००४ आणि २००५ मध्ये ४, ५ मोठे हरिकेन फ्लॉरिडाने सोसले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीच्या येऊ शकणाऱ्या हरिकेनची नावं प्रसिद्ध झाली आहेत. हरिकेनना नावं दिल्याने त्यांचं रेकॉर्ड ठेवणं, त्यांच्याबद्दल लिहिणं सोपं झालं आहे. १०० वर्षांपूर्वी वादळांचा उल्लेख वर्ष आणि महिन्यांच्या मदतीने होत असे. नावांचा वापर करण्याची सुरुवात झाली, तेव्हा संतांची नावं वापरली जात असत. काळ पुढे सरकला तशी नावांमध्ये आधुनिकता आली. ज्या हरिकेनमुळे मनुष्यहानी होते, त्यांची नावं कायमची वगळली जातात. अँड्रू, कतरीना, विल्मा, रीटा ही नावं बाद झाली आहेत. एपासून झीपर्यंत असणारी ही नावं एक पुरुषाचं आणि एक बाईचं अशा क्रमाने ठेवलेली असतात. या वर्षीच्या पहिल्या वादळाचं नाव आर्थर, नंतरच्याचं बर्था, मग क्रिस्तोबल, डॉली अशी आहेत. वादळाच्या- वाऱ्याच्या वेगाप्रमाणे त्यांची कॅटेगरी ठरते. कॅटेगरी एकच्या हरिकेनमध्ये वारा ताशी ६४ मैल वेगाने वाहत असतो. जेव्हा वारा ताशी १५६ मैलांच्या वेगाने घोंघावत असतो, तेव्हा तो हरिकेन कॅटेगरी पाच (सर्वात मोठा) असतो.
यंदाच्या वर्षी आठ ते १३ वादळं होतील, पैकी तीन ते सहा हरिकेन आणि दोन मोठ्ठे हरिकेन असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती; पैकी आर्थर विशेष नुकसान न करता निघून गेला आहे आणि बर्थाने फ्लॉरिडाला न येता दुसरीकडे मोर्चा वळवला. हवामान खात्याने नवीन पत्रक काढून फ्लॉरिडावासीयांना दिलासा दिला आहे. कदाचित या वर्षी एकही मोठा हरिकेन येणार नाही असं भाकीत केलं आहे.
स्वतंत्र घरात राहणाऱ्या लोकांना हरिकेनची चाहूल लागली की ‘बोर्डिग’ला सुरुवात करायला लागते. वाऱ्यापासून घरं सांभाळायला आणि काचेची दारं, खिडक्या जपायला मेटलची शटर्स लावायला लागतात. बहुतेक घरमालक खिडक्यांच्या वर आणि खाली स्टीलच्या पट्टय़ा कायमच्या बसवून टाकतात आणि पट्टय़ांमध्ये सरकवायची शटर्स गराजमध्ये ठेवतात. स्टीलची शटर्स पट्टय़ांमध्ये सरकवायला वेळ नाही लागत. गरीब लोक किंवा लहान दुकानदार प्लायवूड, निळ्या रंगाचे प्लॅस्टिक किंवा पत्रे वापरतात. आठ वर्षांपूर्वी आलेल्या विल्मानंतर दुकानांमध्ये खूप जनरेटर्स विकायला आले. (प्रत्येक हरिकेन काही तरी शिकवून जातो). माझ्या घरात तेव्हा आणलेला जनरेटर अजून त्याच्या खोक्यातच गुमान पडून आहे. तो वापरण्याची वेळ कधीच येऊ नये असं वाटतं.
हरिकेन ‘अँड्रू’मुळे फ्लॉरिडाला २७ बिलिअन डॉलर्सचा फटका बसला. हा हरिकेन कॅटेगरी चार आणि पाचमध्ये फिरत होता. वाऱ्याची दिशा प्रत्येक १० मिनिटांनी बदलत होती. आमच्या नशिबाने टी.व्ही.चा एक चॅनेल अजून तग धरून होता. मागचे ४८ तास सतत काम करीत असलेले बाकीचे चॅनेल्स अँड्रूच्या वादळाचा सामना हरले. ब्रायन नॉरकॉस्ट- या चॅनेलचा वेदरमॅन चॅनेलवरून क्षणाक्षणाला वादळाचे बदलते डिटेल्स पुरवीत होता. वादळ कुठल्या भागातून चाललं आहे, कुठले रस्ते पाण्याखाली आहेत, वाऱ्याचा वेग काय आहे, समुद्रावरून वादळ जमिनीवर यायला किती वेळ आहे, वगैरे. एक वृद्ध बाई आणि तिचा कुत्रा दोघंच घरात अडकून पडले होते. ब्रायन तिच्याशी बोलत राहिला. क्षणोक्षणी दिशा बदलणाऱ्या वादळाची नक्की दिशा जेव्हा कळली तेव्हा फारच उशीर झाला होता. ज्या भागातले लोक निर्धास्त होते, त्याच भागात वादळ जमिनीवर उतरणार अशी चिन्हं दिसायला लागली. तिकडे राहणाऱ्या लोकांना आता कुठंच हालता येणार नव्हतं. ब्रायन त्यांना आपल्या चॅनेलवरून सांगत होता- ‘पांघरायला गादी घेऊन रिकाम्या बाथ-टबमध्ये आसरा घ्या.’ वादळ साऊथ फ्लॉरिडावरून पुढे सरकलं (हे अगदी झटपट होतं) तेव्हा ब्रायनने काही फोन कॉल्स करून त्या वृद्धेला आणि तिच्या कुत्र्याला एका शेल्टरमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. २४ तास टी.व्ही.वरून काम करून ब्रायन घरी गेला, तेव्हा त्याचा आवाज बसला होता आणि डोळे तारवटले होते. वादळ शमल्यावर साऊथ फ्लॉरिडाच्या लोकांनी ब्रायनला हीरोचा मान दिला. ब्रायन आजही हवामान खात्याला जोडलेला आहे.
आपल्या घरांसाठी घरमालक इन्शुरन्स पॉलिसी घेतात. अँड्रूने केलेल्या नुकसानानंतर होम ओनर्सना त्यांच्या हक्काची मदत देता देता किती तरी इन्शुरन्स कंपन्या बंद पडल्या. अँड्रूनंतर खूप लोक नोकऱ्या सोडून, शहर सोडून गेले. घरांच्या दुरुस्त्यांची कामं करणाऱ्या किती तरी नव्या कंपन्या निघाल्या. काही लोकांना चांगले दिवस आले. चार-पाच र्वष बरी गेली आणि परत साऊथ फ्लॉरिडाने २००४ आणि २००५ या वर्षी दोन, दोन, चार, चार मोठे हरिकेन पाहिले. २००५ मध्ये झालेल्या हरिकेनमुळे पॉवरहाऊसचं प्रचंड नुकसान केलं. मोठी मोठी शहरं आठ-आठ दिवस अंधारात होती. रस्त्यांवर मोठाले वृक्ष कोसळले होते. पेट्रोल पंपांच्या टाक्या भरता आलेल्या नव्हत्या. पाणीपुरवठा तेवढा चालू होता. टेलिफोन बंद. मोबाइलही बराच काळ वापरता येत नव्हते. बॅटरीवर चालणाऱ्या रेडिओवरून कुठले रस्ते उघडले आहेत, हे कळत होतं. शेजारच्या दोन-तीन राज्यांमधून पॉवर लाइनचं काम करायला इलेक्ट्रिशिअन्स मागवले होते. मोकळ्या मैदानात त्यांचे तंबू होते. दोन आठवडय़ांनी शहराचे व्यवहार हळूहळू सुरू झाले. अमेरिकेत रस्त्यावर कधी एखादा सिग्नल बंद पडला, तर तो दुरुस्त होईपर्यंत लगेच ट्रॅफिक पोलीस रहदारीचं नियंत्रण करायला हजर होतात, पण इतक्या सगळ्या सिग्नलचं नियंत्रण कसं होणार? आपापल्या जबाबदारीवर प्रत्येक वाहनचालक वाहन चालवत होता आणि एकही अपघात न होता सगळीकडची वाहतूक सुरळीत चालली होती. चिल्लर वादळं सोडली, तर गेल्या ९ वर्षांमध्ये एकाही हरिकेनने हजेरी लावलेली नाही. हा सीझन कसा जातो ते बघायचं.
हरिकेन येऊ घातला आहे असं कळतं, तेव्हा त्याला सामोरं जाण्यासाठी अगदी युद्धपातळीवर तयारी करावी लागते. युद्धाच्या वार्ता जशा ऐकायला रम्य वाटतात, तशाच हरिकेनच्या सुद्धा. तुम्ही त्याचा थरार जर प्रत्यक्ष अनुभवला असेल, तर तो सगळा अनुभव अविस्मरणीय होतो. हे सारं जरी खरं असलं तरी युद्ध आणि हरिकेन दोन्ही नको असलेले पाहुणेच आहेत.