गणपती या देवाची एक वेगळीच गंमत आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिराच्या रांगेत तर तुम्हाला विविध धर्मीय मंडळी नेहमीच नजरेस पडतात. त्यात पारशी, शीख, ख्रिश्चन एवढेच नव्हे तर मुस्लीम समाजातील अनेकांचाही समावेश असतो. अशी भक्तमंडळी तर शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरातही दिसतात, पण साईबाबा हे हिंदूू आहेत असे हिंदू मानतात तर ते मुस्लीम होते असे मुस्लीम धर्मीयांना वाटते. दोघांच्याही श्रद्धा अबाधित आहेत आणि म्हणून दोन्ही भक्तगण तिथे येतात, असे म्हणायला वाव आहे. पण गणपतीच्या बाबतीत मात्र असे नाही. तो हिंदूधर्मातील देव म्हणून ओळखला जातो. तरीही सर्वधर्मीय त्याच्या दर्शनार्थ येताना दिसतात. कोकणात तर गणपती घरी आणणारे मुस्लीम कुटुंबही पाहायला मिळते (याच अंकात या संदर्भातील एक लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे). अशी एक नव्हे तर अनेक मुस्लीम कुटुंबे या महाराष्ट्रात आहेत, जे गणपतीला मानतात. मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या ‘लालबागच्या राजा’ला तर त्याच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वाधिक वेळ मुंबईतील मुस्लीमबहुल समजल्या जाणाऱ्या भेंडीबाजारातून जाताना लागतो. तिथे तर प्रत्येक नाक्यानाक्यावर मुस्लीम भगिनी गणरायाला ओवाळण्यासाठी मध्यरात्री तिष्ठत असतात.. अनेक बौद्ध धर्मीयांच्या घरांमध्येही गौतम बुद्धाच्या तसबिरीच्या सोबत गणपती सहज विराजमान झालेला दिसतो. हिंदूच्या इतर कोणत्याही देवाच्या बाबतीत असे होताना दिसत नाही. गणपती हा मात्र या साऱ्यामध्ये अपवाद आहे. भारतात येणारी विदेशी मंडळीही सिद्धिविनायकाच्या दर्शनाच्या रांगेत दिसतात. त्यात युरोपिअन, नायजेरिअन सर्वाचाच समावेश असतो. गणपतीच्या रूपाकारामध्ये त्याचे हे यश दडलेले आहे, असे कलावंत मानतात. त्याचा रूपाकार अतिशय आकर्षक आणि इतर धर्मीयांच्या किंवा विदेशातून आलेल्यांसाठी तसा काहीसा विचित्र म्हणजे धड हत्तीचे आणि शरीर माणसाचे असे असला तरी तो तेवढाच कलात्मकही आहे. गणरायाशी संबंधित कलात्मक आविष्कार कोणत्याही धर्मीयांनी प्रेमात पडावेत आणि निव्वळ कलाकृती म्हणूनही त्याचा सहज आस्वाद घ्यावा, असेच असतात.
गणपती हा वेगळ्या अर्थाने सर्वाधिक लोकप्रिय असा देव आहे. खरे तर एवढे म्हणूनच आपण थांबतो, पण या बुद्धीच्या देवतेच्या लोकप्रियतेचा विचार आता आपण बुद्धीच्याच बळावर करण्याची गरज आहे. कारण त्याच्या अभ्यासामध्येच आपल्याला आताच्या समाजातील काही प्रथा-परंपरांची मुळे सापडणार आहेत आणि कदाचित भविष्यातील समाजरचनेविषयी दिशादर्शन होण्याची शक्यताही असणार आहे. कारण गणपतीची ही लोकप्रियता ही काही आजची नाही तर ती अनेक शतकांपूर्वीची आहे. किमान एक हजार वर्षांपूर्वीची तरी असे म्हणायला पुरातत्त्वीय पुराव्यांचा आधार आहे. याच अंकामध्ये ज्येष्ठ पुरातत्त्व संशोधक डॉ. अरविंद जामखेडकर यांचा या संदर्भातील लेख प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा लेख आपल्याला गणपतीच्या या परंपरेकडे वेगळ्या नजरेने पाहायला प्रवृत्त करणारा आहे.
महाराष्ट्रामध्ये अनेक संप्रदाय वेगवेगळ्या शतकांमध्ये उदयाला आले आणि एकमेकांत बेमालूमपणे मिसळलेही. त्यातील अनेकांनी आपल्या प्रथा-परंपरा आजही कायम ठेवल्या आहेत. मात्र त्यांचे परिचय देणारे अस्तित्व मात्र बदललेले आहे. त्यामुळेच आज त्यांच्याकडे पाहता अनेक प्रश्न पडतात. त्या प्रश्नांचा शोध घेतला तर आपण त्यांच्या मुळाशी म्हणजेच त्या एक हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडात पोहोचतो. हा तोच कालखंड आहे की, ज्या वेळेस महाराष्ट्रातील अनेक संप्रदाय एकमेकांमध्ये मिसळून एक नवीन मूस तयार होण्याचे स्थित्यंतर या महाराष्ट्रात घडत होते. त्यात गणपती हा प्रभावी होता. एका बाजूला नाथ संप्रदाय, शैव, वैष्णव, या सर्वाचा महासमन्वय घडवून आणणारा भागवत संप्रदाय आणि या सर्वामधील आणखी एक महासमन्वयक म्हणजे हा गणपती होता. पण आजवर आपण केवळ त्याकडे श्रद्धेच्या भावनेनेच पाहात आलो आणि त्याची केवळ पूजा करत आलो. तो बुद्धीचा देव आहे, असे म्हणत त्याला साकडे घालण्यामध्ये आपण कालापव्यय केला. खरेतर बुद्धीच्याच माध्यमातून त्याला समजून घेणे आवश्यक आहे, तर अनेक कोडय़ांची उकल होणार आहे.
उत्तर कर्नाटक, त्याला जोडून असलेला महाराष्ट्राचा भाग म्हणजे सोलापूर, कोल्हापूर आदी परिसर आणि एका बाजूस मराठवाडय़ाचा भाग यामध्ये वसलेल्या समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक अंगांमध्ये अनेक प्रकारची साम्यस्थळे आढळतात आणि एकाच ठिकाणी भेदही दिसतात. त्याची उकल करण्यात आजवर पूर्ण यश आलेले नाही. अगदीच उदाहरण घ्यायचे तर इथे बोलली जाणारी भाषा ही मूळ आर्य वंशाची आहे, असे मानले तर त्यात मोठय़ा प्रमाणावर द्रविडीय शब्दभांडार आढळते ते एवढे की, ही द्रविडीय भाषाच असल्याचा संशय यावा. हे कसे काय याचा शोध आज संशोधक घेत आहेत. या परिसराने अनेक प्रकारची सामाजिक आणि धार्मिक आक्रमणे झेलली आहेत आणि त्या दरम्यान झालेल्या सरमिसळीतून तिथली समाजरचना उभी राहिली आहे. या साऱ्याची नाळ १०व्या, ११व्या व १२व्या शतकात प्रसिद्धीच्या लाटेवर आरूढ झालेल्या गणराय नावाच्या एका दैवतापाशी येऊन पोहोचते. हे दैवत त्या वेळच्या जवळपास सर्वच संप्रदायांनी स्वीकारलेले दिसते. मग त्या कालखंडात सर्व धर्म आणि संप्रदायांनी त्याला स्वीकारणे आणि आता २१व्या शतकांतही सर्व धर्मीयांना त्याबद्दल आपुलकी वाटणे, तो लोकप्रिय असणे यात काही साम्यस्थळे आहेत का? बुद्धीच्या या देवतेचा शोध बुद्धीच्या माध्यमातून घेतला तरच ही कोडी सुटणार आहेत.
१०व्या, ११व्या किंवा १२व्या शतकांतील किंवा त्या नंतरच्या शतकांमध्ये घडत गेलेल्या बाबींबद्दल आहेत ती कोडी. पण या २१व्या शतकाकडे पाहिले तर इथे कोडी नव्हेत तर आपण घोळ घालून ठेवले आहेत. ते सर्व मानवनिर्मित असून आपल्या साऱ्यांसाठी अपायकारक असे आहेत, हे गणरायाच्या सध्या प्रसिद्ध असलेल्या अष्टविनायकांकडे पाहून वाटते. हे घोळ किंवा त्या संदर्भातील अव्यवस्था नेमकी काय आहे, याचा वेध घेणारा एक सविस्तर शोधलेखच या गणेश विशेषांकामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. या लेखाच्या निमित्ताने आमचे प्रतिनिधी सुहास जोशी यांनी प्रत्यक्ष या स्थळांना भेट दिली, त्या वेळेस तेथील भेदक वास्तव समोर आले. हे अष्टविनायक प्रसिद्ध होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काही शतकांपूर्वीच्या व्यापारी मार्गावरील ती विसाव्याची ठाणी होती. व्यापाऱ्यांचे रक्षण, सोबत दैवी साथ असल्याची भावना ही त्या कालखंडात चोर-लुटारूंपासूनच्या रक्षणासाठी आवश्यकच होती. त्यातून हे अष्टविनायक लोकप्रिय होत गेले आणि ‘अष्टविनायक’ या ३५ वर्षांपूर्वी आलेल्या चित्रपटाने तर ते घराघरांत नेले. ‘लोकप्रभा’च्या या अष्टविनायक शोधयात्रेमध्ये असे लक्षात आले की, आता या सर्वच ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी लोटते. विनायकी, संकष्टी आणि अंगारकीला तर प्रत्येक ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. पण या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या नियोजनाचा अभाव आहे, केवळ दोनच ठिकाणे अपवाद आहेत. अग्निशमन यंत्रणा असली तरी ती नेमकी, सक्षम आणि पुरेशी नाही. मोठय़ा संकटांचा सामना करण्यास ती पुरेशी निश्चितच नाही. जवळचे अग्निशमन केंद्र सर्वच अष्टविनायकांपासून १५ ते २० किलोमीटर्स एवढय़ा अंतरावर आहे. येण्यासाठीचे रस्ते चांगले नाहीत. सर्वच अष्टविनायकांकडे येणारे मार्ग अरुंद तरी आहेत किंवा मग ते गावातील अरुंद बोळांतून तरी येतात. अनेक ठिकाणी तर पर्यटक किंवा भाविकांची पादत्राणे ठेवण्याची साधी सोयदेखील नाही. जवळपास सर्वच ठिकाणी असलेल्या वास्तू या ३००-४०० वर्षे जुन्या आहेत. पण त्यांचे पुरातन रूप न जपता त्यावरच मार्बल लावणे, त्यावर रंगरंगोटी करणे, काळ्या पाषाणाला ऑइल पेंट फासणे असे प्रकार सर्रास झालेले आढळतात. या अष्टविनायकांच्या व्यवस्थापनांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. जवळपास सर्वच ठिकाणी असलेल्या या मंदिरांमुळे पर्यटक मोठय़ा प्रमाणावर येत असल्याने त्याचा भार गावावर येतो आणि गावाकडे सुविधांसाठी पैसे नाहीत अशी अवस्था आहे. हे सारे सध्याच्या शासनाने समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ नावाचे एक महामंडळ इथे कार्यरतही आहे. मात्र त्यांनीही महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर अग्रक्रमावर असलेल्या या अष्टविनायकांकडे दुर्लक्षच केले आहे. त्यांच्या संकेतस्थळावर असलेल्या १२ पानी पुस्तिकेतून फारसे काहीही हाती लागत नाही. खरे तर या सर्वच स्थळांच्या विकासासाठी या अष्टविनायकांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मंदिरांना नव्हे तर स्थानिक ग्रामपंचायतींना वित्तपुरवठा करून त्या माध्यमातून गावाचा आणि पर्यायाने त्या पर्यटनस्थळांचा विकास होणे गरजेचे आहे. पण या कल्पनेपासूनही हे महामंडळ आणि सरकारही कोसों दूर आहे. खरे महाराष्ट्राला या अष्टविनायकांच्या माध्यमातून एक मोठी संधी चालून आली आहे. या सर्व अष्टविनायकांचा समावेश मुद्गल पुराणामध्ये करण्यात आला आहे. हा ग्रंथ देशभरात गणपतीचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रातील या अष्टविनायकांचा समावेश त्यात आहे. हेच निमित्त घेऊन अष्टविनायकांच्या ठिकाणी चांगल्या सोयी पुरवत ही सर्व ठिकाणे थेट देशाच्या पर्यटन नकाशावर नेण्याची संधी आपल्याला आहे. गणरायाची लोकप्रियता त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मदतीला धावून येईल, पण देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सवाचा मान मिळालेल्या महाराष्ट्रातील या गणेशोत्सवाच्या महत्त्वाची जाण सरकारला आहे कुठे? किमानपक्षी यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तरी हे सारे घडवून आणण्याची सुबुद्धी या बुद्धीदेवता गणरायाने सरकारला द्यावी एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. तेवढेच आपल्या हाती आहे, बुद्धी दे गणनायका!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा