‘झाडे लावा, झाडे जगवा’ एवढय़ावर ते थांबले नाहीत. एकेक झाड लावून ब्रह्मपुत्रा नदीच्या एका बेटावर जंगल उभं केलं. पर्यावरणावर असं नितांत प्रेम करणाऱ्या पद्मश्री जादव पायेंग या वनपुरुषाच्या कार्याची माहिती देणारा लेख.
पाच जून रोजी झालेल्या पर्यावरण दिनाचे औचित्य साधून त्याच्या आधीच्या रविवारी, ३१ मे रोजी पद्मश्री जादव पायेंग यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा योग कल्याणकरांना आला. निमित्त होते कल्याणातील ऐतिहासिक सुभेदार वाडा वास्तूत संपन्न होणाऱ्या सुभेदार वाडा कट्टय़ाच्या कार्यक्रमाचे. ईशान्य भारतातील आसाम येथे वास्तव्य असणाऱ्या जादव पायेंग यांच्याशी संवाद साधण्यााची धडपड सगळ्यांनी का केली असेल? नक्की आहे तरी कोण हा माणूस? पद्मश्री मिळण्यासारखे यांचे कार्य तरी काय? असे अनेक प्रश्न भारतवासीयांच्या मनात आले. त्यामुळेच अशा या पद्मश्री पुरस्कार विजेत्या माणसाची जीवनकहाणी जाणून घ्यायलाच हवी.
सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईशान्य भारतातील आसाम हे एक महत्त्वाचे राज्य आहे. आसामची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे जोरहाट हे पद्मश्री जादव पायेंग यांचे गाव. वैष्णवांचे मोठे तीर्थस्थानही याच गावी असल्याने गावाला मानाचे स्थान आहे. भोगदोई नदीच्या किनारी वसलेल्या या गावामध्ये कधी काळी बाजार भरायचे. ‘जोर’ म्हणजे दोन व ‘हाट’ म्हणजे बाजार. अशा रीतीने या गावाचे नाव पडले जोरहाट. अश्रूंची नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात अनेक वैशिष्टय़े आहेत. जादव पायेंग हे त्यांपैकीच एक. ब्रह्मपुत्रा नदीच्या एका बेटावर १२५० एकर जमिनीवर १९७९ पासून जादव पायेंग यांनी एक एक झाड लावत चक्क जंगल उभारले. ते सध्या मुलाई कथोनी या नावाने ओळखले जाते. ‘मुलाई’ हे पायेंग यांचे टोपण नाव तर ‘कथोनी’ म्हणजे जंगल. या जंगलात बांबू, साग, काटेसावर, सुबाभूळ, कदंब, ऐन, अर्जुन, शेवरी अशा ११० प्रकारच्या वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. जवळच असलेल्या काझीरंगामधून गेंडे तर अरुणाचल प्रदेश मधून हत्ती तीन ते चार महिन्यांसाठी येथे मुक्कामासाठी येतात. अस्वल, हरणे, गवे हे वन्य प्राणीही येथे पाहायला मिळतात. रॉयल बेंगाल टायगर म्हणजेच पट्टेरी वाघ हे मुलाई कथोनी जंगलातील वैशिष्टय़च. चिमण्यांपासून ते गिधाडांपर्यंत विविध पक्ष्यांचाही गराडा या जंगलाभोवती पाहायला मिळतो. असे १२५० एकर जमिनीवर असलेल्या प्रशस्त घराला पायेंग यांच्याबरोबरीने येथील पक्षी, प्राणी, औषधी वनस्पती यांनी आपले घर मानले आहे.
एप्रिल, मे आणि जून हा आसाममधील पावसाळ्याचा काळ. त्यामुळे या काळात पायेंग जास्तीत जास्त झाडे लावतात. दर वर्षी या काळात झाडे लावण्यासाठी पायेंग बीज राखून ठेवतात. कारण हा काळ झाडांच्या वाढीचा व त्यांची निगा राखण्याचा असतो. या काळात ते आसाम सोडून इतरत्र कुठेही कार्यक्रमाला जात नाहीत. परंतु कल्याणातील सुभेदार वाडा शाळेत कार्यक्रम असल्याने केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या ओढीपोटी ते एवढय़ा लांबवर आले.
पायेंग यांच्या लहानपणी आलेल्या ब्रह्मपुत्रेच्या महाप्रलयात या बेटावरील सर्व झाडे नष्ट झाली. याच काळात पुराच्या पाण्यात वाहून आलेला साप वाळूवर मृत अवस्थेत त्यांना दिसला. हा साप का मेला याचा विचार केल्यानंतर त्यांना असे जाणवले की, बांबूचे बन आज जर या ठिकाणी असते तर तो साप तेथे जाऊन स्वत:चे रक्षण करू शकला असता. मात्र ते नसल्यामुळे उन्हाच्या तडाख्यात त्याला आपला प्राण गमवावा लागला. झाडे लावायला सुरुवात केली नाही तर सापाप्रमाणे मनुष्यप्राण्याचीही अशीच अवस्था होईल या विचाराने व वाडवडिलांच्या सल्ल्याने पायेंग यांनी १९७९ मध्ये या बेटावर आपल्या हाताने एक एक झाड लावण्यास सुरुवात केली व ते कार्य आजतागायत कुठल्याही अपेक्षेविना सुरू आहे. पहाटे साडेतीन-चारला उठून स्वत:चे आवरायचे मग एक सायकल घ्यायची. सायकलवर झाडे व झाडे लावण्यासाठी आवश्यक हत्यारे ठेवायची. सायकलवरून आठ ते दहा किलोमीटर प्रवास करायचा. एप्रिल, मे, जून हा आसाममधील पावसाळ्याचा काळ. त्यामुळे धो-धो पाऊस पडत असताना नदी ओलांडण्याचा मनात विचार जरी आला तरी आपले मन भयभीत होईल. परंतु या सगळ्याची तमा न बाळगता नदी पात्र ओलांडायचे. नदी ओलांडल्यानंतर पुन्हा आठ ते दहा किलोमीटर चालत प्रवास करायचा व अखेर जंगलात पोहचल्यावर तिथे झाडे लावायची. असा एकूण २० ते २२ किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास पायेंग वर्षांचे ३६५ दिवस करत आहेत. नवीन वर्ष आले की, आपण मनाशी एखादी गोष्ट वर्षभर करू, असा संकल्प करतो. परंतु प्रत्यक्ष आचरणात किती गोष्टी येतात हे आपल्या सर्वानाच माहिती आहे. जादव पायेंग यांनी मात्र एक-दोन नाही तीस वर्षांहून अधिक काळ झाडे लावण्याचे व्रत अविरत सुरू ठेवले आहे. झाडाच्या एका ‘बी’पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज एका विशाल, महाकाय जंगलापर्यंत येऊन पोहोचला आहे. तरीही त्यांना आपण अजून काहीच केले नाही असे वाटते. अजून बरेच काही करायचे आहे, ही त्यांच्या मनातील भावना खरोखरच वाखणण्याजोगी आहे. जादव पायेंग यांचा हा प्रवास ज्या व्यक्तीने जगासमोर आणला ते आसाममधील पत्रकार जितू कलिता. जितू कलिता यांनी जादव पायेंग या असामान्य व्यक्तीचा जीवनप्रवास प्रकाशझोतात आणल्याने त्यांचेही कार्य कौतुकास्पदच म्हणावे लागेल.
पद्मश्री प्राप्त जादेव पायेंग आजही बांबूच्या कच्च्या व साध्या घरात आपल्या कुटुंबासमवेत राहतात. लग्नाच्या वयात असताना पायेंग यांना कुणीही आपली मुलगी लग्नाला देण्यास तयार नव्हते. कारण झाडे लावत जंगलात फिरणाऱ्या या महान व्यक्तीच्या कार्याला येथील नागरिकांनी सुरुवातीला वेडय़ात काढले होते. परंतु आज त्यांची पत्नी पायेंग यांच्या कार्यात त्यांच्या पाठीने खंबीरपणे उभी आहे. जादव पायेंग यांच्याजवळ गायी-गुरे असल्याने त्यांपासून मिळणारे दूध विकून त्यांना उत्पन्न मिळते. आयुष्याचे रहाटगाडगे चालविण्यापुरते उत्पन्न त्यांना मिळते. त्यात ते समाधानी आहेत. जास्त पैसा मिळवून करायचे तरी काय, असे जादव पायेंग म्हणतात.
भारताच्या लोकसंख्येचा विचार करता आत्तापासूनच आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टीने कंबर कसणे गरजेचे आहे. बाहेरून कोणतीही व्यक्ती येऊन आपल्याला या विषयी मार्गदर्शन करणार नाही, असे पायेंग आपल्या प्रत्येक मुलाखतीत सांगतात. यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांपासून सर्वाना पर्यावरणाचे धडे देण्याची आवश्यकता आहे. पर्यावरण शिक्षणामध्ये प्रात्यक्षिकांवर भर देणे गरजेचे आहे. पायेंग स्वत: शिक्षण घेऊ शकले नाहीत परंतु महाविद्यालयीन विद्यार्थ्यांविषयीची त्यांची कळकळ त्यांच्या बोलण्यातून नेहमीच जाणवते. महाविद्यालयामध्ये पर्यावरण विषय असतो; परंतु त्याविषयीचे शिक्षक त्या ठिकाणी नसतात, अशी खंत ते व्यक्त करतात. पद्मश्री पुरस्काराची मला गरज नसून ही धरती वाचणे आवश्यक आहे. शासन आपल्यासाठी काय करते याचा विचार न करता मी देशासाठी काय करतो या विचाराची आज गरज आहे. आखाती देशांमधून पायेंग यांना भेटण्यासाठी वेगवेगळे लोक येत असतात. आमच्या देशासाठी काही तरी करा अशा विनवण्याही करीत असतात. मात्र तुमच्या देशात येऊ शकत नाही कारण तुमच्या देशात झाडे लावण्यासाठी जमीनच शिल्लक राहिलेली नाही, असे पायेंग सांगतात. मात्र आपल्या देशात जमीनही आहे आणि लोकांकडे पुरेसा वेळही. आपण जर ठरविले तर भविष्यात जगाला प्राणवायू पुरवणारा देश म्हणून आपण भारताचे स्थान निर्माण करू शकतो. निसर्गचक्र व्यवस्थित सुरू ठेवायचे असेल तर झाडे लावणे व जगविणे आवश्यक आहे. झाडे लावण्याबरोबर झाडे जगवली तरच आपण पर्यावरणरक्षण करू शकू. अशोक, पिंपळ, शेंगा यांसारखी झाडे सर्वत्र लावण्याची प्रामुख्याने गरज आहे.
समीर पाटणकर – response.lokprabha@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा