साडी हा भारतीय स्त्रीसाठीचा हळवा कोपरा असतो. मध्य प्रदेशात राहणाऱ्या आमच्या वाचक प्रतिनिधींनी तिथल्या साडय़ांचं विश्व उलगडून दाखवलं आहे.
‘साडी’ आणि नारीचा संबंध फार जुना आहे. फार प्राचीन काळात झाडांची साले, पर्णे, वल्कले, पशूंचे कातडे यांचा उपयोग शरीर व लज्जारक्षण याकरिता होत असे. पुढे मानवांचे लक्ष कापूस उत्पादन व त्यापासून कापडनिर्मितीकडे गेले तेव्हापासून कापडाचे उपयोग सुरू झाले. नारीचे अधोवस्त्र हे साडीचं प्राथमिक रूप.
प्राचीन प्रतिमा, भित्तिचित्रे यामध्येसुद्धा स्त्री साडीरूपी वस्त्रात अवगुंठित दिसते. आजच्या आधुनिक काळात बदललेल्या वस्त्रांच्या परंपरेतसुद्धा स्त्रीला साडीचा मोह आवरत नाही. साडी हे वस्त्र स्त्रीचे लावण्य खुलविते. वेगवेगळय़ा प्रांतांच्या साडय़ांचे वेगवेगळे प्रकार आपल्या वैशिष्टय़ांसह बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या म.प्र.मधील महेश्वरच्या महेश्वरी किंवा इंदौरी साडय़ा त्यांचे मुलायम पोत, वापरलेले नैसर्गिक रंग व वेगळय़ा प्रकारचे काठ यामुळे लोकप्रिय आहेत. ‘महेश्वर’ हे इंदूरपासून सुमारे १५० कि.मी. अंतरावर आहे. नर्मदा नदीच्या अखंड वाहणाऱ्या प्रवाहांनी महेश्वर (पुराण काळात महिष्मती)ला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या साडय़ा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी पावलेल्या आहेत. म.प्र.ला भेट देणारे पाहुणे या साडय़ांच्या खरेदीशिवाय परतत नाहीत.
‘महेश्वरी’ साडय़ांच्या उत्पत्तीची कहाणी अशीच मजेदार आहे. इंदूरच्या सुप्रसिद्ध शासक ‘अहिल्याबाई होळकर’ एकदा बनारसच्या यात्रेला गेल्या होत्या. प्रवासात एक कोष्टी परिवार त्यांच्या भेटीला आला. त्यांनी राणीला हाताने विणलेली सुंदर नऊवारी साडी भेट म्हणून दिली. राणीला साडी खूपच आवडली. तिने कुटुंबप्रमुखाला विचारले, ‘‘तू महेश्वरला येशील का? मी तुला राजाश्रय देते.’’ राणीच्या शब्दाला मान देऊन आपल्याबरोबर अनेक दुसरे परिवार घेऊन तो महेश्वरला आला. राणीने त्यांना सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या. महेश्वर येथे कोष्टी लोकांनी आपल्या वसाहती स्थापल्या. आजही महेश्वरमध्ये या वसाहती आहेत.
या विणकरांनी तयार केलेल्या वस्त्रांची मागणी जगभर आहे. तलम सुतामध्ये रेशीम धागे, जरी यांचा मिलाफ करून सुंदर नक्षीदार साडय़ा व इतर वस्त्रे तयार केली जातात. ठरावीक पद्धतीचे काठ व पदर यांनी या वस्त्रांना उठाव येतो. विविध रंगांनी नटलेली महेश्वरी साडी एखाद्या भारदस्त गृहिणीसारखी वाटते. कालामानाप्रमाणे पंजाबी सूटस्, दुपट्टे, स्कार्फ वगैरेपण मिळतात.
चंदेरी साडी- या साडय़ांकरिता प्रसिद्ध असलेला ‘चंदेरी’ जिल्हा अशोकनगर येथे आहे. इथले राजपूत शासक जेव्हा मोगल शासकीच्या सहवासात आले, तेव्हा या तलम वस्त्रांनी त्यांना भुरळ घातली. मोगली प्रदेशातून कुशल कोष्टी कारागीर बोलावून त्यांना चंदेरी अशोकनगर या भागात वसवले. सुंदर बनावटीची तलम वस्त्रे राजपूत स्त्रियांची आवड बनली. कलेला प्रोत्साहन मिळू लागले. सर्वसाधारण जनतेतही चंदेरी साडीने मानाचे स्थान पटकावले. अतिशय तलम सुती धागे, जरी व रेशीम धागे यांचा उपयोग करून लहानमोठे बुट्टे, पाने, फुले, मोर, बदके, हत्ती यांसारख्या पारंपरिक नक्षीने या साडय़ा नटवतात. या साडय़ांमध्ये काठ नेहमी विपरीत रंगाचे असतात. अशी साडी तुमच्या वॉर्डरोबमध्ये हवीच. फक्त एक काळजी घ्या. तिला कपाटात घडी करून न ठेवता हँगरवर आत एक जुन्या साडीबरोबर घडी करून लटकवा म्हणजे वर्षांनुवर्षे टिकते.
बाग छपाई- म.प्र. घार जिल्ह्य़ात ‘बाग’ नावाचे खेडे आहे. ‘बागमती’ नदीच्या किनारी वसलेले हे गाव तिथल्या ‘वस्त्रांवर छपाई’साठी प्रसिद्ध आहे. आसपासचा भूभाग जंगली वृक्षझाडी यांनी वेढलेला आहे. कापसाची पैदावार जास्त म्हणून विणकर वस्ती जास्त. फार पूर्वी स्त्रिया, मुली आपला वेळ घालवण्यासाठी घराच्या भिंतीवर चुना, गेरू याने विविध आकृती रेखाटत. जंगली जडीबुटीपासून रंग बनवायची कला या कोष्टी लोकांना परंपरागत प्राप्त झालेली आहे. एका स्त्रीने फुरसतीचा वेळ घालवण्याकरिता विणलेल्या कापडावर काही आकृत्या रंगवल्या. नवऱ्याने ते कापड आठवडय़ाच्या बाजारात नेले. पुष्कळ जणांनी या कापडाची विचारपूस केली. तिच्या कामाची तिला दाद मिळाली. मग ही परंपरा वाढतच गेली. वस्त्रांवर अनेक सुंदर रंग व पारंपरिक आकृत्या आकार घेऊ लागल्या. आसपासच्या गावांतल्या बाजारात ही वस्त्रे विकली जाऊ लागली. त्यांची मागणी वाढली. आज ‘बाग’मध्ये १२००० घरांतून हे छपाईचे काम होते. अनेक पारंपरिक आकृत्यांचे लाकडी ठसे आहेत. उपयोगात येणारे सर्व रंग वनस्पतीपासून बनवले जातात. कुठल्याही रासायनिक पदार्थाचा उपयोग केला जात नाही. त्यामुळे मानवत्वचेला काही हानी होत नाही. केळीच्या गाभ्यापासून बनवलेला स्टार्च उपयोगात आणतात. त्यामुळे कपडय़ांना वेगळी चकाकी येते. मग इस्त्री करून माल बाजारात पाठवला जातो.
इथले कोष्टी बहुसंख्येने मुस्लीम आहेत. त्यांना ‘खत्री’ या उपजाती म्हणून ओळखले जाते. बदलत्या काळानुसार साडय़ांबरोबर सलवार कमीज, स्कार्फ, हॅण्डबॅग्ज इतर काही वस्तू यावरपण ही छपाई होते. या वस्त्रांना परदेशाहून विशेष मागणी आहे. या कलेला उत्तेजन व साहायता मिळाल्यास परदेशी चलनाचा एक मोठा स्रोत बनू शकेल.
महेश्वरच्या साडय़ांचे एक वैशिष्टय़ आहे. मृदू रंगाचे अंग व उठावदार रंगाचे, चटईच्या विणीचे काठ, ५ पट्टे असलेला पदर. जयपूरच्या सौंदर्यवती महाराणी गायत्रीदेवी, भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या ऑर्डर देऊन आपल्यासाठी महेश्वरी साडय़ा करवून घेत. हातमागावर उभ्या व आडव्या धाग्यांना विविध बुट्टे, पारंपरिक आकृत्या घातल्या जातात. महेश्वरी वस्त्रांवर ‘बाग छपाई’ कामपण केले जाते. मूळ वस्त्रांकरितापण वानस्पतिक रंग वापरले जातात. अशी तलम श्रीमंती धाटणीची प्रत्येक स्त्रीला आपल्या वॉर्डरोबमध्ये हवीशी वाटेल.