भूषण तळवलकर – response.lokprabha@expressindia.com
१९७१च्या भारत-पाक युद्धातील बावनकशी विजयाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून चालू आठवडा हा त्या युद्धाचा प्रत्यक्ष कालखंड आहे. भारतीय नौदलाने या युद्धात गौरवास्पद कामगिरी करत युद्धाच्या पहिल्याच दिवसापासून देदीप्यमान विजयांची मालिका सुरू केली. बंगालच्या उपसागरात किनाऱ्यालगत असलेली विक्रांत ही आपली विमानवाहू युद्धनौका युद्धापूर्वीच बुडवण्यासाठी पाक नौदलाची गाझी ही पाणबुडी आली होती. नौदलाच्या पूर्व विभागाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल नीलकांता कृष्णन यांनी ३ आणि ४ डिसेंबरच्या मध्यरात्री तिला विशाखापट्टणम बंदराच्या मुखाशी चुचकारत आणले आणि अत्यंत चतुराईने तिचीच कबर खोदली. त्यांनी या विजयमोहिमेचा एवढय़ा दणक्यात आरंभ केला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफझलखान वध प्रकरणाची आठवण यावी! स्वतंत्र भारताच्या नौदल इतिहासातील या सोनेरी पानाचा घेतलेला हा मागोवा.

१९६५ चे युद्ध भडकल्यानंतर सोव्हिएत रशियाने केलेल्या आवाहनानुसार ताश्कन्द करारान्वये युद्धबंदी झाली असली, तरी हा सामना काहीसा अनिर्णित अवस्थेत संपल्यामुळे पाक पुन्हा असे दु:साहस करणार याची कल्पना तत्कालीन रिअर अ‍ॅडमिरल कृष्णन यांच्यासह अनेक भारतीय नौदल अधिकाऱ्यांना होती. त्यामुळे पाकिस्तानातील १९७० च्या निवडणुकांनंतर तेव्हाच्या पश्चिम पाकिस्तानने ऑपरेशन सर्चलाईटद्वारे पूर्व पाकिस्तानची मुस्कटदाबी सुरू करताच वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे, याचा अंदाज भारताच्या राजकीय आणि सशस्त्र दलांच्या नेतृत्वाला आला. पूर्व पाकिस्तानी निर्वासितांचे लाखोंच्या संख्येने भारतात येणारे लोंढे भारताला या संघर्षांत खेचू लागले. १९७० साली नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख असलेले कृष्णन पश्चिम किनाऱ्याच्या संरक्षणाच्या अनेक योजना कार्यान्वित करत असताना त्यांची बदली नौदलाचे पूर्व विभागप्रमुख म्हणून विशाखापट्टणम इथे करण्यात आली. काहीशा नाराजीतच २७ फेब्रुवारी १९७१ रोजी त्यांनी पदग्रहण केले आणि सर्वप्रथम त्यांच्यासाठी असलेल्या ‘द रिट्रीट’ (निवारा, आश्रय) या अधिकृत निवासस्थानाचे नाव बदलून ‘नेव्ही हाऊस’ असे केले. लगोलग आपल्या संपूर्ण सेनेला स्फूर्तिदायक संभाषणांनी प्रेरित करत, पूर्व विभागाच्या सामर्थ्यांचा आणि कच्च्या दुव्यांचा सखोल अभ्यास करत त्यांनी एकीकडे सागरी नाविक सराव जोरात सुरू केला तर दुसरीकडे अ‍ॅडमिरल नंदा, व्हाइस अ‍ॅडमिरल कोहली, देशाचे राजकीय नेते यांच्या सतत संपर्कात राहून संरक्षणाबरोबरच प्रतिहल्ल्याच्या अनेक पदरी योजना ते आखत राहिले. अशातच ६ ऑक्टोबर १९७१ रोजी त्यांच्या ताफ्यात असलेल्या आयएनएस विक्रांतला पश्चिम किनाऱ्यावर जाण्याचा आदेश नौदल मुख्यालयाने दिला तेव्हा त्याचा त्यांनी कडाडून विरोध केला. मुंबईला निघालेल्या विक्रांतला नौदल मुख्यालयाने मग परत माघारी पाठवले आणि नकळत गाझीच्या सागरसमाधीचा पहिला अध्याय लिहिला गेला! 

sand mafias are illegally extracting sand from ujani dam
उजनी धरणाच्या जलाशयात वाळू माफियांचा धुडगूस
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
infiltrating boat seized by fisheries department with the help of local fisherman
रत्नागिरीत घुसखोरी करणाऱ्या मलपी येथील मासेमारी बोटीचा थरारक पाठलाग, गस्ती नौकेला एक बोट पकडण्यात यश
tiger path blocked loksatta news
नागपूर : वाघांचा रस्ता अडविला; न्यायालयाकडून गंभीर दखल…
Wastewater recycling project Reuse of wastewater going into the sea possible Mumbai news
सांडपाणी पुनःप्रक्रिया प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य; समुद्रात जाणाऱ्या सांडपाण्याचा पुनर्वापर शक्य
Local villagers experienced thrill fight between two tigers in Wasada Makta area
‘त्या’ दोन वाघांमध्ये झुंजीचा थरार; रक्ताचा सडा, पण…
Painganga mine area, tigers , Chandrapur,
चंद्रपूर : सावधान…! पैनगंगा खाण परिसरात वाघाचा मुक्त संचार; परिसरात दहशत
tarkteerth Lakshman Shastri Joshi
तर्कतीर्थ विचार : ‘गुरुकुल’चे दिवस

स्वतंत्र भारताची नौदल उभारणी विक्रांत या विमानवाहू नौकेला केंद्रस्थानी ठेवून करण्यात आली होती. तिच्यावरील विमानांच्या बळावर भारत बंगालच्या उपसागरावर हुकमत गाजवू शकतो, हे पाक जाणून होता. त्यामुळे शत्रूच्या दृष्टीने ते पहिल्या क्रमांकाचे लक्ष्य होते. ऑक्टोबर महिन्यात ती चेन्नई (तेव्हाचे मद्रास) परिसरात कार्यरत होती. कृष्णन यांनी शत्रूच्या दृष्टिकोनातूनही विचार करत, त्याच्या चालींचा अंदाज बांधत विक्रांतला असलेला धोका ओळखला. तिला १३ नोव्हेंबरला भारताच्या मुख्य भूमीपासून सुमारे १००० किलोमीटर दूर पाठवत शब्दश: लपवले! अशातच २४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी हुकूमशहा याह्याखान यांनी पाकिस्तानात आणीबाणी जाहीर केली आणि स्वत: एका महत्त्वाच्या सामरिक कामासाठी पुढचे १० दिवस मुख्य कार्यालयात येणार नसल्याचे जाहीर केले. यावरून कृष्णन यांनी अचूक कयास बांधला की पाक आपल्याकडील पाणबुडय़ा भारताच्या सागरी क्षेत्रात पाठवणार असून त्यांचे प्रमुख लक्ष्य विक्रांतच असणार आहे. तिला बुडवल्यानंतर ते अधिकृतपणे युद्ध पुकारणार आहेत. विक्रांतला सुरक्षित जागी पाठवल्यावर कृष्णन आता मुरब्बीपणे फसवे डाव टाकू लागले. मद्रासच्या नौदल अधिकाऱ्यांशी सर्वसाधारण फोनवर चर्चा करत त्यांनी विक्रांत मद्रासला येत असून तिच्यासाठी योग्य धक्का आणि शिधासामुग्री उपलब्ध करण्याचा आदेश कोणतीही गुप्तता न पाळता जारी केला! पाकिस्तानच्या तत्पर खबऱ्यांनी हा आदेश लगेचच टिपून पुढे पाठवला. काही दिवसांतच विशाखापट्टणमच्या शिधा पुरवठादारांना प्रचंड मोठय़ा प्रमाणात ताज्या भाज्या, मांस आणि इतर शिधासामुग्री पुरवण्याच्या ऑर्डर्स जारी झाल्या. किनारपट्टीजवळ सुळसुळाट झालेल्या खबऱ्यांनी ही बातमी शत्रूच्या गोटात पोहोचवून एखादी मोठी युद्धनौका, बहुधा विक्रांत विशाखापट्टणम बंदरात येणार असल्याचे संदेश दिले. राजपूत या युद्धनौकेवरून विक्रांतवरील एका खलाशाच्या नावाने विशाखापट्टणमच्या कार्यालयात तो आपल्या अत्यवस्थ आईच्या तब्येतीची चौकशी करत आहे असा बनावट बिनतारी संदेश पाठवून शत्रूच्या गुप्तहेरांची दिशाभूल करण्यात आली! दुसरीकडे स्थानिक मुलकी प्रशासनाला, बंदर अधिकाऱ्यांना आणि मच्छीमार कोळय़ांना विश्वासात घेऊन डोळय़ांत तेल घालून दक्षता बाळगण्याचे आदेशही कृष्णन यांनी त्यांना दिले.

आता गाझीच्या प्रवासाचा थोडा मागोवा घेऊ. युद्धानंतर काढलेल्या अंदाजांनुसार १४ नोव्हेंबर १९७१ रोजी आपल्या पोटात ९२ नाविकांना सामावून घेत गाझी कराचीहून बंगालच्या उपसागराच्या दिशेने भारतभूमीला दूरवरून वळसा घालत निघाली. १६ नोव्हेंबरला ती मुंबईपासून सुमारे ६०० किमी. दूर होती. १९ नोव्हेंबर रोजी सिलोन (श्रीलंका) ला वळसा घालून २३ नोव्हेंबरला बंगालच्या उपसागरात प्रवेश करत ती विक्रांतला शोधू लागली. पण तिला तिथे पोहोचण्यास तब्बल १० दिवस उशीर झाला होता! अशातच कृष्णन यांनी जारी केलेल्या फसव्या संदेशांना बळी पडून ती २७ नोव्हेंबरच्या सुमारास विशाखापट्टणमच्या जवळ येऊन विक्रांतला शोधत समुद्रात पाणसुरुंग पेरू लागली. यादरम्यान कराचीच्या पाकिस्तानी नौदल मुख्यालयातील पाणबुडी नियंत्रक कमोडोर (कॉमसब्ज) यांनी त्यांच्या गुप्तहेरांच्या बातम्यांवर विसंबून गाझीला जे बिनतारी आदेश जारी केले त्यांचे छापलेले कागद नंतर समुद्रात बुडालेल्या गाझीच्या पोटातून आपल्या नौदलाच्या शूर पाणबुडय़ा सैनिकांनी हस्तगत केले. यातील २२ नोव्हेंबरचा सायंकाळचा संदेश भारताच्या सागरी क्षेत्रात आलेल्या चार पाकिस्तानी पाणबुडय़ा नौकांनी आपल्या जागा घेतल्याचे दर्शवतो. यातील क्रमांक ४ म्हणजे गाझी आणि माईक म्हणजे मद्रास! दुसरा त्याच दिवशी रात्रीचा संदेश ‘सर्व पाणतीर सज्ज करा’ असा आदेश देतो. तिसरा २३ नोव्हेंबरचा संदेश ‘दक्ष (युद्धसज्ज) अवस्थेत या’ असा आदेश देतो. चौथा २५ नोव्हेंबरचा संदेश गाझीला ‘पूर्ण सामर्थ्यांनिशी व्हिक्टर प्रदेशात पोहोचा. विमानवाहू नौका बंदरात असल्याचे संकेत मिळाले आहेत’ असा आदेश देतो. यातील व्हिक्टर म्हणजे विशाखापट्टणम! कृष्णन यांनी अत्यंत चतुराईने विणलेल्या जाळय़ात गाझी स्वत:हून येऊन दाखल झाली होती. आता त्या जाळय़ाचे मुख आवळत गाझीला गुदमरून टाकून चिरसमाधी अवस्थेला पोचवण्याचे काम बाकी होते!

आधी एकदा कुमांऊला अधिकृत कामानिमित्त गेले असताना जिम कॉर्बेटशी त्यांची भेट झाली होती. त्या वेळी कॉर्बेटने रुद्रप्रयागच्या बिबटय़ाच्या शिकारीचा प्रसंग सांगताना त्या रात्री तो बिबटय़ा जवळपास वावरत आहे हे त्याला अंतर्मनातून जाणवत होते, असे सांगितले होते. तशाच अंत:चक्षूंद्वारा कृष्णन यांना विशाखापट्टणमच्या आसपास समुद्रात दबा धरून बसलेली गाझी जाणवत होती आणि अस्वस्थ करत होती.

३ डिसेंबरला सायंकाळी कृष्णन आपल्या घरी पोहोचत असतानाच पीटीआयच्या स्थानिक वार्ताहराचा त्यांना फोन आला आणि पाकिस्तानने उत्तर भारतातील हवाईदलाच्या अनेक विमानतळांवर बॉम्बफेक केल्याची माहिती त्याने दिली. जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधत त्यांनी याची शहानिशा करून घेतली आणि तसेच उलटे फिरत आपल्या कार्यालयात पोहोचून शहरातील, बंदरावरील तसेच डॉल्फिन्स नोझ या दीपगृहाचे आणि बंदराच्या प्रवेशपट्टीतील सर्व दिवे आणि सिग्नल्स बंद करण्याचा आदेश दिला. तोपर्यंत नौदल मुख्यालयातून प्रतिहल्ल्याचे आदेश पूर्व निदेशलायत येऊन थडकले. मग बंदरात आलेल्या आयएनएस राजपूत या विनाशिकेला तातडीने इंधन भरून रात्री खोल समुद्रात जाण्याचा आदेश त्यांनी दिला. त्या वेळी तिथे राजपूत ही एकच नौका संरक्षणासाठी होती. बाकी सर्व बंगालच्या उपसागरात रवाना झाल्या होत्या. किनाऱ्यावरील तोफखान्याला अतिदक्षतेचा आदेश दिल्यानंतर कृष्णन यांनी राजपूतचे मुख्य अधिकारी लेफ्टनंट कमांडर इंदरसिंग यांना बोलावून पुढच्या मोहिमेचे ब्रीिफग देताना असे सांगितले की, ‘राजपूतने सर्व दिवे मालवून कोणत्याही दूरसंपर्काशिवाय आत्यंतिक सावधानता बाळगत बंदराबाहेर पडताना समुद्रात थोडय़ा थोडय़ा अंतराने डेप्थ चार्ज सोडत जावे. परंतु त्याचा परिणाम पाहण्याच्या फंदात न पडता, तिथे अजिबात न रेंगाळता मार्गक्रमण सुरू ठेवावे. पुढचे आदेश त्यांना समुद्रात मिळतील.’    

आदेशानुसार मध्यरात्रीच्या आधी राजपूत निघाली. चिंचोळय़ा बहिर्गमन पट्टीतून बाहेर पडतापडता तिच्यावरील निरीक्षण अधिकाऱ्याला सुमारे अर्धा मैल पुढे पाण्यात काही खळबळ माजलेली लक्षात आली. त्यावरून तिथे पाण्यावर आलेल्या पाणबुडीने समुद्रात बुडी मारल्याचा तर्क करत राजपूतला वेगाने त्या स्थळावर नेऊन दोन डेप्थ चार्ज समुद्रात सोडण्यात आले. हे करताच राजपूत जराही न घुटमळता आपल्या निर्धारित मार्गाने त्वरेने खोल समुद्राकडे रवाना झाली. नंतर केलेल्या चौकशीत असे निष्पन्न झाले की, राजपूतने सोडलेल्या त्या स्फोटकांच्या जागेजवळच गाझी सागरतळाशी मृतप्राय अवस्थेत पडली होती. त्याच सुमारास बंदरावरील दक्ष अधिकाऱ्यांना आणि नागरिकांनाही समुद्राच्या बाजूने मोठय़ा स्फोटाचा आवाज ऐकू आला होता. 

दुसऱ्या दिवशी स्थानिक मच्छीमारांनी पाण्यावर तेलाचे तवंग आणि काही अपरिचित वस्तू तरंगत असल्याची बातमी दिली. नौदलाच्या पाणबुडी पथकाने त्या जागी पाण्याखाली जात सुमारे ४० मीटर खोलीवर एखादी पाणबुडीसदृश मोठी वस्तू असल्याचा प्राथमिक अहवाल दिला. परंतु अंधारामुळे नीटसे कळत नव्हते. सुमारे ४० मीटर खोल समुद्रातील त्या जागेवर माणसाने पोहोचणे अंधारामुळे आणि पाण्याच्या दाबामुळे खूप अवघड होतेच, पण इतक्या खोलीवर पोहोचेल अशी पाणबुडीही तेव्हा विशाखापट्टणमच्या तळावर उपलब्ध नव्हती. मिळालेले पुरावे तातडीने दिल्लीला मुख्यालयात विश्लेषणासाठी आणण्यासाठी अ‍ॅडमिरल नंदा यांनी पाठवलेले एक खास विमान मग विशाखापट्टणमला थांबून राहिले. ५ डिसेंबरला पाणबुडय़ा जवानांनी धाडस करत तेवढे खोल जात विविध खाणाखुणांवरून ती गाझीच असल्याचा निर्वाळा दिला, पण तिची सर्व दारे आतून घट्ट बंद करून घेतल्यामुळे त्या अंधारात आणि विचित्र अवस्थेत ती उघडणे शक्य होत नव्हते. शेवटी अथक प्रयत्नांनंतर तिसऱ्या दिवशी निरीक्षण मनोऱ्याचे बंद झाकण उघडण्यात यश आले आणि फुगलेल्या, सडलेल्या अवस्थेतील काही नाविकांचे मृतदेह तिथे सापडले. त्यांना, त्यांच्या अवशेषांना दूर करत आत शिरून आपल्या प्राणांची बाजी लावत आपल्या पाणबुडय़ा जवानांनी गाझीमधील अनेक वस्तू, नकाशे, नोंदवही, गाझीच्या मुख्य अधिकाऱ्याचा शिक्का असलेले कागद आदी गोळा करून वर आणले. रात्री १२.१५ वाजता बंद पडलेले एक घडय़ाळही यांमध्ये होते. हे सर्व पुरावे घेऊन त्या खास विमानाने दिल्लीला प्रयाण केले. पुढच्याच दिवशी सर्व गोष्टींची योग्य छाननी करून युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपले सामरिक खच्चीकरण करण्याच्या दुष्ट मानसुब्याने शत्रूने आधीच पाठवलेल्या गाझीच्या पुराव्यांची सर्व लक्तरे भारतीय नौदलाने जगापुढे टांगली! बुडालेल्या गाझीच्या अंतर्भागात मिळालेल्या सर्व नाविकांच्या मृतदेहांची छायाचित्रे घेऊन त्यांचे विधिवत सागरी दफन करण्याचा खास आदेशही कृष्णन यांनी जारी केला आणि पुन्हा एकदा जिवावरचे धाडस करत आपल्या नौदलाच्या शूर पाणबुडय़ा जवानांनी त्याची पूर्तता केली!

गाझीच्या कलेवराच्या छायाचित्रांवरून तिचा पुढचा भाग उद्ध्वस्त झाल्याचे आढळले. त्यामुळे तिच्या अंताविषयी एक तर्क असा आहे की रात्री विशाखापट्टणम बंदराबाहेर समुद्रावर येत ती आपले स्थान निश्चित करण्याच्या प्रयत्नात होती, तेव्हा अचानक समोरून येत असलेल्या राजपूतला विक्रांत समजून प्रचंड घाईत तिने समुद्रात बुडी मारली असावी आणि अंदाज चुकल्यामुळे उथळ समुद्रातील खडकांना आदळून तिच्यात अंतर्गत स्फोट झाले असावेत. किंवा राजपूतने सोडलेल्या डेप्थचार्जने आपले काम चोख बजावले असावे. काहीही असो, विक्रांतला नष्ट करायला आलेल्या गाझीचा विक्रांतच्याच घराजवळ दारुण अंत झाला! कृष्णन यांनी लगोलग आघाडीवरील आपल्या पूर्ण ताफ्याला संदेश पाठवला पी. एन. एस. गाझी ही पाणबुडी मी बुडवली आहे आणि ती माझ्या पायाशी लोळण घेत आहे. हीच वेळ आहे शत्रूवर धाडसी हल्ला चढवण्याची. आगे बढो. पूर्व नौदल ताफ्याचे आता एकच ध्येय – आक्रमण! आक्रमण!! आक्रमण!!!

पुढच्या काही दिवसांत मैदानात पुन्हा अवतरलेल्या विक्रांतच्या साथीने आपल्या नौदलाने पूर्व पाकिस्तानची संपूर्ण सागरी नाकेबंदी करत अंतिम विजयाचा पाया रचला. कोंडी झालेल्या पाक सैन्याने १६ डिसेंबरला शरणागती स्वीकारली. या समारंभात आपले लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्या बरोब्बर मागे नौदलाच्या शुभ्र गणवेशात व्हाइस अ‍ॅडमिरल कृष्णन उभे दिसतात. देशभर आनंदाचे उधाण आले आणि कृतज्ञ राष्ट्राच्या प्रमुखाच्या, अर्थात भारताचे राष्ट्रपती व्ही. व्ही गिरी यांच्या हस्ते व्हाइस अ‍ॅडमिरल कृष्णन यांना १५ जानेवारी १९७२ रोजी पद्मभूषण हा नागरी किताबही बहाल करण्यात आला.

अमेरिकेकडून कर्जावर घेतलेल्या या गाझीचे मूळ अमेरिकन नाव ‘डायब्लो’ अर्थात दैत्य असे होते. या ‘डायब्लो’ला फायनल ‘ब्लो’ देऊन सागरतळाशी लोळवणाऱ्या भारतीय नौदलाकडे जग तेव्हापासून आदराने पाहते! 

(संदर्भ- ‘अ सेलर्स स्टोरी’ – अ‍ॅडमिरल कृष्णन छायाचित्रे – अर्जुन कृष्णन यांच्या पूर्वपरवानगीने)

Story img Loader