मथितार्थ
अगदी सुरुवातीच्या कालखंडामध्ये माणूस भटक्या होता. त्याला स्वतचे घर नव्हते. तो कळपामध्ये राहायचा आणि शिकारीच्या शोधार्थ भटकायचा. त्यानंतर त्याला शेतीचा शोध लागला आणि तो एकाच ठिकाणी वसण्यास सुरुवात झाली. त्यातून सुरुवातीस गावे निर्माण झाली आणि नंतर त्यातील गावांचे स्वरूप आणि आकार मोठा होत त्याचे रूपांतर शहरामध्ये झाले, असे मानवाचा इतिहास सांगतो.
माणसाला लागलेला शेतीचा शोध ही त्याच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. त्यापूर्वी या भूतलावरील सर्वच प्राणिमात्र हे केवळ मांसाहारी होते. शेतीच्या शोधानंतर माणसाच्या शाकाहाराला सुरुवात झाली. तो एवढी शेती करू लागला की, त्यातून अधिकचे धान्य उत्पादन झाले आणि मग त्याची साठवणूक होऊ लागली. अखेरीस त्या साठवलेल्या धान्याचे आदानप्रदान करून त्याने स्वतच्या गरजा भागविण्यास सुरुवात केली तिथे व्यापार आणि बाजारपेठ अस्तित्वात आली.
शेतीच्या या सुरुवातीच्या शोधाच्या कालखंडात माणूस दिवस उजाडल्यावर कामाला सुरुवात करायचा आणि सूर्यास्तानंतर पुढच्या तासभरातच जेवण, गप्पाटप्पा यांच्यानंतर झोपी जायचा. त्याच कालखंडात सामूहिक जगण्याची एक गरज आणि निसर्गावर असलेले अवलंबित्व यांतून अनेक पूजा आणि सणांचा जन्म झाला. जवळपास सर्व सण हे म्हणूनच निसर्गातील अनेक बाबींशी संबंधित आहेत. त्यात उंदरांचा नायनाट करून धान्य वाचविणाऱ्या नाग-सापासाठी नागपंचमी आहे आणि सुगीनंतरचा आनंद व्यक्त करणारा दसरा-दिवाळीही आहे. अंधारावर प्रकाशाने केली जाणारी मात हे अग्नीच्या शोधानंतरचे नवल होते, त्यामुळे त्याच्यासाठीही उत्सव आला तर त्यात त्या वेळेस आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नव्हते. हा तोच कालखंड होता की, जेव्हा लोककला आणि लोकसंगीताचाही उदय झाला. अर्थात त्या सुरुवातीच्या काळात ते अगदी कच्च्या स्वरूपात होते. आताच्या रूपापर्यंत पोहोचण्यास त्यास हजारो वर्षांचा अवधी जावा लागला.
आज मानवी प्रगतीच्या हजारो वर्षांच्या प्रवासानंतरही अनेक ठिकाणी त्याचे निसर्गावर असलेले अवलंबित्व कायम आहे. भारतासारख्या देशात तर कृषीशी असलेली नाळ आता हळूहळू कमी होत तुटत चालली आहे. पण सण- समारंभ मात्र कर्मकांडाच्या माध्यमातून अधिक घट्ट होत चालले आहेत. अगदी अलीकडे तर या सण- समारंभांची नाळ थेट अर्थकारणाला जोडली गेली आहे. त्यातून निर्माण होणारा पैसा, त्याच्याशी संबंधित बाजारपेठ या साऱ्यांनी त्या सणांशी संबंधित अर्थकारणाला एक बैठक देण्याचे काम केले आणि मग गेल्या काही वर्षांमध्ये तर त्याला ग्लॅमर प्राप्त झाले आहे. पुन्हा एक नवा खेळ सुरू झाला ग्लॅमर आणि पैशांचा. पैसा मिळतो म्हणून तर त्या लाखोंच्या मायेसाठी कुणाच्याही दहीहंडी उत्सवात कोणताही अभिनेता आणि अभिनेत्री येऊन चार-दोन क्षण नाचण्यातही धन्यता मानताना दिसतात. त्यांना त्या सण- समारंभांशी काहीच देणेघेणे नसते, असते ते केवळ पैशांवरचे प्रेम. त्यांना पाहायला तुफान गर्दी लोटते आणि तीच मग एखाद्याला राजकारणाच्या भाऊगर्दीतही राजकीय नेता करण्यास पुरेशी ठरते. सणांचा हा आधुनिक प्रवास म्हणूनच एका वेगळ्या अभ्यासाचा विषय ठरावा.
सुरुवातीच्या काळातील सण आणि उत्सवांमध्ये सामाजिक बंधुभाव महत्त्वाचा होता. सण आणि उत्सव म्हणजे त्या वेळचे ‘सोशल नेटवर्किंग’च होते. भारतीय पारतंत्र्याच्या कालखंडात लोकमान्य टिळकांना गरज जाणवली ती सर्वाना सामाजिक स्तरावर देशकार्यासाठी एकत्र करण्याची. त्या उद्देशानेच त्यांनी चातुर्याने सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. लोकमान्यांप्रमाणेच विचारांची झेप अधिक असलेल्या आगरकरांनी त्यातील धोक्याची घंटा त्याही वेळेस लोकमान्यांच्या लक्षात आणून दिली. पण त्या वेळेस टिळकांच्या नजरेसमोर स्वातंत्र्य सर्वाधिक महत्त्वाचे होते. यात दिसायला उत्सव वरकरणी धार्मिक होता पण त्यातून त्यांना स्वातंत्र्य चळवळीचा संदेश चतुराईने सर्वत्र पोहोचवायचा होता. तसे त्यांनी केलेही, पण लोकमान्य आज हयात असते तर कदाचित आज सार्वजनिक गणेशोत्सवाला लाभलेल्या स्वरूपाबद्दल त्यांना निश्चितच खेद वाटला असता.
वाहतुकीचे बारा वाजणार याची पूर्णपणे कल्पना असतानाही रस्त्याच्या मधोमध घातलेले गणेश मंडप हे जवळपास अनेक शहरांमधले एक समान लक्षण ठरावे. आपण इतर कुणाला तरी त्रास देतो आहोत, याची पूर्ण जाणीव आयोजकांना असते. पण धार्मिकतेची पट्टी डोळ्यावर चढलेली असल्याने जनवेदना दिसतच नाहीत. उत्सव संपल्यानंतरही मंडपासाठी रस्त्यावर केलेले खड्डे कायम राहतात. रस्त्यांच्या मधोमध असणाऱ्या मंडपांना परवानगी देऊ नये असे स्पष्ट निर्देश एका प्रकरणात पाच वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतरही पोलिसांकडून या सर्व मंडपांना रीतसर परवानगी मिळते. मग न्यायालयाच्या त्या निवाडय़ाला अर्थच काय राहतो. असे करण्यास धजावण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे धार्मिक बाबींच्या आड न्यायालये येणार नाहीत, अशी राजकारण्यांना मनोमन असलेली धारणा हेच आहे. शिवाय न्यायालये धार्मिकतेच्या आड आलीच तर त्यांना राजकारण करण्यासाठी आयते कोलितच मिळते. विरोधकांना कोलीत मिळू नये म्हणून मग पोलिसांना परवानगी देण्याचे आदेश तोंडीच जारी होतात. यात धार्मिकता पुढे असते, पण त्या आडून या उत्सव आणि सणांमध्ये खेळले जाते ते राजकारण.
सार्वजनिकरीत्या साजऱ्या होणाऱ्या कोणत्याही सण-उत्सवाचे उदाहरण घ्या. मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्यामागे राजकारण प्रभावी असते. मग ईदच्या शुभेच्छा देण्यासाठीही अहमहमिका सुरू असते आणि गणेशोत्सवाच्या शुभेच्छांसाठीही. पूर्वी या सार्वजनिक उत्सवांमधून कार्यकर्त्यांची एक फळी तयार व्हायची आणि मग त्यांच्यातून भावी नेतृत्व पुढे यायचे. आता राजकारण्यांनीच जवळपास सर्व मंडळे ताब्यात घेतल्यासारखी स्थिती आहे. त्यांच्या माध्यमातूनच राजकीय नेतृत्वाची प्रतिष्ठापना करण्यासाठी या उत्सव- सण आदींचा वापर राजकारण्यांकडून केला जातो.
आताच्या उत्सवांना धांगडधिंग्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डीजे हा आता परवलीचा शब्द झाला आहे. मग उत्सव कोणताही असो दहीहंडी किंवा गणपती, कर्णकर्कश आवाजात डीजे लावल्याशिवाय आणि त्याच्यावर पाय थिरकल्याशिवाय ते साजरे झाल्यासारखे वाटतच नाही, अशी घाणेरडी मानसिकता जन्माला येते आहे. गेल्या वर्षी तर प्रथमच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्तही अनेक ठिकाणी डीजेवर थिरकणारी पावले प्रथमच पाहायला मिळाली. उत्सवांचे अशा प्रकारे ‘डीजे’करण आता समाजाच्या मुळावर येते आहे. या ‘डीजे’करणाविरोधात तक्रार करणाऱ्या सर्वानाच अनुभव आला तो मस्तवालपणाचा. ज्याच्या मुळाशी होता उन्माद!
गणेशोत्सवाच्या निमित्ताने समोर येणाऱ्या बाबी वाईटच आहेत असे नाही. या निमित्ताने चांगले सामाजिक काम करणारी मंडळेही आहेत. त्यातील अनेकांनी स्वतच्या पायावर मुलांना उभे करणाऱ्या शिक्षणासाठी वंचितांना शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली आहे तर अनेकांनी विविध समाजोपयोगी प्रकल्पांचा श्रीगणेशा केला आहे. पण अशा मंडळांची संख्या फार मोठी नाही. गेल्या अनेक वर्षांमध्ये गणेशोत्सव मंडळांची असलेली संख्या सर्वत्र वाढते आहे. याचाही वेगळ्या पातळीवर विचार व्हायला हवा. लोकांनी एकत्र यावे म्हणून लोकमान्यांनी सार्वजनिक उत्सव सुरू केला, पण आज त्याच्या मूळ हेतूकडे दुर्लक्ष झाल्याने आणि इतर हितसंबंध असलेले हेतू प्रधान झाल्याने एकाच सोसायटीमध्ये वेगवेगळ्या विंगचाही वेगळा गणेशोत्सव अनेक ठिकाणी दिसतो. किंवा एकाच मंडळातून भांडणामुळे बाहेर पडून स्थापन झालेली अनेक दुसरी मंडळेही दिसतात. ही स्थिती सार्वजनिक उत्सवांच्या मूळ उद्दिष्टांबाबत आपण पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे, हेच सुचविणारी आहे.
मध्यंतरी या वाढलेल्या मंडळांच्या संख्येचा शोध घेताना असे लक्षात आले की, कार्यकत्यरंची संख्याही वाढलेली आहे. हे सारे लाखो कार्यकर्ते विविध मंडळांमध्ये दिवसरात्र राबताना दिसतात. याला ऊर्जा म्हणायचे तर ती सकारात्मक असायला हवी आणि ती विचारांच्या बाबतीत समाजाला पुढे नेणारी असायला हवी. पण समाज पुढे न जाता उलटपक्षी परंपरा आणि रूढींच्या कर्मकांडातच अडकत चाललेला दिसतो. शिवाय आपण ज्या पद्धतीने त्याचे उत्सवीकरण करत आहोत तेदेखील केवळ कार्यकर्त्यांनाच नव्हे तर समाजालाही उन्मादाच्या कडेलोटाच्या दिशेने नेणारे आहे. उन्माद प्रबळ झाला की, माणूस संवेदना आणि सहवेदनाही विसरतो आणि मग ही तीच वेळ असते की, त्याच्यातील पशू जागा होतो. त्याच्यातील पशू जागा करणे हे उत्सवांचे उद्दिष्ट कधीच नव्हते. आपण त्यापासून आता खूप दूरवर आलो आहोत. अर्थशास्त्राच्या भाषेत बोलायचे तर आपला प्रवास आता कृषिप्रधानता ते सेवा व्यवसायापर्यंत (सव्‍‌र्हिस इंडस्ट्री) झाला आहे. मग अशा टप्प्यावरही त्या कृषीशी संबंधित असलेल्या सण- समारंभांशी असलेली नाळ आपण कायम ठेवणार असू तर मग कृषीशी अर्थात शेतीशी असलेली नाळ तुटते आहे, याचे भान आपल्याला का नाही? आपल्याप्रमाणेच सुपरपॉवर अर्थात महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेजारच्या चीनकडे पाहिले तर असे लक्षात येईल की, त्यांची कृषीवर असलेली पकड कायम आहे आणि आपल्याकडील शेतीचे प्रमाण चिंताजनक घटते आहे. अलीकडेच आपण अन्नसुरक्षा विधेयकही संमत केले. अन्नसुरक्षेची खात्री देशातील जनतेला देण्यासाठी प्रथम तेवढे अन्न आपल्याकडे असावे लागेल. आज ते तेवढे अन्न आपल्याकडे आहे. पण उद्याची मात्र खात्री नाही असे सांगत देशभरातील अर्थतज्ज्ञ आणि कृषितज्ज्ञ त्या अतिमहत्त्वाच्या समस्येकडे आपले लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण उत्सवाच्या उन्मादामुळे संवेदनाच हरवलेल्या आपल्या कानांना ती इशाऱ्याची घंटा ऐकू कुठे येतेय?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा