बाहेर धुवाधार पाऊस पडतोय. सगळीकडे मस्त गारवा आहे. अशा वेळी समोर हवी गरमागरम कांदाभजी आणि हातात हवा वाफाळत्या चहाचा कप.. तुम्हालाही असंच वाटतं ना? पण तसं असतं का खरंच?

आमच्या लहानपणी म्हणजे साठच्या दशकात पावसाळय़ात पाऊस खूपच पडायचा. त्या काळात ग्लोबल वॉर्मिग, प्रदूषण इ. थेरं निसर्गाला माहीत नसल्याने पावसाळा १०-११ जूनला सुरू व्हायचा आणि सप्टेंबरनंतर गणपतीसोबतच निरोप घ्यायचा! ओल्या मातीचा आणि नवीन पुस्तकांचा वास आम्ही एकदमच घ्यायचो आणि पहिल्या पावसात भिजतच शाळेत जायचो! त्या काळात हवामान खातेही तितकेसे आधुनिक नसल्याने बेडूक, पावश्या पक्षी इ. पावसाच्या दूतांकरवी पावसाचे भविष्य जाहीर व्हायचे आणि योगायोगाने बऱ्याच वेळा ते खरेही व्हायचे!
इंग्लिश जुलै आणि मराठी आषाढ सुरू झाला की धुवाधार पाऊस सुरू व्हायचा. आमच्या गल्लीत गुडघाभर पाणी तुंबायचे, तेव्हा वार्षिक नालेसफाई वगैरे प्रकार नसल्याने तास-दोन तासांत आपोआप ओसरूनही जायचे! जास्त पाऊस झाला की, त्या काळातले प्रेमळ गुरुजी कान उपटून मस्ती न करता सरळ घरी जाण्याच्या बोलीवर शाळाही सोडून द्यायचे! घरी आल्यावर पक्का तुरुंगवास! वडीलही तितकेच प्रेमळ असल्याने पाठीत गुद्दे घालून घरातच डांबून ठेवायचे. त्या काळात लोक मनोरंजनासाठी रेडिओ वगैरे ऐकत असत. दुपारच्या वेळी रेडिओवर हमखास एक श्रुतिका (‘केवळ ऐकण्याचे छोटे नाटुकले’ याचा अचूक मराठी प्रतिशब्द) लागायची, त्या श्रुतिकेत आजच्या लोकप्रिय ‘आदेश भाऊजी’सारखा एक ‘टेकाडे भाऊजी’ असायचा! वेळीअवेळी मित्रांच्या संसारात अचानक टपकणे, राजकारण आणि चालू स्थितीवर फालतू चर्चा करणे, मित्राला राग न येण्याइतपत वहिनींची भंकस करणे, अत्यंत बालिश विनोद करून स्वत: हसणे आणि शेवटी वहिनीकडे चहा आणि काही तरी खाण्याची फर्माईश करणे हेच त्या ‘टेकाडेभाऊजीं’चे काम! भर पावसात ही श्रुतिका लागली की, हे टेकाडेभाऊजी वहिनीकडे हमखास चहा आणि गरमागरम कांदाभजीची फर्माईश करायचे. रेडिओवर ऐकलेले खरे मानण्याची आमची वृत्ती असल्याने त्या टेकाडेभाऊजींचा खूपच हेवा वाटायचा. हा माणूस आता श्रुतिका संपल्यावर भर पावसात भरपूर कांदाभजी हादडणार या कल्पनेनेच आम्हाला त्याची असूया वाटायची, रागही यायचा! पावसाळा आणि कांदाभजी हे समीकरण त्याच काळात आमच्या मनांत रुजले! ते किती भंपक आहे हे हळूहळू आम्हास समजू लागले.
भर पावसात हजार वेळा आईचा पिच्छा पुरवूनही तिने कधी खास पावसासाठी कांदाभाजी तळल्याचं मला तरी आठवत नाही! कदाचित आमचं बारा माणसांचं दणदणीत कुटुंब आणि खाणारे अव्वल दुष्काळवीर असल्याने तिचाही नाइलाज असावा!
गल्लीच्या तोंडाला एक गचाळ हॉटेल होते. जेवढे हॉटेल जास्त गचाळ तेवढीच तिथली कांदाभजी अप्रतिम या अलिखित नियमाने तिथली कांदाभजी जबरदस्त असायची. बाहेर तुफान पाऊस, आमचा मुक्काम गॅलरीत आणि दुपारी चारला भजीचा पहिला घाणा पडला, की अख्खी गल्ली खमंग वासाने दरवळून जायची. भजी तळणारा ‘रामय्या’ कमरेला कळकट टॉवेल आणि कधीकाळी पांढरा असावा अशी शंका येणारा जाळीदार गंजीफ्रॉक घालून भजी तळायला बसायचा! त्या काळात सांगून- कळवून कोणाच्या घरी जाण्याचा शिष्टाचार कोणीही पाळत नसल्याने घरी ऐन जेवणाच्या वेळी बऱ्याच वेळा उपटसुंभ पाहुणे यायचे आणि होणाऱ्या वाढीव कामासाठी आई आमच्या बहिणींना लाच म्हणून तिथून भजीपुडी मागवून द्यायची! आणण्याचे काम माझे, त्याची बिदागी म्हणून त्यातली एक-दोन भजी माझ्या हातांवर पडायच्या! तोंड खवळून उठायचे, पैसे साठवून एकदम ५-६ प्लेट भजी खायची ही माझी त्या काळची उत्तुंग महत्त्वाकांक्षा होती. हा ‘रामय्या’ रोज रात्री भज्यांच्या परातीतील उरलेल्या भज्यांच्या पिल्लांचा ढीग समोरच्या धोबिणीच्या मोठय़ा मुलीला उदार अंत:करणाने फुकट द्यायचा. पुढे हा प्रेमळपणा इतका वाढला की, धोबिणीला मुलीचे लग्न मोठय़ा घाईघाईने त्याच्याशीच करून द्यावे लागले!
त्यानंतर माझ्या वाचनात अनेक कथा-कादंबऱ्यांत पावसाळा आणि कांदाभजी यांचे उल्लेख येतच राहिले, पण ‘‘बाहेर धुवाधार पाऊस पडतोय आणि कोणीएक पावसाची मजा घेत गॅलरीत बसून गरमागरम भजी हादडतोय आणि त्याची पतिव्रता पत्नी रिकामी प्लेट परत-परत भरतेय’’ असे रमणीय दृश्य मी तरी याचि देही याचि डोळा अजून तरी पाहिलेले नाही. या समीकरणाला पुराणातूनही काही पुष्टी नाही. पुराणांत वांगी आहेत, पण कांदाभजी नाही. कालिदासाने केलेल्या पावसाच्या वर्णनांत कांदाभजीचा कुठेही उल्लेख नाही किंवा भरपावसात मावळे सिंहगडावर भजी खात बसल्याचे कोण्या बखरकारानेही लिहिल्याचे आढळलेले नाही. पावसाळा आणि कांदाभजी ही बाब आधुनिक युगातील एक कपोलकल्पित गोष्ट आहे अशी माझी खात्रीच पटू लागली आहे.
माझे लग्न झाल्यानंतर ज्या काळात आपली बायको आपलं सहज ऐकते अशा काळात एका पावसात मी तिच्याकडे कांदाभजीची फर्माईश केली, पण चण्याचं पीठ संपल्याच्या सबबीवर भजी झाली नाही. पुढच्या वेळेला मी चाणाक्षपणे पीठ आणून ठेवले तर पुरेसे तेल नाही म्हणून बेत बारगळला. पुढच्या वेळेला कांदे नसल्याची सबब नक्कीच असणार म्हणून मी प्रयत्नच सोडून दिला. याबाबत मी बऱ्याच मित्रांकडेही चौकशी केली, पण प्रत्येक ठिकाणी नन्नाचा पाढा! चहाच्या व्यसनाचा प्रचंड तिटकारा असणाऱ्या माझ्या काही मित्रांच्या बायकांनी त्यांचे नवरे कांदाभजीसोबत तोंडी लावणं म्हणून अंमळशी दारूही पितात या सबबीवर मूळ कांदाभजीचाच आग्रह धुडकावून लावला असे समजते.
त्या दिवशी घरात शिरल्याशिरल्या कांदाभजीचा खमंग वास आला, बाहेर पाऊसही नव्हता, चकित झालो; पण तितक्यातच आमची शेजारीण कांदाभजीचे ताट हातात घेऊन आमच्या स्वयंपाकगृहातून बाहेर आली, ‘‘खाणार का?’’ तिनं विचारलं, पण माझा होकार जाण्यापूर्वीच स्वत:च्या घरात शिरून तिनं धडाम्कन दार बंद केलं. घरी तिचा भाऊराया आला होता आणि त्यांचा गॅस संपला म्हणून तळणं आमच्याकडे झालं होतं असा नंतर खुलासा झाला.
त्या दिवशी तुफान पाऊस होता. टी.व्ही.वरचा लाडेलाडे बाष्कळ बडबड करत होता, ‘‘बाहेर पाऊस आहे, वातावरण सुंदर आहे, अशा वेळी हवा हातात गरमागरम चहाचा कप आणि सोबत कांदाभजी!’’ मनात म्हटलं पक्का खोटारडा आहे, घरी (स्वत:च्या) जाऊन मागून तर बघ, मग कळेल?
मध्यंतरी एका उच्चभ्रू ‘रेन पार्टी’ला जाण्याचा अलभ्य योग आला. एका आलिशान हॉलमध्ये पार्टी होती. टेबलावर भाजलेली कणसे, चिकन आयटेम्स, फरसाण आणि चक्क भजी महोत्सव होता. फ्लॉवरपासून पनीपर्यंत सर्व बेचव भज्या होत्या, पण ‘कांदाभजी’ नाऽऽही! आणि ते हायफाय लोकही लहान मुलाला दुपटय़ात गुंडाळावे तसे एक एक भजी टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून नाजूकसाजूक खात होते आणि दोन भज्यांच्या वर जात नव्हते.
तात्पर्य काय? कांदाभजी आणि पावसाळा ही एक तद्दन थोतांडी कविकल्पना असून ज्याला कोणाला यात थोडा जरी सत्यांश आढळेल त्या महापुरुषाची मी भजीतुला करण्यास तयार आहे.

Story img Loader