घरातलं कपाट हा असा घटक असतो की त्याच्याशिवाय आपलं चालत तर काहीच नाही, पण ते रोजच्या रोज नीटनेटकं, आवरलेलं ठेवणं जिकिरीचं असतं. पण थोडा विचार केला तर कपाट नियोजन अगदीच शक्य आणि सोपं आहे.
सकाळची सहा-साडेसहाची वेळ. साधारण ह्य वेळेला बहुतेकांच्या घरात हळूहळू जाग यायला सुरुवात होते. पाणी भरणे, दूध तापवणे, डबे करणे याची लगबग सुरू होते. बऱ्याच घरांत घडय़ाळाच्या अलार्मऐवजी कुकरच्या शिट्टीनेच उठायची वेळ झाली याचा संकेत मिळतो. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत आधी डोक्यावर हात फिरवून ‘‘उठतो का सोन्या?’’ ची जागा सोन्या हालत नाही म्हणाल्यावर रट्टा देऊन उठवण्यात होते. मग रडणे, चिडचिड, आरडाओरडा. पुण्याच्या सदाशिव पेठेपासून मुंबईच्या दादर ते पाली हिलपर्यंत बहुतेक घरांमध्ये हेच चित्र दिसेल. फक्त डब्यातील पोळीभाजीऐवजी पिझ्झा होईल हाच काय तो थोडा फरक. पण ८० टक्के घरांमध्ये सकाळचा गोंधळ हा ठरलेला असतो. त्या गोंधळात अजूनच भर पडते जेव्हा आपल्याला पाहिजे ती वस्तू सापडली नाही तर. कधी ऐनवेळी मुलांची पुस्तके सापडत नाहीत तर कधी नवऱ्याचा रुमाल, कधी आयकार्ड तर कधी डब्याची पिशवी. मोजे तर हरवण्यासाठीच विणले गेले आहेत जणू! सलग तीन दिवस दोन्ही जोड मिळाले तर लोक गावजेवण घालायलापण तयार होतील. वरकरणी अगदी छोटय़ा वाटणाऱ्या या गोष्टी आपल्या त्रासाला कारणीभूत ठरतात. बहुतेक बायकांची ट्रेडमिलवर चालताना किंवा किटी पार्टीत खाताना ‘घरातील पसारा’ यावर जोरजोरात चर्चा चालली असते. सकाळी सकाळी आपला बिघडलेला हा मूड आपण एका छोटय़ाशा कृतीतून सुधारू शकतो. ती कृती आहे कपाट आयोजनाची.
मागच्या एका लेखात स्वयंपाकघरात भांडी व उपकरणे ठेवायला नियोजन करणे किती आवश्यक आहे त्यावर लिहिले होते. त्याचप्रमाणे प्रत्येक खोलीत तेथील सामानानुसार नियोजन करणे आवश्यक आहे. ह्यमध्ये प्रत्येक कपाटात अत्यावश्यक असणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे ड्रॉवर्स, शेल्फ्स व हुक्स. प्रत्येक कपाटातील याची जागा, उंची-रुंदी, संख्या या गोष्टी तेथील सामानानुसार ठरवाव्या लागतात. कितीही प्रयत्नपूर्वक हळू दार उघडले तरी ज्याच्या आवाजाने सगळ्यांची झोप उडते अशा पूर्वापार चालत आलेल्या स्टीलच्या कपाटांची जागा आता आधुनिक, आकर्षक कपाटांनी घेतली आहे. पण ही सर्वच तयार कपाटे आपल्या सोयीनुसार बनवलेली असतातच असे नाही. बऱ्याच वेळेला मध्ये दोन छोटी ड्रॉवर्स देऊन बाकीकडे फक्त फळ्या टाकलेल्या असतात. पण बहुतेक वेळा फळ्यांऐवजी ड्रॉवर्स असलेले केव्हाही चांगले. ते जास्त व्यवहारी असते. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्याला अनुभव असेल, बरेच वेळा एखादी गोष्ट आपण शोध शोध शोधतो व शेवटी मिळत नाही म्हणून प्रयत्न सोडून देतो. मग कधीतरी सहा महिन्यांनी खण साफ करताना पार मागे ती वस्तू मिळते. ड्रॉवर्समध्ये आपल्याला खणाच्या मागच्या बाजूची गोष्टसुद्धा नीट दिसून येते व त्यामुळे शोधाशोध करण्यात वेळ वाया जात नाही. जेथे खाली वाकून वस्तू काढाव्या लागतात अशा ठिकाणी तर ड्रॉवर्सच पाहिजेत. ड्रॉवर्समध्ये कुठल्या वस्तू ठेवल्या जाणार आहेत ह्यचा आधीच नीट विचार करून ड्रॉवरची लांबी व उंची ठरवावी. कधी कधी आपल्याला वाटते की खोल असलेला ड्रॉवर चांगला, जास्त सामान मावेल. पण अशा ड्रॉवरमध्ये तळाची गोष्ट काढायला फार त्रास होतो. तिथे कपडे असतील तर त्याची इस्त्रीपण बिघडू शकते. अशा वेळी गोष्टी मागून व बाजूने पडणार नाहीत असा जरुरीपुरता प्लायवूड दोन चॅनल्सवर लावून शेल्फ कम ड्रॉवर करता येते. यामुळे समोरून इस्त्रीचे कपडे काढणे सोप्पे जाते. त्याचप्रमाणे खोल ड्रॉवरमधील सामान उंचीने छोटे असेल तर उरलेला ड्रॉवरचा भाग वाया जातो व वाटते त्यापेक्षा कमी सामान ठेवले जाते. खोल ड्रॉवर्स जास्तीतजास्त १० इंच असावीत व बँकेचे चेकबुक, पासबुक, दागिने, पसे वगरे गोष्टी ठेवण्यासाठी तीन ते चार इंचाचा ड्रॉवर पुरेसा आहे. आपण जसे स्वयंपाकघरात चमचे, डाव यासाठी वेगवेगळे खण करतो तसेच खण बेल्ट, रुमाल, टाय, दागिने, सुट्टे पसे, मेकअपचे सामान यासाठी कपाटाच्या ड्रॉवर्सलापण करावेत. जेणेकरून वस्तू पटापट सापडतील व कपाटसुद्धा व्यवस्थित दिसेल. ड्रॉवर्सची एकूण उंची जमिनीपासून ३३-४० इंचांपेक्षा जास्त नसावी.
कपाटाची व्यवस्था अशी करावी की, मधल्या भागात नेहमीच्या लागणाऱ्या गोष्टी, खालच्या भागात कधीतरी लागणाऱ्या गोष्टी तर वरच्या खणात वर्षांतून एकदा लागणाऱ्या गोष्टी ठेवाव्यात. ज्या ठिकाणी हँगरवर शर्ट लावायचा आहे तिथे जास्त उंचीची मोकळी जागा लागते, तर जिथे पँट दुमडून हँगरवर लावतो त्याची उंची कमी असते. त्याचप्रमाणे सूट वगरेसाठीची उंची अजूनच जास्त लागते. हे सर्व सांगायचा उद्देश हा की, आपल्या राहणीमानाप्रमाणे वेळीच या सगळ्याची उंचीनुसार सोय करणे गरजेचे आहे. अन्यथा जागा वाया तरी जाते किंवा अपुरी पडून कपडे खालून दुमडले तरी जातात. कपाटाच्या दाराच्या आतील बाजूस आपण हुक्स तर लावतोच पण फ्रिजच्या दाराप्रमाणे सामान ठेवायला सोय केली तर त्याचा खूप उपयोग होतो.
घरात लहान पाहुणा येणार असेल तर त्याचे लंगोट, लाळेरी, दुपटी ठेवण्यासाठी १०-१२ खण असलेले टांगून ठेवायचे कापडी ऑर्गनायझर बाळ मोठे झाले की, टाकून दिले जाते. खरे तर एवढी उपयुक्त गोष्ट दुसरी कुठली नसेल. बाळाच्या छोटय़ा कपडय़ांच्या जागेचा उपयोग नंतर किल्ल्यांपासून वेगवेगळी औषधे ठेवायला होऊ शकतो. मुलांच्या अभ्यासाच्या टेबलाच्या बाजूला हा लावल्यास वेगवेगळ्या पेन्सिल्स, स्केचपेन्स, रबर वगरे ठेवायला उपयोगी पडून टेबलावरच्या पसाऱ्याला आळा बसतो. हा ऑर्गनायझर कुठल्याही दांडीला, कपाटाच्या दाराच्या आतील बाजूला, िभतीवर कुठेही लटकवता येतो.
सध्या बायका व पुरुषांच्या पोशाखात खूप फरक पडला आहे. बायकांसाठी स्ट्रोल, स्कार्फ व पुरुषांसाठी टाय ही नित्याची बाब झाली आहे. या कपडय़ांच्या सुळसुळीतपणामुळे त्यांना घडीत नीट ठेवणे जिकिरीचे असते. अशा वेळी स्ट्रोल- स्कार्फ हँगरलाच गाठ मारून ठेवल्यास दिसतेपण चांगले आणि पटकन निवडायलापण सोप्पे जाते. बरेच वेळा सॉफ्टबोर्डचा वापर कानातले खोचून ठेवायला किंवा सॉफ्टबोर्डच्या पिना वापरून माळा लटकवायला होऊ शकतो.
कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुला-मुलींच्या ‘बोळा संस्कृतीत’ कपाटाचे दरवाजे उघडताच कपडय़ांचा लोंढा अंगावर पडतो. इतके कपडे असूनसुद्धा त्यांना पाहिजे तो एकही कपडा आयत्या वेळी सापडत नाही. त्यामुळे तोच तो चुरगळलेला शर्ट, ड्रेस अंगावर चढवला जातो. अशा वेळी त्यांना वरीलप्रमाणे कपाट आयोजन करून दिल्यास सकाळच्या आरडाओरडीला बऱ्यापकी आळा बसू शकतो. शेवटी मुलांना शिस्त लागावी म्हणून आपल्याकडून हा अजून एक प्रयत्न!
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com