सुकामेवा हे बहुतेकदा श्रीमंती खाणे समजले जाते. आर्थिकदृष्टय़ा तर ते आहेच पण पोषक तत्त्वे आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सुकामेव्यातील अनेक घटक श्रीमंत आहेत. म्हणूनच सुकामेवा खाणं गरजेचं आहे.
अक्रोड
अक्रोड आपल्या वापरात नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अक्रोडाची रचना व आपल्या मेंदूची रचना यात बराच सारखेपणा आहे. डोक्याच्या कवटीत जशी मज्जा असते तसेच अक्रोडच्या टरफलात मेंदूच्या स्वास्थ्याकरिता निसर्गाने अप्रतिम मगज बनविला आहे. ज्यांना बौद्धिक थकवा आहे, मेंदूचे काम जास्त आहे, मगजमारी किंवा डोकेफोड जास्त आहे, विचार-चिंतन फार आहे, त्यांनी अक्रोड नियमितपणे दोन-तीन खावे. ज्यांना झोप येत नाही त्यांनी डोक्याला अक्रोडच्या तेलाचा मसाज झोपताना करावा. उत्तम झोप लागते.
अक्रोडचे बरेचसे गुण बदामासारखे आहेत. अक्रोड जास्त शुक्रकर आहे. अक्रोड कफपित्तवर्धक, वीर्यवर्धक, बल्य आहे. हृद्रोग, रक्तदोष, वातरक्त यावर उपयुक्त आहे. अक्रोड जास्त प्रमाणात घेतले तर शरीराचा दाह होतो. रेच होतात. वजन वाढविण्याकरिता अक्रोड चांगले. धातू क्षयामुळे उद्भवलेल्या वातविकारात, आमवातात अक्रोड पथ्यकर आहे. अक्रोड कामवासना वाढविणारा आहे. अक्रोडात प्रोटिन व स्निग्ध पदार्थ जास्त आहेत.
शरीरात वेगवेगळय़ा प्रकारच्या गाठींवर अक्रोड गराचा लेप उपयुक्त आहे. विशेषत: गंडमाळावर अक्रोड वाटून त्याचा लेप करावा. तसेच अक्रोड खावयास द्यावेत. बाळंतीणीस दूध कमी येत असल्यास गव्हाच्या चपातीत अक्रोड गर मिसळून पोळी खावी. सात दिवसात स्तन्यवृद्धी होते. स्वप्नदोष व वारंवार लघवी होणे या तक्रारींकरिता तूप-खडीसाखरेबरोबर अक्रोड चूर्ण खावे.
क्रूर कोठा असणाऱ्यांनी रेचक म्हणून अक्रोड तेलाचा प्रयोग जरूर करावा. पहाटे दुधाबरोबर अक्रोड तेल तीन-चार चमचे घ्यावे. कोठा न ओरबाडता सुखाने पोट साफ होते. चक्कर येणे, भोवळ येणे, फिरल्यासारखे होणे, मस्तक हलके होणे याकरिता मोठय़ा प्रमाणावर नियमितपणे अक्रोड खावे. मासिकपाळीत स्त्राव कमी येणे, साफ न होणे या तक्रारी असणाऱ्या कृश स्त्रियांनी अक्रोड नियमित खावे.
अक्रोडच्या तेलाचे एरंडेलाच्या गुणाशी साम्य आहे. एरंडेलाने अशक्ती येते. अक्रोड तेलाने ताकद येते. हा फरक आहे. लांबलचक चपटे टेप वर्म किंवा जंत तसेच फाजील पित्त बाहेर काढण्याकरिता अक्रोड तेलाचा मोठय़ा मात्रेत प्रयोग करावा. ज्यांचे केस दुबळे झाले आहेत त्यांनी अक्रोड नियमित खावे.
आहळीव
आहळीव किंवा आळीव बाळंतिणीकरिता खूप थंडीत लाडू किंवा लापशी करून देण्याकरिता वापरले जाते. दिवाळीत मातीच्या किल्ल्यावर लवकर उगवणारे धान्य म्हणून आम्ही लहानपणी वापरत असू.
खूप उचकी लागली तर आळिवाचा उकळून काढा द्यावा. आळिवात एक उडून जाणारे तेल आहे. या तेलाने अन्ननलिका, आमाशय, स्निग्ध होऊन उचकी निर्माण करणाऱ्या वायूला आवर पडतो. बाळंपणात कंबरदुखी, पाठदुखी, गर्भाशयाला पूर्ववत आणण्याकरिता वायू ठिकाणावर आणण्याकरिता आळिवाची पेज घ्यावी. आळीव वाटून त्याचा लेप दुखऱ्या सांध्यांवर लावावा.
बाळंतपणातून उठलेल्या स्त्रियांना दूध कमी येत असेल तर आळीव, ओल्या खोबऱ्याचे दूध व गूळ असे मिश्रण शिजवून दाट लापशी करून प्यावे. ज्यांना हिवाळय़ात व्यायाम करून शरीर कमवायचे आहे त्यांनी आळीव, ओले खोबरे, गूळ व भरपूर चांगले तूप असे लाडू करून खावे. तिखट, आंबट, खारट पदार्थ टाळावे. चहा पिऊ नये. निश्चयाने वजन वाढते. आळिवाचा काढा घेतला की लघवी साफ होते. पोट दुखून जुलाब होत असल्यास व आतडय़ांच्या व्रणात आळिवाच्या काढय़ाचा उपयोग होतो. कंबरदुखी, सायटिका या विकारात आळीव उपयुक्त आहेत. डोळे येणे किंवा डोळय़ांच्या सुजेवर बाहेरून आळिवाचे पोटीस बांधावे. उपयोग होतो.
काकडी बी
महाराष्ट्रात काकडी कोशिंबिरीकरिताच जास्त वापरली जाते. एक काळ महाराष्ट्रात मावळी काकडी खेडोपाडी मिळायची. ती बऱ्याच वेळा कडू असायची. आत्ता मिळणारी काकडी व्यतिरिक्त आणखी एक लवचिक, चटकन वाकणारी काकडीची जात पुणे-मुंबई रस्तोरस्ती खवय्यांना खुणावत असते. काकडीच्या बियांचा वापर आम्हाला मुळी माहीतच नाही. उत्तर हिंदुस्थानात काकडी, खिरा, बालमखिरा, तरकाकडी, वालूक अशा वेगवेगळय़ा नावाच्या काकडय़ांच्या बिया वाळवून त्यांच्या मगजाचा वापर पौष्टिक म्हणून केला जातो. काकडीच्या बिया थंड गुणाच्या असून शरीर पुष्ट करतात. मासिक स्त्रावाचा दाह, रक्त फार जाणे, कष्टाने रक्तस्त्राव होणे या तक्रारी तसेच लघवी कमी होणे, अडखळत होणे या तक्रारीत बियांचा चांगला गुण येतो. काकडीच्या बियांमधील मगज व मनुका एकत्र वाटून तांदळाच्या धुवणाबरोबर घ्यावे. त्यामुळे लघवीची तिडीक कमी होते. एड्स या गंभीर रोगावस्थेत ज्या स्त्री-पुरुषांना मूत्रेंद्रियांचा दाह होतो, जखम असते. उपदंशाची लक्षणे आहेत त्यांनी काकडीच्या बियांचा वापर वरील प्रकारे करून पाहावा. चीनमध्ये एक प्रकारच्या मोठय़ा काकडीच्या बिया व मुळांचा एड्स विकारांकरिता उपयुक्त म्हणून प्रयोग चालू आहे.
काकडीच्या बिया या मूत्रवह स्रोते सतत मोकळी ठेवतात. शरीरात कांती सुधारते. रक्तामध्ये जोश आणतात. आमाशय, यकृत, पांथरी येथील पित्त कमी करतात. शोष पडणे किंवा खूप तहान लागत असेल तर काकडीच्या बिया वाटून खाव्या. कडकीवर काकडीच्या बिया, खडीसाखर एकत्र वाटून पाण्याबरोबर घ्याव्या. कडकी कमी होते.
काकडीच्या बियांचा वाटून केलेला शिरा फारच पौष्टिक आहे. हिवाळय़ामध्ये वजन वाढविण्याकरिता उपयोग होतो. खिरा किंवा खजुराच्या बियांच्या मानाने काकडीच्या बिया कमी पौष्टिक आहेत. पण त्या पित्त कमी करण्याचे कार्य चांगले करतात. काकडीच्या बियांचा वाटून केलेला लेप चेहऱ्याची त्वचा सुधारते. काकडीच्या बिया या उत्साहवर्धक आहेत. शुक्र धातूचे उत्साह वाढविणे, टिकविणे हे कार्य काकडीच्या बिया चांगले पार पाडतात. कृश व्यक्तींचा आवाज बसणे या विकारात खिरा या जातीच्या काकडीच्या बिया वाटून मधाबरोबर खाव्या, आवाज सुधारतो. उन्हाळय़ात अंगावर उष्णतेचे फोड उठणे, उबाळू, उन्हाळी ताप या तक्रारींत खिरा, काकडीच्या बियांचे सरबत उत्तम काम देते.
खजूर
खजूर हे पूर्ण अन्न आहे. खजूर उष्ण हवामानात व प्रदेशात तयार होतो. तो पोटात गेल्याबरोबर पचायला सुलभ अशा गुणांचाच असतो. खजूर जशाचा तसा पूर्णपणे आतडय़ांनी ग्रहण केला जातो. पचायला बिलकूल जड नाही. खजूर उष्ण आहे अशी समजूत आहे. खजूर वात व पित्तशामक कार्य करतो. वजन वाढवतो. शरीराला तृप्ती आणतो. म्हातारपणा दूर ठेवतो. ज्यांना शंभर वर्षे जगण्याची इच्छा आहे त्यांनी खजूर नियमितपणे खावा. खजूर तुपाबरोबर घेतल्यास त्याचे गुण वाढतात. खजुरात ए, बी, सी व्हिटॅमिन व भरपूर साखर तसेच लोह आहे.
वाढलेल्या पांथरीवर खजूर उपयोगी पडतो. खजुराच्या चार बियांचा गर कुस्करून पाण्याबरोबर नियमितपणे महिनाभर खावा. पांथरी कमी होते. खजूर सारक आहे. त्यामुळे पोट साफ होते. त्वचेच्या सुरकुत्या दूर होतात. कांती सुधारते, रक्त वाढते. खजूर खाण्याअगोदर त्याचा दर्जा बघावा. खजूर अत्यंत अस्वच्छपणे आयात होतो. त्याचा वापर करणारे गलिच्छपणे त्याचा व्यवहार करतात. त्याकरिता खजूर गरम पाण्याने स्वच्छ धुऊन मगच खावा.
तृषार्त किंवा खूप शोष पडणाऱ्यांनी खजुराच्या दोन-चार बियांचा मगज थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवून ते पेय घ्यावे. वृद्ध व लहान कृश बालकांकरिता दोन खजूर, चिमूटभर जिरे व चवीला गूळ किंवा साखर असे मिश्रणाचे सरबत मिक्सरमध्ये करावे. चहा, कॉफी किंवा खूप जाहिरातींच्या टॉनिकपेक्षा उत्तम पेय म्हणून काम देते.
खजुराचा विशेष फायदा, मेंदू, हृदय, कंबर, वृक्क या अवयवांना बल देण्यात होतो. तापातून उठलेल्यांकरिता खर्जूरमंथ किंवा रवीने घुसळून तयार केलेले खजुराचे सरबत फार चांगले गुण देते. अतिकृश बालकांना वजन वाढवायला खजुराचा उपयोग होतो. दातांचे आरोग्य मात्र खजूर खाताना सांभाळावे लागते. काळा किंवा लालबुंद खजूरच खावा.
निवडुंगाच्या बोंडांपासून ‘नवजीवन’ नावाचे एक अफलातून औषध लहान बालकांच्या दुर्धर खोकला विकाराकरिता वापरले जाते. त्याच्या औषधी निर्माण प्रक्रियेत आसुत क्रियेकरिता- फरमेंटेड प्रोसेसकरिता खजुराच्या सत्त्वांशाचा वापर केला जातो. (संदर्भ- म.अ. अण्णासाहेब पटवर्धन चरित्र) कोरडय़ा खोकल्याकरिता वापरल्या जाणाऱ्या एलादी वटीत तसेच खर्जुरासवात खजुराचा मोठा सहभाग आहे.
खरबूज बी
खरबूज हे मेंदूतील फाजील उष्णता, गरम डोके थंड करण्याकरिता फार उपयुक्त आहे. खरबुजाच्या बियांचा मगज दीर्घकाळच्या तापावर उपयुक्त आहे. काकडी, खरबूज, कोहळा, कलिंगड व दुध्याभोपळा अशा पाच प्रकारच्या बियांचा अष्टमांश काढा कडकी, जुनाट ताप यावर हमखास गुण देतो. या काढय़ामुळे नुसतीच कडकी कमी होते असे नसून वजन वाढण्यास मदत होते. खरबुजाच्या बिया गरम केल्यास त्यातून तेल निघते. तेल अडलेली लघवी मोकळी करण्यास उपयुक्त आहे. दहा-पंधरा थेंब तेल घेतले की लघवी साफ होते. खरबुजाच्या बियांचे तेल जास्त पौष्टिक आहे. कॉडलिव्हर ऑइल इत्यादी महागडी तेले उष्ण असतात. खरबुजाच्या बियांचे तेल थंड गुणाचे आहे. पौष्टिक आहे.
मूतखडा, यकृतवृद्धी, मूत्रेंद्रियाची सूज, पाळीतील रक्तस्त्राव अडखळत होणे या तक्रारीत खरबुजांच्या बियांचा वाटून तांदळाच्या धुवणाबरोबर उपयोग करावा. या इंद्रियांच्या मार्गातील अडथळा दूर होऊन लघवी, रक्तस्त्राव व पित्ताचे मार्ग मोकळे होतात. अति तीव्र उन्हाळय़ात अंगावर फोड आल्यास किंवा सनस्ट्रोकसारख्या अवस्थेत खरबुजाच्या बियांचा मगज फार हितकर आहे. शारीरिक सौंदर्य, त्वचाविकार, व्यंग, फोड याकरिता खरबुजाच्या बिया वाटून लावाव्या. त्वचा नितळ व स्वच्छ होते.
खसखस
अफूच्या बोंडातील बी म्हणजे खसखस हे बऱ्याच जणांना माहीत नाही. दिवाळीमध्ये अनारसे करण्याकरिता किंवा बाळंतीणीला खसखशीची लापशी द्यावी. एवढीच माहिती बहुतेकांना आहे.
अतिसार, कॉलरासारखे वारंवार जुलाब होणे, जुनाट ग्रहणी, शौचावाटे रक्त पडणे, झोप न येणे, आतडय़ातील रक्तस्राव, शुक्रदौर्बल्य इत्यादी विकारात खसखस उपयुक्त आहे. खसखशीचे कार्य मधुर रसासारखे पण उष्ण आहे. स्निग्ध व मलावष्टंभ आहे. कफ पित्त वाढवून वातशमन करणाऱ्या पदार्थात खसखस जास्त उपयोगी आहे. कारण त्याच्या वापराने जुलाब होत नाहीत. खसखशीबरोबर साखर, बदाम, बेदाणा, चारोळी, खारीक, मनुका इत्यादी पदार्थ वापरून लापशी करावी.
खूप जुलाब होत असल्यास खसखशीच्या बिया वाटून त्याची लापशी किंचित जायफळ व सुंठ चूर्ण मिसळून घ्यावी. खूप कृश झालेल्या व्यक्तीने हिवाळय़ात खसखस लापशी जरूर घ्यावी. प्रकृती सुधारते, झोप येत नसल्यास साखर किंवा मधाबरोबर खसखशीचा काढा झोपताना घ्यावा.
आमातिसार, पोट दुखून जुलाब होत असल्यास खसखस ताकात वाटून चवीपुरते मीठ मिसळून घ्यावी. खूप नशापाणी, धूम्रपान करणाऱ्यांच्या सर्दी, पडसे, खोकला, दमा या विकारात खसखस दुधात शिजवावी. या दुधात थोडे केशर व वेलची चूर्ण मिसळून घ्यावे. काही कारणाने डोके काम करीत नसेल, मेंदूचा थकवा आला असेल तर बदाम व खसखस वाटून त्याची लापशी घ्यावी. बदाम पचायला जड पडू नयेत म्हणून खसखशीचा उपयोग होतो.
काजू
काजू पाहिले की खावेसे वाटणारी चीज आहे. पण जरा जपून. काजू अत्यंत उष्ण आहेत. ज्यांना लघवीचा त्रास आहे. लघवी कमी होते, अडखळत होते, मूतखडा आहे, लघवीला जोर करावा लागतो, त्यांनी काजू खाऊ नये. शौचावाटे रक्त पडणे, अंगावर चकंदळे उठणे, गांधी येणे, आम्लपित्त, अल्सर, पित्तामुळे पोटदुखी या विकारांत काजू वज्र्य करावे. पित्तप्रकृतीच्या व्यक्तीकरिता काजू कुपथ्य आहे. फार काजू खाऊन होणाऱ्या त्रासावर डाळिंबाचा रस, खडीसाखर व मध हा उत्तम उतारा आहे.
काजूचे फळ उत्तम पाचक आहे. त्याच्या रसाने भूक सुधारते. वारंवार होणारे जुलाब थांबवतो. आमांशयात गुबारा धरत असेल तर काजूच्या फळाच्या रसाने तो कमी होतो. काजूच्या फळांपासून उत्तम पाचक आसव होते. काजूच्या ताज्या फळांचा रस कपडय़ावर पडला तर डाग जात नाहीत, इतके पक्के डाग पडतात. स्मृतिनाश व मेंदू क्षीणतेवर काजू उपयुक्त आहेत. ताकद व वजन वाढणे याकरिता भरपूर व्यायाम व नियमितपणे काजू खाणे याचा उपयोग हिवाळय़ात करावा. त्वचेला बधिरपणा येणे, जळवात, चिखल्या याकरिता काजूतेलाचा प्रयोग सावधानपूर्वक करावा.
काजू वृष्य, वाजीकर, हृदय व नाडीला बळ देणारे फळ आहे. काजूत भरपूर प्रोटिन व बी-व्हिटॅमिन आहेत.
खारीक
बाजारात सामान्यपणे दोन प्रकारची खारीक मिळते. साखरी खारीक व कोरी खारीक. साखरी खारीक चावायला मऊ व थोडी तुलनेने अधिक गोड असते. कोरी खारीक खूप कडक व कमी गोड चवीची असते.
खारीक ही खजुराच्या जातीतील असली तरी स्त्रियांकरिता त्याचे वेगळे विशेष स्थान आहे. ज्या मुलींची मासिक पाळी साफ येत नाही त्यांनी नियमितपणे खारीक चूर्ण तुपाबरोबर खावे किंवा किमान एक खारीक रोज खावी. दोन-तीन महिने असा प्रघात ठेवला तर मासिक पाळी नियमित होते. मासिक पाळीच्या त्रासामुळे ज्यांना गर्भधारणा होत नाही त्यांना नियमित खारीक खाल्ल्यामुळे दिवस राहतात. खारीक खाल्ल्यामुळे वजन वाढेल असे नाही, पण खारकेसारखे शरीर खुटखुटीत व ताठपणे काम करणारे बनते.
खारकांचे बारीक तुकडे व तितकेच आल्याचे लहान तुकडे, भरपूर लिंबाचा रस व त्यात अष्टमांश प्रमाणात सुंठ, मिरे, पिंपळी, जिरे व बडीशेप असे चूर्ण, चवीपुरते मीठ व तुपावर भाजलेला हिंग असे लोणचे मुरल्यावर खावे. उत्तम रुची येते. भूक लागते. रक्तपित्त विकारात खारीक व तूप खावे. लहान मुलांचे दात बळकट व्हावयास हवे असतील तर रोज एक खारीक चावून, चघळून खावयास लावावी. चॉकलेट व केकपेक्षा हा खुराक उत्तम.
गोडांबी
गोडांबी म्हणजे बिब्ब्याचा गाभा आहे. बिब्ब्याचे सर्व गुण गोडांबीत आहेतच. त्याशिवाय गोडांबी ही अत्यंत वृष्य, शुक्र व वीर्यवर्धक आहे. ज्या पुरुषाला स्त्रीसंग करायला ‘भ्या’ वाटते त्याने नियमितपणे गोडांबी खावी. मात्र त्याकरिता पुढील पथ्य कडकपणे पाळावे म्हणजे बिब्बा अंगावर उतत नाही.
गोडांबीचा प्रयोग थंड ऋतूत, थंड ठिकाणी व रात्रीच्या वेळात किंवा पहाटे करावा. हा प्रयोग करण्याअगोदर आठ दिवस आंबट, खारट व तिखट वज्र्य करावे. आंबवलेले पदार्थ, पाव, दही, लोणचे, पापड खाऊ नये. लघवीची तक्रार असणारांनी गोडांबी खाऊ नये. वीर्यवृद्धी अपेक्षित असणारांनी आपल्या ताकदीनुसार तीन ते सात गोडांब्या सकाळी रिकाम्यापोटी दुधाबरोबर घ्याव्या. त्यानंतर त्या दिवशी शक्यतो दूध-भात, दूध-चपाती असा अनम्ल, अलवण व मसालाविरहित आहार ठेवावा. असा प्रयोग मानवत गेला तर सात दिवस नियमित गोडांब्या खाव्यात. लघवी कमी होत नाही यावर लक्ष ठेवावे.
ज्यांना मेंदूला ताकद हवी, स्मरणशक्ती वाढायला हवी असेल त्यांनीसुद्धा वरीलप्रमाणे प्रयोग करावा, गोडांबीबरोबर गायीचे दूध प्यावे. गोडांबी अधिक खाऊन शरीरावर फोड उठले तर घाबरू नये. कोथिंबीर वाटून त्याचा रस पोटात घ्यावा. बाहेरून त्याचा चोथा लावावा.
चारोळी
चारोळय़ा खाण्याचा प्रघात नाही. पण बदामाचे सहीसही गुण चारोळीच्या बियांत आहेत. रुची यावी म्हणून केवळ चारोळी वापरावी असेच नसून लहान मुलांकरिता चारोळी हे उत्तम टॉनिक आहे. चारोळीत तीस टक्के मांसवर्धक पदार्थ व साठ टक्के स्निग्ध पदार्थ आहे. खोकल्यात चारोळीची पेज घ्यावी. त्वचाविकारात चारोळी वाटून त्याचे उटणे करावे. चारोळीचे तेल केस काळे व्हावे म्हणून वापरून प्रयोग करण्यासारखे आहे.
खोबरे
नारळ कल्पतरू आहे. त्याचा प्रत्येक भाग उपयुक्त आहे. नारळाच्या आतील खोबरे, ओले, वाळलेले, नारळाचे दूध तीनही वेगवेगळय़ा प्रकारे आरोग्य राखण्याचे व रोगनिवारण्याचे काम करतात. सुके खोबरे हे अत्यंत शुक्रवर्धक, वीर्यवर्धक, ओजवर्धक आहे. ज्या स्त्री-पुरुषांच्या कमतरतेच्या किंवा कामेच्छा कमी असल्याच्या तक्रारी आहेत त्यांनी नियमित खोबरे खावे.
क्षीण बालके, वाढ न होणारी मुले-मुली, विशेषत: खुरटी स्तन व छाती असणाऱ्यांकरिता सुके खोबरे वरदान आहे. ज्या बाळंतिणीला पुरेसे दूध येत नाही त्यांनी खोबरे जरूर खावे. दुधाचे प्रमाण वाढते. ज्या स्त्रियांना आपल्याला गोरीपान व तेज:पुंज संतती व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी नियमाने खोबरे गर्भारपणी खावे. उत्तम संतती होते. कंपवात विकारात कृश व्यक्तीकरिता खोबरे नियमित खाणे चांगले, त्यामुळे मज्जातंतूंचे पोषण होते. कापणे कमी होते.
धातूक्षयामुळे ज्यांना मुंग्या येतात. जास्त बोलणे किंवा विचार, मगजमारी यामुळे क्षीणता येते त्यांनी खोबरे, साखर खावी. दुबळेपणाच्या तक्रारी असणाऱ्यांना जर पोटात वायू धरण्याची खोड असली तरी त्यांनी खोबऱ्याबरोबर आल्याचा तुकडा किंवा सुंठचूर्ण खावे. ज्यांना मलावरोधाची सवय आहे त्यांनी कोरडय़ा खोबऱ्याऐवजी ओला नारळ आपले दुबळेपणाकरिता वापरावा. कोरडे खोबरे भाजून खाल्ले तर पोटात वायू धरत नाही. पचायला सोपे जाते. नेत्रक्षीणता, वाचण्याचे खूप श्रम यामुळे डोळे थकणे याकरिता सकाळी रिकाम्यापोटी खोबरे चावून चावून खावे.
नारळाचे तेल घरच्या घरी
तुम्ही आम्ही केसांकरिता बाजारातून खोबरेल आणतो. असे तेल आणण्यापेक्षा एकवेळ पुढील प्रयोग जरूर करावा. एक मोठा नारळ आणावा. त्याचे ओले खोबरे खवणीने खवावे. त्या ओल्या खोबऱ्यात थोडेच पाणी मिसळून ओल्या खोबऱ्याचे दुधासारखे पातळ मिश्रण तयार करावे. ते रात्रभर फ्रीजमध्ये ठेवावे. सकाळी वर तरंगून आलेला लोण्यासारखा पातळ भाग वेगळा करून अत्यंत कमी उष्णतेवर एका भांडय़ात गॅसवर आटवावा. वर उत्तम दर्जाचे ‘नारिकेल तेल’ तयार होते. असे ओल्या खोबऱ्याचे तेल घरगुती तुपापेक्षा उत्तम गुण देते. ते केसांना तर वापरावेच पण त्यापेक्षाही त्या नारिकेल तेलाचा उपयोग नियमितपणे अल्प प्रमाणात पोटात गेल्यास; गुडघे व इतर सांध्यांच्या वंगण शुद्धीकरिता होतो. गुडघ्यातून येणार कट्कट् आवाज अशा रोगापासून ते गुडघे व खुबे बदलण्याचा, महाभयंकर, महागडय़ा अस्थिविकारात असे ताजे तेल शंभर टक्के गुण महिना-दोन महिन्यात देते. अधिक माहितीकरिता ‘अनेकानेक वातविकारांकरिता अनुभूत आयुर्वेदीय चिकित्सा’ पुस्तकाचा आधार घ्यावा.
आमचे आयुर्वेदातील गुरुजी वैद्य दत्तूकाका शेण्डय़े त्यांच्या सर्व रुग्णांना ‘ख’ पदार्थाचे टॉनिक सांगायचे. खोबरे, खारीक, खसखस, खडीसाखर व खरबुजाच्या बियांमधील मगज. ‘रंगीबेरंगी’ टॉनिकांच्या बाटल्यांपेक्षा हे टॉनिक अनेकपट चांगले. गळू, फोड पिकावयास हवे असतील तर खोबरे व कांदा ठेचून शिजवून त्याचे पोटीस बांधावे. पुवाचा निचरा आपोआप होतो किंवा गळू, फोड आपोआपच बसून जातात. ज्यांना आपल्या मुलांचे दात बळकट व्हावयास हवे आहेत त्यांनी मुलांना रोज एक खोबऱ्याचा तुकडा चावून चावून खावयास सांगावे. नंतर चुळा भराव्यात. जिथे कॉडलिव्हर ऑईल किंवा अन्य प्रकारची टॉनिक खाण्याकरिता वापरली जातात त्याला आपले खोबऱ्यासारखे पदार्थ वापरून पाहावयास हवे. तुलनेने खोबरे स्वस्त आहे. ज्यांना नेहमी थंडी वाजते, खूप पांघरुण घ्यावेसे वाटते, पाय चेपावेसे वाटतात अशा वातविकारात सुके खोबरे खावे. त्यामुळे रक्त वाढते, व्हायटॅलिटी सुधारते.
नारळ वरून खडबडीत, टणक असला तरी आतले ओले खोबरे कोणालाही हवेहवेसेच वाटते. महागडय़ा बदाम, बेदाणा, आक्रोडापेक्षा ओल्या, सुक्या खोबऱ्याशी मैत्री करा. हाडाच्या हट्टीविकारांना, मगजमारीला दूर ठेवा.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य -response.lokprabha@expressindia.com