‘टाइमपास’ या बॉक्स ऑफिस हिट सिनेमानंतर दीड वर्षांत त्याचा सिक्वेलही येतोय. ‘टीपी’प्रमाणे त्याचा दुसरा भागही हिट होईल का, पहिल्या भागावेळी झालेली टीका, चित्रकलेची आवड, टीव्हीत पदार्पण अशा बाबींवर दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी केलेली बातचीत.
‘टाइमपास टू’ बाबत किती उत्सुक आहात?
मी स्वत: प्रचंड उत्सुक आहे. कारण माझ्यासाठी हा एक प्रयोग आहे. मला वाटतं की, एका वर्षांत गाजलेल्या सिनेमाचा सिक्वेल येण्याची भारतातली ही पहिलीच वेळ असावी. कारण, साधारणपणे सिक्वेल खूप वर्षांनी येतात. किंवा सिक्वेलमध्ये प्रिक्वेलचा म्हणजे सिनेमाच्या पहिल्या भागाचा काहीच संबंध नसतो. ‘बॅटमॅन’, ‘धूम’ ही त्याची काही उदाहरणं. पण, ‘टाइमपास टू’मध्ये प्रिक्वेलमधली पात्रं तशीच ठेवून सिक्वेलमध्ये नवी कथा गुंफली आहे. हे माझ्यासाठी आव्हान होतं. जुन्या कलाकारांना घेऊन सिनेमा करायला हवा असा सर्वसाधारण सूर असतो. पण, मी तसं केलं नाही. प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापट या दोघांची निवड केली. त्यामुळे प्रेक्षकांना कितपत आवडेल यासाठी मीही उत्सुक आहे. आत्तापर्यंत सिनेमांच्या प्रोमोजना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
तुम्ही आता मुख्य भूमिकांच्या कास्टिंगबद्दल बोललात. पण, काही प्रेक्षक प्रियदर्शनच्या कास्टिंगबद्दल व्यक्त होताहेत. प्रोमोमधून त्यांना फारसं आवडलं नाही असं दिसतंय…
मला मजा येते. २०१३ च्या नोव्हेंबरमध्ये ‘टाइमपास’चा पहिला प्रोमो आला होता. तेव्हा प्रेक्षक प्रथमेशच्या बाबतीतही असेच व्यक्त झाले होते. ‘हा हिरो कसा असू शकतो’ अशाप्रकारत्या प्रतिक्रिया तेव्हाही उमटल्या होत्या. मी त्या प्रतिक्रिया माझ्याकडे जपून ठेवल्या आहेत. मला वाटतो हा शुभशकुन आहे. हिरोची बॉडी उत्तम हवी, चांगलाच दिसला पाहिजे असं मराठी सिनेमांचं धोरण नाहीये. मराठी सिनेमांमध्ये व्यक्तिरेखांना जास्त महत्त्व दिलं जातं. हे मराठीचं सर्वात मोठं बलस्थान आहे. तसंच ‘टाइमपास’च्या बाबतीत म्हणता येईल. पण, प्रथमेश परबने जसं त्याच्या कामाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तशी प्रियदर्शन जाधवही करेल यात शंका नाही. ‘टाइमपास’च्या वेळी प्रियदर्शनने माझ्यासोबत संवादलेखक म्हणून काम केलंय. आम्ही त्यासाठी वर्कशॉप घेतले होते. त्यावेळी प्रियदर्शन दगडू साकारायचा. मी तेव्हाच त्याला म्हणालो होतो, जर सिनेमा चालला आणि सिक्वेल करायचा विचार असेल तर तूच त्यात दगडू साकारायचा. ही गोष्ट आहे २०१३ ची.
‘टाइमपास टू’साठी प्रेक्षकांकडून काही कथा-पटकथा तुमच्याकडे आल्या होत्या असं ऐकलंय.
हो. ‘टाइमपास’ला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. अनेकांकडून मला पटकथांचे ई-मेल येत होते. व्हॉट्सअॅपवरुनही ‘टाइमपास टू’च्या कथेचा एक मेसेज फिरत होता. नंतर ठाणे, उरण या ठिकाणी ‘टीपी टू’ शुटिंग सुरु आहे; अशीही अफवा पसरली होती. तसंच मला काही संगीतकारांनी काही गाणी रेकॉर्ड करुन पाठवली होती. इतका प्रचंड प्रतिसाद बघून मला सिक्वेल करावासा वाटला.
अनेकदा सिक्वेलची गणितं कुठेतरी चुकतात. आधीचा भागा गाजला म्हणजे सिक्वेलही लोकप्रिय होईल, असं नेहमीच होत नाही. तर ‘टाइमपास टू’कडून काय अपेक्षा आहेत?
‘टाइमपास’ही इतका बिझनेस करेल असं खरंच वाटलं नव्हतं. नाव जरी ‘टाइमपास’ असलं तरी तो करण्याची प्रक्रिया मात्र गंभीर होती. सामान्य माणसाची ती कथा होतीे. प्रत्येक माणसामध्ये कुठेतरी दगडू लपलेला असतो. याच सामान्य माणसाला तो भावला. तसंच या सिक्वेलच्या वेळीही सिनेमा फार चालेल, कमाई करेल असा मी आता विचार करत नाही. मी माझ्या टीमला सांगितलं होतं की, मागच्या कोणत्याही सिनेमांचा विचार डोक्यात ठेवून ‘टाइमपास टू’चं काम करु नका. हा आपला पहिलाच सिनेमा आहे असं समजून काम करा. ‘टाइमपास’ हिट झाला म्हणजे ‘टाइमपास टू’ हाही हिट होईल तर हा समज चुकीचा आहे. ‘टाइमपास टू’ साठी गेलं वर्षभर आम्ही काम करतोय. त्यामुळे कदाचित असं होईल की, ‘टाइमपास टू’ हा ‘टाइमपास’पेक्षा जास्त लोकप्रिय होईल.
‘टाइमपास’वर टीका झाली होती. ‘सिनेमा पाहूच नका’ अशाही प्रतिक्रिया होत्या. अशाप्रकारच्या टीकांना मी अतिशय गांभीर्याने घेतो. त्या टीकांचा आदर करताना वेगवेगळे प्रयोग करण्याचं धाडस करणंही महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.
‘बालगंधर्व’, ‘नटरंग’, ‘बालक पालक’ या आशयघन सिनेमानंतर दिग्दर्शक रवि जाधव आता ‘टाइमपास’, ‘टाइमपास टू’ अशा व्यावसायिक सिनेमांच्या वाटेवर जाताहेत, असं म्हणायचं का?
नाही. वाट बदलली असं नाही म्हणता येणार. माझ्या मते, विविध धाटणीचे, बाजाचे सिनेमे करुन बघायलाच हवं. एखाद्या गोष्टीवर आपलं मत व्यक्त करण्याआधी आपण ती गोष्ट करुन बघितली पाहिजे. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ या सिनेमांनंतर मला व्यावसायिक सिनेमांबाबत कुतूहल निर्माण झालं होतं. व्यावसायिक सिनेमा नेमका कसा असतो, त्याचं गणित, मांडणी, विचार, हिंदी सिनेमा तीन दिवसात कोटींची कमाई कशी करतो या सगळ्याबाबत मला प्रचंड उत्सुकता होती. अशाप्रकारचा सिनेमा मी केला नसल्यामुळे मला याची काहीच माहिती नव्हती. ‘टाइमपास’च्या माध्यमातून मी तो प्रयत्न केला. व्यावसायिक सिनेमा करणं हे खूप आव्हानात्मक असतं. त्यामध्ये पुरस्काराची खात्री नाही. सिनेमा चालला तर उत्तम नाहीतर त्यावर टीकाच होणार. ही रिस्क असते. त्यामुळे असा सिनेमा करणंही आशयघन सिनेमा करण्याइतकंच कठीण आहे, हे माझ्या लक्षात आलं. व्यावसायिक सिनेमा मला समजून घ्यायचा होता. या विचारातून ‘टाइमपास’ घडला. त्यामुळे मी माझी वाट बदलली नाहीये. मी इतरही वाटांवरचे सिनेमे करण्याचा प्रयोग करतोय.
आता यापुढे कोणत्या धाटणीचा सिनेमा करण्याचा प्रयोग करणं मनात आहे?
लघुचित्रपट हे येणाऱ्या काळातलं महत्त्वाचं माध्यम असणार आहे. त्यामुळे ते आपण समजून घ्यायला हवं असं मला वाटलं होतं. म्हणूनच मी ‘मित्रा’ हा लघुपट केला. अजूनही बऱ्याच विषयांचे, बाजाचे सिनेमे करुन बघायचे आहेत. जो सिनेमा करताना मला स्वत:ला शिकायला मिळेल, ज्यात आव्हान असेल, त्यावेळी मी त्या विषयाचा विचार करत असेन असा सिनेमा मी करेन.
‘टाइमपास’ बॉक्स ऑफीसवर हिट झाला पण, आशय आणि विषयाबाबत सिनेमावर टीकाही झाली.
हो, टीका झाली होती. ‘सिनेमा पाहूच नका’ अशाही प्रतिक्रिया होत्या. पण, अशी टीका करणारे माझे जवळचे लोक होते. त्यांनी माझं आधीचं काम बघितलंय. म्हणून त्यांच्या अशा प्रतिक्रिया होत्या. त्यांचा मी आदरच करतो. पण, आदर करताना वेगवेगळे प्रयोग करण्याचं धाडस करणंही महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं. माझ्या कामावर होणाऱ्या टीकांना मी अतिशय गांभीर्याने घेतो. कारण प्रत्येकाने अभ्यास करुन त्यांचं मत व्यक्त केलेलं असतं. या टीकांना मी सल्ला म्हणेन. मला वाटतं, आपण एखाद्या गोष्टीसाठी रिस्क घेतली तर त्यावर टीका होणारच. त्यासाठी सल्लेही मिळणारच आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायला सुरुवात केलेली असते तेव्हा लोक सल्ले देणारच. पण, मला मिळालेले सल्ले चांगलेच होते. एकीकडे मराठी सिनेमा राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरतोय तर दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. मला वाटतं, मराठी सिनेमांमध्ये दिसत असलेलं हे समांतर चित्र इंडस्ट्रीसाठी पोषकच आहे. या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. सतत एकच गोष्ट करु नये असं माझं म्हणणं आहे. वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत रहावा. मी जाहिरात क्षेत्रात बारा र्वष काम केलं. सिनेमेही मी बारा र्वष करेन. त्यापुढे नाही. कदाचित मी चित्रकला क्षेत्रात काहीतरी करेन. अशाप्रकारे नवनवीन क्षेत्रांत पावलं टाकण्याचा माझा प्रयत्न असेन.
चित्रकलेचा उल्लेख केलात. काही वर्षांनी तुमच्या चित्रांचं मोठं प्रदर्शनही भरणार आहे असं ऐकलंय. त्याची तयारी कुठवर?
चित्रकलेची मला प्रचंड आवड आहे. वेळेअभावी ही आवड जोपासता येत नव्हती. रंग, कॅनव्हास आणायचो पण, इतर कामांमुळे त्यासाठी वेळ मिळायचा नाही. पण, आता खूप गांभीर्याने घेतोय. प्रदर्शनाचं मनात आहे. त्यावर अजून काम सुरु आहे. ‘नटरंग’ या माझ्या पहिल्या सिनेमाच्या वेळी मी प्रचंड मेहनत घेतली होती. त्यासाठी बराच काळही लागला होता. २००४ पासून त्यासाठी काम करत होतो. सिनेमा २०१० मध्ये प्रदर्शित झाला. तेव्हा ओळख नव्हती कोणाशी, नवीन होतो. अनुभव नव्हता. या प्रक्रियेतून मी गेलोय. चित्रकलेच्या बाबतीत तशाच प्रक्रियेतून मी आताही जातोय.
‘टाइमपास टू’ सोबत हिंदीमध्ये ‘गब्बर’ प्रदर्शित होतोय. मराठी-हिंदी सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होण्याबाबतचा न्यूनगंड बाजूला होतोय असं म्हणता येईल का?
हो, हा न्यूनगंड धूसर होतोय. कारण ‘गब्बर’ सिनेमा ‘टीपी टू’च्याच वेळी प्रदर्शित होतोय. पण, आम्हीही हिंदीसारखाच प्रमोशन, कॅम्पेन करतोय. सिनेमा फक्त तयार करुन उपयोगाचं नाही तर तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मार्केटिंग आता खूप महत्त्वाचं झालं आहे. यासाठी मोठं बजेट असण्याची आवश्यकता नाही. व्यवस्थित नियोजन आणि माध्यमांची योग्य निवड केली तर सगळं शक्य होतं.
मराठी-हिंदी सिनेमांबद्दल बोललात. सध्या मल्टिप्लेक्स, प्राइम टाइम आणि मराठी सिनेमा या मुद्दय़ांवरुन वाद सुरु आहे. त्यावर तुमचं मत काय?
मराठी सिनेमांबाबत काही करण्याची इच्छा आहे, त्याबाबत काही निर्णय घेतले जाताहेत या गोष्टी स्वागतार्ह आहेतच. पण, विशिष्ट वेळेने सिनेमा चालणं किंवा न चालणं हे ठरत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. सिनेमा हे माध्यम भाषेपलीकडचं आहे, हे जगमान्य आहे. विविध भाषिक सिनेमे आपल्या देशातही बघितले जातातच. थिएटरमध्ये जर एक इंग्लिश आणि एक मराठी असे दोन सिनेमे एकाच वेळी सुरु असतील तर जो चांगला असेल तोच चालणार, यात शंका नाही. मराठी सिनेमांचा प्राइमटाइम ६-९ असा आहे का, याचाही विचार करणं महत्त्वाचं आहे. कारण त्याच वेळेत मराठी टेलिव्हिजनचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे.
मराठी सिनेमांच्या अनुदानाबाबतही असेच निर्णय, चर्चा सतत सुरु असतात. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
मराठी सिनेमांना अनुदान मिळण्याची योजना खूप चांगली आहे. पण, ते अनुदान कोणत्या सिनेमांना मिळतं याची एक यादी जाहीर व्हावी. जेणेकरुन याविषयी माहिती नसलेल्या इंडस्ट्रीतल्या काहीजणांसह सामान्य रसिकांनाही याबाबतची माहिती कळेल. ही यादी जाहीर केल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. मलाही अजून त्याबाबत पुरेशी माहिती नाही. मी अनुदानासाठी अजूनही अर्ज केला नाही.
अर्ज न करण्याचं कारण?
अर्ज करावं असं मला वाटलं नाही. खरंच ज्याला गरज आहे त्याने करावं. इंडस्ट्रीत येऊ पाहणारे अनेक नवे तरुण दिग्दर्शक कष्ट करत चांगले सिनेमे तयार करतात. अशांना अनुदानाची जास्त गरज असते.
टीव्ही हे माध्यम खूप प्रभावी झालंय. यापूर्वी एका रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून प्रेक्षकांसमोर आला आहात. मालिका दिग्दर्शनाचा काही विचार?
गेल्या दोन वर्षांपासून मला मालिकांसाठी ऑफर्स येताहेत. पण, आजही मला टीव्ही क्षेत्राची पुरेशी जाण नव्हती. याविषयीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. त्यामुळे मध्यंतरी अभ्यास म्हणून मी ‘महाराष्ट्राची लोकधारा’ आणि ‘सारेगमप’चं एक पर्व अशा दोन कार्यक्रमांचं दिग्दर्शन केलं. आता मात्र या माध्यमात आत्मविश्वासाने पाऊल टाकायला मी तयार आहे. लवकरच याविषयीही कळेल. ज्याप्रमाणे माझ्या सिनेमांमध्ये वेगळेपण असतं तसंच माझ्या मालिकेतही वेगळेपण असेल एवढं मात्र आता सांगू शकतो.
नाटय़क्षेत्रात पदार्पण करण्याचा काही विचार?
मी जाहिरात क्षेत्रातून आलो आहे. मी रंगभूमीवर कधीच काम केलं नाही. पण, मला नाटक हे माध्यम खूप आवडतं. त्यामुळे नाटय़क्षेत्रातही निर्मिती-दिग्दर्शन करण्याची इच्छा आहे. योग्य संधी, चांगली संहिता याची वाट बघतोय. या सगळ्या गोष्टी जमून आल्या तर निश्चितच याही क्षेत्रात चांगलं काम करेन.
चैताली जोशी