मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी. कॉलेज नावाच्या स्वप्नमयी जगात येऊन थबकलेले मी. अचानक मला ‘स्वातंत्र्य’, ‘स्वच्छंद’ या गोष्टी कळायला लागल्या. मी स्वतंत्र आहे याची जाणीव वगरे व्हायला लागली. स्वातंत्र्य हे पारतंत्र्यातून जन्मत असावं कदाचित. फक्त आपल्याला पारतंत्र्याची जाणीव व्हायला हवी.
‘काय गं कसला इतका विचार करतेस. जेवणात लक्षच नाहीये तुझं. कधीपासून नुसताच भात चिवडत बसलीयेस. काय झालं? बरं नाहीये का?’ जेवणात तिचं लक्ष नाहीये पाहून आईने तिला विचारलं. ‘नाही गं मम्मा. अगं आता शाळेत
१५ ऑगस्टची तयारी सुरू झाली आहे आणि मुख्याध्यापक बाईंनी मला मुलींना घेऊन नाटक बसवायला सांगितलंय. त्याचाच विचार करतेय.’ ‘ओह, इतकंच ना.. इतकं काय टेन्शन त्याचं?’ ‘ अगं मग काय.. शाळेत शिक्षिका म्हणून जॉइन झाल्या झाल्या ही जबाबदारी टाकली गेलीये माझ्यावर. ती नीट पार पाडायला हवी ना.’ ‘पाडशील गं.. छान पार पाडशील. पण, आधी जेवून घे नीट.’
‘आजची स्त्री आणि तिचं स्वातंत्र्य’ तसं लिहिण्यासारखं बरंच आहे पण नेमकेपणाने दाखवता आलं पाहिजे. पण कसं आणि काय दाखवायचं. मुळात स्त्री-स्वातंत्र्य म्हणजे तरी काय आणि हे पाचवी-सहावीतल्या मुलींना समजावून कसं द्यायचं. कितपत माहीत असेल त्यांना. अजिबातच माहीत नसेल. त्यांच्याएवढी असताना मला तरी कुठे माहिती होतं स्त्री-स्वातंत्र्य वगैरे. नकळत ती तिच्या लहानपणीच्या कप्प्यातल्या आठवणी विस्कटायला सुरुवात करते. लहानपणी ‘स्वातंत्र्य’ असा काही शब्द असतो हेही माहीत नव्हतं. फक्क मजा करायची, हुंदडायचं आणि मोठं व्हायचं एवढंच हवं असायचं. लहानपणी लंगडी, लपाछुपी खेळायला काय मजा यायची आणि मारामारी करायलासुद्धा. अशीच एकदा मारामारी आणि मस्ती करून घरी आल्यावर आई म्हणाली, ‘अनू, आता अशी मस्ती नाही करायचीस तू. मुलगी आहेस ना तू.’ म्हणजे आधी मी फक्त अनू होते आता मी ‘मुलगी’ पण झाले होते. पण, म्हणजे नेमकं काय झालं होतं. अनूला काहीच कळलं नव्हतं तेव्हा. एक मात्र झालं होतं. अनूची मजा संपली होती. ‘मुलगी’ नावाच्या चाकोरीत जी मजा, जो आनंद लुटता येणार होता तो आणि तेवढाच तिच्या वाटय़ाला येत होता. हळूहळू मला ते अंगवळणीसुद्धा पडलं. सप्तरंग एकत्र आले की आपण त्यांना वेगवेगळ्या नावाने न ओळखता एकच ‘इंद्रधनुष्य’ म्हणतो. लहानपणीचं ते इंद्रधनुष्य आता विरत चाललं होतं. प्रत्येक रंग वेगळा झाला होता. शाळेत ते अजून जाणवायला लागलं. लहानपणी ज्याच्याबरोबर वेडय़ासारखी मस्ती केलेली तो मित्र मला ओळखही द्यायला तयार नव्हता. सगळंच बदललं. आता मन आणि शरीर दोघांनीही माझ्या मुलगी असण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. पहिल्यांदा पाळी आल्यावर किती भांबावले होते मी. मला काही तरी भयंकर आजारच झालाय असंच वाटत होतं मला. मग नंतर आईने समजावून सांगितल्यावर कळलं की ही पाळी आता आयुष्याची बरीच र्वष आपला पाठलाग करणार आहे. बरं.. पाळी नुसती येऊन थांबली नाही तर तिने आपल्यासोबत अनेक गोष्टी आणल्या. आजीने ‘त्या दिवसात’ देवघरात यायला मनाई केली. आई आणि आजी जरा विचित्रच वागतात, त्या दिवसांत माझ्याशी. अजूनही. मला शाळेतला तो प्रसंगसुद्धा आठवतोय. माझ्या स्कर्टच्या मागे तो डाग लागला होता आणि कोणी तरी मोठय़ाने ओरडलं, ‘ए, तुझ्यामागे बघ कसला डाग लागलाय.’ किती ओशाळलेले मी तेव्हा. आत्ता कोणी तरी यावं आणि मला मारून टाकावं आणि या ओशाळलेपणातून सुटका करावी, असं वाटतं होतं मला. खूप रडले त्या दिवशी घरी येऊन. आणि आत्ता दोन दिवसांपूर्वीच मी ‘तिची’ बातमी वाचली. लंडन मॅरेथॉनमध्ये पाळी चालू असताना सॅनिटरी नॅपकीन किंवा टॅम्पून न वापरता ती धावली. तिच्या पॅण्टवर उमटलेले रक्ताचे डाग बघून तिथल्या लोकांनी नाकं मुरडली. ती मात्र मॅरेथॉन जिंकल्याच्या आनंदात खूश होती. पाळीवर वर्षांनुवषर्र् उमटलेला डाग तिच्या या डागांनी पुसला होता का? मीसुद्धा शॉक झाले होते, हे वाचून. बापरे.. असं पाऊल कसं काय उचललं तिने. पण, हेच तर स्वातंत्र्य आहे ना. मला कोणी असं स्वातंत्र्य दिलं तर स्वीकारीन का मी ते. या प्रश्नाने तिला पुरतं क्लीन बोल्ड केलं. नाटकाचा विचार करता करता तिला एक वेगळाच भुयारी मार्ग सापडला होता. ज्याला तिने फक्त वरवरूनच पाहिलं होतं. त्याच्या आत ती कधी शिरलीच नव्हती. आणि अचानक तिला ती भुयारी मार्गाच्या मध्यावर सापडली होती. भांबावलेली. चलबिचल झालेली. अशीच होते ना मी कॉलेजच्या पहिल्या दिवशी. कॉलेज नावाच्या स्वप्नमयी जगात येऊन थबकलेले मी. तिथला कोपरान्कोपरा एक्स्प्लोर करायचा होता. अचानक मला ‘स्वातंत्र्य’, ‘स्वच्छंद’ या गोष्टी कळायला लागल्या. मी स्वतंत्र आहे याची जाणीव वगरे व्हायला लागली. स्वातंत्र्य हे पारतंत्र्यातून जन्मत असावं कदाचित. फक्त आपल्याला पारतंत्र्याची जाणीव व्हायला हवी. ‘अगं, ही जीन्स किती टाइट आहे. काय हा ड्रेस.. गळा किती खोल आहे याचा. हे असं चालणार नाही हां अनू. ९ वाजून गेले. होतीस कुठे तू इतका वेळ? हे चालणार नाही. इतका उशीर यापुढे करायचा नाही’ हिरावून घेतल्यावरच स्वातंत्र्याची जाणीव झाली मला. ‘कशी बसली आहेस.. नीट बस जरा. मुलींनी असं बसू नये.’ एकेक ऐकावं ते नवलच होतं. तेव्हाच जाणवायला लागलं हे सगळं सांगणाऱ्या आपल्या आई, आजी, मावशी, काकीसुद्धा त्यांच्या-त्यांच्या स्वातंत्र्याला मुकलेल्याच होत्या. घरातला कोणताही निर्णय घेताना आईचं मत बाबा विचारायचे, मात्र ते मत विचारात घेतलं जायचंच नाही कधी. त्या दिवशी घरी बर्थडे पार्टीला सगळ्यांनी किती छान एन्जॉय केलं. आईलाही सांगितलं नाच आमच्यासोबत. तिच्याकडे बघून वाटत होतं, खूप नाचायचंय तिला मनसोक्त. पण, काय काय माहीत तिला नाचताच आलं नाही मनमुराद. आग्रहास्तव फक्त टाळ्या वाजवत उभी होती. थांबवलं होतं तिला. तिचं तिनेच. सवयीचं झालं असेल तिला हे बहुधा आता. हव्या त्या गोष्टी न करण्याची सवय. आजीला त्या दिवशी माझी ती जीन्स किती आवडलेली. मीही मजेत म्हटलं तू घालून बघ ना, एकदा आजी. क्षणार्धात तिच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक आली. आणि दुसऱ्याच क्षणी सावरून ती म्हणाली ‘मस्करी करतेस होय, म्हातारीची. जीन्स घालून बाहेर गेले तर मला म्हातारचळ लागलंय असं म्हणतील लोक.’ यासाठी तिने तिला मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा दरवाजा धाडकन बंद केला. कधी कधी घरातली आपली माणसं आड येत नाही तितके हे ‘लोक’ आपल्या प्रत्येक गोष्टीत नको तितके येतात. या ‘लोकांना’ महत्त्वही गरजेपेक्षा खूप जास्त दिलं जातं.
हा काय मामला आहे स्वातंत्र्याचा. आणि मी कुठे भरकटत चाललेय नाटकावरून. हा तर, नाटकात राममोहन रॉयनी सतिप्रथा बंद करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा सीन यायला हवा. काय भयंकर प्रथा होती ती सती जाण्याची. बरं झालं बंद झाली. पण खरंच झालीये का बंद? तिच्याच प्रश्नावर ती चमकली. कदाचित आजही सुरू आहे ती. अनेक गृहिणी आजही आपलं आयुष्य आपल्या संसारासाठी असंच जाळतात की. समाज त्याला ‘कर्तव्यनिष्ठा’ वगरे गोंडस नाव देतो. लग्न म्हटलं की अॅडजस्टमेंट आल्याच असा धडा न शिकवताच दिला जातो. म्हणूनच मला लग्नच नाही करायचं. पण, आईबाबा असं करू देतील? लग्न झाल्यावर माझी मर्जी नसतानाही नवऱ्याने सेक्स करण्यासाठी भाग पाडलं तर मी विरोध करीन का त्याला? ‘नाही’ म्हणण्याची हिंमत माझ्यात असली तरी त्याच वेळी व्यक्त केली जाईल का माझ्याकडून? मूल न होण्याचा निर्णय मला घ्यायला दिला जाईल का? जन्माला येणाऱ्या बाळाची जबाबदारी घेण्याची क्षमता माझ्यात नाही हे सांगण्याची संधी मला मिळेल का? माझ्या शरीरालाही स्वातंत्र्य नाही. अजूनही.. माझ्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय मी एकटी घेऊ शकत नाही की मला घ्यायला दिले जात नाहीत. लग्न न करता एकटं राहायचं ठरवलं तर ते कितपत सहजपणे स्वीकारलं जाईल? स्वीकारलं गेलं तर त्या मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद मला घेता येईल का? स्वातंत्र्य मिळतं की ते असतं आधीपासूनच आपल्यात की मिळवावं लागतं की कुणी तरी येऊन आपल्या पदरात दान टाकावं लागतं स्वातंत्र्याचं? मुक्तपणे हवे ते विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे का मला? केलेले विचार हवे तसे मांडण्याचं, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे का मला? मी तरी इतका विचार करतेय. माझ्या आधीच्या पिढीतल्या स्त्रियांना िपजऱ्याआडच्या बंदिस्त वास्तवाने कधी हा विचार करूच दिला नसेल ना. पण, खरंच असं आहे का? स्त्रियांनाही हवीच असते ना ही िपजऱ्यातली बंदिस्त सुरक्षितता. त्यांना नको असतं स्वातंत्र्य वगरे. ‘फ्रीडम इज वाइल्ड’ कोणाच्या तरी मागे लपून राहिल्यावर ते आपल्याकडे येत नसतं. निधडय़ा छातीने त्याला सामोरं जावं लागतं. त्याच्या प्रेमात पडावं लागतं. त्याहीआधी स्वत:वर प्रेम करायला लागतं. मनापासून.. नुसतं स्वातंत्र्य हवं म्हणून बोलून चालत नाही, त्याबरोबर येणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. आजची मी स्त्री तयार आहे का हे सर्व सांभाळायला? कळलाय का आम्हाला स्वातंत्र्याचा खरा अर्थ? लहानपणी अर्थ कळत नसून स्वातंत्र्य उपभोगत होतो पण आता अर्थ तर कळलाय पण स्वातंत्र्य गमावलंय. गमावलंय खरंच की आपणच लाथाडलंय? सुरक्षित पिंजऱ्याच्या हव्यासाने. हवंय का खरंच स्वातंत्र्य? तयार आहे का मी त्यासाठी?
भंडावलेल्या डोक्याने ती तशीच स्तब्ध बसली. तिने बसवलेले नाटक मुलींनी छान सादर केले. स्त्री-स्वातंत्र्यासाठी लोक कसे झटले त्यानंतर स्त्रीचे समाजजीवन आणि आजची स्त्री कशी गगनभरारी घेतेय. सगळं सगळं दाखवलं तिने. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नाटक संपल्यावर ती मात्र िवगेत हरल्यागत उभी होती. पाठीवर प्रश्नांचं मणभर ओझं घेऊन. त्या भुयारी मार्गात ती पुरती हरवली होती.
प्राची साटम – response.lokprabha@expressindia.com