विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य असे अभिमानाने सांगितले जाते. गेल्या पाच वर्षांतील प्रदूषित शहरांच्या संदर्भातील अहवाल पाहिले तर असे लक्षात येते की, महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांच्या संख्येमध्ये या वेगवान शहरीकरणाच्या प्रक्रियेत समांतर वाढ होते आहे. याचा अर्थ शहरीकरणाच्या प्रक्रियेचा आणि वायुप्रदूषणाचा जवळचा संबंध आहे. आजवर अनेक शास्त्रीय अहवालांमधून तो सिद्धही झाला आहे. खरे तर गेल्या दीड वर्षांमध्ये महाराष्ट्रानेच नव्हे तर संपूर्ण देशाने आणि जगानेही आरोग्याच्या क्षेत्रातील आणीबाणी कोविडच्या निमित्ताने अनुभवली. वाढते शहरीकरण असेच अर्निबधपणे सुरूच राहिले तर आपल्या ‘प्रदूषणाच्या आणीबाणी’ला सामोरे जावे लागेल. एकूणच उपलब्ध असलेली विविध अहवालांमधील आकडेवारी पाहाता सध्या आपण त्या आणीबाणीच्या उंबरठय़ावर उभे आहोत, असे लक्षात येते.
या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल ती येणाऱ्या काळात पर्यावरणाच्या सर्व प्रकारच्या समस्यांकडे आपल्याला साकल्याने पाहावे लागणार आहे. म्हणजे एका समस्येचा संबंध दुसऱ्याशी शंभर टक्के असणार आहे, तो काय आणि कसा याचा शास्त्रीय शोध घ्यावा लागेल. वापर वाढलेल्या वाहनांमधून ओकला जाणारा धूर आणि औद्योगिक वापरानंतर हवेत फेकली जाणारी विषारी द्रव्ये म्हणजेच केवळ वायुप्रदूषण असा आपला एक समज आहे. मात्र वायुप्रदूषणाचा मोठा संबंध हा घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित आहे, याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडतो. घाणीद्वारे येणारी दरुगधी म्हणजे काही वायुप्रदूषण नव्हे तर ते त्याही पलीकडे जाणारे असते. क्षेपणभूमीवर सातत्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारा मिथेन वायुप्रदूषणास मोठेच कारण ठरते. क्षेपणभूमीवर लागणाऱ्या आणि दिवस दिवस राहणाऱ्या आगी व धूर यामागे मिथेन हे प्रमुख कारण असते. २०१७ साली देशाने ओला कचरा व सुका कचरा वेगळा ठेवण्याचा व त्याच्या व्यवस्थापनाचा वेगळा कायदा केला, मात्र तो कागदावरच आहे. तो कायदा काटेकोर पाळणारे एकही शहर भारतात नाही. पलीकडच्या बाजूस शहरांमधील घनकचरा दिवसेंदिवस वाढतोच आहे. पर्यायाने केवळ वायुप्रदूषणच नव्हे तर मातीचे प्रदूषण आणि जमिनीखालील पाण्याचे स्रोत प्रदूषित होण्याचे प्रमाणही वाढते आहे.
शहरातील हिरवाई कमी होत सिमेंट काँक्रीटमध्ये वाढ होते आहे. परिणामी ‘वाढत्या तापमानाची शहरी बेटे’ तयार होत आहेत. पुन्हा या वाढत्या तापमानाचा संबंध वायुप्रदूषणाशी थेटच आहे. पण याही साऱ्यापैकी भयानक बाब अलीकडेच येल विद्यापीठातील संशोधनामध्ये लक्षात आली आहे. प्रदूषणामध्ये पार्टिक्युलेट मॅटरची भूमिका लक्षणीय असते; डोळ्यांनाही न दिसणारे ते कण थेट माणसाच्या डीएनएमध्येच विपरीत बदल करण्याचे कार्य करतात. कर्करोगासारख्या अनेक जीवघेण्या विकारांमागे अशा प्रकारे वायुप्रदूषणाची भूमिका खूप महत्त्वाची असल्याचे लक्षात आले असून येल विद्यापीठाच्या स्कूल ऑफ मेडिसिनमधील जिनोमिक्स विभागाचे प्रमुख डॉ. श्रीकांत माने यांची सविस्तर मुलाखत ‘लोकप्रभा’नेच यापूर्वी प्रसिद्ध केली होती. वायुप्रदूषणाच्या संदर्भातील हा धोका खूप मोठा आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी चीनची राजधानी असलेल्या शांघाय परिसरामध्ये वायुप्रदूषण एवढे वाढले की, नागरिकांना श्वसनासाठी ऑक्सिजन सिलेंडर विकत घ्यावे लागले. तीन वर्षांपूर्वी दिल्लीतील हवा सर्वाधिक प्रदूषित झाल्यानंतर हवा शुद्ध करणारे प्युरिफायर्स नागरिकांना विकत घ्यावे लागले. परिस्थिती अशीच राहिली तर कोविडच्या उपचारांसाठी सुरू झालेले ऑक्सिजन प्रकल्प वेगात चालवून अधिक ऑक्सिजननिर्मिती सामान्य नागरिकांच्या नियमित श्वसनासाठी करण्याची वेळ येईल, ती ‘प्रदूषणाची आणीबाणी’ ठरेल!