रंगांच्या दुनियेत पांढरा आणि काळा या दोन रंगछटा अशा आहेत की त्या आवडतही असतात आणि त्यांच्याबाबत असलेल्या वेगवेगळ्या समजुतींमुळे त्या टाळायच्याही असतात.
प्रत्येक आईच्या मनात आपल्या दुर्लक्षित झालेल्या मुलाबद्दल एक खास असा हळवा कोपरा असतो. सर्व जगाने दिलेली दूषणे, अपमान ती स्वत: झेलते पण आपल्या मुलाला त्याची झळ लागू देत नाही. तसे काहीसे माझे काळ्या रंगाबाबत होते. सगळ्यांनी नावे ठेवलेल्या, अशुभ म्हणून हिणवलेल्या काळ्या रंगाने माझ्या मनात एक खास स्थान मिळवलेले आहे. शुभ कार्यात काळा रंग घालू नये, चांगल्या कामाला किंवा परीक्षा- इंटरव्ह्य़ूला जाताना घालू नये, अशा किती तरी ठिकाणी या रंगाला मज्जाव आहे. रंगासारखा रंग, पण किती त्याचा दुस्वास. आज या लेखातून मी या माझ्या आवडत्या रंगाची वकिली करणार आहे.
खरं तर काळा आणि पांढरा यांना रंगाचा दर्जा द्यायचा का नाही याबद्दलपण वेगवेगळ्या व्यवसायांमधील लोक वेगवेगळी मतं मांडतात. भौतिकशास्त्राचा माणूस काळ्याला रंग मानत नाही. कारण व्याख्येनुसार कुठल्याही रंगाचा अभाव म्हणजे काळा रंग. म्हणून त्याचे अस्तित्वच ते नाकारतात. तर इंद्रधनुष्याच्या सातही रंगांचे मिश्रण म्हणजे पांढरा रंग. म्हणून पांढरा हा रंग म्हणून ते मानतात. पण हाच प्रश्न एखाद्या चित्रकाराला विचारल्यास तो काळ्याला रंगाचा दर्जा देईल, पण कदाचित पांढऱ्याला नाही. ते काहीही असो, सध्या आपण यांना रंग मानून त्याचा आपल्या मनावर काय परिणाम होतो व सजावटीत त्याचा कसा उपयोग करायचा हे जाणून घेऊ.
फार पूर्वीपासूनच ज्या ज्या म्हणून वाईट गोष्टी आहेत त्यांचा संबंध काळ्या रंगाशी जोडला गेला आहे. उदाहरणार्थ ब्लॅकमॅजिक, ब्लॅकलिस्ट, ब्लॅकमेल वगरे वगरे. आपल्या मराठीतसुद्धा तोंड काळे करणे, मनात काळेबेरे असणे, काळा पसा असणे वगरे माणसाबरोबर काळ्याचापण उद्धार करणारी बरीच विशेषणे वापरली जातात. या रंगाला अनाकलनीय, गूढ असे वलय प्राप्त झाले आहे. कुठलीही नकारात्मक, उदासवाणी गोष्ट काळ्या रंगाने चित्रित केली जाते. पण जरा कल्पना करा, पावसाळी हवा आहे. भन्नाट वारा सुटला आहे. मातीचा सुगंध पसरलाय. आकाशात रंगीबेरंगी ढगांची दाटी झालीये.. सॉरी सॉरी काही तरी चुकले ना? आत्ता आपल्याला रंगांचा विचारपण करवत नाही. इथे पाहिजेत फक्त काळे ढग आणि त्यामुळे आजूबाजूला पसरलेली ती कुंद हवा. रंग पण काळ्याच्या जागी काळाच पाहिजे. वर निसर्गाचे उदाहरण घेतले पण काळ्या रंगाची चांगली जाण असलेल्या डिझायनरने केलेली सजावट बाकी कुठल्याही रंगीत सजावटीपेक्षा वरचढ ठरते. याचे महत्त्वाचे कारण काळ्या रंगाची आपल्या मनात तयार होणारी प्रतिमा. काळा रंग म्हणजे सत्ता व शक्तीचे प्रतीक आहे. हा ‘नो नॉन्सेन्स’ रंग वातावरणात एक प्रकारची शिस्त आणतो. निळ्या रंगासारखा बोलायला उद्युक्त करणारा किंवा केशरी रंगासारखा गळ्यात गळे घालणारा हा रंग नाहीये. हा रंग कामे करवून घेतो पण स्वत:चा आब राखून. त्यामुळे फार आक्रमक न होता पण लोकांना हाताच्या अंतरावर ठेवून सीईओ, मॅनेजरच्या केबिनमध्ये या रंगाचा कलात्मकतेने केलेला वापर फार उपयोगी पडतो.
या रंगाबरोबर जगातला कुठलाही रंग शोभून दिसतो. अशा वेळी काळ्या रंगामुळे दुसऱ्या रंगालाही एक वलय प्राप्त होते. ज्याप्रमाणे भरभराटीला आणलेला आपला व्यवसाय आपल्या सक्षम मुला-मुलीकडे देताना बापाला आनंद होतो, स्वत: बॅकसीट घेऊन तो त्यांना वाढू देतो. तसे काहीसे काळा रंग दुसऱ्या रंगाबाबत करतो. काळ्या रंगाच्या खंबीर पािठब्यामुळे दुसरा रंगपण एकदम प्रौढ, विचारी वाटायला लागतो. त्यामुळे सजावटीला आपोआपच एक दर्जा प्राप्त होतो. ती आधुनिक वाटते. काळ्या रंगाची सोबत असल्याने इतर वेळी उथळ वाटणारा रंगही लोक गंभीरपणे घेतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवणे जरुरीचे आहे की, काळा रंग प्रकाश शोषून घेत असल्याने अशाच ठिकाणी वापरावा जिथे जागा मोठ्ठी व भरपूर उजेड असणारी आहे. नाही तर लहान जागा अजूनच लहान दिसायला लागेल.
काळ्या रंगाचा अजून एक गुण म्हणजे त्याला लाभलेले अभिजात सौंदर्य व सुसंस्कृतपणा. म्हणूनच सध्याच्या फॅशनच्या युगात काळ्या रंगाला अतिशय मान आहे. डोक्यापासून पायापर्यंत एकावर एक कितीही कपडे घालून ‘स्टायलिश’ दिसण्याचा गुण बाकी कुठल्याही रंगात नाही, फक्त काळ्या रंगातच आहे. हा रंग कधीही ‘आऊट ऑफ फॅशन’ होत नाही. म्हणूनच तर इतकी वष्रे पुरुषांसाठी काळा सूट व टाय आणि बायकांसाठी काळा गाऊन किंवा ड्रेसची अजूनही चलती आहे. या रंगामुळे बारीक दिसायला होते हा अजून एक मोठ्ठा फायदा.
तर असा हा काळा रंग. ज्यांना आवडत नाही त्यांची फिकीर न करणारा, पण ज्यांना आवडतो त्यांचे त्याच्याशिवाय पानही हलू न देणारा.
काळा म्हणल्यावर त्याच्या जोडीदाराचा, पांढऱ्याचा उल्लेख यायलाच हवा. पूर्वापार चालत आलेली ही काळ्या-पांढऱ्याची जोडी आजही एक हिट जोडी आहे. पांढरा रंग म्हणजे शांततेचे प्रतीक, नव्याची सुरुवात, पावित्र्य, साधेपणा असे बरेच काही. स्वच्छतेचा समानार्थी शब्द म्हणजे पांढरा रंग. हा रंग न्यायाने वागणारा, सगळ्यांना समानतेने वागवणारा म्हणून ओळखला जातो.
बाकीच्या रंगांप्रमाणेच पांढऱ्या रंगाचेसुद्धा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. या रंगाच्या सात्त्विकतेमुळे पाश्चिमात्य संस्कृतीत नव्या नवरीचा गाऊन हा पांढराशुभ्र रंगाचा असतो. आपल्याकडे या रंगाची दोन भागांत विभागणी केली आहे. एकीकडे पांढरा हा शांतता, आध्यात्मिक रंग म्हणून धार्मिक गुरूंच्या अंगावर परिधान केलेला दिसतो. ज्ञानाचे प्रतीक म्हणून देवी सरस्वतीच्या अंगावर दिसतो. तर दुसरीकडे कोणाच्या शोकसभेसाठी जातानापण ल्यालेला दिसतो. हा रंग मुळातच शिस्तीचा भोक्ता असल्याने शाळेच्या पीटीपासून आपल्या नौसेना, वायुदलाच्या युनिफॉर्ममध्ये आवर्जून वापरलेला दिसून येतो. या रंगाच्या टोकाच्या स्वच्छ प्रतिमेमुळे डॉक्टरांचा कोट, हॉस्पिटलची सजावट पांढऱ्या रंगात केली जाते.
या रंगाच्या प्रकाश परावíतत करण्याच्या गुणधर्मामुळे सजावटीत याचा फायदा एखादी जागा मोठ्ठी भासवण्यासाठी करता येतो. जिथे प्रकाश कमी आहे अशा जागी पांढरा रंग आवर्जून वापरावा. त्यामुळे खोलीतील काळोख कमी होण्यास मदत होईल. पांढऱ्या रंगामुळे लक्ष विचलित होत नाही. त्यामुळे संग्रहायलामध्ये जिथे टांगलेल्या कलाकृतीकडे, पुरातन वस्तूंकडे लक्ष जाणे अपेक्षित आहे, अशा ठिकाणी पाश्र्वभूमीवर पांढरा रंगच मुख्यत्वे लावला जातो. अशाने कलाकृतीचे रसग्रहण करणे सोपे जाते.
पांढऱ्याचे जसे चांगले गुण आहेत तसे वाईट गुणही आहेत. हा रंग शांततेचे प्रतीक आहे कबूल, पण या रंगाच्या प्रमाणाबाहेरच्या वापराने वातावरणातील शांतता भयाण शांततेत केव्हा रूपांतरित होईल सांगता येत नाही. बऱ्याच लोकांना हा भावनारहित रंग वाटतो. त्यामुळे या रंगाच्या सोबतीत एकाकी किंवा रिकामेपणा येऊ शकतो. सर्व बाबतीत परिपूर्ण व श्रेष्ठ असण्याचा अट्टहास असलेला या रंगाच्या सजावटीत एक प्रकारचा ‘कोरडेपणा’ वाढीस लागण्याची शक्यता असते.
माझ्या दृष्टीने आदर्श घर म्हणजे जिथे मला सोफ्यावर पाय वर घेऊन बसता येते किंवा जिथे मला वावरताना िभतीला, फíनचरला आपल्यामुळे डाग लागण्याची भीती वाटत नाही. सजावटीत पांढऱ्या रंगाचा अति वापर या माझ्या भीतीला उफाळून वर आणतो. साहजिकच अशा घरांमध्ये वावरताना र्निबध येतात. माणूस दबून जातो. या रंगाच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात, असे मला वाटते. थोडेसुद्धा इकडचे तिकडे झालेले त्याला खपत नाही. स्वत:वर एकही डाग खपवून न घेणारा हा रंग दुसऱ्यांचे दोष दाखवण्यात पुढे असतो.
बाकीच्या रंगांप्रमाणे पांढऱ्या रंगामध्येसुद्धा बेज, क्रीम, आयव्हरी अशा बऱ्याच छटा असतात. त्या वापरल्यास या रंगाचे वरील दोष झाकण्यासाठी मदत होईल. िभतीवरील रंग भगभगीत पांढरा देण्याऐवजी त्यात अगदी हलकासा आपला आवडता रंग मिसळल्यास मनाला व डोळ्यांना जास्त सुखकारक वाटतो. त्याचप्रमाणे आजकाल बाजारात दोन-तीन प्रकारचे प्रकाशाचे दिवे, टय़ूबलाइट्स मिळतात. त्यातील पूर्ण पांढरा प्रकाश असलेले दिवे घेण्याऐवजी ज्यात थोडी पिवळट / निळी झाक आहे असे दिवे घेणे केव्हाही चांगले.
तर अशी ही अट्ट आणि गट्टची जोडी. हे दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. हे दोन रंग म्हणजे यिन व यँग या चायनीज तत्त्वज्ञानाचा पाया आहेत. प्रत्येकामध्ये काळ्या आणि पांढऱ्याचे गुण-दोष सामावलेले आहेत. सजावटीत याचा समतोल राखणे फार गरजेचे आहे. तरच या जोडीमधील गोडव्याचा आपण आस्वाद घेऊ शकू, अगदी ब्लॅक अॅण्ड व्हाइट सिनेमासारखा.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com