कौटिल्याने सांगितलेली राजनीतीची तत्त्वं आणि शिवाजी महाराजांचं राजकारण यात खूप साम्यस्थळं आढळतात. काय होती कौटिल्याने सांगितलेली राजनीतीची नेमकी तत्त्वं? पेशवाईत त्यांचे संदर्भ कसे सापडतात?

शामाशास्त्रींना १९०९ मध्ये ‘कौटिल्याचा अर्थशास्त्र’ ग्रंथ उपलब्ध होईपर्यंत अंधारात असलेल्या या ग्रंथाचा अभ्यास प्राचीन काळी तरी होत होता का, कोणत्या राजांनी तो केला होता, असे प्रश्न मनात येतात. या प्रश्नांची उत्तरे शोधायची तर आपल्याला साहित्यातील संदर्भ तपासावे लागतात.
विष्णुशर्मारचित पंचतंत्र
कौटिल्य आणि त्याचा ग्रंथ याविषयीचा सर्वात प्राचीन संदर्भ पंचतंत्रात येतो. विद्वानांच्या मते पंचतंत्राचा काळ इस पूर्व दुसरे शतक मानला जातो. अमरशक्ती राजाच्या उनाड मुलांना राजनीती शिकवण्यासाठी पंचतंत्र या ग्रंथाची निर्मिती झाली. ग्रंथारंभी राजनीतीतील पूर्वी होऊन गेलेल्या मनू इत्यादी आचार्याना वंदन केले आहे. त्यात विष्णुशर्मा म्हणतो,
मनवे वाचस्पतये शुक्राय पराशराय ससुताय।
चाणक्याय च विदुषे नमोऽस्तु नयशास्त्रकर्तृभ्य:।।
याचा अर्थ पंचतंत्रापर्यंत चाणक्य ही वंदनीय व्यक्ती झाली होती. या मंगलाचरणाशिवाय पंचतंत्रात कौटिल्याविषयी व कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’विषयी संदर्भ सापडतात.
पंचतंत्राच्या शेवटच्या ‘अपरीक्षितकारक’ तंत्रात मत्स्यमंडूक कथेच्या सुरुवातीला बुद्धिमतांना अगम्य असं काही नाही हे सांगण्यासाठी शस्त्रधारी नंदाला आपल्या बुद्धीच्या जोरावर चाणक्याने ठार केल्याचा उल्लेख आहे.
याच तंत्रात ‘चंद्रभूपती’ कथेमधील वानरांच्या नायकाने औशनस, बार्हस्पत्य व चाणक्य यांच्या नीतीचा अभ्यास केलेला विद्वान होता, असे कौतुक गायले आहे.
याशिवाय कौटिल्याने सांगितलेले मंत्राचे पाच प्रकार व पंचतंत्रातील प्रकार शब्दश: जुळतात,
कौटिल्याच्या मते कर्मणामारम्भोपाय:, पुरुषद्रव्यसंपद्, देशकालविभाग:, विनिपातप्रतिकार: कार्यसिध्दिरिति पञ्चङ्गो मन्त्र: (१.१५.४२)। तर पंचतंत्रात अगदी त्याच शब्दांत विष्णुगुप्त सांगतो,
पञ्चविधो हि मन्त्र: – कर्मणामारम्भोपाय:, पुरुषद्रव्यसंपत्, देशकालविभाग:, विनिपातप्रतिकार:, कार्यसिद्धिश्चेति। (मित्रभेद – ४११)
दंडीचे दशकुमारचरित
दहा राजकुमारांवर रचलेल्या या कथेत दंडी प्रारंभीच दहा कुमारांना मौर्यासाठी विष्णुगुप्ताने रचलेल्या सहा हजार लोकांनी युक्त अशा दंडनीतीचा अभ्यास करण्यास सांगतो.
पुढे एका ठिकाणी तो म्हणतो, ‘‘सत्यमाह चाणक्य चित्तज्ञानानुवर्तिनोरऽनर्थ्यां अपि प्रिया: स्यु:। दक्षिणा अपि तद्भावबहिष्कृता द्वेष्या भवेयु:’’म्हणजे राजाचे मन जाणलेले लोक अयोग्य असले तरी त्याला प्रिय होतात. त्याची मर्जी नसेल तर त्याने दिलेली दक्षिणासुद्धा त्याजली पाहिजे, तिचा द्वेष केला पाहिजे.
तर ‘अर्थशास्त्रा’त कौटिल्य म्हणतो, ‘‘अप्रिया अपि दक्ष्या: स्युस्तद्भावे बहिष्कृता:। अनर्थ्यांश्च प्रिया चित्तज्ञानानुवर्तिन:।’’ म्हणजे दोघांच्या शब्दांत केवळ पुढे-मागे, अर्थ मात्र तोच.
पैशाच्या अपहाराविषयी कौटिल्याचे मत मांडताना दंडी म्हणतो, ‘‘चत्वारिंशतं चाणक्योपदिष्टानाहरणोपायान्।’’
तर चाणक्याचे शब्द आहेत, ‘‘तेषां हरणोपाय: चत्वारिंशत्.।’’ जे करायचे नाही ते केले, जे करायचे ते केले नाही, थोडेच काम झाले असता पुष्कळ झाल्यासारखे दाखवणे असे भ्रष्टाचाराचे चाळीस प्रकार कौटिल्याने सांगितले आहेत आणि त्यांचाच उल्लेख दंडीने केला आहे.
कामंदकीय नीतिसार
कामंदक स्वत:ला कौटिल्याचा शिष्य मानतो. त्यामुळे त्याच्या ‘नीतिसार’ या ग्रंथाच्या प्रारंभी आपल्या गुरुकार्याला शब्दबद्ध करताना तो आपल्या गुरूची तुलना इंद्र, ब्रह्मा यांच्याशी करतो. त्याच्या मते इंद्राप्रमाणे अभिचार नावाच्या तेजस्वी वज्राने (वज्र – इंद्राचे आयुध किवा शस्त्र) आणि वासवी शक्ती धारण करणाऱ्या विष्णुगुप्ताने एकटय़ाने वैभवशाली असा पर्वतप्राय असा नंदवंश समूळ नष्ट केला. ही पृथ्वी सर्व राजांमध्ये चंद्राप्रमाणे शोभून दिसणाऱ्या चंद्रगुप्ताकडे सोपवली. त्यानंतर सर्व नीतिशास्त्रांचा अभ्यास करून ’अर्थशास्त्रा’चे अमृत निर्माण केले, अशा त्या विष्णुगुप्तरूपी ब्रह्मदेवाला मी वंदन करतो.
कामंदकाने कौटिल्याच्या ब्रह्मदेवाशी केलेल्या तुलनेला वेगळे महत्त्व आहे. ब्रह्मदेव हा निर्मितीचा देव आहे. केवळ विध्वंस करणे योग्य नाही, पुन्हा निर्माणाची क्षमता असेल त्यालाच नष्ट करण्याचा अधिकार असतो. केवळ नंदवंशाला नष्ट करणे एवढेच ध्येय कौटिल्याने ठेवले नाही, कारण ‘शासनरहित राज्यव्यवस्था अराजक निर्माण करते,’ याची जाणीव कौटिल्याला होती. दुष्ट व्यवस्था जाऊन तेथे सुष्ट शासन आणण्याची जबाबदारी कौटिल्याने मान्य केली होती, त्यामुळे कौटिल्याने प्रजेला त्रासदायक ठरलेला नंदवंश नष्ट केला आणि त्यानंतर चंद्रगुप्तासारख्या योग्य व्यक्तीच्या हाती राज्य सोपवून एक नवी सुव्यवस्था निर्माण केली.

विशाखदत्ताचे ‘मुद्राराक्षस’
विशाखदत्ताने इ.स.च्या सहाव्या ते आठव्या शतकाच्या आसपास कधीतरी लिहिलेले संपूर्णपणे चाणक्याला वाहिलेले ‘मुद्राराक्षस’ नाटक. चाणक्याला खऱ्या अर्थाने ‘कौटिल्य’ या नावाने विख्यात करण्याचं कर्तृत्व विशाखदत्ताकडे जातं. संपूर्णपणे कौटिल्याच्या राजनीतीला वाहिलेल्या या नाटकाच्या प्रारंभी प्रस्तावनेत सूत्रधार-नटीमध्ये चंद्राला लागलेल्या ग्रहणावरून संवाद सुरू आहे. ग्रहणाच्या उपशमनासाठी नटीने ब्राह्मणभोजनाची योजना केलेली आहे. त्यांच्यातला हा संवाद पडद्यामागे कुणाच्या तरी कानावर पडतो आणि तो विचारतो, ‘‘आ: क एष मयि स्थिते चंद्रम् अभिभवितुम् इच्छति।’’ मी इथे उभा असताना चंद्राला ग्रासण्याची कोणाची शामत आहे? हे शब्द कानावर पडताच ‘पृथ्वीवर उभा राहून आकाशस्थ चंद्राचे ग्रहण दूर करणारा हा कोण शहाणा?’ या कल्पनेने नटीला हसू येते. तेवढय़ात पुन्हा तेच शब्द कानावर येतात ‘‘आ: क एष मयि स्थिते चंद्रगुप्तम् अभिभवितुम् इच्छति।’’ पण या वेळी त्या वाक्यात चंद्र याऐवजी चंद्रगुप्तं असा बदल झालेला असतो आणि तो ऐकून सूत्रधाराच्या हे दर्पोद्गार काढणारी व्यक्ती लक्षात येते. तो आपल्या पत्नीला सांगतो, ‘‘कुटिलमति: स एष येन क्रौधाग्नौ प्रसभमदाहि नन्दवंश:।’’ अग हाच तो कुटिलमती ज्याने आपल्या क्रोधाग्नीत नंदवंश जाळून टाकला. विशाखदत्ताच्या या वाक्याने चाणक्य ऊर्फ विष्णुगुप्ताला खऱ्या अर्थाने इतिहासात ‘कुटिलमती कौटिल्य’ म्हणून विख्यात केले.
‘मुद्राराक्षसा’च्या ह्य लेखकाचा ‘अर्थशास्त्रा’चा प्रगाढ अभ्यास जागोजागी दिसून येतो. ‘अर्थशास्त्रा’तील शब्द किंवा सूत्र अगदी जशीच्या तशी विशाखदत्ताने वापरलेली दिसतात.
हे नाटक चाणक्य व राक्षस या दोन महामात्यांनी एकमेकांविरुद्ध खेळलेल्या रहस्यमय खेळी आणि प्रतिखेळींवर आहे. दोघांचेही गुप्तहेर संपूर्ण नाटकभर तांडव करत आहेत. ‘अर्थशास्त्रा’त चाणक्याने गुप्तहेरांचं महत्त्व आणि वर्गीकरण अत्यंत पद्धतशीरपणे केले आहे आणि त्याचा नेमका उपयोग विशाखदत्ताने आपल्या नाटकात करून घेतला आहे. चाणक्याने गुप्तहेरांचे संस्था आणि संचारी असे वर्गीकरण केले आहे. या संस्थेत कापटिक, उदास्थित, गृहपतिक, वैदेहक आणि तापसव्यंजन या गुप्तहेरांचा तर संचारीमध्ये सत्री, तीक्ष्ण, रसद, भिक्षुकी यांचा समावेश होतो. हेरांना विविध भाषा, आचार व वेश घेता आले पाहिजेत हा पहिला नियम. ‘मुद्राराक्षस’ नाटकात जवळपास सर्वच हेर असून कुणी यमपट दाखवणारा आहे, कुणी साप खेळवणारा आहे, कुणी वृद्ध तपस्वी आहे, कुणी वैद्य आहे, कुणी सुतार आहे तर कुणी माहूत. आपल्या वेशानुसार त्यांचे आचरण, भाषा धारण करून अत्यंत महत्त्वाची कार्ये त्यांनी पार पाडली आहेत. वर उल्लेखिलेला रसद हा ‘अर्थशास्त्रा’तील ‘औषध देणारा’ म्हणजेच प्रसंग पाहून शत्रू राजाला विष देऊन ठार मारणारा वैद्याच्या वेशातील गुप्तहेर असतो. नाटकात अभयदत्त हा राक्षसाने चंद्रगुप्ताला मारण्यासाठी नियुक्त केलेला निष्णात वैद्य आहे. पण दुर्दैवाने चाणक्याच्या जागरूकतेने चंद्रगुप्ताऐवजी अभयदत्तच मरतो आणि ते वृत्त ऐकल्यावर राक्षस, ‘‘अहो महान्विज्ञानराशिरुपरत:।’’ अरेरे, महान ज्ञानराशी नष्ट झाली असा दु:खोद्गार काढतो.
क्षपणक हा दुसरा गुप्तहेर जो तापस प्रकारचा आहे. ‘अर्थशास्त्रा’च्या बाराव्या अधिकरणातील पाचव्या प्रकरणात तळघरं, भुयारं, भिंतीतील गुप्तस्थानं यांचा उपयोग करून शत्रूचा वध कसा करावा याची विस्तृत चर्चा आहे. तर ‘मुद्राराक्षसा’त चंद्रगुप्ताच्या शयनगृहाच्या भिंतीतील गुप्तस्थानात त्याला ठार मारण्यासाठी लपलेल्या गुप्तहेरांना शोधून चाणक्य कसे ठार मारतो ते सारेच भयंकर आहे. याशिवाय विविध वेशांतील संचारी गुप्तहेरांचा उपयोग दोन्ही पक्षांनी खूप मोठय़ा प्रमाणावर केला आहे.
‘अर्थशास्त्रा’तील दुसऱ्या भागातील चौतिसाव्या मुद्राध्यक्ष प्रकरणांत परवाना, आजच्या भाषेतील पासपोर्टचे नियम दिले आहेत. एका जनपदांतून दुसऱ्या जनपदात जाताना मौर्यकाळी असा परवाना घ्यावा लागत असे, तो नसेल तर बाहेर जायची संमती नसे. ‘अर्थशास्त्रा’तील या सगळ्या नियमांचा सुयोग्य उपयोग विशाखदत्ताने राक्षसाच्या युद्धछावणीतील प्रवेशासाठी किंवा तेथून बाहेर पडण्यासाठी केला आहे.
‘अर्थशास्त्रा’तील पाचव्या अधिकरणाच्या चौथ्या ‘अनुजीविवृत्तम्’ म्हणजे नोकरांचे आचरण या अध्यायात, ‘लोकयात्राविद् राजानमात्मद्रव्यप्रकृतिसंपन्नं प्रियहितद्वारेणाश्रयेत्।’ अगदी शब्दश: या सूत्राचा उपयोग कुमार मलयकेतुच्या मनात राक्षसाबद्दल विष कालवण्यासाठी भागुरायण या चाणक्याच्या गुप्तहेराने केला आहे.
गुप्तहेरांसाठी कौटिल्याने एक महत्त्वाचा नियम सांगितला आहे, ‘न च अन्योन्यं संस्थास्ते वा विद्यु:’। (१.१२.१२) कोणत्याही ‘गुप्तहेरा’ला दुसऱ्याची माहिती असू नये. आणि मुद्राराक्षस नाटकातील गुप्तहेरांना शेवटपर्यंत कोण गुप्तहेर आहे आणि कोणासाठी काम करतोय त्याची गंधवार्तासुद्धा नव्हती. याचा अर्थ विशाखदत्ताने ‘अर्थशास्त्रा’तील गुप्तहेर खात्याचा अक्षरश: उपयोग करून घेतला आहे.
याशिवाय उपजाप, आभ्यन्तरकोप, बाकोप असे काही विशेष शब्द कौटिल्याने वापरले आहेत. ‘उपजाप’ म्हणजे ‘फितुरी घडवून आणण्यासाठी गुप्तपणे पसरवलेला अपप्रचार,’ असे ‘अर्थशास्त्रा’त सांगितले आहे. तर नाटकात, ‘चन्द्रगुप्तशरीरमभिद्रोग्धुमस्मत्प्रयुक्तानां तीक्ष्णरसदायिनामुपसंग्रहरथ परकृत्य उपजापरथ च महता कोशसंचयेन स्थापित: शकटदास:’। म्हणजे चंद्रगुप्ताला ठार मारण्यासाठी नेमलेल्या तीक्ष्ण, रसद या गुप्तहेरांना आर्थिक साहाय करण्यासाठी व चंद्रगुप्ताविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी राक्षसाने कुसुमपुरात आपली माणसं पेरून ठेवलेली आहेत. असे अनेक संदर्भ नाटकात दिसतात. त्यावरून नाटककाराच्या ‘अर्थशास्त्रा’च्या अभ्यासाची सहज कल्पना येते.
पेशवेकालीन संदर्भ
प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी ‘अर्थशास्त्रा’चा अभ्यास केला होता का याला अजून तरी लिखित पुरावा उपलब्ध नसला तरी पेशवाईत चाणक्याचा अभ्यास होत होता असा स्पष्ट पुरावा उपलब्ध आहे. मराठी रियासतीच्या चौथ्या खंडात पृष्ठ अठ्ठावीस येथे बाळाजी बाजीरावांनी रघुनाथरावांच्या अभ्यासाविषयी चौकशी करण्याकरता उदयपुराहून दिल्लीला जाताना वाटेत कुठूनतरी पत्र लिहिले आहे. त्यात वजनी, कैली, बराबर ह्य गणिती विषयांबरोबर फावल्या वेळात विराटपर्वापासून पुढे महाभारताचे वाचन नियमाने करण्यास सांगितले आहे. त्यातच रघुवंश, विदुरनीती व चाणक्य यांचे नेमपूर्वक चिंतन करण्याची सूचना केली आहे.
यातील रघुवंश हे काव्य असले तरी ती काव्याच्या मधुर रसात घोळवलेली राजनीतीची कडू गोळी आहे. तर विदुरनीती ही स्पष्टपणे राजनीती आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो चाणक्याचा. साडेतीनशे वर्षांपूर्वी चाणक्य नियमित अभ्यासला जात होता ही गोष्ट वरील पत्रावरून लक्षात येते. पण ह्य चाणक्याच्या नावे ‘चाणक्यनीती’, ‘चाणक्यसूत्राणि’ व ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ असे तीन ग्रंथ आहेत. यातील कोणत्याही ग्रंथाच्या उल्लेखाऐवजी केवळ चाणक्य म्हटल्याने संभ्रम निर्माण होतो. यासाठी आपण एकेका ग्रंथाचा विचार करणार आहोत.
‘चाणक्यनीती’ ही वेगवेगळ्या ग्रंथांतून गोळा केलेल्या श्लोकांचे संकलन आहे. त्यामुळे तिचा रचयिता कौटिल्य नाही. ‘चाणक्यनीतीसूत्र’ ही ‘कौटिलीय अर्थशास्त्रा’वर बेतलेली आहेत आणि ‘कौटिलीय अर्थशास्त्र’ हे स्वत: चाणक्याने रचलेले आहे. त्यामुळे यातील कुठल्याही ग्रंथाचा अभ्यास झाला तरी तो ‘अर्थशास्त्रा’चाच अभ्यास होतो. पण शिवाजी महाराजांच्या राजनीतीचा अभ्यास करताना ‘अर्थशास्त्रा’तील सूत्रांचा पूरेपर उपयोग शिवाजी महाराजांनी केल्याचे स्पष्टपणे जाणवते. किंवा अधिक स्पष्टपणे सांगायचे तर कौटिल्याचे सूत्र व त्याबरहुकूम शिवाजी महाराजांची राजनीती अशी साम्यस्थळे भरपूर आढळतात. त्यांचाच अभ्यास आपण करणार आहोत.