lp62अरबांबरोबरच्या सततच्या संघर्षांसाठीच आपल्याला माहीत असलेला इस्रायल पर्यटनाच्या दृष्टीने आगळा देश आहे. नेहमीच्या चौकटीबाहेरचे काही पाहायचे असेल तर इस्रायलला जरूर भेट दिली पाहिजे.

इस्रायल हा आशिया खंडाच्या पश्चिमेला असलेला छोटासा देश. मेडिटरीअन समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर जॉर्डन, पॅलेस्टाइन, लेबनॉन, इजिप्त, ग्रीस या देशांशी जोडलेला. मूर्ती लहान, पण कीर्ती महान या धर्तीवर चार हजार वर्षांपासूनचा ज्यू धर्माचा पगडा असलेला देश. मुस्लिमांचे मक्का हे पवित्र स्थान, तसे ज्यू व ख्रिश्चन लोकांचे जेरुसलेम, अर्थातच इस्रायल. पूर्वी जाफा, जेरुसलेम, नझारेट, हेफा ही सर्व गावे वेगवेगळी होती. ब्रिटिश काळात हे सर्व पॅलेस्टाइन होते. पुढे १९४८च्या करारानुसार ते पॅलेस्टाइनपासून विभक्त होऊन स्टेट ऑफ इस्रायल असे झाले. ज्यू लोकांचा हा जगातील एकमेव देश. इस्रायलच्या जेरुसलेम या भागात येशूचा इतिहास, शिवाय महंमदला मक्केला जाताना ईश्वरी संकेत इथेच झाला, म्हणून या सर्वाच्या दृष्टीने ते पवित्र स्थान, म्हणजेच होली लँड. ख्रिश्चन व मुस्लीम धर्म हे अनुक्रमे ज्यू धर्मापासूनच अस्तित्वात आले. याबरोबर इतिहासकाळापासून मध्यपूर्वेतील अरब, मुस्लीम तसेच रोमनांनी राज्य केल्यामुळे त्यांचे वास्तव्यही आहेच.
तेल अवीव ही येथली व्यापारी पेठ व जेरुसलेमपाठोपाठ मोठे शहर. बाहेरून आलेल्या विदेशी लोकांची, निर्वासितांनी वस्ती केलेली जागा. जाफा हे इस्रायलच्या पश्चिम किनाऱ्यावरील पूर्वापार व्यापारी बंदर. जगातील पहिले बंदर अशी ख्याती असलेले हे बंदर समुद्रसपाटीपासून १३५ फूट उंचीवर आहे. चार हजार वर्षांपूर्वी बांधलेल्या सिटी वॉलचा एक लहान हिस्सा ऐतिहासिक खूण म्हणून ठेवलेला आहे. बाकी वॉल बरीच तोडली गेली आहे. सध्या आतमध्ये लोक राहतात. प्रत्येक घरावरील नंबर हे चिनी मातीच्या पाटीवर बारा राशींपैकी मेष राशीच्या चित्रासहित आहेत. पूर्वीच्या बंदरावरून येणारा रस्ता अजूनही ठेवलेला आहे. किनाऱ्यावर जामा-उल्-बर ही एक मिनारा असलेली मशीद आहे. पूर्वी खलाशांसाठी दीपगृह व विश्रांतीची जागा होती. तिथल्या चुनखडीच्या खांबांवर १६७५ सालचे डच शैलीतील चित्र आहे.
मशिदीवरून खाली आलेल्या रस्त्यावर जाफा टाऊन स्क्वेअर आहे. तिथे ऑटोमन काळातील शंभर क्लॉक टॉवरपैकी एक व इस्रायली सात क्लॉक टॉवर पैकी एक असलेला क्लॉक टॉवर आहे. त्यावरील चार घडय़ाळांपैकी दोन युरोपीअन व दोन इस्रायली वेळ दाखवतात. इजिप्तशिअन, तुर्की लोकांनी युद्धकैद्यांना ज्या तुरुंगात ठेवले होते, त्याचे आता थ्री स्टार हॉटेल झाले आहे. आमच्या गाईडने गंमत म्हणून सांगितले की तुरुंगात व हॉटेलमध्ये लोकांचे वास्तव्य कमी वेळासाठी असते, म्हणून हॉटेललाही तुरुंगाचेच नाव ठेवले आहे. एके ठिकाणी इजिप्तशिअन वास्तव्य असलेल्या काळातील नगराचे प्रवेशद्वार आहे. त्यावर इजिप्तशिअन चित्र, खाणाखुणा असलेले खांब आहेत. उन्हाळ्यात वेगवेगळया देशातील पुरातन अवशेष शोधणारे पुरातत्त्वशास्त्राचे विद्यार्थी संशोधनासाठी येथे येतात. टेकडीवर विशिंग ब्रीज आहे. त्यावर उभं राहून lp63समुद्राकडे पाहून आपण मनात काही इच्छिले तर ते पूर्ण होते असे म्हणतात. हवामान स्वच्छ असेल तर या टेकडीवरून दूरवर जेरुसलेम धूसर नजरेस पडते.
जेरुसलेम हे ऑलीव्ह माऊंट, माऊंट मोरीहा या डोंगरांपैकी मोरीहा डोंगरावर वसले आहे. पूर्वी अरबस्थान हे आताचे सर्व मुस्लीम राज्य मिळूनच होते. त्यात इस्रायल, जॉर्डन व सीरिया या तीन जागा होली लँड म्हणून प्रसिद्ध आहेत. खरंतर येशू हा जन्माने ज्यू होता. तो जन्मलेली गुहा ही बेथलहॅम येथे आहे. तिथे जमिनीवर जी चांदणी आहे तिला चौदा कंगोरे आहेत. आपण त्या चांदणीला हात लावू शकतो. शेजारीच येशूचा पाळणा आहे. तो मोठा झाल्यावर त्याची शिकवणूक ही ज्यू धर्मापेक्षा वेगळी असल्याने धर्मरक्षकांकडून त्याचा अतोनात छळ झाला. त्याला जेरबंद करून शेवटचे भोजन दिलेली जागा ही जेरुसलेमच्या ओल्ड सिटीमध्ये आहे. शिक्षा म्हणून खांद्यावर लाकडी क्रूस घेऊन डोंगरावर जावे लागले. तिथे त्यावर त्याला खिळे ठोकून मारले. या सर्व जागा आपल्याला पाहायला मिळतात.
इथल्या प्रसिद्ध मृत समुद्राच्या जवळपास मसाडा या डोंगरावर अगदी पहिल्या शतकात ख्रिस्तपूर्व ६६ साली ज्यू राजा हेरॉड याने प्रशस्त राजवाडा बांधला होता. पाणी, सुपीक जमीन यांचा अभाव असूनही राजाने गाढवांमार्फत पाणी आणून डोंगरावर छोटय़ाछोटय़ा ओहोळांची अशी व्यवस्था केली होती की, टाकीत भरपूर पाणी जमा होत असे. वर ज्यू प्रार्थनास्थळ, सेनेगॉग आहे. तेथे अजूनही काही धार्मिक कार्यक्रम होतात. राजा होरॉडने आपला राजवाडा तीन स्तरांवर बांधला होता.
राजाची स्वत:साठी जशी खास स्विमिंग पूल, सोना बाथची व्यवस्था होती तशी इतर लोकांसाठीही होती. काही ठिकाणी जमिनीवर मोझेक डिझाईन, भिंतीवर रंगवलेली चित्रे आहेत. किल्ल्याभोवती चांगली १०२५ फूट लांब, दोन फूट रुंद व चार फूट उंच अशी तटबंदी होती. रोमन चढाईच्या वेळी किल्ल्याला वेढा घालून भिंत बांधून सैनिकांसाठी मोर्चेबंदी केली होती. हे सर्व आपण किल्ल्यावरून व्यवस्थित पाहू शकतो. रोमन सैनिकांनी एके ठिकाणी तटाला खिंडार पाडून आतमध्ये प्रवेश केला तो चढ आजही आहे.
मसाडाबद्दल असं म्हटलं जातं, रोमन सैनिकांनी तटबंदी भेदताना किल्ल्यावरील लोक वरून दगड, गरम तेल ओतत होते, पण रोमन बधले नाहीत. त्यांनी बंदी करून आणलेल्या ज्यू कैद्यांना पुढे करून चाल करण्याची नामी शक्कल लढवली. आपल्याच बांधवांना कसे मारायचे या विचाराने मारा थंड झाला; पण रोमन कैदी होण्यापेक्षा आपण सन्मानाने मेलेले बरे म्हणून सर्वानीच आत्महत्या करावी, अशा विचाराने अधिकाऱ्याने एकमेकांना तलवारीने मारून टाकण्याचा आदेश दिला. रोमन सैनिकांनी किल्ला काबीज केल्यावर मृत गाव नजरेस पडले, तसे त्यांनी ती जागा तशीच सोडली. तेव्हापासून तिथे परत कुणी आलेच नाही. १९९० साली इंग्लिश संशोधकांना तिथे एक पुरुष, स्त्री व मुलाचा असे मानवी सांगाडे मिळाले.
लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवरील भूस्तरांवर मोठय़ा हालचाली होऊन आफ्रिका खंडापासून अरबस्तानचा भाग अलग झाला. जॉर्डनचा भाग एकदम उंचावला गेल्यामुळे मेडिटरीअन समुद्राचा काही भाग तसाच ४०० मी. खोलीवर गेला. हा आता समुद्र नसून प्रचंड खाऱ्या पाण्याचा तलाव झाला आहे. अशा बंदिस्त दरीत असल्याने त्यात कुठूनही पाणी येत नव्हते तसेच ते बाहेरही जात नव्हते. त्यामुळे त्याचे मृत समुद्र (डेड सी) असे नामकरण झाले. इस्रायल सोडल्यानंतर हायवेवरून जाताना ठिकठिकाणी आपण समुद्रसपाटीपासून १००, १५० मी. असे किती खाली जात आहोत हे दर्शवणारे मैलावरचे दगड डोंगरावर आहेत. लाखो वर्षांपासून तेथे साचलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील मिठाचे प्रमाण कालागणिक वाढतच आहे. त्यामुळे या तलावात lp64कोणत्याही प्रकारची जीवसृष्टी नाही. शिवाय समुद्रसपाटीपासून खाली असल्याने पावसाचे प्रमाणही अत्यल्प, त्यामुळे तिथे शेतीवाडीही अस्तित्वात नाही.
इस्रायलपासून जॉर्डनपर्यंत पसरलेल्या मृत समुद्राची लांबी ५२ कि.मी., १५ कि.मी. रुंदी, तर खोली ३०४ मीटर आहे. साध्या पाण्यात बुडणाऱ्या बहुतेक वस्तू इथल्या पाण्यात बुडत नाहीत तर तरंगतात. इथल्या पाण्यात मिठाचे प्रमाण ३४ टक्के आहे. आपण येथे पोहूही शकत नाही. ब्रेस्ट स्ट्रोक करायचा म्हटले तरी हातपाय मारून जिथे आहोत तिथेच राहतो. पाठीवरून पोटावर येणे महामुश्कील, पण हातात वर्तमानपत्र घेऊन खुशाल पाण्यात पहुडून वाचू शकतो. शिवाय अशा परिस्थितीमुळे किनाऱ्यावरील मातीत विद्राव्य खनिजांचे व क्षारांचे प्रमाण फारच आहे. त्यामुळे त्या मातीचा लेप, मडपॅक, हा काही चर्मरोगांवर, ब्युटी थेरपीमध्ये फायदेशीर असतो असं म्हटलं आहे. त्यातूनच वेगवेगळी मसाज ऑइल्स, साबण बनवले जातात. इस्रायलभेटीसाठी आलेले पर्यटक मृत समुद्रामध्ये पोहून, चिखल माखून घेतल्याशिवाय जात नाहीत; पण बर्फासारख्या थंडगार पाण्याच्या समुद्रात पोहून तेवढय़ाच गारेगार पाण्याचा शॉवर घेण्याची तयारी ठेवावी लागते.
अपवाद म्हणून जॉर्डन रिव्हरमधून येथे थोडे पाणी येते. पण त्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. किनाऱ्यावर क्षारांचे दगड दिसतात, तर काही ठिकाणी काळी वर्तुळं दिसतात. याचे कारण म्हणजे किनाऱ्यावरील क्षारांचे प्रमाण घटल्याने तेथे खड्डा निर्माण होतो. असा खड्डा कधी पडेल ते सांगताही येत नाही. त्याची खोली किती आहे हे सांगणेही कठीण असते. आमच्या गाइडने सांगितले की दोन वर्षांपूर्वी कुणी तेथे चालताना जमिनीचा काही भाग खचला व ती व्यक्ती ३० फूट खोल गेली. कित्येक तासांनी महत्प्रयासाने त्या व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे अशा ठिकाणी चालण्यास मज्जाव आहे. अशा भौगोलिक परिस्थितीमुळे मृत समुद्राचा विस्तार वर्षांगणिक अर्धा ते एक मीटरने कमी होत आहे. या गोष्टीमुळे वैज्ञानिक चिंतेत आहेत असे आम्हाला सांगितले गेले.
मृत समुद्रासारखाच सी गलीली, लेक तायबेरीआज हा गोडय़ा पाण्याचा तलाव आहे. तोही मृत समुद्रासारखाच निर्माण झाला आहे, पण तलावाला जमिनीखालील झरे व जॉर्डन नदीमधून पाण्याचा साठा असल्याने पाणी गोड आहे. इस्रायलला येथूनच पाणीपुरवठा होतो, त्यावरून तलावाच्या स्वरूपाची कल्पना येईल. २१ किमी. लांब, १३ किमी. रुंद, १७० चौरस किमी. क्षेत्रफळ असलेला तायबेरीआज लेक समुद्रसपाटीपासून २०९ मी. खाली आहे. हा तलाव ख्रिश्चन बांधवांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा. येशूने सीरियावरून येताना येथे वास्तव्य केले होते. त्याचा शिष्य सेंट पीटर्स याने तेथे पहिले चर्च बांधले होते. त्यावर आणखीन दोन चर्चेस बांधली गेली lp65होती. ती गोलाकार चर्चेस उत्खननात सापडली होती. आता तर त्यावर अष्टकोनी चर्च खांबांवर उभे आहे. शिवाय येथेच येशू पाण्यावर चालला होता, असे बायबलमध्ये लिहिले आहे.
येथे अडीच हजार वर्षांपूर्वी सापडलेल्या ख्रिस्ताच्या बोटीची एक कथा सांगितली जाते. १९८६ साली या भागात चांगलाच दुष्काळ पडला होता. त्यामुळे तलावाची पातळी बरीच खाली गेली होती. किनाऱ्यावरील जेनासोर या ठिकाणी फिरायला आलेल्या दोन भावांच्या पायाला वाळूतील लोखंडी खिळे लागले. ते वेगळेच दिसत होते. तेव्हा कुतूहल म्हणून त्यांनी किनाऱ्यावर थोडे खोदल्यावर लाकडी फळ्या व लोखंडी सामान मिळाले. पुरातत्त्व खात्याने आणखी खोदकाम केले तेव्हा अकरा दिवसांनी चिखलात अडकलेली होडी दिसली. त्यावरील खाणाखुणा पाहून ती दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याचे नक्की झाले. बायबलमध्ये रोमन आक्रमणाच्या वेळी ज्यू लोकांनी वापरल्याचा उल्लेख आहे. इतकी वर्षे पाण्यात राहिल्यामुळे लाकूड अगदी स्पंजासारखे झाले होते. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक बाहेर काढून रसायनांनी धुवून, सुकवून ती साली यीगल अ‍ॅलीन या वस्तुसंग्रहात ठेवली आहे.
बेत शिहॅन हे त्या काळातील भरभराट झालेले रोमन शहर होते. जॉर्डन रिव्हर व्हॅली व झ्ॉज्रील व्हॅली यांच्या नाक्यावरच, शिवाय मेडिटरिअन सीपासून जवळ आणि जेरुसलेम व सी ऑफ गलीली येथे जाण्यासही सोयीची, त्याबरोबर व्हॅलीत असल्याने पाणी भरपूर, शेती, फळफळावळ यासाठी सुपीक जमीन त्यामुळे व्यापारालाही फायदेशीर. चांगली दणकट वेस बांधून रोमन शहराची स्थापना केली गेली. हुशार रोमन लोकांनी जमिनीखालून येणाऱ्या झऱ्यांचा उपयोग करून त्या काळी सोना बाथ, स्विमिंग पूल यांची अतिशय कल्पकतेने उभारणी केली होती. सोनामध्ये जमिनीखालून गरम पाणी सोडून घुमटाकार बाथ गरम करण्यात येत असे. पाण्याची वाफ थंड छताला लागल्यावर त्याचे पाणी जमिनीवर पडून परत वाफ होऊन वापरात येई. असे हे चक्र सतत चालूच.
रोमन सुंदऱ्यांकडून तेलमालीश करून, जिममधे व्यायाम झाल्यानंतर सुगंधी माती लावून स्नान करण्याची व्यवस्था होती. सहा ते सात हजार लोक मावतील असे अ‍ॅम्फी थिएटर हे तिथलं आणखी एक आकर्षण. त्यात आजसुद्धा म्युझिकल कॉन्सर्ट्स, फॅशन शोज होतात. तसाच नगराचा मोठा नाका. जराशा उंचवटय़ावर देवालय, तसंच बळी देण्याची जागा होती. बाजाराच्या दोन्ही बाजूंना दुकानं होती, रस्ता मध्यभागी जरासा उंच करून त्यावर पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याखालून गटाराची व्यवस्था होती. त्या वेळीही इतके अद्ययावत शास्त्र पाहून आपल्याला आज आश्चर्यच वाटते.
इस्रायलमध्ये ज्यू, ख्रिश्चन व मुस्लीम या तीन संस्कृतींचा वावर असल्यामुळे त्यांच्या तिघांचाही पेहराव, खाण्यापिण्याच्या सवयी एकमेकांमध्ये मिसळून गेल्या आहेत. इथल्या स्त्रिया घोळदार झगा घालतात. डोक्यावर टोपी असून त्याला जाळी असते. तर इथल्या मुस्लीम स्त्रिया पूर्ण हिजाब घालतात. पुरुष लांब डगला, डोक्यावर काळी हॅट आणि हॅट नसली तर यमाका म्हणजे डोक्यावर लहानशी चकती सारखी टोपी lp66असते. केस चांगले असले तर क्लिप लावलेली असते. टक्कल असेल तर नुसतीच ठेवलेली असते. तरीही ती मुळीसुद्धा पडत नाही. एकाला त्याबाबत विचारले तर त्याने डोके हलवून प्रात्यक्षिक करूनच दाखवले. टोपीच्या बाजूने कानावर जन्मापासूनच्या जावळाच्या दोन बटा रुळत असतात. या वेशात लहान मुलं फारच गोंडस दिसतात.
शुक्रवार दुपारी तीननंतर रविवार सकाळपर्यंत ज्यू लोकांच्या वस्तीत शुकशुकाट असतो. त्याला शबात म्हणतात. शनिवारी हा शबात काटेकोरपणे पाळला जातो. रेस्टॉरंट्स सोडाच, पण घरातसुद्धा चूल पेटत नाही. त्या दिवशी आपल्याला सुके खाणे घेऊन व्यवस्था करायला लागते. पण हासुद्धा अनुभव घ्यायलाच हवा. आणखी एक गंमत म्हणजे शबातच्या वेळेत कोणतेही मशीन चालवायचे नसल्याने ज्यू लोक गाडी चालवत नाहीत, तसेच हॉटेलात लिफ्टमधील बटणेही दाबत नाहीत. त्यामुळे बऱ्याच हॉटेल्समधल्या सर्व लिफ्ट्सपैकी एक लिफ्ट ज्यू लोकांकरिता वेगळा प्रोग्रॅम केलेली स्वयंचलित असते. ती तळमजल्यावरून सर्वात वरच्या मजल्यावर जाते व खाली येताना प्रत्येक मजल्यावर ठरावीक वेळच थांबत येते. त्यामुळे या अशा गमतीशीर लिफ्टमध्ये चढायला काही जण कचरतात.
lp67इस्रायलमध्ये ज्यू, ख्रिश्चन व मुस्लीम संस्कृतीचा मिलाफ असल्याने आहारात मासे व श्वारमा, कबाब, कटलेट्स, पिटाब्रेड, रोटी तसेच वांग्याच्या भरताप्रमाणे बाबागनूष, मोत्ब्बल, ग्रिल्ड फिश आणि डाळिंबाचा रस असतो. शिवाय गोडामध्ये बकलावा, कडाईफ, हलुवा हे खाल्लेच पाहिजेत असे पदार्थ. अरबस्तानात सुकामेवा उत्कृष्ट असल्याने त्यापासून बनलेली मिठाई आपल्याला दुकानांच्या शोकेसमधून चव घेण्यासाठी खुणावत असते. इस्रायलला भेट देण्यासाठी डिसेंबर ते एप्रिल हा चांगला मोसम आहे. मस्त थंडीही असल्याने गरम कपडे असणे गरजेचे आहे. आम्ही इस्तंबूलमार्गे तेथे गेलो होतो. भौगोलिक जवळीक असली तरी राजकीय कारणांमुळे कोणत्याही अरब अमिरातीतील हवाई सेवा तेथे नाही.
गौरी बोरकर

Bomb attack on Benjamin Netanyahu's house, Israeli Prime Minister's residence targeted.
Benjamin Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्या घरावर बॉम्बहल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, “शत्रूंनी….”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?
Singapore flagged cargo vessel near Colombo beach in Sri Lanka Fact Check
हत्यारं वाहून नेणाऱ्या इस्रायलच्या जहाजाला लागली आग? VIRAL VIDEO चं नेमकं सत्य काय? वाचा, खरी गोष्ट
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
What Vikrant Messy Said About Muslims
Vikrant Massey : “देशातल्या मुस्लिमांना धोका नाही, कुणीही..”, विक्रांत मेस्सीचं वक्तव्य; टीकेचा भडीमार