नवरात्र विशेष
भारतात अनादी कालापासून कार्य करण्याचे सामथ्र्य देणाऱ्या शक्तीची देवता रूपात उपासना अस्तित्वात आहे. तीच आदिशक्ती आहे. ती वैभव, पराक्रम व ज्ञान या तीन गुणांनी युक्त होऊन महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या रूपांत प्रकट होते. आज या तिघींचे विस्मरण झाले आहे.
इंग्रजी भाषेत पॉवर, अॅबिलिटी, कपॅसिटी, एनर्जी अशा अर्थाने येणारा शक्ती हा शब्द संस्कृतमध्ये ‘शक्’ म्हणजे ‘समर्थ असणे’ या धातूवरून तयार झाला आहे. भारतात शक्ती या शब्दाचे विविध अर्थ मानले आहेत. योगशास्त्रात ‘चित्तवृत्ति निरोध:’ म्हणजे मनात उठणाऱ्या भावनांचे नियमन म्हणजे शक्ती आहे, तर सांख्य तत्त्वज्ञानात विश्वाचे प्रकटीकरण, ही शक्ती मानली आहे. त्यांच्या मते ही शक्ती व ती धारण करणारा यांत कोणताही भेद नाही. तर सर्वसामान्य भाषेत ‘कार्य करण्याचे सामथ्र्य’ म्हणजे शक्ती होय.
भारतात अनादी कालापासून कार्य करण्याचे सामथ्र्य देणाऱ्या या शक्तीची देवता रूपात उपासना अस्तित्वात आहे. बृहदारण्यक उपनिषदानुसार ही शक्तीच संपूर्ण चराचराला जन्म देते. तीच आदिशक्ती आहे. ही आदिशक्ती वैभव, पराक्रम व ज्ञान या तीन गुणांनी युक्त होऊन महालक्ष्मी, महाकाली व महासरस्वती या रूपांत प्रकट होते. शक्तीचे हे तीन गुण जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. या तीन गुणांशिवाय जीवनात गतीही नाही व प्रगतीही नाही.
प्राचीन राजनीतीतसुद्धा शक्ती हा शब्द विशिष्ट अर्थाने येतो. राजनीतीत शक्ती ही सन्यशक्ती आहे. पण कधी कधी भाला, गदा किंवा एखादे अस्त्र यांचाही उल्लेख शक्ती म्हणून केला जातो. इंद्राकडे असलेली शक्ती ‘वासवीशक्ती’ आहे. पण हे फार वरवरचे अर्थ झाले. प्राचीन राजनीतीत, ‘प्रभू’, ‘उत्साह’ व ‘मंत्र’ अशी तीन प्रकारची शक्ती मानली गेली आहे. राजनीतीतील ही शक्ती समजून घेण्यापूर्वी प्राचीन भारतीयांचे राजनीतीविषयक तत्त्वज्ञान काय होते, ते प्रथम जाणून घेऊ या.
अनेक पाश्चात्त्य व काही भारतीय विचारवंतांच्या मते भारतीयांना ऐहिक जीवनाची आवड नव्हती. त्यांच्याकडे काव्य व तत्त्वज्ञान या ज्ञानाच्या दोनच शाखांचा विकास झाला होता. राज्य हा शब्द भारतीयांना माहीत नव्हता असे सेनार्ट नावाच्या तत्त्वज्ञाचे मत आहे. तर ‘राज्य, समाज व नागरिकत्व या ऐहिक विषयांकडे प्राचीन भारतीयांनी लक्षच दिले नव्हते’ असा टीकेचा सूर ए. बी. किथ या विद्वानाने आळवला
आपल्याकडे धर्म, अर्थ, काम व मोक्ष असे चार पुरुषार्थ मानले आहेत. धर्म म्हणजे योग्य-अयोग्याचे ज्ञान झाल्यावर अर्थ व कामाचा उपभोग घेत घेत आयुष्याच्या अंती मोक्षाकडे वाटचाल करावी अशा विचारातून ही पुरुषार्थाची चौकट घातली गेली आहे. या चौकटीत अर्थ व कामालाही तेवढेच स्थान आहे. त्यांचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सर्वाना मान्य होते, पण मला हवे ते मी कोणत्याही मार्गाने लुबाडीन हे प्राचीन भारतीयांना मान्य नव्हते. अर्थ व काम हे धर्म व मोक्षाच्या मर्यादेत राहून प्राप्त केले पाहिजे याची जाणीव भारतीयांना होती. भारतीयांना वैभवाचे वावडे कधीच नव्हते. आजकाल फार मोठय़ा प्रमाणात म्हटले जाणारे श्रीसूक्त हे ऋग्वेदाच्या पाचव्या मंडळात येते. श्री म्हणजे लक्ष्मी. संपूर्ण श्रीसूक्ताचा अभ्यास केला तर वैभव प्राप्त करून देणाऱ्या भूदेवीची ती पूजा आहे असे लक्षात येते. भारत हा शेतीप्रधान देश असल्याने आमचे उदरनिर्वाहाचे साधन जर आम्हाला शेतीतून प्राप्त होत असेल तर तिच्याविषयी कृतज्ञता या सूक्तात व्यक्त होते.
ऐहिक गरजा भागल्याशिवाय तत्त्वज्ञान सुचत नाही याची स्पष्ट जाणीव ऋषी-मुनींना होती. यामुळेच ऋग्वेदातील सूक्तांतून देवांना आहुती दिल्यावर ऋषी-मुनींनी, ‘आम्हाला भरपूर दूध देणाऱ्या गाई, पुष्ट बल, विपुल वैभव दे, पराक्रमी पुत्र दे’ अशा प्रार्थना केल्या आहेत. ऋग्वेदात केलेल्या दानांच्या वर्णनांवरून ते वैभव त्यांनी केवळ प्राप्त केले होते असे नव्हे तर ते समाजाला देऊन टाकण्याचा दानशूरपणाही त्यांच्याकडे होता असे दिसते. ऋग्वेदातील या दानांमध्ये उत्तमोत्तम वस्त्रांबरोबर सुवर्णपात्र, सुवर्णरथांचेही उल्लेख आहेत. यावरून ऋग्वेदकाळत केवढे मोठे वैभव भारतीयांनी मिळवले होते याची कल्पना येते. हे वैभव टिकवण्यासाठी फार मोठे पराक्रम आमच्या पूर्वजांनी केले होते. त्याच वेळी आदिशक्तीच्या महालक्ष्मी व महाकाली रूपाबरोबरच ज्ञानसाधना म्हणजे सरस्वतीचीही उपासना केली होती. ऐहिक वैभव सर्वार्थाने प्राप्त करीत असतानाच त्यातील आनंद चिरकाल टिकणारा नाही हे भारतीयांना जाणवले आणि मग माणसाला मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे घेऊन जाणारा ज्ञानामृताचा अखंड वाहणारा झरा ऋषी-मुनींनी निर्माण केला.
जी गोष्ट ऋषी-मुनींची तीच गोष्ट तथागत गौतम बुद्धाची. वैभवात लोळणाऱ्या सिद्धार्थाला त्यातील वैत्यर्थ जाणवले आणि मग सर्वसंग परित्याग करून ज्ञानाच्या शोधात तो बाहेर पडला व बुद्ध झाला. पण स्वत: सर्वसंग परित्याग केला तरी अर्थाचे मूल्य तो जाणून होता. अशा या ‘बुद्ध’ झालेल्या बुद्धाविषयी एक कथा सांगितली जाते-
ज्ञान प्राप्त झालेल्या बुद्धांचा फार मोठा शिष्यवर्ग होता. या अनुयायांना धर्मज्ञान दिल्यावर त्यांनी धर्मप्रसार करण्यास बाहेर पडावे अशी आज्ञा दिली. त्यांच्या आज्ञेनुसार सारे शिष्य बाहेर पडले. यांत एक तरुण उत्साही शिष्यही निघाला. ज्या मार्गाने तो निघाला त्याच मार्गावरून समोरच्या दिशेने एक व्यक्ती येत होती. या तरुणाने त्याला थांबवून आपल्याजवळचे ज्ञान द्यायला सुरुवात केली. त्या व्यक्तीने काही वेळ तरुण धर्मप्रसारकाचे म्हणणे ऐकले आणि थोडय़ा वेळाने विनवणीच्या सुरात तो म्हणाला, ‘‘महाराज, माझी ही धंद्याची वेळ आहे. मला जाऊ द्या.’’ तरुण धर्मोपदेशकाचा विरस झाला. खिन्न मनाने तो बुद्धदेवांकडे परत आला. एवढय़ा लवकर व उदास चेहऱ्याने परत आलेल्या त्या शिष्याची बुद्धांनी समजूत काढली व ‘उद्या पुन्हा प्रयत्न कर’ असे सांगितले. दुसऱ्या दिवशी तो शिष्य पुन्हा त्याच रस्त्याने निघाला. कर्मधर्मसंयोगाने पुन्हा कालचाच माणूस समोरून येत होता. त्या माणसाने समोरून येणाऱ्या धर्मोपदेशकाला पाहून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने चालायला सुरुवात केली. धर्मोपदेशकही रस्ता ओलांडून त्या माणसासमोर गेला. त्याला समोर पाहताच तो गृहस्थ कळवळून म्हणाला, ‘‘महाराज, काल मी थोडा वेळ थांबलो आणि माझे फार नुकसान झाले. तेव्हा आज मी अजिबात थांबणार नाही. याच वेळात माझा धंदा चांगला होतो. मला जाऊ द्या.’’ तरुणाने त्याला विचारले, ‘‘तुझा कसला धंदा आहे?’’ हात जोडत माणूस म्हणाला, ‘‘मी भीक मागतो. आपापल्या उद्योगाला सुरुवात करण्यापूर्वी लोक मंदिरात जातात आणि बाहेर पडताना आम्हालाही काही देऊन जातात. काल मी मंदिरात पोहोचेपर्यंत नेहमीचे लोक निघून गेले, माझे नुकसान झाले.’’ असे म्हणून तरुणाच्या उत्तराची अपेक्षा न करता तो भिकारी निघून गेला. ‘धर्मज्ञानापेक्षा याला भीक मोठी वाटते? छे, छे! उच्चज्ञान घेण्याची लोकांची लायकीच नाही!’ असा विचार करून धर्मोपदेशक परत आला. आल्या आल्या त्यांनी उद्यापासून आपण धर्मप्रचाराला बाहेर पडणार नाही असे जाहीर केले. पण दुसऱ्या दिवशी बुद्धदेव स्वत: त्याच्याबरोबर निघाले. त्यांनी मार्गही तोच घ्यायला सांगितला. इकडे हा भिकारीही आपल्या घरातून निघाला. पण निघतानाच मनात भीती होती. ‘गेले दोन दिवस दिसत असलेला तो माणूस आज पुन्हा दिसणार नाही ना? तो माणूस अभद्र आहे, तो दिसला की आपल्या धंद्यात खोट येते,’ या विचारातच निघालेल्या त्या माणसाला आज एकाऐवजी दोन माणसे येताना दिसली. डोक्यावर हात मारून, दुर्दैवाला दोष देत तो उलटय़ा दिशेने धावत सुटला. बुद्धांनी आपल्या शिष्याला त्या भिकाऱ्याला पकडून आणायला पाठवले व तो गयावया करीत असताना हात धरून त्याला आपल्या गुंफेकडे घेऊन आले. आल्या आल्या भिकाऱ्याने कधी पाहिले नसेल असे सुग्रास जेवण त्याला दिले. स्नानासाठी स्वच्छ जल व नंतर स्वच्छ वस्त्रांची सोय केली. पोटात अन्न गेल्यावर भिकाऱ्याच्या डोळ्यावर झोप आली. त्याच्यासाठी बिछाना घातला गेला. भिकारी जागा झाला की स्नानादी करी व भोजन करून पुन्हा झोपी जाई. इतर शिष्यांना भिकाऱ्याला बुद्धांकडून मिळणाऱ्या या सवलतींचा खरंतर रागच यायला लागला होता. पण जो तो मूग गिळून गप्प होता. एक दिवस भिकाऱ्याला अवेळी जाग आली. त्या वेळी बुद्धांचे प्रवचन सुरू होते. पडल्या जागेवरून तो ते ऐकत होता. हे सगळे वेगळे आहे असे त्याला वाटू लागले. आता तो त्या वेळाला मुद्दाम उठू लागला व अंथरुणातून प्रवचन ऐकू लागला. काही काळाने तो इतरांबरोबर बसून प्रवचन ऐकू लागला व एक दिवस असा आला की, प्रवचन झाल्यावर बुद्धांनी शिष्यांना धर्मप्रसार करण्यासाठी जाण्याची आज्ञा दिली तेव्हा तोही निघाला. ‘पोटाची भूक भागल्याशिवाय धर्म, तत्त्वज्ञान सुचत नाही,’ हे सत्य जे शिष्याला कळले नव्हते ते बुद्ध जाणून होते.
राजनीतीतील शक्तीचे रूप
तत्त्वचिंतकांना जे कळले ते राजनीतिज्ञांना कळले नव्हते हे कसे शक्य आहे?
राजनीतीच्या रामायण, महाभारतादी सर्व ग्रंथांतून या राज्यलक्ष्मीचे, संपत्तीचे महत्त्व सांगितले आहे. महाभारतातील शांतिपर्व हा राजनीतीविषयक भाग. यात युधिष्ठिराला राजनीतीतील संपत्तीचे महत्त्व सांगताना भीष्म म्हणतात, श्रीमंत लोक हे राष्ट्राचे प्रमुख अंग आहेत. संपत्ती ही राष्ट्रात सर्वश्रेष्ठ आहे म्हणून या लोकांचा तू मान केला पाहिजेस. याच पर्वात कालकवृक्षीय मुनी व क्षेमदर्शी राजाच्या कथेच्या निमित्ताने भीष्म, राष्ट्रांत संपत्ती व सन्याचे महत्त्व युधिष्ठिराला समजावतात. कालिदासासारखा कवी आपल्या कुमारसंभव या काव्यात, उत्साह गुणाने युक्त होऊन राजाने अखंडित संपत्ती प्राप्त केली पाहिजे असे स्पष्ट करतो. रिकामा कोश हे राजाचे लांच्छन मानले जाई. राजनीतीवरील सर्वात प्राचीन व उपलब्ध अशा कौटिलीय अर्थशास्त्र या ग्रंथात कोश व तो टिकवण्याचे साधन असणारी सन्यशक्ती याची विस्तृत चर्चा आहे. कौटिल्य, ‘धर्मस्य मूलम् अर्थ:’ अर्थाशिवाय धर्म केवळ अशक्य आहे, त्यामुळे कोश हा सर्वप्रथम येतो व तो कधीही रिकामा होणार नाही याची राजाने काळजी घेतली पाहिजे, असे स्पष्ट प्रतिपादन करतो. ही काळजी घेण्याचे साधन अर्थातच सन्य आहे. म्हणून कौटिल्य म्हणतो, ‘बलं शक्ति: सुखं सिद्धि:’। (६.२.३२) बल म्हणजे सन्यशक्ती व त्याद्वारेच आम्हाला सुखाची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे सर्व सुखाचे मूळ असणाऱ्या या शक्तीचे वर्णन करताना तो म्हणतो, ‘शक्तिस्त्रिविधा ज्ञानबलं मन्त्रशक्ति: कोशदण्डबलं प्रभुशक्ति: विक्रमबलमुत्साहशक्ति:’। (६.२.३३) ज्ञानाच्या साहाय्याने प्राप्त होणारी ती ‘मन्त्रशक्ति’, प्रकर्षांने पुढे अर्थात विजयी असण्याची इच्छा म्हणजे ‘प्रभुशक्ती’ व ती कोश व सन्य यांनी प्राप्त होते. पराक्रमाने युक्त असते ती ‘उत्साहशक्ती’. या उत्साह गुणाची व्याख्या कौटिल्याने ‘शौर्यममर्ष: शीघ्रता दाक्ष्यं चोत्साहगुणा:।’ (६.१.५) अशी केली आहे. म्हणजे उत्साह या एका गुणांतर्गत शूरता, अमर्ष (संताप), शीघ्रता (गतिशीलता) व दक्षता असे गुण आले. यातील अमर्ष या शब्दाचे स्पष्टीकरण करताना कामंदक नावाचा राजनीतिज्ञ म्हणतो, ‘आपल्या राष्ट्राचा अपमान कधीही न विसरणे म्हणजे अमर्ष.’ दुर्दैवाने आज आपण हा गुण पूर्णपणे विसरलो आहोत. त्यामुळेच आपल्या राष्ट्राचा पुन:पुन्हा अपमान करताना शत्रूला काहीच वाटत नाही. आतापर्यंत पाकिस्तान व चीन आपली आगळीक काढत होते. पण अमर्षहीन असलेल्या आपल्या वृत्तीला पाहून ब्रह्मदेशही आता आपल्याला त्रास देऊ पाहत आहे.
राजनीतीतील प्रभू, उत्साह व मंत्र या तीन शक्तींची आपल्याला आदिशक्तीच्या तीन रूपांशी सांगड घालता येते. मंत्रशक्ती म्हणजे ज्ञान. ही मंत्रशक्ती म्हणजेच सरस्वती. प्रभुशक्तीत कोशाचा अंतर्भाव असल्याने ती महालक्ष्मीचे रूप आहे, तर पराक्रम व अमर्ष म्हणजे संताप या गुणांमुळे उत्साहशक्ती ही महाकालीचे रूप ठरते.
संत हे शांततेचे पुरस्कत्रे, मात्र ही शांतता राष्ट्र सुरक्षित असेल तरच मिळू शकते याचे संस्मरण संतांनाही होते. आणि म्हणूनच संपूर्ण भारत मुसलमानांच्या अत्याचाराखाली भरडला जात असताना एकनाथांसारखा संत ‘बया दार उघड’ अशा शब्दांत त्या शक्तीला आवाहन करतो, तर रामदासांसारखा ‘चळवळ्या’ संत शक्तीचे गुणगान गाताना सहजपणे सांगतो,
शक्तीने पावती राज्ये शक्ती नसता विटंबना
शक्तीने नेटका प्राणी वैभव भोगिता दिसे॥
शक्ती असेल तरच राज्ये टिकतात व तिच्यामुळेच आनंदाने वैभवाचा उपभोग घेता येतो. मात्र त्या दुग्रेच्या रूपाला विसरलो तर किती दीर्घकाळ आपण दैन्यावस्थेत काढला याची आठवण आपल्या सगळ्यांनाच आहे.
काळ कोणताही असो, महालक्ष्मीच्या उपासनेला पर्याय उरत नाही. त्यामुळेच ऋग्वेदातील श्रीसूक्त आजही तेवढय़ाच भक्तीने म्हटले जाते व वैभवाच्या प्राप्तीसाठी संतोषीमाता, वैभवलक्ष्मी किंवा महालक्ष्मीसारखी व्रते येत असतात. लोक मोठय़ा प्रमाणावर वैभव मिळावे म्हणून या व्रतांचे पालनही करतात. श्रीयंत्रासारख्या वैभव मिळवून देणाऱ्या यंत्राचा खप सगळ्यात जास्त असतो. पण शक्तीचे एक रूप मिळवायचे असेल तर तिची उरलेली दोन्ही रूपेही तितकीच महत्त्वाची आहेत, याचे मात्र दुर्दैवाने विस्मरण झालेले दिसत आहे. आज नवरात्रीच्या निमित्ताने शक्तीच्या या तीनही रूपांची आपण उपासना करू या!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा