जनगणमन आणि वंदेमातरम् सगळेचजण म्हणतात. पण ते म्हणताना त्यामागचा इतिहास आपल्याला माहीत असतो का?

चो वीस मार्च १९३१.
भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिघांच्या फाशीचा ठरलेला दिवस. फाशीची वेळ पहाटे सहा वाजता. आदल्या दिवशी- २३ मार्चला गांधीजींनी व्हाइसरॉयला पत्र लिहिलं होतं- ‘फाशी देण्याचे कृत्य हे माघारी न घेता येणारे कृत्य आहे. तुम्हाला जर अशी थोडीदेखील शंका असेल, की निकालाबाबत थोडी चूक झाली असेल, तर मी तुम्हाला अगदी कळकळीने सांगू इच्छितो की, पुन्हा विचार करण्यासाठी, फाशी देण्याच्या कृतीला काही काळ स्थगिती द्या.’
घडलं विपरीतच. कदाचित दुसऱ्या दिवशी अपेक्षित जनक्षोभाच्या भीतीनं २३ मार्चलाच संध्याकाळी सात वाजता फाशी देण्याचा हुकूम निघाला! मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जीव ओवाळून टाकलेले तिघेही देशभक्त, फाशीच्या दोराचे चुंबन घेत मृत्यूला सामोरे गेले. शहीद झाले.. तेव्हा तोंडी शब्द होते,
‘वंदे मातरम्!’
काय विलक्षण जादू होती त्या शब्दांत! १८५७चं बंड आणि नंतरच्या वासुदेव बळवंत फडके यांच्या स्वातंत्र्यलढय़ाशी समांतर जाणारी ‘आनंदमठ’ ही बंकिमचंद्र चटर्जीची कादंबरी १८८०-८२च्या सुमाराची. ‘वंदे मातरम्’ हे गीत त्या कादंबरीतून लोकांसमोर आलं, तरी ते लिहिलं होतं १८७६ सालीच. या गीताचं पहिलं जाहीर गायन रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६च्या काँग्रेस अधिवेशनात केलं, आणि ते प्रचंड लोकप्रिय झालं. नंतरच्या स्वातंत्र्यलढय़ात हजारो देशभक्तांनी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करीत प्राणाहुती दिली, त्यात हिंदूंबरोबर असंख्य मुस्लीम क्रांतीकारकदेखील होते!
हिंदू-मुस्लीम ऐक्य ब्रिटिशांना कधीच परवडणार नव्हतं. त्यांच्या ‘डिव्हाइड अॅन्ड रुल’या धोरणानुसार १९०६ साली ‘मुस्लीम लीग’चा झालेला जन्म ही चाळीस वर्षांनंतर झालेल्या फाळणीची नांदी होती. १९३३ साली बॅ. जिना एके ठिकाणी म्हणाले होते. ‘खऱ्याखुऱ्या हिंदू- मुसलमान ऐक्याशिवाय हिंदुस्थानला कसलीही आशा नाही.’ तेच जिना १९३८ साली अलिगड अँग्लो-मुस्लीम कॉलेजात म्हणाले, ‘हिंदू- मुस्लीम ऐक्याची आशा धरण्यात अर्थ नाही..’ काँग्रेसच्या कामकाजातून, सभांतून हे ‘वंदे मातरम्’ गीत वगळलं जावं अशी मागणी त्याच सुमारास पं. नेहरूंजवळ केली. गांधीजींना स्वत:ला हे गीत अतिशय आवडत असे, परंतु हिंदू व मुस्लीम समाज एक होण्याआड येणाऱ्या वा अडचण निर्माण करणाऱ्या गोष्टींचं त्यांनी कधीच समर्थन केलं नाही. मात्र काँग्रेसमधून बाहेर पडून आझाद हिंद सेना स्थापन करणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी या गीताला ‘राष्ट्रीय दर्जा’ दिला. ते म्हणत, ‘या गीताला दुसरा कुठलाच पर्याय होऊ शकत नाही, इतकं ते स्वातंत्र्य लढय़ाशी एकरूप झालं आहे!’ मात्र हे गीत प्रथम जाहीररीत्या गाणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांनी सुभाषचंद्र बोस यांना १९३७ साली लिहिलेल्या एका पत्रात म्हटलं होतं, ‘वंदे मातरम्’ची मुळं बंगाली समाजाशी-कालिमातेशी निगडित आहेत यात शंका नाही. त्यामुळे मुसलमान व्यक्तीने ते म्हणण्याची अपेक्षा करणं योग्य नव्हे. दोन्ही समाजात ‘वंदे मातरम्’विषयी तीव्र भावना असल्यामुळे, यात योग्य तोल सांभाळणारा निष्कर्ष काढणं महत्त्वाचं आहे. राजकीय आकांक्षांपूर्तीबरोबरच एकता, शांतता आणि सद्भावना जपण्याची रास्त अपेक्षा आहे. एका समाजाच्या मागणीसाठी दुसऱ्या समाजावर अन्याय, असा संघर्ष हितावह नाही!’ स्वातंत्र्यपूर्व काळात ‘वंदे मातरम्’ संदर्भात असा बराच विचारकलह झाला.
स्वातंत्र्यलढय़ात जनमानसात उतरलेलं दुसरं लोकप्रिय गीत म्हणजे डॉ. महंमद इक्बाल यांनी लिहिलेलं, ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा! १६ ऑगस्ट १९०४ला लिहिलेलं हे गीत त्याकाळी अघोषित राष्ट्रगीतच झालं होतं. गांधीजीदेखील त्यांच्या सभांतून या गीताचा उल्लेख करीत असत. महंमद इक्बाल यांचे तीनशे वर्षांपूर्वीचे पूर्वज काश्मिरी ब्राह्मण होते. स्वत: इक्बाल निधर्मी मानवतावादी होते. पण १९०८च्या दरम्यान लंडनहून बॅरिस्टर होऊन आलेले ‘कवी इक्बाल’ आमूलाग्र बदलले. त्यांच्या अजरामर गीताचे संदर्भ बदलले. शब्ददेखील बदलले..
‘चीनो-अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा,
मुस्लीम है, वतन है, सारा जहाँ हमारा!’
मुस्लीम लीगच्या १९३०च्या अलाहाबाद येथील अधिवेशनात, वायव्येकडील इस्लामी प्रांतांना एकत्र करून, वेगळं मुस्लीम राज्य (राष्ट्र नव्हे) करण्याचा विचार त्यांनीच प्रथम मांडला. मात्र बॅ. जिनांच्या सूचनेनुसार वेगळय़ा ‘पाकिस्तान’ राष्ट्राच्या चळवळीला मान्यता देण्याचा निर्णय, १९३८च्या अधिवेशनात घेतला. पण तत्पूर्वी २१ एप्रिल १९३८ रोजी बॅरिस्टर महंमद इक्बाल या कवीचं निधन झालं होतं! १९४७च्या रक्तलांच्छित फाळणीच्या काळात ते जिवंत असते, तर कदाचित त्यांना त्यांच्या बदललेल्या विचारांचा पश्चात्ताप झाला असता. कारण मूलत: कविप्रकृतीच्या, तत्त्वज्ञ असलेल्या इक्बाल यांचा मानवतेवर विश्वास होता. त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे, ‘सारे जहाँ से अच्छा’ हे राष्ट्रगीत होता होता राहिलं!
‘जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता,’ हे कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं गीत प्रथम जाहीरपणे गायलं गेलं, ते २७ डिसेंबर १९११ रोजी काँग्रेस अधिवेशनात. दुसऱ्याच दिवशी इंग्रजी वर्तमानपत्रांतून ते गीत ‘राजा पंचम जॉर्जच्या’ स्वागतासाठी गायलं गेलं, असं खोडसाळपणे छापून आलं. (वास्तविक ‘पंचम जॉर्ज स्तुतीपर’ गीत रामभुज चौधरी यांनी हिंदीतून गायलं होतं.) अन् आरोपांचं वादळ उठलं. रवींद्रनाथ टागोर त्यासंदर्भात इतकंच म्हणाले, ‘इंग्रज राजा पंचम जॉर्ज यांच्या स्वागताप्रीत्यर्थ मी हे गीत लिहिण्याचा मूर्खपणा करीन, असा आरोप करणाऱ्यांना उत्तर देणं हाच मला अपमान वाटतो!’ पुढे ‘फ्री स्टेट ऑफ इंडिया’ने १९४३ ते ४५ या काळात ‘जनगणमन’चा राष्ट्रगीत म्हणून उपयोग केला. मात्र तत्पूर्वी १९४१ साली रवींद्रनाथांचा जीवनपट संपला होता!
१५ ऑगस्ट १९४७ला भारत स्वतंत्र झाला, तेव्हा पहिला बळी पडला माणुसकीचा. सहा लाखांवर (हा सरकारी आकडा) स्त्री- पुरुष-मुलांचा भीषण हत्याकांडात बळी गेला. ‘फाळणीला जबाबदार कोण?’ यावर आज सदुसष्ठ वर्षांनंतरदेखील हिरिरीने वाद घातले जातात, तेव्हा ‘हत्ती आणि आंधळे’ या गोष्टीतलं मर्म कळतं, एवढंच. थोडक्यात, जसं मिळालं तसं स्वातंत्र्य आपण स्वीकारलं, हे सत्य.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रगीत ठरविताना पुन्हा वादविवाद झालेच. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर ‘वंदे मातरम्’ला ते स्थान मिळावं ही सर्वसामान्यांची अपेक्षा. पाकिस्तान ‘इस्लामिक प्रजासत्ताक’ झालं तरी भारताने ‘धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक’ पद्धती स्वीकारल्यामुळे, पं. नेहरूंनी ‘जनगणमन’ला पुष्टी दिली. पहिल्या प्रजासत्ताक दिनी, पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या सूचनेनुसार ‘जनगणमन’ हे राष्ट्रगीत (National Anthem), तर ‘वंदे मातरम्’ हे ‘राष्ट्रीय गीत’ (National Song) घोषित झालं. राष्ट्रगीताचं महत्त्व तर निर्विवाद, तरीदेखील ‘वंदे मातरम् व सारे जहाँसे अच्छा’ या गीतांचा प्रभाव स्वातंत्र्योत्तर काळातदेखील आजवर कायम राहिला.
‘वंदे मातरम्’ हे संपूर्ण गीत १९५२ साली ‘आनंदमठ’ या चित्रपटात लोकांसमोर आलं, अन् अजरामर झालं. १९६२च्या चिनी आक्रमणानंतर, ‘ए मेरे वतन के लोगो’ हे स्वातंत्र्योत्तर काळातील आजवरचं सवरेत्कृष्ट देशभक्तीपर चित्रपटबा गीत देणाऱ्या कवी प्रदीप यांच्यावरदेखील ‘वंदेमातरम्’चा पगडा होताच. १९५४च्या ‘जागृती’साठी त्यांनी लिहिलं, ‘इस मिट्टीसे तिलक करो, ये धरती है बलिदान की वंदे मातरम्!’ तर कवी महंमद इक्बाल यांनी नंतर शब्द बदलले तरी त्यांचे मूळ ‘सारे जहाँसे अच्छा,’ हे गीत स्वातंत्र्यानंतर ‘हिंदोस्ताँ हमारा’, ‘अपना घर’ आणि ‘भाई बहन’ या तीन चित्रपटांत येऊन गेलं. १९५८च्या ‘फिर सुबह होगी’मध्ये साहीर लुधियानवी, स्वातंत्र्यानंतर जाणवू लागलेल्या विदारक सत्यावर उपरोधिकपणे लिहून गेला..
चीनों-अरब हमारा, हिंदोस्ताँ हमारा,
रहने को घर नही है, सारा जहाँ हमारा!
बेकारी, महागाई, सामाजिक विषमता, भ्रष्टाचाराबरोबरच, हिंदू-मुसलमानांमधील वाढत्या तणावाची, भीषण सत्याची जाणीव झाली, १९९२ साली बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा. त्यानंतर उफाळलेल्या दंगलींमुळे, फाळणीच्या जुन्या जखमा पुन्हा वाहू लागल्या. किरकोळ जखमा तर नेहमीच्याच. छोटय़ा पडद्यावरील अप्रतिम ‘महाभारत’ लिहिणाऱ्या डॉ. राही मसूम रझा यांना हिंदू संघटनांचा विरोध, तर मूळ हिंदू असलेल्या ए. आर. रहेमानने जेव्हा मातृभूमीला सलाम करण्यासाठी ‘वंदे मातरम्’ निवडलं, तेव्हा वादळं उठली! पडद्यावरचा हिंदू बैजुबावरा, ‘मन तरपत हरी दरशन को आज’ हे शकील बदायुनी- नौशाद अली- महंमद रफी यांनी निर्माण केलेलं भजन म्हणतो, वा मुस्लीम अनारकली, ‘दुवा कर गमे दिल, खुदासे दुवा कर..’ या शैलेंद्र-सी. रामचंद्र-लता यांच्या गीतानं खुदाशी नातं जोडते. याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. कारण या धर्मनिरपेक्ष देशात हिंदू-मुसलमान ऐक्य ‘न होण्याची काळजी’ सत्तालोभी राजकारणी-ब्रिटिशांना अनुसरून पुरेपूर घेत आहेत. गैरमार्गानं गोळा केलेली अवैध मालमत्ता, संस्थानिकांना लाजविणारी विलासी राहणी, गुंडगिरीची साथसंगत.. हे सारं उघड झालं तरी त्याचं निर्लज्ज समर्थन, याचं आता सर्वसामान्य जनतेलादेखील काही वाटेनासं झालं आहे. किंबहुना सत्याचा असत्यावर, नीतीचा अनीतीवर, सदाचाराचा भ्रष्टाचारावर विजय हे फक्त सिनेमाच्या पडद्यावरच होतं, या भूमिकेतून जनतादेखील ‘सोयीस्करपणे’ या व्यवस्थेत सामील होत आहे.. वंदे मातरम्!
‘गांधीगिरी’ करणाऱ्या मुन्नाभाईसाठी, पडद्यावर खुद्द गांधीजी जेव्हा अवतीर्ण होतात, तेव्हा पाश्र्वभूमीवर ‘बंदे मे था दम्, वंदे मातरम्’ची धून असते. पण खरंच प्रत्यक्षात जर गांधीजी वा भगतसिंग पुन्हा या देशात आज अवतरले तर?.. ‘टेन्शन नही लेने का, कोई भी आएगा, तो देश की हालत देखकर अपने आप भाग जाएगा,’ असं मुन्नाभाईच्या ‘सर्किट’सारखं म्हणून हात झटकता येतील, परंतु त्यानं सत्य कसं बदलेल?

BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
319 crores received for birth certificates of Bangladeshis and Rohingye says kirit somaiya
“बांगलादेशी, रोहिंग्यांच्या जन्म दाखल्यासाठी ३१९ कोटी आले”… किरीट सोमय्यांनी थेट…
Chief Minister Devendra Fadnavis comments on surname Var and offer to vijay wadettiwar to join BJP
चंद्रपूर : मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘वार’ आडनाव येताच आम्ही हात जोडतो’
Rabindranath Tagore
History of Jana Gana Mana: जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?
Pushkar Singh Dhami
Uttarakhand : डेहराडूनमध्ये ५७ बेकायदेशीर मदरसे, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी उचललं मोठं पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय
This is real patriotism The national anthem is sung every morning at rameshwaram cafe in Hyderabad Watch the beautiful
“हीच खरी देशभक्ती!” हैद्राबादमधील या कॅफेमध्ये रोज सकाळी गायले जाते राष्ट्रगीत! पाहा सुंदर Video
Mahant Ramgiri Maharaj on National Anthem
Mahant Ramgiri Maharaj: ‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’, महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान; टागोर यांच्या नोबेल पुरस्काराबाबत म्हणाले…
Story img Loader