मराठी भाषेच्या मुद्दय़ावरून अनेकदा विविध प्रकारे वाद होत असतात. अलीकडच्या काळात मराठीच्या मुद्दय़ावरून अनेक घटना घडलेल्याही बघितल्या असतील. दुकानांचे मराठीतले बोर्ड असो किंवा ऑफिस, सार्वजनिक ठिकाणी बोललेलं मराठी असो, मराठीचा झेंडा त्या त्या वेळी वर राहिलाय. अशा घटनांमधून मराठीला न्याय मिळाल्याचं दिसून आलं. पण प्रत्यक्षात न्यायव्यवहारात मात्र मराठीची आजही दुरवस्थाच आहे. राज्याचा शासनव्यवहार हा लोकभाषेतून म्हणजेच मराठीतून करण्याबाबतचा ‘महाराष्ट्र राजभाषा अधिनियम’ १९६४ मध्ये आला. त्यानंतर विधिमंडळाचा कारभारही मराठीतून करण्यास सुरुवात केली. न्यायव्यवहाराच्या मराठीकरणाची अधिसूचना संमत केली तरी आजही त्याबाबत अनास्थाच दिसून येते. याविषयीची चीड मराठी अभ्यास केंद्र प्रकाशित आणि अॅड. संतोष आग्रे लिखित ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ या पुस्तकातून व्यक्त होते. पुस्तकात मांडलेल्या विषयाची पाश्र्वभूमीही सोप्या शब्दात, साध्या मांडणीत रेखाटल्यामुळे समजायला सोपे होते. या पाश्र्वभूमीमुळे पुस्तकातल्या इतर लेखांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, दिवाणी, फौजदारी न्यायालयाची भाषा, ग्राहक तक्रार निवारण मंचाची भाषा, मराठीतून विधिशिक्षण आणि न्यायाधीशांची परीक्षा, मराठीकरणासाठी चळवळी, संघर्ष असे अनेक महत्त्वाचे मुद्दे विस्तृतपणे पुस्तकात मांडले आहेत. याशिवाय मराठीच्या मुद्दय़ांवरून नेहमी काही प्रश्न विचारले जातात. त्याची कायद्यांच्या उल्लेखांसह मुद्देसूद माहिती दिली आहे. तसंच न्यायालयीन मराठीकरणासाठी कृती आराखडा आणि मागण्या हा लेखही वाचनीय आहे. न्यायव्यवस्थेतील मराठीच्या दुरवस्थेबद्दलचं चित्र रेखाटणारं ‘न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी’ हे पुस्तक निश्चित वाचण्यासारखं आहे.
न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी
लेखक : अॅड. संतोष आग्रे
प्रकाशक : मराठी अभ्यास केंद्र
मूल्य रु. : २००/-
पृष्ठसंख्या:- १४७
स्त्रीच्या रूपांतराचं अनुभवकथन
आयान हिरली अली यांचं ‘नोमॅड’ हे पुस्तक विविध मानसिकतेचा शोध घेणारं आहे. अमेरिकेत आल्यावर नव्याने आयुष्य जगण्याबद्दल आयानने या पुस्तकात लिहिले आहे. युरोपमधील कडव्या इस्लामी लोकांच्या जिवे मारण्याच्या धमक्या, जगाशी संघर्ष, तिचा अंतर्गत संघर्ष अशा सगळ्यांपासून दूर जात तिने नव्याने आयुष्याला सुरुवात केली. स्त्रीवर बंधनं घालणाऱ्या मागास जमातीतील एका स्त्रीचे खुल्या समाजातील स्वतंत्र आणि नीडर स्त्रीमध्ये झालेल्या रूपांतराचे ‘नोमॅड’ हे अनुभवकथन आहे. कुटुंबापासून ते समाजापर्यंत अनेकांचा सामना करत तिला वेळोवेळी आव्हानं स्वीकारावी लागली. तरी जिद्दीने सगळ्यांशी लढा देत स्वत:च्या विचारांना तिने वाट मोकळी करून दिली. तिच्या वडिलांसोबतची अखेरची भेट, ९/११ च्या घटनेनंतर तिने इस्लामचा केलेला त्याग, आई आणि युरोपमधील काही नातेवाइकांपासून दुरावणं अशा कौटुंबिक दु:खांनाही ती सामोरी गेली. ‘नोमॅड’ हे पुस्तक स्त्रीच्या अमेरिकेतील पदार्पणाचे, तेथील हृद्य, मजेशीर अनुभवांचे, संस्कृतीचे, तिथल्या लोकांच्या स्वभाववैशिष्टय़ांचे, मानसिकतेचे विश्लेषणात्मक चित्रण आहे.
नोमॅड
लेखक : आयान हिरसी अली; अनुवाद : प्राजक्ता चित्रे
प्रकाशक : सुनील अनिल मेहता,
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे-३०
मूल्य रु. : २८०/-; पृष्ठसंख्या : २५८
प्रेरणादायी आत्मकथन
भारत-पाकिस्तान फाळणीचा अनेकांच्या आयुष्यात मोठा परिणाम झाला. फाळणीमुळे स्थलांतर झालेल्या अनेकांच्या काही ना काही कहाण्या जरूर असतील. तसेच एक अब्दुल सत्तार इदी. अब्दुल यांचा जन्म भारतातला. पण फाळणी झाल्यानंतर किशोरवयातच ते कराचीला स्थलांतरित झाले. कराचीत राहून त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. आपत्कालीनप्रसंगी रुग्णवाहिका सेवा, हेलिकॉप्टर सेवा, पूर, भूकंप किंवा रेल्वे अपघातप्रसंगी तातडीची मदत अशा अनेक सेवांमुळे अब्दुल इदी यांचं नाव मोठं होतं. वेळप्रसंगी काही गोष्टींविरुद्ध लढा देऊन त्यांना मानवसेवा करावी लागली. पण ते मागे हटले नाही. जिद्दीने पुढे कसं जात राहिले याचं उत्तम कथन ‘केवळ मानवतेसाठी’ या त्यांच्या आत्मकथनात आहे. इदींच्या सेवाकार्याच्या प्रचंड विस्तारामुळे आणि त्यांच्या धर्मनिरपेक्ष सेवाभावामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय कीर्तीही लाभली याचा प्रत्यय पुस्तकातून येतो. सेवाकार्य आणि मानवता ही मूल्यं जपत, आचरणात आणत मानवतेसाठी इदींनी स्वत:ला कुटुंबासह वाहून घेतलं होतं. शासनाची दंडेलशाही, धर्माधाचा विरोध आणि दहशतवाद्यांचा दबाव अशा मोठमोठाल्या संकटांना सामोरं जात इदी त्यांचं कार्य जिद्दीने पूर्ण करत राहिले. त्यांचं ‘केवळ मानवतेसाठी’ हे प्रेरणादायी आत्मकथन उत्तम अनुभूती आहे.
केवळ मानवतेसाठी
शब्दांकन : तेहमिना दुराणी; अनुवाद : श्रीकांत लागू
प्रकाशक : प्रदीप चंपानेरकर, रोहन प्रकाशन
मूल्य रु. : १९५/-; पृष्ठसंख्या : २९८