लग्न झालं की आपल्या स्वातंत्र्याचा संकोच होतो यावर स्त्री-पुरुषांचं एकमत असतं. पण तसं खरंच होत असतं का? वास्तविक दोघांनीही एकमेकांच्या स्पेसचा आणि विचारांचा आदर करणं एवढं जरी पाळलं गेलं तरी लग्नानंतरच्या स्वातंत्र्याकडची वाटचाल सोपी होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लग्नानंतर थोडीफार बंधनं येणारच ना.. हे असं वागणं सासरी खपेल का?.. आत्ताच फिरून घे (किंवा लोळून, नाचून, झोपून, बागडून घे) एकदा लग्न झालं की.. हे असे संवाद लग्नाळू मुलीला ऐकावे लागतातच. आपण कितीही आधुनिक युगात, मुक्त समाजात, स्वतंत्र देशात राहण्याचा दावा करत असलो तरी लग्नानंतर माणूस (मग ती स्त्री असो वा पुरुष ) बंधनात अडकतो, लग्न झाल्यानंतर थोडंफार कॉम्प्रमाइज करावंच लागतं.. हे ‘सो कॉल्ड’ सत्य सतत ऐकावंच लागतं. रिलेशनशिपचं ‘स्टेट्स’ झालेल्या युवा पिढीपासून ते लोणच्यासारखं ‘मुरलेलं’ नातं मिरवणाऱ्या मागच्या पिढीपर्यंत सगळ्यांच्या तोंडून हे सो कॉल्ड सत्य अधूनमधून ऐकू येत असतं. लग्नानंतर खरंच व्यक्तिस्वातंत्र्य गमावून बसतं की काय? लग्न खरोखर बंधन वगैरे असतं का?
पंचाहत्तरीतल्या एक आजी गप्पा मारताना त्यांच्या नातसुनेला सांगत होत्या.. ‘आमचे हे खूपच चांगले होते. सासर हौशी होतं. त्यामुळे मला कधी सासरचं बंधन जाणवलंच नाही. सगळी हौसमौज करू दिली आणि आमच्या ह्यंनी तर मला नोकरीही करू दिली.’ नातसुनेचा यातल्या ‘करू दिली’ या शब्दालाच आक्षेप होता. ‘करू दिली म्हणजे काय? तो तुमचा अधिकारच नव्हता का?’ असं तिचं म्हणणं. तिच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत अशी कुणाची तरी परवानगी मागायला लागणं म्हणजे एकप्रकारचं बंधनच होतं. म्हणजे काळानुरूप लग्नानंतरचं स्वातंत्र्य बदललं आहे तर.
आजच्या काळातही घरच्या सगळ्या पुरुषांचं जेवण झाल्याशिवाय लग्न झालेल्या स्त्रियांनी बसायचं नाही, हे बंधन अनेक घरांमध्ये आहेच की! कुणाला स्वयंपाक करण्याचं बंधन वाटत असेल तर कुणाला सासरच्या घरी बनतो त्याच चवीचा, पद्धतीचा स्वयंपाक करण्याचं बंधन जाचक वाटत असेल. स्वयंपाकाची आवड असलेली तरुण मुलगी एका उच्चभ्रू घरात लग्न होऊन गेली, तर तिला तिथे ‘स्वयंपाकघरात कशाला उगाच वेळ घालवतेस’, असं ऐकावं लागलं. म्हणजे तिला स्वयंपाक न करण्याचं बंधन वाटत होतं तर. एका उच्चशिक्षित मुलीचं तितक्याच ‘तोलामोला’च्या (म्हणजे नेमकं काय हो?) मुलाशी लग्न झालं. लग्नानंतर नोकरी करण्याचं, हवं तिथे जाण्याचं, हवे ते कपडे घालण्याचं ‘स्वातंत्र्य’ होतं. पण एक गोष्ट तिला अगदी मनापासून खटकत होती. सासऱ्यांसमोर पाय पसरून पेपर वाचत किंवा टीव्ही बघत बसायचं नाही, हा त्यांच्या घरचा नियम होता. असं स्त्रियांनी कामं सोडून पाय पसरून बसणं तेही घरातल्या वडीलधाऱ्या पुरुषांसमोर.. म्हणजे त्या वडीलधाऱ्यांचा अपमान होता म्हणे. सकाळी पेपर वाचायला बसण्यावरून तिला हे ऐकावं लागलं आणि लग्नानंतर आपण निवांत पेपर वाचण्याचं स्वातंत्र्यही गमावून बसलोय याची तिला जाणीव झाली.
थोडक्यात, लग्नानंतरचं स्वातंत्र्य म्हणजे अमुक एका गोष्टीसाठी स्वातंत्र्य असं सांगता येणार नाही. स्वातंत्र्य ही संकल्पना अशी व्यक्तिसापेक्ष आहे. ती पिढीनुसार, राहणीमानानुसार, आवडीनुसार, काळानुसार बदलते. म्हणजे मुळात मी बंधनात आहे, ही भावना असते तेव्हाच स्वातंत्र्याचं महत्त्व असतं आणि प्रत्येकाचा बंधनाचा परीघ सारखा नसतो. लग्नानंतरचं स्वातंत्र्य आजच्या काळात व्यक्तिस्वातंत्र्याशी जोडलं गेलं आहे. ती स्त्री आहे की पुरुष हा विचार त्यामध्ये नाही. नवरा- बायकोच्या आधी ती स्वतंत्र व्यक्ती आहे, हे मुळात मान्य असायला हवं, असं मानणारी पिढी आता तयार होतेय. या काळातल्या मुलीला मग लग्नाचं बंधन केव्हा वाटू शकतं? लग्नानंतर नोकरी कुठे करायची, करायची का नाही, किती वेळ बाहेर राहायचं हे ठरवण्याचा अधिकार आपला राहिला नाही, ही भावना येते तेव्हा. अगदी कपडे कसे घालावेत, कोणते घालावेत, दागिने काय घालावेत, कुणामध्ये मिसळावं, कुणामध्ये नाही, कुणाला काय म्हणावं, किती बोलावं, कसं बोलावं, कुठे बसावं, कसं बसावं या साध्या गोष्टी आपल्या मर्जीनेच व्हाव्यात, अशी आजच्या सुशिक्षित, मुक्त स्त्रीची अपेक्षा असते. या सगळ्या तुलनेने किरकोळ गोष्टी वाटत असल्या, तरी लग्नानंतरचं तिचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यात मोलाची भूमिका बजावतात. आर्थिक स्वातंत्र्य यामध्ये प्राधान्याने येतं.
लग्नानंतरची ओळख
आर्थिक स्वातंत्र्यामध्ये नुसतं पैसे कमावण्याचं स्वातंत्र्य अभिप्रेत नाही. मिळालेले पैसे खर्च करण्याचं स्वातंत्र्यही त्यामध्ये येतं. लग्नानंतर स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी आजच्या तरुणीला हे आर्थिक स्वातंत्र्य अनिवार्य वाटतं. हे ‘स्वतंत्र अस्तित्व’ म्हणजे पुन्हा नेमकं काय? अस्तित्वाची सगळ्यात ढोबळ खूण म्हणजे आपलं नाव. लग्नानंतर मुलीनं आपलं आडनाव बदलण्याची पद्धत जगभर आहे. आपल्याकडे तर पहिलं नावही बदलतात. लग्नानंतर तिचं कुटुंब बदलतं. त्यामुळे नावही बदलतं, हे त्यामागचं लॉजिक. पण ‘स्वतंत्र अस्तित्वा’ची तीच तर मोठी खूण. भारतात स्त्रीवादी चळवळ सुरू झाल्यापासून म्हणजे सुमारे पन्नास वर्षांपासून या स्वतंत्र अस्तित्वासाठीचा झगडा सुरू आहे. पाश्चिमात्य देशांत तर १९ व्या शतकातच फेमिनिझमची चळवळ सुरू झाली होती. तरीही अजून या चळवळीची गरज तिथे संपलेली नाही.
ल्युसी स्टोन या अमेरिकन बाईंनी प्रथम स्त्रियांच्या स्वतंत्र अस्तित्वाची दखल घ्यायला पाहिजे, हा विचार मांडला. लग्नानंतर नवऱ्याचं नाव न लावता माहेरचं नावच कायम ठेवण्याचा त्यांच्या निर्णय १९ व्या शतकात क्रांतिकारी ठरला. अजूनही स्टोन बाई त्यांच्या या क्रांतिकार्यासाठीच ओळखल्या जातात. ल्युसी स्टोन यांच्या निधनानंतर तब्बल तीन दशकांनी म्हणजे १९२१ मध्ये त्यांच्या नावाने ‘ल्युसी स्टोन लीग’ अमेरिकेत स्थापन झाली आणि लग्नानंतर माहेरचं नाव लावण्याचं स्वातंत्र्य कायद्याने स्त्रीला मिळायला हवं ही मागणी पुढे आली. अजूनही अमेरिकेत लग्नानंतर नाव न बदलणाऱ्या स्त्रिया ‘ल्युसी स्टोनर’ म्हणून ओळखल्या जातात.
आपल्याकडे नव्या पिढीच्या मुली स्वत:चं आणि नवऱ्याचं दोघांचं आडनाव हल्ली लावताना दिसतात. स्वत:ची मूळ ओळख कायम ठेवण्याची गरज त्यामागे असावी. पण असं करून त्या आपली विवाहित असल्याची पावतीच देत नाहीत का? म्हणजे पुन्हा स्वतंत्र अस्तित्वाच्या मूळ गरजेच्या हे विरोधात जाणं झालं.
ग्लोरिया स्टायनेम या अमेरिकेतील ८० व्या दशकातील अग्रणी फेमिनिस्ट पत्रकार. ‘मिस’ (Ms) नावाचं नियतकालिक त्यांनी सुरू केलं. लग्नानंतर बाईची ओळख ‘मिस’ (Miss)ची ‘मिसेस’ (Mrs) होते. अशी ओळख करून दिल्यानं तिच्या मॅरिटल स्टेट्सचा अकारण बाऊ केला जातो, असं मानून प्रीफिक्स लिहायचंच तर ते Ms असं असावं, मग स्त्री लग्न झालेली असो वा नसो. ग्लोरिया यांच्या पिढीने अमेरिकेत हा विचार रुजवला. तोही विचार आपल्याकडे हळूहळू रुजतोय हल्ली.
लग्नानंतर स्त्रीनं कुठलं नाव लावावं, कसं लावावं हा तिचा प्रश्न आहे. हे तिचं स्वातंत्र्य आहे, हा विचार अजूनही तितकासा रुळत नाही, हेच खरं. आपल्याकडे कायद्याने हा अधिकार स्त्रियांना कधीच दिलेला असला तरी अगदी नव्या पिढीतही याबाबत विरोधी मतं आहेत आणि अनेक समज-गैरसमज आहेत. गेल्या वर्षी याच विषयावर एका मुलीनं ‘मी लग्नानंतर नाव का बदलावं?’ या विषयावर लिहिलेली फेसबुक पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. मतमतांतरं नोंदवली जात होती आणि त्या पोस्टला एक लाखांवर लाइक्सही मिळाले होते.
लग्नानंतरच्या स्वातंत्र्याच्या या सगळ्या बाबी मुख्यकरून अर्थात स्त्रियांशी निगडित आहेत. पुरुषांच्याही लग्नानंतरचं स्वातंत्र्य म्हणून काही अपेक्षा असतातच. स्वत:च्या आवडी जपायचं स्वातंत्र्य, स्वत:ची ‘स्पेस’ या गोष्टींचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो. म्हणजे एकमेकांच्या स्पेसचा आणि विचारांचा आदर करणं एवढं जरी पाळलं गेलं तरी लग्नानंतरच्या स्वातंत्र्याकडची वाटचाल सोपी होईल.
लग्नानंतरच्या स्वातंत्र्याची तशी सार्वत्रिक व्याख्या करणं शक्य नाही, हेच खरं. घर बदललं, सवयीच्या गोष्टी बदलल्या, आसपासची माणसं बदलली की थोडे फार बदल आपल्यालाही करायला लागणार हे उघड आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी, राहण्या-वागण्याच्या सवयी बदलणार हे उघड आहे. कारण आपण आयुष्याच्या नव्या टप्प्यावर येतोय आणि तो टप्पा आपण आवडीने स्वीकारलेला आहे. ‘मी मुळीच बदलणार नाही’ हा हटवादीपणा झाला. लग्नानंतरचे बरेच बदल नवरा- बायको दोघांनाही मनातून हवेहवेसे वाटत असतात. त्याला वरवर बंधन म्हणताना आतून ते सुखावत असतात. हीच या नात्याची गंमत आहे. पण हे बदल कुणी दुसऱ्यावर लादत असेल किंवा हे बदल बंधनकारक आहेत, असं कुणी सांगत असेल तर तो स्वातंत्र्यावर घाला वाटतो. याउलट हे बदल स्वीकारण्याचं बंधन नसेल तर ते आपोआप घडतात. बदल ‘आपलेसे’ करणं हे लग्नानंतरचं स्वातंत्र्य आहे.
शेवटी स्वातंत्र्य हे मानण्यावर असतं. कुणासाठी एखादी गोष्ट करणं म्हणजे स्वातंत्र्य आहे की प्रेम, जिव्हाळा जपण्याचं माध्यम हे ज्यानं- त्यानं ठरवायचं. लग्नानंतर आयुष्याचा परीघ रुंदावतो, याचा अर्थ स्वातंत्र्याचा परीघ कमी केला पाहिजे असा नसतो. कारण स्वातंत्र्याला परीघ असा नसतोच मुळी.
अरुंधती जोशी – response.lokprabha@expressindia.com