काश्मीर म्हटलं की आपल्याला आठवते ती काश्मीरला दिलेली भूतलावरचं नंदनवन ही उपमा. या नंदनवनाची सैर अनुभवणारं कथन-

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मी एक सेवानिवृत्त प्राध्यापक. आयुष्यात दोन छंद कटाक्षाने जोपासत आहे. पर्यटन आणि छायाचित्रण. पर्यटक म्हणून अर्धा भारत पाहून झाला. स्वर्गाची भटकंती करायची खूप इच्छा होती. (म्हणजे धरतीवरील स्वर्गाची.. अर्थात आपल्या काश्मीरची बरं! भलती शंका मनात आणू नका). काश्मीरला कोणत्या ऋतूत जावं याबाबत संभ्रम होता. बऱ्याच जणांच्या सांगण्यावरून मार्च ते ऑगस्ट हा कालावधी काश्मीरला जाण्यासाठी उत्तम असल्याचे कळले. वास्तविक पाहता काश्मीरची प्रत्येक ऋतूची आपली आगळीवेगळी खासियत आहे. शरद ऋतूत रंगीबेरंगी फुलंच फुलं, ग्रीष्म ऋतूत हिरव्याकंच गवताची कुरणं आणि वसंत ऋतूत पांढऱ्याशुभ्र चकाकणाऱ्या बर्फाच्या रांगा. आम्ही जून महिन्यात जाण्याचा बेत आखला. काही नातेवाईक आणि मित्रांच्या १० जोडय़ा असा जत्था तयार झाला. सर्व जण ज्येष्ठ नागरिक. नासिक येथील माझ्या मित्राची ट्रॅव्हल कंपनी आहे. त्यासोबत जायचं ठरल्यामुळे बाकी काही टेन्शन नव्हतं. तीन महिने आधीच सर्व बुकिंग झालं होतं. २ जून ते १४ जून हा सहलीचा कालावधी होता.
२ जून रोजी रात्री सर्व जण मुंबई सेन्ट्रल स्थानकाहून रवाना झालो. जयपूरमार्गे ४ तारखेला सकाळी जम्मूला पोचलो. नाश्ता करून तीन तवेरा गाडय़ांतून श्रीनगरकडे कूच केले. अंतर अंदाजे ३०० कि.मी. प्रवास डोंगरदऱ्यांतून असल्यामुळे पोचायला रात्रीचे आठ वाजले. एवढा प्रवास असला तरी आजूबाजूच्या अप्रतिम सृष्टिसौंदर्यामुळे थकवा जाणवला नाही. उकाडा खूप होता. पण २.५ कि.मी. लांबीचा जवाहर बोगदा ओलांडला नि वातावरणात एकदम गारवा जाणवू लागला. चिनार, देवदार, पाइनचे वृक्ष, फेसाळलेल्या पाण्याचे प्रवाह, तांदळाच्या शेतीची हिरवीगार खाचरं दिसू लागली आणि काश्मिरात पोचल्याची जाणीव झाली. श्रीनगरला पोचलो, हॉटेलमध्ये गेलो, खोल्यांचा ताबा घेतला, थोडा वेळ आराम केला. तोवर जेवण तयार झाले होते. जेवण घेतले आणि पुढच्या पाच दिवसांच्या सहलीचे स्वप्न रंगवत झोपी गेलो.

काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरला पूर्वेकडील व्हेनिस म्हणतात. झेलम नदीच्या दोन्ही तीरांवर वसलेल्या श्रीनगरचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात दल सरोवर आणि त्यातील हाऊस बोटी आणि शिकारे. जवळपास ६० चौ.कि.मी.चा परिसर असलेल्या या सरोवरात शेकडो बोटी आणि शिकारे आहेत. रस्त्यावरून त्यांचे मनोहारी दृश्य बघायला मिळते. सकाळी नाश्ता करू आम्ही शिकारा रायडिंगसाठी निघालो. शिकारात बसलो आणि मला आमच्या काळातील काश्मीर की कली, आरजू हे चित्रपट आठवले. सरोवरात थोडे आत गेलो आणि आमच्या मागे लागले शिकाऱ्यातून व्यापार करणारे व्यापारी. या शिकाऱ्यातून हस्तकलेच्या वस्तू, बदाम, अक्रोड, केसर, गालिचे, शाली हे सर्व काही विकले जाते. ती तरंगती दुकानंच होत. आधुनिक भाषेत त्याला मोबाइल मार्केट म्हणतात. सुमारे दोन तास शिकाऱ्यात बसून सैर केली. एका हाऊस बोटमधील दुकानात खरेदी केली. जेवणासाठी परतलो, थोडा आराम केला आणि नंतर शंकराचार्य टेकडीवर गेलो. तेथून संपूर्ण श्रीनगरचे विहंगम दृश्य दिसते. नंतर खाली येऊन मोगलकालीन निशात बाग, नसीम बाग, शालिमार बाग पाहिल्या. काश्मिरी वेश परिधान करून फोटो काढून घेतले. तोवर सूर्यास्त झाला आणि आम्ही हॉटेलवर परतलो.
श्रीनगरनंतरचे आकर्षण होते सोनमर्ग. सोनमर्गचा अर्थ सोन्याचा गालिचा. सोनमर्ग म्हणजे लडाखचं प्रवेशद्वार. तिथून बालतालमार्गे अमरनाथला जाता येतं. बर्फात खेळण्याचा आनंद घ्यायचा असेल तर सोनमर्गला जायलाच हवं. श्रीनगरपासूनचा ९० कि.मी.चा प्रवास डोळ्यांचे पारणे फेडणारा. फर, पाइनचं जंगल, झेलम नदी, गवताळ कुरणं, काय काय आणि कुठे कुठे पाहावं, सारंच अप्रतिम, नयनरम्य. शक्य तेवढं डोळ्यात साठवलं आणि बाकी सर्व माझ्या गळ्यातला ताईत असलेल्या निकॉनमध्ये. सोनमर्ग जसं जसं जवळ येत होतं तसतसं थाजीवास ग्लेशियरवरील बर्फ आम्हाला खुणवीत असल्याचा भास होत होता. सोनमर्गला पोचलो आणि लगेच तेथून ४-५ कि.मी. अंतरावर असलेल्या ग्लेसिअरवर जाण्यासाठी जीपने निघालो. जवळ पोचलो, पण आमचे दुर्दैव आड आले. अचानक जोराचा पाऊस सुरू झाला आणि आमचे स्वप्न धुळीस मिळाले. बर्फाच्छादित पर्वतरांगा खूप जवळून पाहिल्या, एवढंच समाधान बाळगून खिन्न मनाने श्रीनगरला परतलो.
श्रीनगरपासून ५० कि.मी. अंतरावर असलेलं गुलमर्ग काश्मीरमधलं एक अतिशय लोकप्रिय हिल स्टेशन. जगातील सर्वात उंचीवरील केबल कार तिथे आहे. त्या कारमधून आम्ही ७ मिनिटांत खिलनमार्गला पोचलो. तेथील बर्फाच्छादित पर्वत पाहून डोळ्यांचे पारणे फिटले आणि साक्षात स्वर्गात आल्याचा आनंद झाला. तिथून खालचे अप्रतिम दृश्य दिसत होतं. पाइन, देवदारचे उंचच उंच वृक्ष, गोल्फचं मैदान, सारं काही लाजवाब. आज तर सूर्य देव आमच्यावर प्रसन्न होते. घोडय़ावर बसून ग्लेशिअरजवळ गेलो, यथेच्छ खेळलो. परत जायची इच्छा होत नव्हती, पण नाइलाज होता. तिथली दृश्यं डोळ्यात आणि आठवणी मनात साठवून श्रीनगरच्या दिशेने कूच केले. वाटेत सफरचंद आणि चेरीच्या बागा पाहिल्या.
पहलगाम म्हणजे नंदनवनातला स्वर्ग. सगळं काश्मीर एका बाजूला आणि पहलगाम एका, एवढं सुंदर आहे पहलगाम. इथल्या सौंदर्याचं वर्णन करता येईल असा एकही शब्द शब्दकोशात सापडणार नाही. लीडर आणि शेषनाग नद्यांच्या संगमावर वसलेलं, चित्रपटसृष्टीवाल्यांचं आवडतं पहलगाम म्हणजे निसर्गाचा अनोखा आविष्कार. तेथे गेल्यावर ‘खुदा जब आसमां से इस जमीं पर देखता होगा, मेरे मेहबूब को किसने बनाया सोचता होगा’ हे गाणं आठवलं. अमरनाथला जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची पहिली पायरी येथून १२ कि.मी. अंतरावरील चंदनवाडी येथे आहे आणि तिथे जाण्यासाठी लागणार हे पहिलं गाव, म्हणून पहलगाम. चंदनवाडीपर्यंतचा प्रवाससुद्धा चित्तथरारक. छोटासा वळणावळणाचा रस्ता, एका बाजूला उंचच उंच पर्वत, तर दुसऱ्या बाजूला खोलच खोल दरी, दरीतून वाहणारी नदी आणि भोवतालचा हिरवागार निसर्ग.. खरंच, नंदनवन म्हणजे काय ते इथे आल्यावर कळलं. इथल्या बर्फावरसुद्धा खेळण्याचा कालसारखाच, बहुधा त्यापेक्षा जास्त आनंद घेतला. काल काही जण बर्फावर आले नव्हते, त्यांना आज मोह आवरता आला नाही, ते पण आज सहभागी झाले. सर्वच्या सर्व वीस जण आपलं वय विसरून, देहभान विसरून बर्फावर खेळलो. परत येते वेळी बेताब व्हॅलीचं विहंगम दृश्य पाहिलं. इथं बेताब या चित्रपटाचं शूटिंग झालं, तेव्हापासून हे नाव पडलं. त्यानंतर आरू व्हॅली. इथे कर्माचं शूटिंग झालं होतं. घोडय़ावरून फेरफटका मारला. जेमतेम दोन फुटांचा रस्ता, पण त्यावरून घोडा अत्यंत सफाईदारपणे वर चढत होता. पण खाली पाहिलं तर मात्र काळजाचा थरकाप होत होता. मी तर चक्क डोळे मिटले होते. काश्मीरची ही चार प्रमुख पर्यटन स्थळं पाहून झाल्यावर आम्ही गेलो जम्मू, कटरामार्गे वैष्णोदेवीला. तेथून अमृतसरला आणि अमृतसरहून आपापल्या घरी सुखरूप येऊन पोचलो.
आम्ही सर्व जण तर स्वर्गसुख घेऊन आलो. आता काश्मीर वाट पाहतोय तुमची. तर मग ठरवा काश्मीरचा बेत आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत आणि घेऊन या स्वर्गसुख.