जगामध्ये कर्करोगामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या विविध अवयवांची क्रमवारी लावल्यास, मोठय़ा आतडय़ाचा तिसरा क्रमांक लागतो. जगभर या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: पाश्चात्त्य देशांमध्ये याचे प्रमाण खूप जास्त आहे. त्या मानाने आशिया, आफ्रिका खंडामध्ये कमी आहे. परंतु हल्ली ज्या ज्या देशामध्ये पाश्चात्त्य देशांप्रमाणे राहणीमान व खाणेपिणे बदलले आहे, त्या देशामध्ये मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचे प्रमाणसुद्धा वाढत आहे.
मोठे आतडे म्हणजे आपल्या अन्नपचन संस्थेच्या सर्वात शेवटचा नळीसारखा अवयव. ज्यात चयापचय क्रियेनंतर उरलेला कचरा किंवा मल साठवलेला असतो. मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग हा आतडय़ाच्या आतील आवरणांपासून सुरू होतो व तेथून पुढे पसरतो. अनेकदा मोठय़ा आतडय़ामध्ये छोटय़ा छोटय़ा गाठी आढळून येतात. हे पॉलिप्स (Polyps) सुरुवातीस कर्करोगाचे नसतात. परंतु अनेक वर्षे तसेच आतडय़ामध्ये राहिल्यास त्याचे परिवर्तन कर्करोगामध्ये होऊ शकते, म्हणून अनेकदा सर्जन्स कोलोनोस्कोपी (Surgeons – Colonoscopy दुर्बिणीचा तपास) करताना हे पॉलिप्स आढळल्यास काढून टाकतात असे पॉलिप्स काढून ते तपासणीस पाठवून त्यात कर्करोग आहे की नाही, हे पडताळून पाहिले जाते.
हा कर्करोग जरी संसर्गजन्य नसला तरी आनुवंशिक वा खानदानी आहे. म्हणजेच एखाद्या कुटुंबात हा आजार झाला तर त्या कुटुंबातील इतर व्यक्तींना (भावंडे, मुले) हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.
आतडय़ाचा कर्करोग होण्याची कारणे –
असमतोल आहार – स्निग्ध पदार्थ म्हणजेच चरबी (RGYM) जास्त असलेला आहार कर्करोगास आमंत्रित करतो. ज्या देशामध्ये जास्त चरबीयुक्त आहार घेतला जातो, तिथे या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळते. स्निग्ध (RGYM) पदार्थाच्या पचनक्रियेनंतर जे अंतिम घटक तयार होतात ते कार्सिनोजेनिक (Carcinogenic) म्हणजेच कर्करोगास आमंत्रण देतात.
याउलट ज्या आहारामध्ये खूप प्रमाणात फळे, भाज्या, पालेभाज्या व फायबरयुक्त पदार्थाचा समावेश असतो (उदा. भारतीय चौरस आहार) त्या देशात/त्या व्यक्तींना हा कर्करोग होण्याची शक्यता कमी असते.
मोठय़ा आतडय़ातील गाठी-पॉलिप्स (Polyps)
या गाठी (पॉलिप्स) बऱ्याचदा कर्करोगाच्या नसल्या तरी काही वर्षांनी पुढे जाऊन त्याचे रूपांतर कर्करोगामध्ये होऊ शकते.
मोठय़ा आतडय़ाचे काही आजार
कोलायटिस (Ulcerative Colitis ), कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या मोठय़ा आतडय़ात खूप गाठी असणे, (Familiar Polyposis) हे आजार रुग्णांना अनेक वर्षे असतात. हे आजार ज्या रुग्णांना अनेक वर्षे असतात त्यांना मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग होण्याची शक्यता दसपटीने वाढते.
आनुवंशिकता व जनुकांचा प्रभाव :
कुटुंबामध्ये म्हणजेच रक्ताच्या नात्यामध्ये जर कुणाला मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग झाला असेल तर हा कर्करोग इतर व्यक्तींना होऊ शकतो. अशा व्यक्तींनी तसेच ज्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस (Ulcerative Colitis) १० वर्षांपेक्षा जास्त काळ असेल तर वर्षांतून एकदा सर्जनकडून वा दुर्बिणीद्वारे मोठय़ा आतडय़ाची तपासणी करणे आवश्यक असते.
या कर्करोगाची लक्षणे
* थकवा, अशक्तपणा
* शौचाला जाण्याच्या सवयींमध्ये बदल होणे म्हणजे जी व्यक्ती रोज सकाळी शौचास जाते त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा शौचाला जायला लागणे वा दोन-चार दिवसांतून एकदा पोट साफ होणे
* शौचाला पातळ होणे किंवा बद्धकोष्ठाचा त्रास सुरू होणे
* शौच पहिल्यापेक्षा अरुंद होणे
* शौचावाटे रक्त जाणे
* वजन घटणे, पोटात दुखू लागणे वा पोट फुगल्यासारखे वाटणे.
मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाची लक्षणे आजार सुरू झाल्यानंतर बऱ्याच काळानंतर जाणवायला लागतात. कर्करोग पोटात कुठल्या भागात आहे, यावरून लक्षणे बदलू शकतात.
कर्करोगाची गाठ जर उजव्या बाजूला आतडय़ात असेल तर हे आतडे मोठे असल्याने कॅन्सरची गाठ खूप मोठी झाल्याशिवाय त्रास सुरू होत नाही. त्यामुळे हा आजार फार उशिरा लक्षात येतो. या कर्करोगामध्ये बराच काळ शौचावाटे रक्त जाऊन त्या रुग्णामध्ये अनेमिया (रक्त कमी होण्याची) लक्षणे म्हणजेच थकवा, दम लागणे ही लक्षणे दिसतात.
तपासण्या कोणत्या कराव्यात?
रुग्णास जेव्हा मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग असण्याची शक्यता वाटते तेव्हा पुढील तपासण्या कराव्यात.
* कोलोनोस्कोपी (Colonoscopy)- यामध्ये एक नळी (दुर्बीण) शौचाच्या जागेमधून मोठय़ा आतडय़ापर्यंत आत टाकली जाते व आतडे आतून पूर्णपणे पाहून घेतले जाते. काही संशयास्पद आढळल्यास वा पॉलिप्स आढळल्यास ते काढून बाहेर घेतले जातात व पॅथॉलॉजिस्टकडून कॅन्सरसाठी तपासून घेतले जातात.
* सीटी स्कॅन – आतडय़ाचा कॅन्सर कुठे व किती पसरलाय हा तपास केला जातो.
* बा एनिमा (Ba Enema) – बेरीयम नावाचे पांढरे औषध एनिमाद्वारे मोठय़ा आतडय़ात टाकून एक्स-रे काढणे. दुर्बिणीच्या तपासामुळे हल्ली याची आवश्यकता कमी पडते.
काय खबरदारी घ्यावी?
* योग्य आहार घ्यावा, ज्यात पालेभाज्या, सलाड, तंतुमय पदार्थ म्हणजे कोंडा न काढता केलेल्या चपात्या, पॉलिश न केलेले तांदूळ वगैरे अन्न घ्यावे, चरबीयुक्त पदार्थाचे प्रमाण कमी करावे, जसे की तेल, अंडी, मटण, चीज, बटर.
* पन्नाशीनंतर प्रत्येकाने दरवर्षी किंवा शौचाच्या सवयीत बदल झाल्यास आपले शौच तपास करून त्यातून रक्त जात नाही ना हे पाहावे तसेच शौचाची जागा आतून तपासून घ्यावी.
* कॅन्सर रुग्णाच्या फॅमिलीमध्ये कुणी संशयास्पद असेल तर त्याच्या रक्त, लघवी, शौचाचा तपास करून घ्यावा. सोनोग्राफी, एन्डोस्कोपी, तपास जरुरीप्रमाणे करून घ्यावे.
उपाययोजना
योग्य उपाययोजना जर योग्य वेळेत झाल्या तर मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचे रुग्ण अनेक वर्षे चांगले राहू शकतात, म्हणूनच कर्करोगाचे लवकर निदान हे महत्त्वाचे ठरते,
शस्त्रक्रिया : मोठय़ा आतडय़ाचा खराब झालेला भाग काढून टाकणे, हीच सर्वात चांगली उपाययोजना. कर्करोगाच्या दोन्ही बाजूंचा पाच-दहा सेंमी भाग काढून ते पुन्हा जोडले जाते. मोठय़ा आतडय़ाच्या आजूबाजूचा भागही काढला जातो. जर आजूबाजूचे अवयव या कर्करोगाला अडकलेले असतील तर तेही शक्य असल्यास काढले जातात. सर्वसाधारणत: मोठय़ा आतडय़ाच्या कर्करोगाचे उपाय केल्यानंतर रुग्ण जगण्याची शक्यता चांगली असल्यामुळे मोठय़ा शस्त्रक्रिया केल्या जातात. यकृत/फुप्फुस हेही कर्करोगामुळे ग्रस्त झाले असल्यास त्याचा भाग काढून रुग्णास वाचवता येते. अगदी पुढे गेलेल्या कर्करोगावर शस्त्रक्रिया करता येत नाही.
केमोथेरपी (Chemotherapy)- आज अनेक नवीन औषधे बाजारात उपलब्ध आहेत. ही औषधे वापरून कर्करोगाची गाठ कमी करता येते. यामुळे मोठय़ा गाठी काढणे सुकर होते. तसेच शस्त्रक्रिया केल्यानंतर थोडासा आजार बरा करता येतो. ही औषधे जरी महाग असली तरी त्याचा चांगला परिणाम होतो. परंतु कुठल्याही कर्करोगाच्या औषधांप्रमाणे याचेही शरीरावर अनावश्यक परिणाम होतात. त्यामुळे काळजी बाळगणे आवश्यक असते. (समाप्त)
मोठय़ा आतडय़ाचा कर्करोग
मोठे आतडे म्हणजे आपल्या अन्नपचन संस्थेच्या सर्वात शेवटचा नळीसारखा अवयव.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
आणखी वाचा
First published on: 25-12-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व कशासाठी? पोटासाठी! बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big colon cancer