भिंतीवर पेंटिंग्ज लावताना खोलीचे आकारमान, त्याची उंची व आजूबाजूच्या फíनचरनुसार त्याची लांबी-रुंदी किती असावी हे आपण पहिल्या भागात पाहिले. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी पेंटिंग्जबाबत लक्षात घेणे जरुरीचे आहे, जेणेकरून सजावट आकर्षक दिसायला त्याचा हातभार लागेल.
मध्यंतरी व्हॉट्सअॅपवर एका राजकारणी व्यक्तीच्या मुलीच्या लग्नातले फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते. शब्दश नखशिखांत म्हणतात तशी ती डोक्यापासून पायापर्यंत सोन्याने मढली होती. गळ्यातील हार १४ इंची पाहिजे का १६ इंची या मानसिकतेत अडकलेल्या आपल्यासारख्यांना तो गुढघ्यापर्यंतचा हार बघून भोवळ आली असणार. या हाराबरोबरच असंख्य वेगवेगळ्या डिझाइनच्या सोन्याच्या साखळ्या, प्रत्येक बोटात अंगठय़ा, कर्णफुले बघून सगळा माल किती किलोचा असेल असा प्रश्न पडला. झूम करून बघितले तर प्रत्येक दागिना म्हणजे उत्कृष्ट कारागिरीचा नमुना होता. त्यावरील नाजूक कलाकुसर थक्क करणारी होती. पण या सगळ्याचा परिणाम शून्य होत होता. घडत होते ते फक्त ओंगळवाणे संपत्तीचे प्रदर्शन. असे झाले, कारण एका जागी नजर खिळवून ठेवेल असे काहीच नव्हते. सगळेच सुंदर, सगळेच उत्कृष्ट. हे बघू का ते बघू अशी होण्याची परिस्थिती. जसे माधुरी दीक्षित आपल्यात येऊन बसली तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल, पण बाकीच्या ढीगभर सिनेतारकांमध्ये असताना तिच्या एकीकडेच लक्ष जात नाही. तेव्हा आपले लक्ष विभागले जाते. याचे कारण, आपल्यात असताना ती फोकल पॉइंट होते. तर बाकीच्या तारकांमध्ये ती त्यांच्यातील एक तारका होऊन जाते. हा फोकल पॉइंट (लक्ष वेधून घेणारा िबदू) सजावटीतदेखील एक महत्त्वाची भूमिका पार पाडतो आणि मुख्य करून हे काम करते एखादे पेंटिंग.
माझ्या आधीच्या एका लेखामध्ये फोकल पॉइंटविषयी विस्ताराने लिहिले आहे. माणसाची भिरभिरती नजर एका जागी स्थिर करण्यासाठी फोकल पॉइंटचा खूप उपयोग होतो. मग हा फोकल पॉइंट एखादी खुर्ची असेल, एखादी फुलदाणी किंवा एखादे पेंटिंग. मला बऱ्याच व्यक्ती माहीत आहेत ज्यांना प्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती जमवण्याचा छंद आहे. साहजिकच हा अमूल्य खजिना सगळ्यांनी बघावा, सगळ्यांनी कौतुक करावे असा मोह त्यांना होतो. पण खोलीतील सगळ्याच िभतींवर या सर्व कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन करणे बरोबर नाही. अशाने सजावटीतील समतोल बिघडून कौतुक होणे तर सोडाच, कोणाचे लक्षही जाणार नाही. कधी कधी संतुलन साधायला िभती रिकाम्याही ठेवाव्या लागतात. सजावट बांधून ठेवण्यासाठी पेंटिंग फार मोलाची भूमिका पार पाडते. त्यामुळे त्याची मांडणी, पेंटिंग लटकवलेली जागा, आजूबाजूचे फíनचर या गोष्टी लक्षात घेऊन फोकल पॉइंट तयार होईल असे करावे आणि मनावर दगड ठेवून बाकीच्या कलाकृतींची गर्दी करणे टाळावे.
सजावटीतील सर्वात त्रासदायक गोष्ट कुठली असेल तर पेंटिंग्जसाठी खिळे ठोकणे. पेंटिंगनुसार खिळ्यांची उंची ठरवणे, दोन्ही खिळे अचूक एका रेषेत मारणे या गोष्टी नाही म्हटले तरी तापदायक असतात. परत पेंटिंग बदलल्यावर आधीचे खिळे बिनकामाचे ठरतात तो भाग वेगळाच. एकतर ठोकल्याने िभत खराब होते आणि दुसरे ती फ्रेम बदलणे कठीण होऊन जाते. अशा वेळी प्रदर्शनात ज्याप्रमाणे िभतीच्या वरच्या बाजूला मेटलच्या पट्टीमधून आलेल्या दोऱ्यांवर पेिन्टग लटकवलेली असतात, त्याचप्रमाणे आपणदेखील करू शकतो. कोणाला त्या दोऱ्या दिसलेल्या आवडत नसतील तर ज्याप्रमाणे आपण पडद्यांचे रॉड पॅनिलग /पेलमेट करून झाकतो तसे यासाठीसुद्धा करू शकतो.
छोटय़ा फ्रेम्ससाठी सजावटीचाच भाग म्हणूनच पूर्ण िभतीवर शोभेच्या छोटय़ा छोटय़ा लाकडी पट्टय़ा (शेल्फ्स) करून त्यावर फोटो फ्रेम्स ठेवता येतात. यामुळे खिळे ठोकावे लागत नाहीत व फ्रेम्सची जागा आपण कशाही प्रकारे बदलू शकतो. उद्या आपल्याला वाटले की सगळ्या फ्रेम्स काढून टाकायच्या तरीसुद्धा त्या रिकाम्या शोभेच्या पट्टय़ा डेकोरेशनचा एक भाग दिसतात. त्याचबरोबर ही शेल्फ्स तुम्ही कितीही वेगवेगळ्या रंगात व आकारात करू शकता. बरेच वेळा आपण विजेच्या वायरी, खांब, ओबडधोबड खाचा लपवण्यासाठी वॉल पॅनिलगचा उपयोग करतो. हेच पॅनिलग आपण फ्रेम्स लावायलाही करू शकतो. िभतीवर लाकडाच्या, जीप्समच्या किंवा मेटलच्या पट्टय़ा ठोकून, दोन पट्टय़ांच्या खाचेत पिनांवर आपण पेंटिंग्स लटकवू शकतो.
सध्या ज्याप्रमाणे एखादी फॅशन बाजारात आली की सगळ्यांच्या अंगावर तेच तेच कपडे दिसू लागतात, त्याचप्रमाणे पेंटिंगची एक स्टाइल आली रे आली की त्या प्रकारची पेंटिंग्ज टीव्ही सिरीअलपासून बाजूच्या कॅफेपर्यंत सगळीकडे दिसू लागतात. अर्थातच कितीही आवडले तरी अशा वेळी वाटते की आपले घर या जागांपेक्षा वेगळे दिसावे. हे वेगळेपण आपण आणू शकतो आपल्या वैयक्तिक गोष्टींनी. उदाहरणार्थ दुकानातून फ्रेम्स / पेंटिग्स आणण्यापेक्षा आपल्या घरच्या लोकांचे फोटो फॅमिली ट्रीच्या रूपात िभतभर लावून जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकतो. त्याच प्रमाणे बऱ्याच लोकांना काही ना काही गोष्टी जमवायची हौस असते. मीनिएचर गोष्टी, नाणी, सोव्हेनीअर्स, शंख िशपले ..या गोष्टी जर तुम्ही कल्पकतेने फ्रेम करून घरात लावल्यात तर दुकानातल्या कुठल्याही महागडय़ा पेंटिंगपेक्षा तुमचे घर जास्त आकर्षक दिसेल. तुमच्या कलेक्शननुसार त्या त्या गोष्टींच्या जागा ठरवणे महत्त्वाचे असते. सगळ्याच गोष्टी दाखवण्यासाठी दिवाणखान्यातच पाहिजेत असे नाही. हा आपला ठेवा, दुसऱ्यांसाठी नाही तर आपल्याला आनंद देण्यासाठी आहे याची जाणीव ठेवल्यास प्रवेशद्वारापासून गच्चीपर्यंत कुठेही मांडता येईल. अगदी तऱ्हेतऱ्हेची भांडी स्वयंपाकघरातच ठेवायला पाहिजेत असे कोणी सांगितले? एखादे वेळेस ती बाल्कनीत देखील चांगली दिसू शकतात. नाणी जमवायची आवड असेल तर ग्रुप करून फ्रेम करू शकता किंवा वरून काच ठेवून सेंटर किंवा साइड टेबलाखालीही ठेवू शकता.
घरात सजावटीचे काम काढल्यावर शेवटी शेवटी माणूस थकून जाऊन केस उपटणे बाकी ठेवतो. अशा वेळी सरळ मध्ये दोन-तीन दिवस विश्रांती घेऊन फ्रेश होऊन पेंटिंग्ज लावायचे काम हाती घ्यावे. कारण थकलेल्या डोक्याने काम करताना पेंटिंगची उंची थोडी जरी वर-खाली झाली किंवा िभत व पेंटिंगमधली प्रमाणबद्धता चुकली तर पुढील सजावट होईपर्यंत आपल्याला त्याचे ते दिसणे अस्वस्थ करू शकते. त्यामुळे उगीच घाई नको. कारण शेवट गोड झाला तरच आपण घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com