आपण सहज आजूबाजूला नजर फिरवली तर वेगवेगळ्या प्रकारचा पोत असलेल्या वस्तू दिसतात. हा पोत वस्तूला एक व्यक्तिमत्त्व बहाल करत असतो. घराच्या सजावटीतही पोत ऊर्फ टेक्श्चर महत्त्वाची भूमिका बजावतो.
रंग, आकार, प्रमाणबद्धता या गृहसजावटीमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट जी नेहमी दुर्लक्षिली जाते ती म्हणजे वस्तूंवरील टेक्श्चर किंवा पोत. आपल्याला वाटते फक्त खरखरीत, खडबडीत असणे म्हणजे पोत असणे. पण गुळगुळीत हासुद्धा पोतच आहे. प्रत्येक वस्तूला पोत असतो. साडी किंवा कपडा निवडताना रंग, डिझाइनबरोबर त्याचा पोत आवर्जून बघितला जातो. तुम्ही आता बसलेल्या जागी आजूबाजूला सहज नजर फिरवून बघितलीत तर किती तरी वेगवेगळ्या प्रकारच्या पोत असलेल्या वस्तू तुम्हाला दिसतील. खिडकीच्या चारी बाजूला फिरवलेली चमकदार ग्रॅनाइटची पट्टी, टेबलावरील लाकडाचा थोडा खडबडीत पण उबदार स्पर्श, पाय आत रुतणारा मऊ गालिचा, स्टीलचा थंडावा व दगडी िभतीवर मोहवून टाकणारा प्रकाश व सावलीचा खेळ. विचार करा, विनारंग व विनापोत जर का सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला ठेवल्या तर जग किती भकास वाटेल. सगळ्या गोष्टी पांढऱ्याफटक व गुळगुळीत.. एकदम अबोल, भावनारहित.
कुठल्याही वास्तूत प्रवेश केल्यावर तेथील भव्यता, रंगसंगती आपण चटकन ग्रहण करतो व त्यानुसार दादही देतो. पण वेगवेगळ्या वस्तूंवरील टेक्श्चरने त्या सजावटीत उठाव आला आहे हे आपण सोयीस्करपणे विसरतो. मुद्दामहून खडबडीत केलेली िभत, धातूमध्ये बनवलेले झुंबर, लेदरचे सोफे व खरखरीत पानांच्या मध्ये उगवलेली मऊ मुलायम फुले, या सगळ्या गोष्टी त्या सजावटीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात.
सजावटीत टेक्श्चर आपण दोन प्रकारांनी वापरू शकतो. एक फक्त दिसण्यासाठीचे व दुसरे स्पर्शाने समजणारे. आजकाल मार्केटमध्ये अगदी खऱ्यासारख्या दिसणाऱ्या वस्तू बनवलेल्या मिळतात. एकदा एका मंगल कार्यालयात दारातच पाच फूट उंचीच्या समया सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या. चकचकीत पितळेच्या दिसणाऱ्या त्या जडशीळ दिसणाऱ्या समया खरं तर बनवल्या होत्या फायबर ग्लासमध्ये. डोळ्यांना कमीत कमी १५ किलो भासणारे त्यांचे वजन प्रत्यक्षात दोन किलो पण नसेल. कधी कधी बजेटमध्ये बसत नसल्याने लोकांना आपल्या आवडत्या गोष्टींना मुरड घालावी लागते. अशा वेळी कृत्रिम घटकांचा वापर करून पाहिजे तो परिणाम व पोत साध्य करता येतो व सजावट आकर्षक करता येते. आजकाल दगडी दिसणारी िभत चक्कपुठ्ठय़ासदृश घटकापासून किंवा टाइल्सने बनवलेली असते किंवा पूर्वीच्या काळी रंगीत तुकडे जोडून तयार केलेली चर्चच्या खिडक्यांमधील स्टेनग्लास आजकाल चक्कस्टिकर लावून बनवली जाते. दुरून या सगळ्या गोष्टी मूळ वस्तूसारख्याच दिसत असल्याने लोकांचीसुद्धा त्यांना पसंती असते. पण याच कारणामुळे आपल्या समोरील वस्तू आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या घटकाचीच आहे की नाही याची खात्री करून घेण्याची खोड मला लागली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी सगळ्यावर हात फिरवून टकटक-टकटक केल्याशिवाय चनच पडत नाही. कारण त्यातून निघणाऱ्या आवाजाने ती गोष्ट भरीव आहे की पोकळ ते समजते व ती तयार करण्यासाठी कोणत्या घटकाचा उपयोग केला आहे, याचा अंदाज येतो. या माझ्या आवाज करून बघण्याच्या सवयीमुळे मी नारळाचा धंदा चांगला करीन असे काही लोकांचे म्हणणे आहे.
वरील प्रकारचे पोत आपण बजेटमध्ये बसवायला किंवा दुरून पाहिजे तो परिणाम साधण्यासाठी म्हणून सजावटीत वापरतो. पण बऱ्याच वेळेला एखाद्या वस्तूवरील पोत हा फक्त सौंदर्यासाठी नसून आवश्यकता म्हणून वापरला जातो. जसे बाथरूममध्ये पाय घसरून पडू नये म्हणून थोडय़ा खडबडीत पोत असलेल्या टाइल्स वापरणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. त्याचप्रमाणे अंध व्यक्तींना वावरायला सोपे जावे, एक जागा दुसऱ्या जागेपासून वेगळी आहे, हे समजावे म्हणून िभतींवर, जमिनीवर वेगवेगळे पोत वापरले जातात. जेणेकरून वेगवेगळ्या स्पशार्ंच्या जाणिवेतून त्यांना वावरणे सहजसोपे जाते.
वस्तूंचे वेगवेगळे पोत व त्याची त्यानुसार मांडणी हा एक वेगळाच अभ्यासाचा विषय आहे. खडबडीत पोत असलेल्या वस्तूशेजारी सौम्य पोत असलेली वस्तू ठेवल्यास दोन्ही वस्तू उठून दिसतात. नाही तर दोन्हीही वस्तूंचा परिणाम शून्य होतो. हिरव्या मऊशार गवतावर दगडी गोटे, ओंडक्याचा खडबडीतपणा किंवा झुडपाची रखरखीत पाने वातावरणात जिवंतपणा आणतात. नाही तर सगळेच सपक वाटायला लागते. गृहसजावटीतसुद्धा सोफा व त्यावरील कुशन्स, िभतीसमोरील फुलदाणी, कपाट व त्यावरील हॅण्डल्स वेगवेगळ्या टेक्श्चरमध्ये घेतली तर सजावट जास्त आकर्षक दिसते.
सजावटीच्या वेगवेगळ्या संकल्पनांनुसार वेगवेगळे पोत वापरले जातात. जेवढे खडबडीत पोत तेवढे डोळ्याला भासणारे त्याचे वजन जास्त. उदाहरणार्थ समान क्षेत्रफळाची एक िभत दगडाची केली व दुसऱ्या िभतीवर फक्त रंग दिला, तर दगडी िभत जास्त लक्ष वेधून घेईल. तिचे डोळ्यांना भासणारे वजन जास्त असेल. अशा वेळी फक्त दगड-विटा वापरूनच सजावटीत जडपणा येतो असे नाही. नुसती प्लास्टर करून सोडलेली िभतसुद्धा गुळगुळीत िभतीपेक्षा डोळ्याला जड भासेल. कारण त्याच्यावरील दाणेदार पोत, लाकूड, दगड, शहाबादी फरशा, बांबू, विटा, वाळू यांसारख्या खडबडीत पोत असलेल्या गोष्टी सजावटीत आपलेपणा, उबदारपणा आणतात. सजावट आरामदायी वाटते. तुम्हाला पारंपरिक, गावरान (१४२३्रू) सजावट आवडत असेल तर वरील सामानाअभावी सजावट पूर्ण होणे कठीण आहे. अशा वेळी झाडांची निवडसुद्धा सजावटीला साजेशी असणे जरुरी आहे. खडबडीत पोताच्या विरुद्ध गुळगुळीत पोत असलेल्या वस्तू या प्रकाश जास्त परावíतत करतात. त्यामुळे त्या जास्त चमकतात. जसे काच, स्टील, पॉलिश केलेला संगमरवर, आरसा वगरे. या प्रकारचे पोत वापरून केलेली सजावट ही हलकी व आधुनिक वाटते. कामामध्ये अतिशय व्यस्त असणाऱ्या लोकांच्या घरी शक्यतो सौम्य किंवा गुळगुळीत पोत असलेल्या वस्तू असणे जास्त फायदेशीर आहे. जेणेकरून धूळ कमी जमेल व जमली तरी स्वच्छ करणे सोप्पे जाईल. आपल्याला पारंपरिक, आधुनिक, भारतीय, जपानी यापैकी कशी सजावट करायची आहे, हे एकदा ठरले की त्याला साजेशा पोत असलेल्या वस्तूंनी सजावटीत उठाव आणता येतो.
तर असा हा गृहसजावटीतील अतिशय आवश्यक पण दुर्लक्षिलेला घटक. याचा विचार सर्व सजावट पूर्ण झाल्यावर करण्याऐवजी सुरुवातीपासूनच केल्यास सजावटीला योग्य तो न्याय मिळेल.
वैशाली आर्चिक – response.lokprabha@expressindia.com