मान्सून डायरी
‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या तिसऱ्या टप्प्याचा प्रवास मान्सूनबरोबर सुरू आहे. या वेळी सरस्वती नदीच्या टापूमध्ये फिरून सगळ्या मध्य भारतातल्या पावसाचा, त्यातून विकसित झालेल्या संस्कृतीचा, त्यातून निर्माण झालेल्या वैविध्याचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.
या वर्षी जून महिन्यापासून या ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या तिसऱ्या टप्प्यातला पहिला भाग अगुम्बे ते म्हसवड असा होता. अगुम्बे हा कर्नाटक राज्यामधला प्रदेश. पश्चिम घाटातला सर्वात अधिक पाऊस इथे पडतो. तिकडून महाराष्ट्रातला दुष्काळी भाग म्हणजे माण तालुका असा पहिल्या टप्प्यातला प्रवास या गटाने पूर्ण केला. यामध्ये घाट, कोकण आणि काही दुष्काळी प्रदेशांतला मान्सून या गटाने अनुभवला होता. या पहिल्या भागामध्ये पंधरा जण सहभागी झाले होते. या पंधरा जणांमध्ये काही पीएच.डी. करणारे होते, ते अगदी अकरावी-बारावीमधले विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.
गेल्याच आठवडय़ात या गटातल्या मयूरेश प्रभुणे आणि मंदार मोरवणे यांनी तिसऱ्या टप्प्यातल्या दुसऱ्या भागाची सुरुवात केली. हा प्रवास पुण्यापासून परत पुण्याला येईपर्यंत असा पाच हजार किलोमीटरचा असणार आहे. मार्ग साधारणत: पुण्याहून दिल्ली- हरियाणा- आदिबद्री- तेथून उलटा प्रवास पश्चिमेकडे आहे. हा प्रवास कुरुक्षेत्रवरून राचीगढी जे प्राचीन संस्कृतींचे अवशेष असलेले मोहंजोदडोपेक्षाही पुरातन आणि अजून उत्खनन न झालेले ठिकाण असा आहे. त्यानंतर शिरसाह हे ठिकाण जिथे सरस्वतीच्या सात उपनद्या एकत्र येतात ते ठिकाण, या ठिकाणाचा उल्लेख महाभारतामध्येही सापडतो. त्यानंतर राजस्थानमधले कालीबंग नावाचे ठिकाण. त्यानंतर मग जैसलमेरला जिथे अत्यंत कमी पावसाचे प्रमाण असते तिथे ते येणार आहेत. मग दक्षिणेला येऊन गुजरातमधल्या धोलविराज, मग कच्छच्या भागात ते येणार आहेत. तिथून नारायण सरोवर. इथे येईपर्यंत या गटाने सरस्वती नदीचा संपूर्ण मार्ग पाहिला असेल आणि त्यामुळेच पुरातन काळात मान्सून कसा होता हेही समजायला मदत होईल अशी या गटाची अपेक्षा आहे.

प्रोजेक्ट मेघदूत.. आत्तापर्यंत
तीन वेगवेगळ्या पद्धतींनी तीन वेगळ्या भागांमध्ये मान्सूनच्या प्रवासाचा वेध घेत प्रोजेक्ट मेघदूताचा प्रवास सुरू आहे. या तिन्ही वर्षांमधल्या प्रवासाचा रस्ता वेगळा, अभ्यासाचं स्वरूप वेगळं, उद्देश वेगळा. मात्र, या तीनही वर्षांमधल्या प्रवासामागचं सूत्र एकच. भारतातल्या मान्सूनचा शोध. या शोधामध्ये केवळ याचा हवामानशास्त्रीय दृष्टिकोन बघितला गेला नव्हता. तो या सगळ्या अभ्यासाचा उद्देशही नाही. या अभ्यासामधून ‘प्रोजेक्ट मेघदूत’ गटाला भारत समजून घ्यायचा होता, भारतातल्या विविध परंपरा, संस्कृती, माणसं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रथा.. आणि या सगळ्याला जोडणारा एक समान धागा- तो धागा म्हणजे मान्सून.
या संपूर्ण भारताला जोडणाऱ्या धाग्याचा अभ्यास करताना तो एकूण पाच टप्प्यांत करायचा असे नियोजन केले होते. हे नियोजन पाच वर्षांचे होते. या नियोजनानुसारच आजपर्यंत ‘प्रोजेक्ट मेघदूत’ गटाने आपला प्रत्येक वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. ‘प्रोजेक्ट मेघदूत’च्या पहिल्या वर्षी हा प्रवास पश्चिम घाटापासून केला. हा पहिल्या वर्षांचा प्रवास २०११ सालच्या जूनच्या पहिल्या आठवडय़ामध्ये केला गेला होता. पहिल्या वर्षीची थीम होती विविधता. मान्सूनची विविध रूपं पाहण्याच्या उद्देशाने या प्रवासाचे नियोजन केले गेले होते. मान्सून जेव्हा पश्चिम घाटात पोहोचतो तेव्हा आपल्याला बरीच विविधता पाहायला मिळते. विविधता फक्त पावसाची किंवा निसर्गाची नाही पण माणसांमध्येही आपल्याला विविधता बघायला मिळते. त्यामुळे पहिल्या वर्षी या टीमला ही विविधता आणि या विविधतेमुळे होणारे परिणाम, हेदेखील पाहायला मिळाले. म्हणजे अगदी काही बदलत्या व्यावसायिक गरजांमुळे बेरोजगार झालेले मच्छीमार दिसले आणि त्याचबरोबर पावसाळ्याच्या या चार महिन्यांत नवीन तंत्रज्ञान वापरून, मग ते पर्यावरणाला कितीही घातक का असेना, तर ते तंत्रज्ञान वापरून कोटय़धीश झालेले मच्छीमारही बघायला मिळाले. पहिल्या वर्षीचा अनुभव गाठीशी बांधून ‘प्रोजेक्ट मेघदूत’ गट काही नव्या अभ्यासकांबरोबर दुसऱ्या वर्षीच्या मान्सूनचा वेध घ्यायला सज्ज झाला होता.

हा संपूर्ण भाग पश्चिम भारताचा म्हणजे गुजरात, हरियाणा, राजस्थान. या भागांतल्या सर्व पुरातत्त्व अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी स्थळे आहेत. ही सर्व स्थळे हडप्पा-मोहंजोदडो या काळाची आहेत. ही अशी स्थळे आहेत की ज्यांचा कालावधी पाच हजार वर्षांपूर्वीचा होतो. म्हणजे साधारण ख्रिस्तपूर्व तीन ते साडेतीन हजार वष्रे! ही संस्कृती त्या काळाची सर्वात प्रगत अशी संस्कृती होती. आजची परिस्थिती पाहिली तर आज या सर्व भागांत खूप कमी पाऊस पडतो. पंजाब, हरियाणा या राज्यांतही आपण पाहिले तर तिथे पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. या राज्यांना पाणी मिळते ते हिमालयातल्या नद्यांमुळे, तिथला बर्फ वितळून मिळणारे पाणी आहे. म्हणूनच, या हिमालयातल्या नद्यांमुळेच हा प्रदेश शेती क्षेत्रामध्ये विकास करू शकला आहे.  हा पाऊस, जसे जसे आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे जायला लागू तसा तसा आपल्याला तो कमीच होताना दिसतो. याचे मुख्य कारण म्हणजे या भागात समुद्रापासूनच अंतर कमी कमी होत जाणारे आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला मान्सूनचे वारे पोहोचायला इथे वेळ लागतो आणि ते पोहोचले तरी त्यांची तीव्रता, म्हणजेच त्यांच्यामधल्या बाष्पाचे प्रमाण फारच कमी झालेले असते. काही वेळा या भागाला पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळेही मिळतो. मयूरेशने सांगितल्याप्रमाणे या दोन्ही वाऱ्याचे जर एकत्रित प्रमाण काढले तरी या पश्चिम भारतातल्या पावसाचे प्रमाण हे अतिशय कमीच दिसते.
प्राचीन संस्कृती आणि पाऊस
या अतिशय कमी प्रमाणातल्या पावसाचे आणि या प्रगत प्राचीन संस्कृतींचे नाते कसे बनले? कारण आपण पहिल्याप्रमाणे ज्या भागांमध्ये भरपूर पाऊस, सुपीक जमीन, तिथेच प्राचीन संस्कृती उदयाला आल्या, वाढल्या आणि प्रगत झाल्या. मग, या कमी पावसाच्या प्रदेशात या प्रगत संस्कृती कशा निपजल्या? हे भाग सुपीक झाले ते कशाने? हिमालयांमधल्या नद्यांमुळे? पण, भूगोल पहिला तर या नद्या जशा जशा पश्चिमेला खाली येतात तशा तशा त्या पाकिस्तानच्या दिशेने जायला लागतात आणि नंतर समुद्राला मिळतात, मग पश्चिमेकडचा खालचा भाग कोरडाच राहतो. मग या भागामध्ये या वेगवेगळी संस्कृती कशी विकसित झाली? अशाच प्रश्नांचा शोध घेताना ‘प्रोजेक्ट मेघदूत’ गटाला काही शोधनिबंध वाचायला मिळाले. या शोधनिबंधांमधून त्यांच्या लक्षात असे आले की, या भागामधून साधारणत: ख्रिस्तपूर्व २५०० ते १९०० या कालखंडात पाऊस आणखी पूर्वेकडे वळला. म्हणजेच पावसाचे प्रमाण पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकायला लागले. त्यामुळे पश्चिमेकडे जो चांगला पाऊस सुरू होता तो हळूहळू कमी होत गेला. हा जो काहीशे वर्षांचा कालखंड आहे या कालखंडामध्ये या सर्व प्रदेशांतल्या नद्या कोरडय़ा पडत गेल्या आणि त्यामुळेच आजूबाजूला वसलेली मानव-वस्तीही पूर्वेकडे वळायला लागली. त्यामुळे या भागांत विकसित झालेली संस्कृती हळूहळू लोप पावायला लागली.
सरस्वती नदीचा शोध
या नद्यांचा अभ्यास केला, त्यांचा भूगोल पाहिला तर आपल्याला असे लक्षात येईल की, या सर्व नद्या सरस्वती नदीशी जोडल्या गेल्या आहेत. मग या गटाने हा सरस्वतीच्या मार्गाचा अभ्यास केला. त्या अभ्यासामधून असे लक्षात आले की, हा सरस्वती नदीचा मार्ग शिवालिक पर्वतरांगांपासून सुरू होतो. तिथून तो हरियाणा, पंजाब, राजस्थान असे करत करत त्याला दोन शाखा फुटतात. एक शाखा कच्छच्या मार्गाने अरबी समुद्रात जाते. या मार्गाची दुसरी शाखा पाकिस्तानच्या माग्रे जाते. ती शाखा परत कच्छमध्ये येऊन परत अरबी समुद्राला मिळते. सरस्वती नदीचा हा जो मार्ग आहे, साधारण याच मार्गावरून ‘प्रोजेक्ट मेघदूता’च्या गटाला यावर्षी फिरायचे होते. म्हणूनच या वर्षी या गटाने या पुढच्या मार्गाची थीम ‘सरस्वती नदीचा शोध’ अशीच ठेवली. टीम याच सरस्वतीच्या मार्गावरून मान्सूनचा पाठलाग करणार होती.
मागच्या वर्षी या गटाने जेव्हा मान्सूनचा पाठलाग मध्य भारतातून केला तेव्हा त्यांना मान्सूनचे आताच्या संस्कृतीवर होणारे परिणाम अनुभवायला मिळाले. तर या वर्षी ही टीम प्रमुख दोन गोष्टी पाहायला उत्सुक होती. एक तर, सरस्वती नदीचा शोध घेताना त्या सर्व पुरातनकालीन स्थळांवर ते जाणार होते. ते फिरताना त्या काळाची संस्कृती आणि त्याच्यामध्ये त्या वेळेच्या चांगल्या पावसाबद्दलच्या काही खुणा त्यांना तपासता येणार होत्या. त्याचबरोबर, आज या क्षेत्रात कमी पाऊस असल्यामुळे आज तिथले लोक कसे निभावत आहेत हे त्यांना पाहायला मिळणार होते. त्यामध्ये त्यांची शेती, पशुपालन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आणि इतर जलव्यवस्थापन पाहणे असा त्यांचा उद्देश होता.
पावसापासून सुरू होणारे कालमापन
या वेळेला मागच्या वर्षी ज्या भागात थांबता आले नाही तिथे थांबून काही लोकांशी बातचीत या गटाने केली. यामध्ये भिल्ल आणि भिलाला या जमातीची लोक होती. यांच्याकडून काही महत्त्वाच्या गोष्टी कळल्या. त्या म्हणजे या लोकांकडे पावसाचे निरीक्षण करण्यासाठी काही पद्धती आहेत, पण दुर्दैवाने त्यांच्या तरुण पिढीला याबद्दलची काहीही माहिती नाही. त्यानंतर हा गट राजस्थानमध्ये गेला असताना त्यांना तिकडचा एक भिल्ल जमातीतला इसम भेटला. त्यांनी त्याला महिने विचारले असता तर तो आषाढ, श्रावण, भाद्रपद अशी नावे सांगायला लागला. वर्ष सुरू कधी होते असे विचारले तरी आषाढ.. श्रावण.. भाद्रपद! तर कारण असे होते की, आज ते लोक इंग्रजी कालमापन वापरत असले तरी त्यांचे कालमापन हे पावसापासून सुरू होते. म्हणजे पाऊस जेव्हा सुरू होतो तेव्हा त्यांचा नवा महिना सुरू होतो. अश्विनपर्यंत त्यांचा पावसाचा महिना असतो. त्यांच्यामधल्याच दुसऱ्याला पाऊस कधी पडेल असे विचारले तर त्याचे उत्तर फारच वेगळे होते. त्याचे म्हणणे होती की माणसाचा जसा गर्भ नऊ महिन्यांचा असतो, तसाच तो पावसाचा असतो. मग तो कसा मोजायचा? तर आषाढपासून मागे नऊ मोजत जायचे. अशा प्रकारे त्यांना बरोब्बर तीन महिने हे पावसाळ्याचे मिळतात.

मान्सून आणि मेघदूत
प्रोजेक्ट मेघदूतचे दुसरे वर्षे सुरू झाले २०१२च्या जून महिन्यामध्ये. या वर्षी मध्य भारतातून मान्सूनचा पाठलाग करायचा असे नियोजन होते. या वर्षी फक्त मध्य प्रदेश हे राज्य घेतले होते. म्हणजे महाराष्ट्रातल्या विदर्भापासून ते बुंदेलखंडपर्यंत असा प्रवास योजला होता. मध्य भारतामध्ये मुख्यत: दोन भागांमधले नर्ऋत्य मोसमी वारे एकत्र येतात. साधारण मध्य प्रदेशाच्या मध्यात, अरबी समुद्राकडून येणारे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे एकत्र येतात. त्यामुळे या भागामध्ये पाऊस नेमका कोणत्या वाऱ्यांमुळे आहे ते कळत नसतं. हा सगळा प्रदेश ऐतिहासिकदृष्टय़ाही खूप महत्त्वाचा मानला जातो. इथे काही प्राचीन राजवटी होऊन गेल्या म्हणून आणि शेतीच्या दृष्टीनेही या भागाचे महत्त्व फार आहे. या भागातही आपल्याला बरीच भौगोलिक विविधता पाहायला मिळते. टेकडय़ांबरोबरच इथे बरीचशी सपाट जमीनही पाहायला मिळते. भौगोलिक विविधतेबरोबरच किंवा म्हणूनच इथे खाद्यपदार्थामध्येही बरीच विविधता पाहायला मिळाली. या सगळ्याच गोष्टींमध्ये पाऊस नेमका कसा काम करतो हे या गटाला पाहायचं होतं. याला धरूनच अजून एक धागा या गटाने पकडला होता आणि तो म्हणजे जगप्रसिद्ध अशा ‘मेघदूत’ या काव्याचा. या काव्यामध्ये उल्लेख केलेल्या मार्गावरून जायचं आणि त्या काव्यामागचा अर्थ ओळखायचा असेही काम या गटाने करायचे ठरवले होते. कालिदासाने लिहिलेल्या या मेघदूत काव्यातल्या ढगाचा प्रवास महाराष्ट्रामधल्या रामटेकपासून सुरू होऊन तो कुरुक्षेत्रापर्यंत जाऊन संपतो. हा सर्व भाग हा मध्य भारतामध्ये येतो. म्हणूनही या मार्गाचा अभ्यास करायचा असे ठरवले होते. या दुसऱ्या टप्प्यात मेघदूताचा मार्ग बघता बघता हाच मान्सूनचा मार्ग आहे हे या गटाच्या लक्षात आले. दुसऱ्या टप्प्यातल्या अभ्यासामध्ये मान्सूनचा आणि मेघदूत या काव्याचा संबंध लावणे आणि त्यानुसार आत्ताच्या परिस्थितीचे विश्लेषण करणे हे खूपच मूलभूत काम ‘प्रोजेक्ट मेघदूत’ गटाने केले.

रेवाडी समाज
राजस्थानमधल्या चित्तोडगढ जिल्ह्य़ातला हा रेवाडी समाज महाराष्ट्र किंवा कर्नाटकमधल्या धनगराशी मिळताजुळता आहे. ते पावसाळ्याचे चार महिने आपल्या गावी परत येतात आणि बाकीचे महिने आपल्या जनावरांना घेऊन बाहेर असतात. राजस्थानमधून ते नर्मदेच्या खोऱ्यामध्ये येतात. तिथे पावसाची चिन्हे दिसली की परत आपल्या गावी परत जातात. ज्यांच्याकडे जमीन आहे ते शेती करतात. महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचाही असाच काहीसा प्रवास असतो. म्हणजेच, जे जनावरांवर अवलंबून असतात किंवा शेतीवर अवलंबून असतात, त्यांचा प्रवास हा या पावसालाच धरून आखलेला असतो. या एका उदाहरणामधून आपल्याला देशभरातला मान्सूनच्या काळातला स्थलांतराचा एक मुद्दा ठळकपणे दिसून येतो.
मिराशी आणि नाथजोगी समाज
पाऊस बघता बघता अनेक वेळा काही विलक्षण माणसे भेटतात. त्यातलाच हा मिराशी समाज आणि नाथजोगी समाज. यांची खासियत अशी की हे लोक नमाजपण पढतात आणि त्याचबरोबर पूजाअर्चाही करतात. या समाजाने धर्मातर करून इस्लाम धर्म स्वीकारलेला. ते ढोलकी बनवायचे आणि व्यापारी लोकांच्या नोंदी ठेवायचे काम करायचे. आता ढोलकीही गेली आणि नोंदी ठेवायच्या वेगळ्या पद्धती विकसित झाल्या. त्यांचे परंपरागत व्यवसाय गेले आणि त्यामुळे आता ते रस्त्याची कामे करत आहेत.
तसेच नाथजोगी हे परंपरागत पीठ दळून देणारे. पण इलेक्ट्रॉनिक पीठ गिरण्या आल्यावर त्यांचा व्यवसाय एकाएकी बंद झाला. आता हे लोक मशीनला ग्रीस लावून देणे अशा व्यवसायात आले आहेत. हे दोन्हीही समाज एका छोटय़ाशा जमिनीच्या तुकडय़ावर पालं करून राहात होते. त्याच्यापकी कोणाच्याही स्वत:च्या जमिनी नव्हत्या. गिरणी आल्यावर त्यांचा व्यवसाय बंद झाला. दुसरा कोणताच उद्योग करायचे त्यांच्याकडे कौशल्य नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडे स्वत:ची जमीन नाही! करणार काय? शिक्षण अत्यंत कमी. आपण आपल्या राहणीमानात काही बदल करतो तेव्हा एखाद्या समूहाचा व्यवसायच बंद पाडत असतो. पण असे बदल करताना आपल्याला हे लक्षात येत नाही. या आणि अशा गोष्टींचा या मान्सूनच्या अनुषंगाने समाजशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास व्हायला हवा आहे, असे ‘प्रोजेक्ट मेघदूत’ला वाटते.
भारतात अनेक ठिकाणी या कामाच्या निमित्ताने िहडताना काही गोष्टी स्पष्टपणे लक्षात आल्या असे मयूरेश म्हणतो. त्याच्या मते भारतातल्या कुठल्याही व्यवस्था बघा, त्यांचा एकटा विचार करताच येणार नाही. व्यवस्था असो, जमाती असोत, त्यांच्या परंपरा असोत, त्यांचे व्यवसाय असो हे सगळं एका मोठय़ा जाळ्याचा भाग आहे. प्रत्येक धाग्याच्या अस्तित्वाला काही कारण आहे, प्रत्येक धागा दुसऱ्या धाग्याशी जोडला गेला आहे. तो सुटा नाही. प्रत्येकाला एक इतिहास आहे, परंपरा आहे. हेच चित्र भारतात कुठेही जा, आपल्याला दिसून येते. प्रत्येक माणूस, त्याची एक गोष्ट आणि ती गोष्ट त्याच्यासारख्याच अनेक माणसांच्या गोष्टीशी कुठेतरी जोडली गेलेली!
अशाच अनेक गोष्टी ऐकण्यासाठी कुरुक्षेत्रापासून पुढे ‘प्रोजेक्ट मेघदूत’ प्रवास आता सुरू झाला आहे.

Story img Loader