गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. या शोधातूनच उद्याच्या नवनव्या गोष्टी समाजाला मिळतात. शोधकर्त्यांच्या याच यादीत ‘एम इंडिकेटर’ या अॅपद्वारे आपले वेगळे अस्तित्व निर्माण केलेय, सचिन टेकेने. ५५ लाख मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या ‘एम इंडिकेटर’ या मोबाइल अॅपद्वारा सचिन आज घराघरांत पोहोचला आहे. या शोधामुळे ‘मोबॉण्ड’ या सॉफ्टवेअर कंपनीचा तो आज मालक आहे. एका तरूण, मराठमोळ्या उद्योजकाच्या या अॅपच्या टेक-ऑफची ही रंजक गोष्ट –
मुंबईकरांचे अवघे जीवन हे घडय़ाळ्याच्या काटय़ावर फिरत असते. सकाळी अमुक वाजता उठा. मग ऑफिसची किंवा शाळा-कॉलेजची तयारी करा. कोणाला ७.४० ची लोकल पकडायची असते तर कोणाला ९.२०.. बहुतांश मुंबईकरांची सकाळ सुरू होते ते ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी अशा विविध मार्गानी प्रवास करीत आपापल्या कार्यक्षेत्रात वेळेवर पोहोचण्याची. यात एखाद्या ट्रेन वा बसची वेळ जरा जरी चुकली तरी सगळे दिवसभराचे कामाचे गणित कोलमडते. या त्रासाला रोज हजारो मुंबईकर सामोरे जातात. त्यांच्यातलाच एक, सचिन टेके. नेरुळला राहणारा सचिन रोज कॉलेजसाठी आणि त्यानंतर नोकरीनिमित्ताने नेरुळ ते अंधेरी ट्रेन, बस, रिक्षा असा प्रवास करीत असे. या प्रवासात रोज त्याचे दोन ते अडीच तास जायचे. त्यातही ट्रेन वा बसची वेळ माहीत नसल्यामुळे बराच वेळ वाया जाई. त्यातूनच त्याला वाहतुकीच्या या विविध मार्गासाठी वेळापत्रक दर्शवणारं अॅप बनवण्याची कल्पना सुचली. आणि निर्मिती झाली ‘एम इंडिकेटर’ या अॅपची.
शाळा-कॉलेजात असल्यापासूनच सचिनला काही तरी नवीन बनवण्याची आवड होती. तीच पुढे एका नव्या शोधाची प्रेरणा ठरली. चार वर्षांपूर्वी जर कोणी सांगितले असते की मोबाइलमध्ये ट्रेन, बस, रिक्षा, टॅक्सी यांचे वेळापत्रक तसेच त्यांचा तिकीट दर किती आहे हे आपण पाहू शकू तर कोणी त्यावर विश्वास ठेवला नसता. मात्र चार वर्षांपूर्वी एका तरुणाने हा विचार केला आणि पुढच्या दोन वर्षांत तो अमलातही आणला. संपर्कमाध्यमातील क्रांतीचा फायदा घेत त्याने असे अॅप्लिकेशन बनवले की ज्यामुळे एका क्लिकसरशी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरचे वा मुंबईतल्या बसेसचे मार्ग त्याच्या ‘एम इंडिकेटर’द्वारे सहज उपलब्ध झाले.
अर्थात यामागे सचिनची दोन वर्षांची अथक मेहनत आहे. सचिन व्हीजेटीआयचा आयटी इंजिनीअर. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणते नवनवीन शोध लागताहेत, कोणते नवीन फोन, सॉफ्टवेअर तयार होतायत याविषयी त्याला नेहमीच उत्सुकता असायची. परीक्षेच्या वेळेस सचिनचे लक्ष अभ्यासापेक्षा एखादा प्रॉब्लेम कसा सोडवायचा यातच जास्त असायचे. सचिन गमतीने सांगतो, ‘कॅम्पसमध्ये नोकरीसाठी कॅम्प लागायचे तेव्हा मला माझे मित्र विचारायचे, तू कुठे नोकरी करणार, तेव्हा मी त्यांना थट्टेने म्हणायचो, बॉस नोकरी कोणाला करायची आहे?’ तेव्हा गमतीने बोललेले शब्द खरे करीत सचिनने एक वेगळी वाट चोखाळत उद्योजकतेचा मार्ग स्वीकारला आहे. सुरुवातीला चार वर्षे त्याने नोकरी केली. पण त्यात त्याचे मन रमले नाही. काही तरी वेगळे करायचे या विचाराने सचिनने आपल्या कामाचा अनुभव वापरीत हे अॅप विकसित करण्यास सुरुवात केली. सकाळी नोकियाची नोकरी, मग एमबीए कॉलेज आणि त्यानंतर रात्री १० वाजता घरी पोहोचल्यावर रात्री ३ पर्यंत जागून हे ‘एम इंडिकेटर’ अॅप्लिकेशन त्याने विकसित केले. सुरुवातीला घरातल्यांना त्याने आपल्या कामाचा थांगपत्ताही लागू दिला नाही. मात्र ही सगळी धावपळ करताना कामाचा ताण येऊ लागला, तेव्हा मात्र त्याने घरच्यांशी बोलून आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन पूर्ण वेळ हेच काम करण्याचा निर्णय घेतला. २००९ ते २०११ असे दोन वर्षे सातत्याने काम करीत त्याने ‘एम इंडिकेटर’ बाजारात लाँच केले. खरे तर चार ते पाच वर्षांपूर्वी बाजारात रेल्वे वेळापत्रक माहिती पुस्तिका उपलब्ध होती, पण गर्दीच्या वेळी हे वेळापत्रक काढून वाचणे, पान उलटणे तसे कठीणच होते. म्हणून सुरुवातीला त्याने रेल्वे वेळापत्रक या अॅपवर दिले. पण नंतर त्याच्या लक्षात आले आपल्यासोबत आणखी एक कंपनी हेच काम करतेय तेव्हा यात आपण वेगळे काय देऊ शकतो, या विचाराने त्याला झपाटले. पुढच्या सात दिवसांत त्याने दिवस-रात्र एक करीत रेल्वे वेळापत्रकाबरोबर मुंबईतल्या बसेसचे मार्ग, रिक्षा-टॅक्सी यांचे भाडे, रेल्वेचे मेगा ब्लॉक यांचीही माहिती दिली. आणि या मार्केटमधले आपले वर्चस्व कायम राखले. तोपर्यंत त्याचे हे काम अनेकांनी नावाजले. त्यासाठी त्याने वापरलेली छोटीशी क्लृप्ती कामी आली. त्याने एका इंटरनेट साइटवर आपले हे सॉफ्टवेअर अपलोड केले. थोडय़ाच कालावधीत अनेकांनी त्या साइटला भेट दिली आणि त्याचे हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केले. त्याच्या मते जेव्हा तुम्हाला स्पर्धा निर्माण होते, तेव्हाच तुम्ही जास्त चांगले काम करता. याच पद्धतीने सतत वेगळे काही तरी देण्याच्या प्रयत्नात त्याने या अॅपमध्ये सातत्याने बदल केले. आणखी कोणती माहिती, सुविधा यांची लोकांना गरज आहे याचा त्याने अभ्यास केला. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की मुलांना नोकरीच्या संधीची गरज आहे. त्यासाठी अनेक जॉब देणाऱ्या इंटरनेट साइट्सही उपलब्ध आहेत. पण इथेही सगळ्यांकडेच कॉम्प्युटर, लॅपटॉप असेल असे नाही किंवा हल्ली लोकांना वेळ खूप कमी असतो. काही जणांना अॅप्लिकेशन कसे करावे हे माहीत नसते. ही गरज ओळखून त्याने नोकरीच्या संधी कुठे कुठे उपलब्ध आहेत याची माहिती देण्यासाठी जॉब्स इंडिकेटरची सुरुवात केली. इथे त्याने एक छोटा पर्यायही लोकांना दिला. तिथे जाऊन एकदाच तुमची वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरायची. त्यानंतर ती कुठे पाठवायची असेल तर त्या ऑफिसच्या गरजेप्रमाणे योग्य पद्धतीने ती दुरुस्त करून त्या त्या संस्थेला, कंपनीला पाठवली जाते. त्यासाठी त्याच्या अॅपमध्ये त्याने जी सुविधा दिलीय त्यामुळे आपोआप, तुमच्या माहितीच्या अनुषंगाने एक ई-मेल तयार होतो आणि तो त्या कंपनीकडे पाठविला जातो. त्यासाठी दरवेळेस स्वत:ची माहिती भरायची आणि पाठवायची कटकट कमी होते. दुसरे म्हणजे लोक, विशेषत: तरुण मुले हल्ली पेपर फार वाचत नाहीत. अशांना हे अॅप विशेष उपयुक्तआहेत असे त्याला वाटते. त्याचप्रमाणे त्याने यात आता लांब पल्ल्याच्या गाडय़ांचे वेळापत्रक द्यायला सुरुवात केली. कारण लांब पल्ल्याच्या गाडय़ा बऱ्याचदा तांत्रिक कारणे किंवा अपघात यामुळे उशिरा येतात तेव्हा तासन्तास प्रवाशांचा खोळंबा होतो. ते लक्षात घेऊन त्याने या अॅपवर कोणती ट्रेन कोणत्या स्टेशनवर किती वेळ थांबणार याची माहिती द्यायला सुरुवात केली. त्यालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
या सर्व सुविधा लोकांना देताना त्याने लोकांच्या गरजेची, मागणीची नस अचूक ओळखली. मराठी माणूस हा मुळातच नाटकवेडा आहे. त्यांचं हे नाटकप्रेम पाहून त्याने मुंबईतल्या व आसपासच्या नाटय़गृहांतील नाटकांच्या प्रयोगांची माहितीही आपल्या या अॅपवर देण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नाही, तर सोबत िहदी, गुजराती आणि इंग्रजी भाषांतल्या नाटकांचे प्रयोग कुठे होणार आहेत याचीही माहिती या अॅपवर आहे. अॅन्ड्रॉइड मोबाइल वापरणाऱ्या तरुणांना नाटय़गृहात आणण्याचा, त्यांच्यात नाटकाविषयी प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न त्याने याद्वारे केला आहे. सिनेमागृहांमधील मराठी चित्रपटांचं वेळापत्रकही त्याने नुकतंच द्यायला सुरुवात केलं आहे.
सचिनचं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. रेल्वेच्या तिन्ही मार्गाचा डाटा अपडेट करणं ही तशी खूपच किचकट, कठीण गोष्ट आहे. त्यातही ही माहिती फार जागा अॅपमध्ये व्यापणार नाही याचीही काळजी त्याला आणि त्याच्या टीमला सातत्याने घ्यावी लागते. पण तिथेही या तरुण मित्राचे दोस्तच त्याचे मार्गदर्शक होतात, त्याला सूचना करतात. आणि त्याला मदतही करतात.
त्याच्या या अॅपचं वैशिष्टय़ म्हणजे ते पूर्णपणे मोफत आहे. इतकंच काय तर इंटरनेटशिवायही तुम्ही हे अॅप्लिकेशन मोबाइल किंवा कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून वापरू शकता. त्यामुळेही हे अॅप्लिकेशन आज अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे. झीरो मार्केटिंग हे त्याच्या अॅपचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. मात्र त्याच्या मार्केटिंगसाठी काही छोटय़ा गोष्टी त्याने आवर्जून केल्या. गणपतीच्या दिवशी त्याने लोकांना शुभेच्छा देणारा आणि नवी माहिती अपलोड करणारा एसएमएस पाठविला. पुढच्या तासाभरात हजार लोकांनी त्याचं हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं. दिवसाला १० हजार लोक आणि महिन्याला लाखभर वापरकर्त्यांची संख्या सुरुवातीलाच त्यामुळे त्याला गाठता आली.
सचिन एका बाजूला व्यवसाय करत असला तरी त्याला विविध विषयांची आवड आहे. मॅगझिनसाठी मुखपृष्ठ डिझायिनग करणं, चित्र काढणं ही त्याची आवड आहे. त्यासाठी त्याला बक्षिसेही मिळाली आहेत. फक्त छंदाबाबतच ही विविधता आहे असं नाही, तर बीई केल्यानंतर त्याने फायनान्समध्ये एमबीए केलं.
त्यानंतर सध्या तो कायद्याची पदवी घेतो आहे. विविध गोष्टी शिकायला आणि खूप सारे मित्र जमवायला त्याला आवडतं. त्याच्या या यशात त्याचे घरचे, त्याचे गुरुजन यांचाही खूप मोठा वाटा आहे असं तो आवर्जून सांगतो. जर इच्छा असेल तर मार्ग नक्कीच मिळतो. अनेक संस्थांनी त्याच्या कामाची दखल घेत त्याचा गौरव केला आहे. यानंतर त्याचा मानस आहे, ही सगळी माहिती मराठी आणि िहदीमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्याचा. आगामी काळात मोनो आणि मेट्रो रेल यांचंही वेळापत्रक त्याला द्यायचं आहे. पावसाळ्यात होणारी लोकांची गरसोय पाहता आगामी काळात रस्त्यावर कुठे ट्रॅफिक आहे, कुठे पाणी साठलं आहे ही माहितीही लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. त्याचप्रमाणे यानंतर भारतातल्या इतरही शहरांत त्याला अशा पद्धतीची सुविधा द्यायची आहे. अनेक मोठमोठय़ा पगाराच्या नोकऱ्यांचं आमिष तसंच हे सॉफ्टवेअर विकत घेण्याविषयी मोठय़ा रकमा मिळत असतानाही लोकांना मोफत असं अॅप्लिकेशन देणारा सचिन आपलं सामाजिक भानही जेव्हा जपतो तेव्हा इतरांपेक्षा वेगळा वाटतो.
त्याच्या मते, ज्या गोष्टींची लोकांना गरज असते त्याला मार्केटिंगची आवश्यकता नसते. ग्राहकांची नस बरोबर ओळखणाऱ्या सचिनचं एम इंडिकेटर म्हणूनच अनेक मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालं आहे. ‘मोबाँड’ सॉफ्टवेअर कंपनीतर्फे हे एम इंडिकेटर जास्तीतजास्त लोकांपर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी तो प्रयत्नशील आहे. नोकरी सोडून सचिनने आपल्या छंदाला व्यवसायाचं रूप दिलं आहे. जाहिरातींच्या माध्यमातून त्याला यातून चांगलं उत्पन्नही मिळतंय. आपल्या या यशामुळे अनेक तरुणांसाठी तो आज ‘एम इंडिकेटर’ म्हणजे ‘मार्ग दाखवणारा मार्गदर्शक’ झाला आहे.