घराच्या सजावटीत रंगांचे महत्त्व आपल्या डोळ्यांना कसे दिसते म्हणून नसते, तर ते असते रंगांच्या स्वभाववैष्टिय़ांमुळे. आपण मात्र ही वैशिष्टय़े समजून घेण्याच्या बाबतीत चक्क रंगांधळेपणाच करत असतो.
तमाम पुरुष वर्गासाठी एक महत्त्वाची सूचना.. विवाहेच्छुक तरुणांनी मुलगी बघायला जाताना किंवा ऑफिसमध्ये लेडी बॉससमोर मुलाखत देताना निळे कपडे परिधान करावेत!! मुलीकडून हमखास होकार आणि बॉसकडून नोकरी मिळालीच म्हणून समजा!! तुम्ही म्हणाल हे काय नवीन? यातील गमतीचा भाग सोडा, पण एका निरीक्षणात असे दिसून आले आहे की बायकांची स्वतची पहिली पसंती जरी जांभळ्या, हिरव्या रंगाला असली तरी पुरुषांनी निळे कपडे घातलेले त्यांना आवडतात. अशा पुरुषांकडे त्या जास्त आकर्षति होतात. त्यांच्याबरोबर बोलायला त्या उत्सुक असतात. अशी काय जादू आहे निळ्या रंगात?
निळा रंग आहेच सगळ्यांचा आवडता. वर पसरलेले आकाश व ७१ टक्के पाण्याने व्यापलेली ही भूमी. दोन्हीही निळेच. निसर्गात सर्वात जास्त या रंगाची उधळण केलेली आढळते. शीतल गटात मोडणारा हा रंग मनाला आणि शरीराला शांत व प्रसन्न करतो. त्यामुळे हा रंग झोपायच्या, विश्रांतीच्या खोलीत लावणे एकदम योग्य. या रंगात प्रामाणिकपणा आहे, त्यामुळे या रंगाचे कपडे घातलेली व्यक्ती किंवा निळ्या रंगाने सजवलेले घर हे आपलेसे, विश्वासार्ह वाटते. हा रंग आदर्श म्हणून गणला जातो. इथे लांडीलबाडीला वाव नसतो. म्हणूनच प्रथमदर्शनी ठसा उमटवण्यासाठी बऱ्याच कंपन्यांचे लोगो हे निळ्या रंगात असतात. जेणेकरून ‘आम्ही विश्वासू आहोत’ हा संदेश आपोआप पसरवला जातो. निळ्या रंगाच्या या गुणांमुळेच शेअर बाजारात, किमती व खात्रीशीर शेअर्सना ब्लू चिप शेअर्स म्हणतात. त्याचप्रमाणे ब्लू ब्लड म्हणजे खानदानी, थोर परंपरा जपणारा वारस.
हिंदू धर्मातसुद्धा निळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. आपल्या बऱ्याच िहदू देवांची चित्रे निळ्या रंगाचा वापर करून काढलेली आढळतात. जसे राम, कृष्ण, विष्णू, शंकर वगरे. निळेच्या डब्यात पडून निळा झालेला कोल्हा स्वतला देवाचा अवतार समजू लागला व सगळ्या जंगलावर राज्य करू लागला, ही गोष्ट लहानपणी सगळ्यांनी ऐकलीच असेल. इथे निळ्या रंगाला आध्यात्मिक वैभवपण लाभले आहे.
आपल्या आजूबाजूच्या रंगाचा आपल्या मनावर, वागण्यावर परिणाम होत असतो. निळा रंग उत्तम संवादासाठी, विचारांच्या देवाण-घेवाणीसाठी खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. हा रंग तुमचे मन मोकळे तर करतोच पण विचारांमध्ये-बोलण्यामध्ये सुसूत्रतापण आणतो. या रंगामुळे समोरच्या माणसाला आपले विचार पटवायला मदत होते. म्हणूनच या रंगाची टॅगलाईन आहे, ‘आय स्पीक, आय अॅम हर्ड’. संवाद हा तेव्हाच होतो जेव्हा आपले विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत फक्त पोहोचतच नाहीत, तर समजतात देखील. निळ्या रंगाच्या या वैशिष्टय़ामुळे बहुतांश आॉफिसेसच्या सजावटीमध्ये या रंगाला पसंती दाखवली जाते. बॉस, मॅनेजर व हाताखालील इतर कर्मचारी वर्ग यांच्यात तणावमुक्त विचारांची देवाणघेवाण या रंगामुळे वाढीस लागते असे आढळून आले आहे. त्याच बरोबर शिस्तीत काम करून घेण्यात हा रंग पटाईत आहे. त्याचाही परिणाम ऑफिसच्या वातावरणात पडतोच. सगळ्यांना सामावून घेणारा, एकमेकांशी जोडणारा हा रंग फेसबुक, ट्विटर, िलक्डइन सारख्या सोशल साइट्सना विचारपूर्वकच दिला गेला आहे.
निळ्या रंगाची एक गंमत म्हणजे, या रंगाच्या सान्निध्यात आपल्याला भूक कमी लागते. वजन आटोक्यात ठेवणाऱ्यांसाठी आहे की नाही ही आनंदाची गोष्ट? कधीतरी एकदा ऐकले होते की आहारतज्ज्ञ निळ्या रंगाच्या बाऊलमध्ये खायला सांगतात. त्याचे कारण आत्ता कळले. निसर्गात निर्माण झालेले किंवा आपण तयार केलेले खाद्यपदार्थ आठवून बघा, एकतरी निळा पदार्थ आहे का? ब्लूबेरीजपण निळ्या नसून गडद जांभळ्या रंगाच्या असतात. याच कारणासाठी स्वयंपाक घरात व जेवणाच्या खोलीत शक्यतो निळा रंग टाळावा.
तर असा हा शांत, प्रामाणिक, मनाला प्रसन्न करणारा निळा रंग. रंग चिकित्सा उपचार पद्धतीत निळ्या रंगापाठोपाठ येतो आपल्या हृदयावर राज्य करणारा हिरवा रंग. हिरवा रंग म्हणजे प्रेम, समतोल, ताजेपणा, वृद्धी, शीतलता आणि बरेच काही. कुठल्याही गोष्टीची सुरुवात करणे म्हणजे, ‘ग्रीन सिग्नल’ देणे. निळ्या रंगापाठोपाठ निसर्गात कुठल्या रंगाचे वर्चस्व असेल तर हिरव्या रंगाचे. म्हणूनच माणसाला हा रंग आकर्षति करतो. बहुतेक लोकांचे स्वप्न असते की आपला एक टुमदार बंगला असावा व त्याला लागून छोटी का होईना हिरवीगार बाग असावी. किंवा फ्लॅट असला तरी आजूबाजूला झाडे असावीत. माणसाची सुखाची कल्पना व हिरव्या रंगाचा फार जवळचा संबंध आहे. वरील दोन्हीपकी काहीही शक्य नसेल तेव्हा कोपऱ्यात मनीप्लांट लावून किंवा बाल्कनीत झाडांच्या कुंडय़ा ठेवून हिरवेपणाची भूक भागवली जाते.
हा रंग असा आहे की घराच्या दर्शनी भागापासून झोपायच्या खोलीपर्यंत कुठेही खुलून दिसतो. दिवाणखान्यात लावल्यास त्याचा शीतल रंग रात्री दमून आल्यावर थकवा घालवायला मदत करतो, तर बाथरूममध्ये पाण्याच्या सोबतीने छोटा निसर्ग आपल्या पायाशी आणून ठेवतो. झोपायच्या खोलीत तर हा रंग एकदमच परिपूर्ण ठरावा असा आहे. हिरव्या रंगामुळे डोळ्यांना थंडावा येतो व आपले स्नायू शिथिल होतात. याच कारणामुळे विश्रांतीच्या जागी हा रंग कुठल्या ना कुठल्या गोष्टींमार्फत आवर्जून वापरावा. मग हा रंग िभतीवर असेल, पडद्यावर, पेंटिंगमध्ये किंवा शोभेच्या वस्तूंमध्ये. या रंगामुळे मन ताजेतवाने होते. जसा निळा रंग विश्वास संपादन करायला वापरतात तसेच कुठल्याही गोष्टीचा ताजेपणा सिद्ध करण्यासाठी हिरव्या रंगाला पर्याय नाही. अमेरिकेत हिरवा रंग समृद्धीचा मानला जातो. म्हणूनच की काय त्यांच्या डॉलरचा रंग हिरवा आहे. इस्लाममध्ये हा एक पवित्र रंग म्हणून तर भारतामध्ये हा रंग शुभकार्याची सुरुवात व वृद्धीचे प्रतीक म्हणून वापरला जातो. जितके देश तेवढय़ा समजुती. पण एक मात्र आहे, कधीही कंटाळा न येणारा, आनंद पसरवणारा हा रंग व त्या सारखीच माणसे ‘एव्हरग्रीन’ म्हणून उगीचच ओळखली जात नाहीत.
माणूस हा इतर प्राण्यांपासून वेगळा ठरतो त्याच्या बुद्धीच्या जोरावर. आता या बुद्धीला निळ्या-हिरव्या रंगासोबत ठेवल्यास विश्रांती मिळेल, एकाग्रता वाढेल. पण चालना कशी मिळणार? कल्पनांची भरारी कशी घेणार? त्यासाठी आपल्या कामी येतो पिवळा रंग. अतिशय उत्साहवर्धक, आशावादी आणि मेंदूला सतत खाद्य पुरवणारा. म्हणूनच प्रत्येक वस्तुतज्ज्ञाच्या, इंटिरिअर डिझायनरच्या ऑफिसमध्ये या रंगाचा समावेश असतोच असतो. हा रंग फक्त कल्पनांचे इमले बांधत नाही तर तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून त्या कल्पना सत्यात उतरवायला मदत करतो. असे म्हणतात हा रंग घराच्या प्रवेशद्वारापाशी लावल्यास माणूस घराबाहेर पडताना नवीन आत्मविश्वास, ऊर्जा घेऊन बाहेर पडतो. काम फत्ते करण्याचे बळ त्याच्यात येते. पिवळ्या रंगाला आव्हान स्वीकारायला फार आवडते. जास्तकरून बौद्धिक आव्हान. म्हणून मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी हा रंग शिशुवर्गात, खेळायच्या जागी लावलेला दिसतो. पिवळा रंग हा पटकन नजरेला दिसून येणारा रंग असल्याने रस्त्यावरच्या धोक्याच्या, वळणाच्या पाटय़ा या पिवळ्या असतात. ढगाळ-पावसाळी हवेत रस्त्यावरील पांढऱ्या पट्टय़ांऐवजी पिवळे पट्टे आपल्याला सावध करतात.
िहदू संस्कृतीत व विवाहात पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे. वसंत ऋतूचे प्रतिनिधित्व करणारा हा आनंद पसरवणारा रंग समजला जातो. त्याचबरोबर विवाह विधीत एक शुभ रंग म्हणून या रंगाला मानाचे स्थान आहे. भगवान विष्णू, कृष्ण व गणपती यांनी परिधान केलेली पिवळी वस्त्रे ज्ञानाचे प्रतीक मानली जातात.
पिवळ्या रंगाचा एक दोष आहे की हा रंग डोक्याला सतत व्यस्त ठेवतो, स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे झोपायच्या खोलीत शक्यतो हा रंग टाळलेला बरा. या रंगाच्या याच गुणामुळे अभ्यास करतानासुद्धा लक्ष एकाग्र करणे बरेचदा कठीण जाते. म्हणून अभ्यासाच्या जागी पिवळ्या रंगाऐवजी शीतल रंगाच्या छटा वापरणे चांगले. जेणेकरून मन स्थिर राहण्यास मदत होईल. कधी कधी जरुरीपेक्षा जास्त पिवळा रंग वातावरणात ताण निर्माण करतो. त्यामुळे बऱ्याच वृद्ध माणसांना हा रंग सहन होत नाही. अशा वेळी आपल्या आजी-आजोबांची खोली या रंगापासून दूर ठेवलेलीच बरी. इतर ठिकाणीदेखील पिवळ्या रंगाचा संयत उपयोग करणे केव्हाही श्रेयस्कर.
वरील लेखामुळे एक गोष्ट लक्षात येईल की, माणसाप्रमाणे रंगांचेही स्वभाव असतात. आपल्याला वाटते मुलांनी अभ्यास न केल्याने, नवऱ्याने न ऐकल्याने, कामवाल्या बाईमुळे आपले मूड स्विंग होत आहेत. पण न जाणो, मूकपणे उभे राहून आजूबाजूचे रंगदेखील बरीच करामत करून जात असतील. त्यांच्याकडे वेळीच लक्ष देणे चांगले!!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com